शुक्रवार, एप्रिल २४, २००९

घरगुती अपूर्वाई-भाग २

ह्या लेखाचा पुर्वार्ध येथे वाचायला मिळेल.
अमेरीकी दूतावासाच्या बाहेरचं दृश्य म्हणजे एक जत्राच असते. अनेक व्हिसाभिलाषी आणि त्यांचे नातेवाईक तिथे जमलेले असतात. आंत जाणारे असतात, त्यांना शुभेच्छा देताना बघावं. उमेदवार तरुण अथवा घरातला धाकटा असेल, तर तो मोठ्यांच्या पाय पडून त्यांचे आशिर्वाद घेतो. थोरले, धाकट्यांच्या शुभेच्छा घेऊन आंत शिरतात. हे शुभेच्छा आणि आशिर्वाद अशा प्रकारे दिले जातात, जणू काही ही उमेदवाराची सरो-की-मरो करणारी मुलाखत आहे. आंत जाणार्‍या लोकांच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा उत्साह असतो, एक उत्सुकता असते. ह्या द्राविडी-प्राणायामातून बाहेर पडल्यावर स्वप्नांच्या देशात (?) जायला मिळणार आहे. बरं, ही उमेदवार मंडळी आंत गेली की बाहेर उभ्या असलेल्या नातेवाईकांकडे वाट बघणे, ह्या शिवाय काही पर्याय नसतो. व्हिसाचं काम संपायला जवळ-जवळ २-३ तास लागतात. मी पण आई-बाबांची वाट बघत त्या दूतावासाच्या समोरच्या पदपथावर बसलो होतो.

सवयी प्रमाणे, माझं इकडे-तिकडे बघण्यात टाईम-पास चालू झाला. लोकं आपला वेळ घालवण्यासाठी काय-काय आणतात. सगळ्यात सोपं म्हणजे वर्तमान पत्र. पण इतरही बरेच टाईम-पास असतात, हे तिकडे गेल्यावर कळतं. मला वाटायचं की एका माणसाच्या व्हिसाला एवढी २-३ माणसं कशाला? पण ते खूप उपयोगी पडतात, अशा वेळेस. एका कुटुंबातली २-३ माणसं असतात. उमेदवार आंत गेला, की बरोबर आणलेली एक चादर त्या पदपथावर पसरतात आणि गप्पा कुटायला सुरवात! ते थेट उमेदवार मुलाखत संपवून येई पर्यंत. सोबत, आपण जणू काय सहलीला आलोय ह्या थाटात खायला-प्यायला अनेक पदार्थही घेऊन येतात आणि तोंडाचा हा व्यायाम पण चालू करतात. काही चतुर जणांनी आजू-बाजूची हॉटेल टंचाई लक्षात घेऊन तिकडेच खाण्या-पिण्याच्या (कदाचित बेकायदेशीर) टपर्‍या टाकल्या आहेत. एक सॅण्डविच वाला, एक चणे-शेंगदाणे वाला, एक कुल्फीवाला, एक पाणी वाला असे काही जणं तिथे आपला धंदा चालवतात. आणि त्यांचा धंदा चांगला चालतो.

जसा-जसा वेळ पुढे जातो, तसे-तसे एक-एक उमेदवार आपापल्या मुलाखती संपवून बाहेर निघतात. अनेकांच्या चेहर्‍यावर आनन्द असतो, तर काहींच्या चेहर्‍यांवर निराशा. ज्यांना व्हिसा मिळतो ते असा काही जल्लोष करतात जणू त्यांनी विश्व-करंडक जिंकलाय. बोर्डात मार्कं पडले असते, तरीही त्यांना एवढा आनन्द झाला नसता. रस्त्या पलीकडचे त्यांचे नातेवाईक पण ह्या जल्लोषात सामील होतात. आपल्याकडे कसं, भारतीय संघ टी-२० विश्व-करंडक जिंकून आला, तेव्हा त्या संघापेक्षा जास्ती आनन्द त्यांच्या चाहत्यांना झाला, तसं हे दृश्य असतं. म्हणजे संघ यायच्या आधीच जल्लोष चालू. तिथे नुसत्या उमेदवाराच्या चालीवरून लक्षात येतं की त्याला/तिला व्हिसा मिळाला आहे की नाही. "मिल गया" चा नुसता जय-घोष चालू होतो. तो (ती) आला(ली) की "काय मग पार्टी कधी?" पासून "काय प्रश्न विचारले? तू काय उत्तरं दिलीस?" वगैरे.

ह्या उलट व्हिसा नाकारलेला(ली) उमेदवार, आपले खांदे टाकून परत येताना दिसतो(ते). त्याला/तिला पाहताच, नातेवाईकांच्यात चर्चा सुरू, "काय झालं असेल?" तो/ती आला(ली) की प्रश्नांचा भडीमार. काय झालं? कशामुळे नाकारला? कोण होता मुलाखत घेणारा? ह्या शेवटच्या प्रश्नाचं बर्‍याच वेळा एकच उत्तर असतं. "हां तो, त्याचा बद्दल ऐकलं आहे. त्याचा कडे व्हिसा गेला की समजायचं. त्याने बर्‍याच लोकांचा व्हिसा नाकारलाय." त्यातले काही जणं मग म्हणतात, "जाऊ दे रे(गं) पुन्हा अर्ज करू."

ह्या अशा प्रकारचे जयघोष आणि शोक पाहून पदपथावर वाट बघत असलेला ह्याच विचारात मग्न असतो- "माझा नातेवाईक बाहेर आला की जल्लोष होणार की ऑक्टोबर अटेम्प्ट मारावा लागणार?" करमणूकीचं हे एक साधन आहे. नाहीतर कानाला एमपी-३ प्लेयर लावून एकदाचं जगाच्या वेगळं होऊन जाणे. तिसरा पर्याय म्हणजे, "नेमका मीच मिळालो होतो का ह्यांना" असा विचार करत आत वातानूकुलित हवेत बसलेल्या आपल्या नातेवाईकांच्या नावाने, ब्रीच-कॅन्डीच्या त्या उन्हात, शंख करायचा.

ह्या अशा प्रकारच्या विविध रंग आणि भावना दाखवणार्‍या व्हिसा मुलाखतीचा खेळ बघत असतानाच, रस्त्या पलीकडून आई-बाबा येताना दिसले. ह्यांचं काय झालं असा विचार येता-क्षणी तिकडून आई ने मोठं हास्य करून, मान डोलावली त्या वेळेला मी पण मनात म्हण्टलं "मिल गया!!!"
घरगुती अपूर्वाई-भाग २SocialTwist Tell-a-Friend

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: