सोमवार, डिसेंबर ०४, २००६

स्थलांतर : जीवनाचे अविभाज्य सत्य

स्थलांतर, जीवनाचे एक अविभाज्य सत्य! मानव समाजाची निर्मिती ही नेहमी स्थलांतर करताना घडलेली आहे. इतिहासात अशी अनेक उदाहरणं दिसतील जिथे समाजाची प्रगती ही त्या किंवा इतर एखाद्या समाजाच्या स्थलांतरामुळे झालेली आहे. उदाहरणार्थ, कृष्ण मथुरा सोडुन द्वारकेस आल्याने यादव वंशाची प्रगती झाली. इतिहासात जरा अजुन पुढच्या काळा कडे बघीतलं तर, मुगल/यवनांच्या आगमनाने काही प्रमाणात चांगलं घडलं आहे. जरी आपण मान्य केलं की हिन्दु धर्माची हानि झाली, हिन्दु सामराज्य नष्ट झाली, तरी इतर आघाड्यांवर झालेली प्रगती आपण मान्य करायलाच हवी. बाबरने भारतात तोफा आणल्या. त्या तोफांनी हिन्दुंचं बरच नुकसान झालं खरं, पण त्याच तोफा शिवाजी महाराजांनी नंतर औरंगजेबा विरुद्ध वापरून स्वराज्याचे रक्षण केले होते.

मुगल काळात संगीत, बांधकाम, इत्यादि क्षेत्रात बरीच प्रगती झाली. हिन्दुस्तानी classical संगीताची मुळं मुगल सामराज्यात सापडतील. मुगल काळातील विविध बांधकामांची आजही चर्चा होते. ताजमहल हे मुगल-कालीन स्थापत्यशास्त्राचे आणि कारागिरीचे उत्तम उदाहरण आहे. पण एकंदर मुसलमान राजांच्या काळात वैज्ञानिक विचारांची गती मंदावली. भारतामध्ये विज्ञान, गणित, वैद्यकीय इत्यादि क्षेत्रात खूप प्रगती झाली होती, पण ती मुगल काळात कुठेतरी मागे पडली. कदाचित सामराज्याचा बराच वेळ आणि बरीच माणसे स्वत:च्या संरक्षणात गेले असल्या मुळे असेल, किंव्हा एकंदर त्या काळात मुसलमानांमधे वैज्ञानिक आकलनाची आस्था नसल्याने सुद्धा असेल.

पण, हे चित्र, इंग्रजांच्या राजवटीत बदलू लागलं. अर्थात इंग्रजांचा हेतु स्वत:च्या गरजेसाठी चाकरमान निर्माण करण्याचा होता. पण एकदा का शिक्षण मिळालं की विचार शक्तिला कोणी अडवू शकत नाही. इंग्रजांनी आणलेल्या आंग्ल शिक्षण पद्धतीचा तेव्हा जरी उपयोग झाला नसेल, तरी आज आपण त्याचे फायदे बघतच आहोत. इंग्रजांच्या काळात रामानुजम, जगदीशचंद्र बसु, सी. वी. रमण सारखे गणित, वनस्पतीशास्त्र आणि भौतिकी मधले जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ त्या काळात पुढे आले. इंग्रज ह्या देशात स्वत:च्या फायद्यासाठीच आले ह्यात काही दुमत नाही, त्यांनी येथील लोकांचा पण खूप छळ केला, पण त्यांचा शिक्षण पद्धतीने आपल्या विचारांना चालना दिली. शिक्षणाच्या बळावर जग जिंकता येतं, हे जरी आजचं ब्रीद-वाक्य असलं, तरी त्याची पाया-भरणी ही स्वातंत्र्य-पूर्व काळात झाली आहे. तात्पर्य काय, तर एखाद्या समाजामधे इतर समाजाचं, किव्हा आपल्या समाजाचं इतर ठिकाणी स्थलांतर हे फायद्याचं असतं. तो फायदा नजीकच्या काळात कदाचित दिसतही नसेल, पण कुठेतरी तो दडलेला असतो.

