गुरुवार, जुलै ३०, २००९

अवघा रंग एकचि झाला

काल बरेच वर्षांनी नाटक पाहिला गेलो. शेवटचं नाटक पाहिलं होतं सही रे सही. त्यानंतर, तब्बल पाच वर्षांनी हे नाटक पाहिलं. अवघा रंग एकचि झाला. ह्या नाटका बद्दल अनेक जणांकडून चांगलं ऐकलं होतं, त्यामुळे ते बघावसं वाटत तर होतं. त्यात, झी मराठी वर अमोल बावडेकर ने सादर केलेलं "रंग रंग, पांडुरंगी रंग रंग", हे गाणं ऐकून माझी हे नाटक बघायची इच्छा अजूनच तीव्र झाली. त्यात हे संगीत नाटक. आमच्या पिढीला संगीत नाटक कधी पाहायला मिळालं नाही. म्हणून एकदा संगीत नाटक कसं असतं हे पण बघायचं होतं. काल योग जुळून आल्याने, हे सगळं एकदाचं जमलं.

नाटकाबद्दल म्हणायचं तर, नाटक खूपच छान आहे. नाटकातली कीर्तनं आणि इतर गाणी सुद्धा अप्रतीम आहेत. नाटकाच्या कथेचा पाया जरी जुना असला (दोन पिढींच्या विचारां मधला फरक) तरी कुठे कुठे हा फरक दिसतो, हे मात्र बघण्या सारखं आहे. विशेष म्हणजे, संगीत नाटक असून देखील, ते गाण्यांनी गजबजलं नाहीये. नाटकातले अनेक विनोदी क्षण गंभीर वातावरणात थोडा दिलासा देऊन जातात. नाटकातील पात्रांचा अभिनय उत्तम आहे. प्रसाद सावकारां सारखे दिग्गज कलाकाराच्या जोडीला, स्वरांगी मराठे सारखी उगवती कलाकार पण आहे. पार सावकारांपासून ते स्वरांगी पर्यंत सर्व नटांनी आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. शिवाय, संगीत नाटक असल्याने गायन सुद्धा सुरेख असणे गरजेचे आहे. ह्या क्षेत्रातही सर्वांनी आपापली कामगिरी चोख बजावली आहे. अमोल बावडेकरला आपण सा-रे-ग-म-प आजचा आवाज, मधे ऐकलं आहेच. त्याचा गायनावर सुरेश वाडकरांची छाप आहे. विशेष म्हणजे, स्वरांगीचा आवाज सुद्धा अतिशय गोड आणि सुमधुरआहे. कठीण-कठीण-कठीण किती, ह्या गाण्यावर, स्वरांगीला वन्स मोर मिळाला, आणि तिने सुद्धा खिलाडू वृत्तीने पुन्हा एकदा त्या गाण्यातले एक पद म्हणून दाखवले.

नाटकाचा शेवट फक्त जरा घाई-गडबडीत केल्या सारखा वाटतो. म्हणजे कसं, मंगलाष्टकं जर लांबली, तर मुहूर्त चुकू नये म्हणून भटजींची कशी घाई होते, तसं ह्या नाटकातल्या शेवटा बद्दल वाटलं. पण नाटकाच्या शेवटाला, स्वरांगी आणि अमोल रंगमंचा वरून उतरून प्रेक्षकांमधे आले आणि सर्व नाट्यरसिकांचं अभिवादन स्वीकारलं. नाटकाचा शेवट करण्याची ही अभिनव पद्धत मला खूप आवडली.

दुसरं म्हणजे आमच्या आजी-आजोबां बरोबर संगीत नाटकाला दाद देणारी पिढी सुद्धा लोप पावल्या सारखी वाटली. कारण नाट्यगृहात, कुणीही गाण्याला टाळ्यांखेरीज इतर दाद देत नव्हतं. आता आम्ही असं ऐकलं आहे, की संगीत नाटकामधे दिग्गजांनी प्रत्येक गाण्याला वन्स मोर मिळवला आहे. ते त्यांचं कर्तृत्व आहेच, शिवाय त्या कलेची जाण असलेल्या प्रेक्षांचा सुद्धा त्यात वाटा आहे. ह्या नाटकातली बरीचशी गाणी वन्स मोर घेण्या सारखी होती, पण फक्त स्वरांगीच्या गाण्याला वन्स मोर मिळाला.

