बुधवार, ऑक्टोबर २६, २०११

भले भले आले आणि मातीत मिळून गेले!

भारताचा इतिहासच असा आहे, की इथे आलेल्या परकीयांना कधी ना कधी तरी हार मानावीच लागली आहे. ह्या मातीचा सर्वात पहिला बळी ठरला तो जगज्जेता सिकंदर. त्याने पर्शियाच्या बलाढ्य शहा दरयुश-३ ला पराभूत केलं होतं. त्यानंतर तो मध्य आशिया जिंकत भारताच्या वेशी वर पोहोचला होता. त्याने भले ही पुरू राजाला हरविले असेल, पण त्या युद्धात त्याचा सैन्याने इतकी कच खाल्ली की तिने पुढे जायचा नकार दिला. सिकंदराला गंगा नदीच्या किनाऱ्या वरूनच परतावे लागले. त्यानंतर त्याच्या सामराज्यात कसलीच ताकद उरली नाही आणि त्याचा मृत्यु नंतर ते काही दशकातच कोसळलं. त्यानंतर कालांतराने आक्रमणकरते येत होते, ह्या देशावर आपली सत्ता बसवीत होते, पण त्यांना कालांतराने ह्या देशाचा भाग तरी व्हावं लागलं किंवा देश सोडून परत जावं लागलं. सदाशिवराव भाऊंना पानिपतात हरविणारा अहमदशहा अब्दालीला सुद्धा पुन्हा भारता कडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत झाली नाही. एवढी हानी त्याचा सैन्याला मराठी फौजांनी केली.  इंग्रज, पोर्तुगीज, इ. युरोपीय आक्रमणकरते सुद्धा आले, आणि आपल्यावर राज्य सुद्धा केले. पण, अमेरिकी खंडात त्यांनी स्थानिकांचं अस्तित्वच जसं नामशेष केलं, तसं इथे त्यांना जमलं नाही. उलट त्यांची ह्यात बरीच हानि झाली. आणि अखेरीस त्यांना हा देश सोडून द्यावा लागला.

आणि आता भारताचा हाच लौकिक खेळात सुद्धा पहायला मिळत आहे. विशेष करून क्रिकेट मधे. त्यामुळेच गेल्या १५ वर्षांत भारतात येणार्‍या संघाने केवळ २ वेळाच भारतीय संघाला पराभूत केले आहे. आणि तसंच नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड-भारत एकदिवसीय स्पर्धेत सुद्धा घडलं. सिकंदर प्रमाणेच अगदी महिन्या-दीड महिन्यापूर्वी भारताला नेस्तनाबूद करणार्‍या इंग्लंडचा भारतीय संघाने इथे भारतात त्यांचा सिकंदर करून टाकला. ५-० विजय मिळवून सपेशल दाखवून दिलं की आम्ही विश्वचषक विजेते कसे झालो! ज्याप्रमाणे सिकंदरला भारतातून पराभव व नामुष्की पतकरून परत जावे लागले, त्याचप्रमाणे इंग्लंडचा संघ इथे मोठ्या वल्गना करत आला असता, त्यांना नामुष्की पदरात घेऊनच माय देशी परत जावे लागले.

भारतीय संघाच्या ह्या कामगिरी बद्दल त्यांचे सपेशल अभिनंदन. आणि सचिन, जहीर, युवराज, हरभजन व सेहवाग नसताना ही कामगिरी बजावल्या बद्दल खेळाडूंचे अधिकच कौतुक करावेसे वाटते.
भले भले आले आणि मातीत मिळून गेले!SocialTwist Tell-a-Friend

सोमवार, ऑक्टोबर १०, २०११

सांग सांग भोलानाथ....