हे सगळं मी का लिहीत आहे? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच आला असेल. कारण आज आपण जिथे-जिथे बघतो, तिथे तथाकथित परप्रांतीयांविरुद्ध नेहमीच ओरडा-आरडा होताना दिसत असतं. अर्थात ह्या परिस्थितीला स्थानिक आणि परप्रांतीय दोघं जवाबदार आहेत. परप्रांतीय लोकं येथिल संस्कृतीत स्वत:ला समाविष्ट करून घ्यायला तयार नसतात. त्यांच्यातल्या बहुतेक सगळ्यांचा मुख्य उद्देश फक्त इथे येऊन पैसे कमवणे एवढच असतं आणि आपल्या सारख्या इतर परप्रांतीयांना त्यांच्या ह्याच उद्देशात मदत करणे. आपण ज्या शहरात राहतो, जे शहर/गाव/देश, आपल्याला उदरनिर्वाह करण्यास समर्थ बनवतात, त्या ठिकाणच्या संस्कृतीशी एकरूप व्हावं असं त्यांना अजिबात वाटत नाही. ते सारखे ह्याच विचारात मग्न असतात की आपण आपल्या गावी किती सुखी होतो, आपण कसे रहात होतो, वगैरे. त्यांना असं कधीही वाटत नाही की ह्या शहराला सुद्धा एक संस्कृती आहे, इथे पण आयुष्य आनंदात घालवता येऊ शकतं. ह्या सगळ्याला कष्ट तर नक्की होणार, कारण शहर नवीन, माणसं नवीन, रहाण्याच्या पद्धती नवीन. पण हे कष्ट घेण्यास खूप कमी जणं तयार असतात. त्यातुन प्रत्येकाला सारखं असं वाटत असतं की आपलं गाव/शहर/देश ह्या सध्याच्या ठिकाणापेक्षा खूप चांगलं आहे आणि इथलं रहाणीमान तेवढं चांगलं नाहीये.

आता स्थानिकही ह्या परप्रांतीयांविरुद्धच्या ओरडा-आरडाला कसे जवाबदार असतात? तर ह्याचं कारण असं की स्थानिकांना आपलं आयुष्य एका ठरलेल्या पद्धतीने जगायची सवय झालेली असते. अनेक वर्ष सम-भाषिक व सम-वैचारिक लोकांमधे घालवल्याने, परप्रांतीयांना स्वत:च्या घोळक्यात समावून घेणं त्यांना कठीण जातं. मनुष्याचा स्वभाव असा आहे की तो बदल पटकन स्वीकार न करता, त्याच्या विरुद्ध आरडा-ओरडा करतो. बदल जेवढं टाळता येईल तेवढं टाळतो. पण अशाने होणारे बदल काही थांबणार नाहीत. आपले आयुष्य सुकर बनवण्यासाठी कष्ट आणि प्रगती करत रहाणे हा पण मनुष्य स्वभावच आहे, हे विसरून चालणार नाही. ह्या बदलाला जो स्वीकारतो, तोच प्रगती करून स्वत:चं नाव बनवू शकतो.

शेवटी काय, आज आपली जी काही भाषा आहे, संस्कृती आहे, ती सगळी अशा स्थलांतरातूनच घडलेली आहे. पुरातन कालापासून तिचात बदल होत-होत ती आजच्या स्वरूपात आलेली आहे. ह्या संस्कृती मध्ये अनेक गोष्टी समावल्या गेल्या, अनेक काढल्या गेल्या. हा बदल जर कोणीही रोखू शकला नाही, तर ह्या पुढचे बदल रोखणारे आपण कोण? आपण फक्त सावध राहून, चांगल्या गोष्टी समावून घेऊन, वाईट गोष्टींना आपल्या संस्कृती पासुन लांब ठेवण्याचे एकत्रीत प्रयत्न केले पाहीजेत.
स्थलांतर : जीवनाचे अविभाज्य सत्यSocialTwist Tell-a-Friend

