सोमवार, मार्च १९, २००७

सूर्यग्रहण पाहिलेला माणूस: म्हणजे मी

काल (म्हणजे १८ मार्चला) संध्याकाळी वर्तमानपत्रात सूर्यग्रहणाची वेळ पाहिली आणि वाटलं की सकाळी सूर्यग्रहण बघावं. कारण अशी संधी पुन्हा कधी मिळेल सांगता येत नाही. म्हणजे सूर्योदय आणि सूर्यग्रहण एकत्र येणे खूप दुर्मिळ असेल. या संधीचा अजून एक फायदा असा की कोणत्याही अतिरिक्त साधनाशिवाय हे ग्रहण बघता येतं. तर ठरल्या प्रमाणे हर्ष आणि मी सकाळी-सकाळी IIT च्या मागच्या टेकडी वर साधारण पणे ६:४५ ला जाऊन पोहोचलो. माझ्याकडे नेहमी प्रमाणे कॅमेरा होताच. उजाडलं होतं, पण सूर्योदय झाला नव्हता. तेवढ्यात दोन-तीन जणं येताना दिसली. ते वर आले तर त्यातला एक आमच्या विभागाचा प्रवीण होता. त्याच्याशी थोडावेळ गप्पा झाल्या.


टेकडी वरून चोहीकडचं दृश्य एकदम छान दिसतं. पुर्वे कडे ठाण्याची खाडी लांबून दिसते. तिथून सूर्य उगवताना मस्त दिसतो. नाहीतर IIT मधे सूर्योदयाचे सुरवातीचे क्षण दिसत नाहीत. सूर्य डोंगराच्या वर आल्यावरच आम्हाला दिसतो. म्हणून ग्रहण बघण्यासाठी टेकडी वर जावं लागलं. तेवढ्यात सूर्य उगवताना दिसला. अर्ध-चंद्रासारखा, आज अर्ध-सूर्य पाहायला मिळाला. सूर्य असा दिसत होता जणू काही आज हनुमानाची सूर्य-फळ खायची इच्छा पूर्ण झाली. सूर्य उघड्या डोळ्यांनी बघेनासा होई पर्यंत थांबायचं ठरलं होतं. सूर्यग्रहणाची त्यामुळे अजून छायाचित्रं काढता आली. ही सकाळ पूर्णपणे ग्रहणमय होती. साधारण पणे ७:१५ वाजता सूर्यप्रकाश प्रखर झाला आणि ग्रहण बघायची विशेष साधनं नसल्यामुळे आम्ही खाली परत यायचं ठरवलं. ग्रहण साधारणपणे ७:४५ला सुटणार होतं.


एकंदरीत अमावस्येची समाप्ती आणि पाडव्याची सुरवात चांगली झाली. कुणाला वाटेल, ग्रहण पाहून कसली वर्षाची सुरवात करायची? यावर माझं म्हणणं असं आहे की हे ग्रहण पाहून देवाला प्रार्थना करा, की देवा, या पुढे जी काही ग्रहणं असतील ती पण या ग्रहणाबरोबर सुटून जाऊ दे आणि येणारं वर्ष निर्विघ्नपणे पार पडू दे. असो, तर आजच्या ह्या ग्रहण-दर्शनाने, मी पण सूर्य(ग्रहण) पाहिलेला माणूस झालो.
सूर्यग्रहण पाहिलेला माणूस: म्हणजे मीSocialTwist Tell-a-Friend

२ टिप्पण्या:

कोहम म्हणाले...

good work...keep it up..

Nandan म्हणाले...

surekh aalet photos. khaskaroon shevatacha photo mast aalay.