खरं सांगायचे झाले तर देश सोडल्यावरच आपल्याला संस्कृती वगैरे शब्द आठवायला लागतात. पिकतं तिथे विकत नाही तेच खरं. पण शेवटी संस्कृती म्हणजे काय? ही व्याख्या अनेक वेळा उलगडत नाही. त्यात सुद्धा जागतिकीकरणाच्या लाटेत जिथे सगळच सारखं वाटायला लागतं, तिकडे वेगळे दिसण्याची समानता बर्याच लोकांत दिसून येते. त्यांचे हे वेगळे पण दिसून आले ते एडमंटन मधील Heritage Festival मधे.
जवळ-जवळ ८५ हून अधिक देशांमधील विविध खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि तेथील अनेक हस्तकला व सांस्कृतिक वस्तूंचे स्टॉल लावले होते. पार अगदी प्रगत असलेल्या इंग्लंड-फ्रान्स पासून ते विकसनशील आणि अनेक आपदांनी त्रस्त असलेल्या आफ्रिकेतील इरिट्रिया, सुदान, सोमालियातील देशांचे स्टॉल होते. इंग्लंड आणि वेल्स मधील फरक प्रत्येकाच्या स्टॉलला भेट दिल्यावर कळतो. नेदरलंड्स आणि फ्रांस मधला फरक त्यांच्या नृत्यातील उद्देश्यामुळे लक्षात येतो. हाव-भाव आणि हाल-चाल मध्ये सूक्ष्म फरक असला तरी त्या नृत्याचं उद्देश्य काय (म्हणजे हे नृत्य का केलं जात आहे)? हेच त्या दोन देशातील संस्कृतीतला फरक. साधं लोकर कसं विणलं जातं ह्या वरून हे फरक लेक्षात येतात. सूक्ष्म अभ्यासकाला हेच लहान फरक ध्यानात येतात आणि लक्षात रहातात. संस्कृतीं मधील हे फरक जाणून बुजून केले आहेत असं ही नाही. आपलं वेगळेपण दिसून यावं याचा अट्टाहस नाही!! केवळ तिथल्या भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितींमुळे निर्माण झालेले हे फरक. शिवाय प्रत्येक मनुष्याच्या नजरेतील फरकामुळे सुद्धा हे फरक घडत असतातच.
फरक आहेत तसेच साम्यपण आहेत. इराण, इराक, तुर्की, ग्रीस, इस्रायल ह्या देशांमधील खाद्य पदार्थांमधे इतकं साम्य आहे की आज हे देश एक-मेकांच्या एवढ्या विरोधात का आहेत ते कळत नाही. तिच गत भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशची. ह्या तिन्ही देशांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल बघितले की काहीच वेगळे जाणवत नाही. पदार्थांची नावे सारखीच, चव सुद्धा जवळ-जवळ सारखीच. केवळ तेथील स्थानिक परिस्थितीनुसार काही वेगळ्या घटकांचा वापर. अर्थात भारत-पाकिस्तान मधील संबंध (किंवा त्यांचा अभाव) याला सांस्कृतिक कारण नसून राजकीय (आकांक्षा नव्हे, तर) हाव व धर्मांधपणा जास्ती कारणीभूत आहे, असे माझे मत आहे. अनेक दक्षिण अमेरिकी देशांच्या पदार्थांमधे साम्य दिसते. तसेच त्यांचे पदार्थ स्पॅनिश व पोर्तुगीज पदार्थांशी थोडं फार साम्य राखून आहेत. स्पेन आणि पुर्तगालचं त्या देशांवरील एकेकाळच्या वर्चस्वाची ही दिसून येणारी गाथा आहे.
ह्या Heritage Festival मधून अनेक गोष्टी समोर आल्या. संस्कृतींमधील साम्य व सूक्ष्म फरक तर दिसलेच, पण ह्यांच्या खाद्यपदार्थांमधून त्यांचे (पूर्वापार चालू) असेलेले संबंध सुद्धा दिसून आले. उदाहरणार्थ, इराणी/इराकी पदार्थांमधे वापरले जाणारे मसाले (मिर्च्या, मिरी, इ.) पाहून लक्षात येतं की ह्या देशांचे भारताबरोबर किती जुने व्यापारी संबंध आहेत. जिलबी ह्या पदार्थाचा उगम मध्य-पूर्व आशिया मध्ये आहे. सिरीया किंवा जॉर्डन मधे. तो पदार्थ आफ्रिकी व्यापारी आणि मोगल व तत्सम आक्रमणकर्त्यां मार्फत भारतात पोहोचला. त्याच प्रमाणे सामोसा, हा उत्तर-भारतीय लोकां मधील अत्यंत प्रिय नाष्ट्याचा प्रकार केनीयाच्या व फिजीच्या मेनू मध्ये पण दिसतो. ह्याचा उगम सुद्धा मध्य आणि मध्य-पूर्व आशियात आहे.
असो, ह्या सगळ्या तांत्रिक व ऐतिहासिक गोष्टी झाल्या. तात्पर्य काय, तर संस्कृती म्हणजे आजू-बाजूच्या रहाणीमानानुसार तयार झालेली एक जीवन पद्धती. त्याकाळी तयार झालेली, जेव्हा शहरातील एका टोका पासून दुसर्या टोकाला जायचे म्हणजे दिवसभराची ‘पिकनिक’ असायची. आणि ८४ लक्ष योनीं मधील केवळ मनुष्य योनी मधील जीवाने अस्तित्वापलीकडील जगणे आनंददायी, रममाण आणि अधिक सुसह्य होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची फळे म्हणजेच संस्कृती!!