मंगळवार, नोव्हेंबर २१, २००६

"आवाज... आवाज": माझा दृष्टीकोन

काही दिवसांपूर्वी पु.लं.चं "आवाज.... आवाज" हा लेख वाचला. अर्थात तो जयवंत दळवींच्या "पु.ल. : एक साठवण" मधे आहे म्हणून. नाहीतर आमच्या पिढीला एवढे जुने लेख वाचायला कुठे मिळणार? असो... लेख वाचता वाचता, मन हळूच जुन्या काळात गेले. जुना म्हणजे त्यावेळेला भारतात संगणक आणायला राजीव गांधींना अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांची परवानगी लागली होती. थोडक्यात काय, मी त्या वेळेला शाळेत जात होतो. कानात लगेच त्या काळचे आवाज घुमू लागले. सकाळी ती चिमण्यांची चिव-चिव, पाववाल्याचा पुंउंउंवांक करणारा हॉर्न, बस-स्टॉप वर गेल्यावर बसचा हॉर्न वाजायची वाट बघणे, वगरे सगळं आठवायला लागलं. या पैकी चिमण्यांची चिव-चिव आणि पाववाल्याचा हॉर्न आयुष्यातुन गायब झाल्यासारखॆ आहे. पुर्वी रिक्षाचे हॉर्न पण पाववाल्याचा हॉर्न सारखे होते, आता रिक्षाचा हॉर्न किररररर करून किर-किर करतो.

काळाच्या रस्त्यावर मन वेगाने धावू लागले. शाळा, कॉलेज पार करत-करत IITला येउन पोहोचले. इथल्या वसतीगृ॒हात पण अनेक आवाजांची सवय लागली होती. उदाहरणार्थ, आमच्या वसतीगृहात परगावुन पालकांचे फोन यायचे, त्यासाठी तीन फोनची सोय होती. रोज संध्याकाळी तिथे फोनपाशी असलेला वॉचमन P.A. system वर घोषणा करायचा- "A-wing room no. 410, external call after two minutes". की मग त्या खोलीत राहणारा, सगळी कामं सोडून फोन घेण्यासाठी पळायचा. हा तो काळ होता, जेव्हा mobile आजच्या सारखे पडीक भावाला उपलब्ध नव्हते. त्यामुळे काही मोजक्या जणांकडेच mobile असायचे. इतर जणं रोज संध्याकाळी जेवण झाल्यावर घरी फोन करायची किव्हा फोनची वाट बघत असायची. ती पण एक मजा असायची.... आपण फोनची वाट बघत असताना दुसऱ्याचा फोन आल्यावर चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे असायचे. ते ही बरोबर आहे. माणूस आपली कामं अर्धवट सोडून आलेला असतो, आणि घरच्यांशी बोलायची उत्सुकता असल्याने अशी क्षणिक निराशा होणे सहाजिक आहे. इथे पु.ल. असते तर त्यांनी एक भन्नाट उपमा दिली असती. पण जाऊदे... ते पु.ल. होते, आम्ही वि.अ. आहोत. वसतीगृहात पाचशेहून अधिक विद्यार्थी, प्रत्येकाच्या फोनची कारणे वेगळी... कुणाला नुसतं बोलायचं असायचं, कुणाला आपल्या यशाचा आनंद घरच्यांबरोबर वाटायचा असतो, कुणाला दु:ख कमीत-कमी बोलुन दाखवाचं असतं. P.A. system वरचा तो आवाज, दिवसातुन एकदा जरी नाही आला, तर चुकल्यासारखं वाटायचं. आपला फोन जरी येणार नसेल, तरी!!