जाता-जाता एक सांगायला हरकत नाही. अमोल बावडेकर आणि माझं नातं लागतं. मला सारखं त्याला जाऊन भेटावसं वाटत होतं. पण ते जमेल असं दिसत नव्हतं. मी आणि सुशांत, परत ठाणे स्टेशनला चालत आलो. लोकल साठी उभे होतो, तेवढ्यात अमोल आणि जान्हवी पणशीकर सुद्धा त्याच लोकल साठी आले. सुशांत आणि मी अमोल्च्या मागून त्याच डब्यात शिरलो. ट्रेन मधे अमोलशी ओळख करून घेतली. ठाणे ते कांजूर, त्याचाशी १० मिनिटे गप्पा मारल्या. अमोल सुद्धा मन मोकळे पणाने बोलला. नातं असल्याने, एकमेकांना घरी येण्याचे आमंत्रण देण्यात आले. बघू आता तो कधी आमच्या घरी येतो ते. तो पर्यंत, तुम्ही पहायला विसरू नका- अवघा रंग एकचि झाला.

अवघा रंग एकचि झालाSocialTwist Tell-a-Friend

शुक्रवार, जुलै ०३, २००९

सरकारला फुकट आणि सामान्यांना फरफट

मंगळवारी वांद्रे-वरळी सागरी-पूलाचा शुभारंभ झाला. त्या पुलाचे नाव काय ठेवायचे, हे पण ठरले आणि त्यावर रास्त वादही झाला. मुंबईकरांना पाच दिवस पुल फुकट वापरायची मुभा सरकारने दिली. पण ह्या सगळ्या धांदलीत, ह्या पूलाचं बांधकाम कुणासाठी केलं आहे, ह्याचा मात्र विसर पडला. सामान्य माणसांना आपल्या कार्यालयात जायला सुविधा व्हावी, म्हणून ना पूल बांधला? की फक्त चार-चाकी धारक श्रीमंत नागरिकांसाठी? विद्यमान आमदार, खासदार, सरकारी नोकर आणि त्यांच्या गाड्या ह्या पूलावरून काहीही टोल न भरता फुकट जाऊ शकतात. रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या, ह्यांना टोल माफी समजण्याजोगे आहे. पण आमदार, खासदार ह्यांना का फुकट? आणि ते सुद्धा सदैव!

ज्या गाड्यांमुळे रस्त्यावर एवढी गर्दी झाली, वाहतुकीची गती मंदावली, त्या गाड्यांसाठी नव-नवीन पूल बांधून देण्यात येत आहे. पण सार्वजनिक वाहतुकीला सुधारण्यासाठी तोकडे आणि नाममात्र प्रयत्न चालू असल्याचं दिसतं. बेस्ट परिवहनने राज्य शासनाकडे ह्या सागरी पूलावर बस गाड्यांना आकारण्यात येणार्‍या टोल मधे सूट देण्यासाठीचा अर्ज केला. ती सूट मिळाली असता, तिकिटाचे शुल्क नाममात्र वाढवून ह्या सागरी मार्गावरून बेस्टला सेवा पुरविता आली असती. ही सूट किमान सामान्य गाड्यांना तरी देण्यात यायला पाहिजे होती. वातानूकुलित गाड्यांना नसती दिली तरी एकवेळ समजण्याजोगे आहे. पण सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमति विमल मुंदडांनी स्पष्टपणे सांगितले की बेस्टला कुठल्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही. त्यामुळे बेस्टला ह्या मार्गावरून बस सेवा पुरवायची झाली तर साधरण पणे ३-४ रुपयांनी तिकिटाचे दर वाढवावे लागतील. हे सामान्य जनतेला परवडण्यासारखं आहे का? गाडीधारक श्रीमंतांचा वेळ आणि पैसा वाचावा म्हणून का हा पूल बांधला?

ह्या उलट, इतर गाड्यांकडून जरा ज्यादा कर आकारून त्यातून मिळणारा निधी सरकारने बेस्टच्या सवलतीतली तूट भरून काढण्यासाठी वापरावा. पण तसं न करता सरकारने बेस्ट प्रवाश्यांना ह्या सागरी मार्गाच्या वापरापासून वंचित केलं आहे. त्या मिळणार्‍या करातून बेस्ट यंत्रणा अजून सक्षम करावी. जेणे करून लोकं स्वत:च्या गाडीचा वापर कमी आणि सार्वजनिक वाहतुकीचा अधिक प्रयोग करतील. सार्वजनिक वाहतुक जर सक्षम असेल तर गाड्या काढून रस्ते भरायला कोण येणार आहे?

असो हा ब्लॉग वाचणार्‍यांनी किमान एक काम करावं. वृत्तपत्रात एक पत्र पाठवावं. त्यात बेस्टला टोल मधे सवलत सरकारने द्यावी असा मजकूर लिहावा. एवढी सगळी पत्र बघून वृत्तपत्र त्याची बातमी नक्कीच करेल. निदान त्यातून तरी सरकार काहीतरी बोध घेईल, अशी आशा करुया. ह्या शिवाय बेस्टला ह्या मार्गावर सूट मिळण्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल, ते केलेत तरी उत्तम.
सरकारला फुकट आणि सामान्यांना फरफटSocialTwist Tell-a-Friend