सांग सांग भोलानाथ, किंडल वरती मराठी मधली पुस्तके मिळतील काय? हा प्रश्न विचारायचं कारण असं की आता Amazon ने Kindle Fire टॅबलेट लाँच केलं आहे. Fireच्या आधीच्या Kindle e-book Reader हे वाचकांमधे सुपरहिट ठरलं आहे. जसं Appleच्या iPod ने संगीत क्षेत्रात क्रांती आणली होती, तशीच क्रांती Kindleने पुस्तक वाचनात घडवली. मुख्य म्हणजे Kindleच्या स्क्रीनचं तंत्रज्ञान असं होतं की वाटतं आपण खरंच एखादं छापील पुस्तक वाचत आहोत. त्यात Amazon ने आपलं एक स्वतंत्र Kindle e-book Store चालू केलं. त्यामुळे सर्व Kindle ग्राहकांना e-book विकत घेणं अतिशय सोपं झालं. माफक किमतीत क्लासिक्स, शिवाय रास्त दरात Best Sellers वगैरे विक्रीला उपलब्ध करून अमेरिकेत पुस्तक प्रमींना ह्याने वेड लावलं. आणि मुख्य म्हणजे ही सर्व पुस्तकं तुम्हाला ७X५च्या आकाराच्या ठोकळ्यावर नेता येतात. म्हणजेच तुमची पुस्तकं घरात जागा अडवत नाहीत आणि जागा बदलताना त्या पुस्तकांचे काय करावे, ह्याचा अजिबात प्रश्न नाही. 

Kindle एवढं लोकप्रिय झालं की इतर टॅबलेट्स साठी Amazonने Kindle App काढलं. म्हणजेच तुमच्या iPad वरून किंवा Android टॅबलेट वरून Kindle App वापरून तुम्ही Kindle store मधून पुस्तकं download करून वाचू शकता. पण ही सगळी पुस्तकं इंग्रजी भाषेतील आहेत (आपल्याला मराठी, हिंदी आणि इंग्रजी सोडून इतर भाषा येत नाहीत, त्यामुळे इअत कुठल्या भाषेची पुस्तकं आहेत का, हे शोधायच्या भानगडीत कधीच पडलो नाही). पण मराठी अथवा हिंदी भाषेतील पुस्तकं Kindle store वर उपलब्ध नाहीत. ह्याचे कारण असे, की अजून मराठी प्रकाशकांनी आपल्या पुस्तकांची Kindle आवृत्ती काढलेलीच नाही! Amazonने १-२ वर्षांपूर्वी जाहीर केलं होतं की ते भारतीय प्रकाशकां बरोबर वाटाघाटी करून त्यांना पुस्तकांची Kindle आवृत्ती काढण्यास प्रेरीत करतील. पण तसं फारसं झालेलं दिसत नाही. झालच असेल, तर ते इंग्रजी पुस्तकं छापणार्‍या प्रकाशकां बरोबर झालं असेल. पण प्रादेशिक भाषेतील प्रकाशकांचे काय? ह्या प्रकाशकांकडे Amazon ने जाऊन त्यांना सुद्धा आपल्याकडील मराठी पुस्तकांची Kindle आवृत्ती काढण्यास उत्तेजीत केलं पाहिजे. नाहीतर ह्या प्रकाशकांनी तंत्रज्ञानातील प्रगती व बदलांचा आढावा घेऊन स्वत:च Kindle आवृत्ती काढण्यास सुरुवात केली पाहिजे. कारण आता परदेशात रहाणारा मराठी समाज खूपच मोठा झाला आहे. विशेष करून इंग्लंड, अमेरिका, कॅनडा व ऑस्ट्रेलिया मधे. इथल्या लोकांना मराठी पुस्तकं भारतातून मागवणे दर वेळेस शक्य नसतं. किंबहुना कुणी फारसं मागवतच नाही. बरं एखाद्या आवडणार्‍या पुस्तकाचं प्रकाशनच बंद झालेलं असतं. जुन्या अथवा उत्तम पण कमी विकल्या जाणार्‍या पुस्तकांची केवळ Kindle आवृत्ती काढल्यास अनेक वाचकांना त्याचा लाभ होईल. शिवाय, छपाईचा खर्च नसल्यामुळे प्रकाशकांवरचा खर्चाचा भार देखील कमी होईल. 

पण माझं हे गार्‍हाणं कुणी ऐकत आहे का? की ह्याचं उत्तर केवळ भोलानाथच देऊ शकेल??
सांग सांग भोलानाथ....SocialTwist Tell-a-Friend