IIT मधलं शिक्षण उरकुन नोकरीला लागलो. एक वर्ष नोकरी केल्यावर IITला परत आलो. सुदैवाने पुर्वीचे वसतीगृह मिळाले. राहायला येउन काही दिवस झाले होते. काही तरी चुकल्या सारखे वाटत होते. लक्षात आले की हल्ली P.A. system वरुन होणाऱ्या घोषणा कमी झाल्या आहेत. मुख्य म्हणजे, तुमचा फोन आलाय, अशी घोषणा कधीच होत नव्हती. असं का व्हावं? लोकांचे पालक एवढे बेफिकिर होणार नाहीत ह्याची खात्री होती. मग घोषणा बंद होण्याचे कारण काय? इथे आधीपासून राहणाऱ्या मित्रांना विचारलं. तेव्हा त्यांनी जे सांगितले, त्यावरुन हा आवाज पण काळाच्या पडद्या आड कायमचा गेला आहे, हे लक्षात आले. ते म्हणाले, हल्ली सगळ्यांकडे mobile असतात, त्यामुळे वसतीगृहाच्या फोन वर कोणाचेही पालक फोन करत नाहीत. त्यामुळे, हल्ली P.A. system वर, वॉचमनचा आवाज बंद झालाय आणि खोल्या-खोल्या मधून mobileच्या विविध प्रकारच्या ringtones ऎकू यायला लागल्या आहेत.

या आठवणीं मधे रमलेलो असताना, मन एकदम भानावर आले. पु.लं.चा लेख संपवून जेवायला गेलो. जेवल्यावर खोलीत आलो. अभ्यास वगरे उरकून झोपायला गेलो... गादीवर पडल्या-पडल्या एक विचार आला... हे जे आवाज आपल्या आयुष्यातुन गेले ते इतरांनी निर्माण केले होते. समजा, आपलाच आवाज गेला, तर काय होइल? छे, कल्पनेने पण मन शहारुन निघाले!! असं झालं तर सगळीच बोंबाबोंब... देवाला म्हंटलं, बाबारे, असं काही होवू देउ नकोस...

पण देवाजीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. काही दिवसातचं तो भयंकर विचार सत्य परिस्तिथीत आला. माझा घसा पूर्ण पणे बसला... एक अक्षर बोलता येत नव्हते. अभिजीत, निखील आणि, स्वानंदच्या सहाय्याने किल्ला लढवीत होतो. आमचे रविवारी दुपारी लागण्याऱ्या मूक-बधिरांच्या बातम्यां सारखे झाले होते. मी इशारे करायचो आणि हे लोकं त्याचं भाषांतर करायचे. देवा, ते तीन दिवस खूप त्रासाचे गेले. मनात बरेच विचार होते, पण सांगता येत नव्ह्ते. अरेरे... पुष्कळ कामं त्यामुळे मागे पडली. चवथ्या दिवशी आवाज आल्यावर, आधी मनसोक्त बोलून घेतले. घरी फोन केला, तिघा मित्रांनी सुटकेच नि:श्वास टाकला, मला पण हायसे वाटले.

काल पुन्हा पु.ल.: एक साठवण पुस्तक हातात घेतले. उरलेलं वाचून काढण्यासाठी. सहज "आवाज.... आवज" ह्या लेखा कडे लक्ष गेले. मनात म्हंटले, एक वेळ इतरांनी निर्माण केलेले आवाज काळाच्या ओघात विलीन झाले तरी चालेल, पण आपला आवाज हा आपल्या बरोबरच कालवश व्हायला पाहिजे. नाहीतर जगणे अजून त्रासदायक आहे.

पु.ल. शेवटी म्हणतात, आयुष्य म्हणजे आवाज, ते संपलं तर शांतताच शांतता. मी त्यात अजून एक जोडू इच्छितो. आयुष्य म्हणजे आपला व इतरांनी निर्माण केलेल्या आवाज. हे दोघं वरण-भाता सारखे आहेत. एका शिवाय दुसऱ्याचा काही उपयोग नाही....
"आवाज... आवाज": माझा दृष्टीकोनSocialTwist Tell-a-Friend