फार फार वर्षां पूर्वी असाच प्रश्न लोकमान्यांनी केसरी मधून विचारला होता. सरकार बदलले, पण प्रश्न तिकडेच आहे. दिल्लीत झालेल्या अमानुष सामूहिक बलात्कारा विरुद्ध राष्ट्रपती भवनाजवळ निदर्शनं करणाऱ्या अहिंसक तरुण जमावा वर पोलिसांनी ऐन थंडीत पाण्याच्या फवाऱ्याचा (water cannon) मारा केला आणि लाठ्या चालवल्या. ह्या जमावाला रोखून धरण्यासाठी सरकार कडे दुसरा उपाय नाही? अरे, त्यांचा कडे अशी काय हत्यारं होती कि त्यांच्यावर अश्रुधाराचे गोळे फेकावे लागले? थंड पाण्याचे जबरदस्त फवारे त्यांचा अंगावर मारले? बहुतांश लोकं तिकडे आपल्या व आपल्या आई-बहिण-मैत्रिणींसाठी एक सुरक्षित दिल्ली (आणि देश) मागण्यासाठीच गेले होते ना?
सरकारचं Public Relations खातं आहे की नाही? असा प्रश्न पडतो. ह्या जमावावर पोलिसी लाठ्या चालविण्या आधी जर पंत प्रधान किंवा राष्ट्रपती येउन बोलले असते, तर असा प्रकार घडला असता का? आपण काम करत आहोत असं लोकांना जाणीव करून देणे गरजेचे वाटत नाही का? अणु करार आणि किरकोळ व्यापारात थेट परकीय गुंतवणुकी साठी देशाला संबोधणारे आणि (युधिष्ठिरा सारखे) आपलं सरकार पणावर लावणारे पंत प्रधान देशाच्या जनतेला का संबोधत नाहीत? सोनिया गांधी सुद्धा थेट मिडीयाशी न बोलता त्यांचा विश्वासूं मार्फत बोलताना दिसल्या. राष्ट्रपतींनी तर अजूनही काही प्रतिक्रिया दिली नाही. जर ह्या जमावाशी संवाद साधला असता तर किती कष्ट वाचले असते? जनतेला सुद्धा दिलासा मिळाला असता की सरकार काहीतरी करतंय. पण नाही, आपली ताकद नको तिकडे दाखविण्याची हौस सरकारला उगीचच आहे.
तिकडे अमेरीकेत सुद्धा वारंवार अनेक ठिकाणी नि:शस्त्र लोकांवर गोळीबार होत असतो आणि त्यात भरपूर जीव हानी होते. पण न्यू-टाउन मध्ये हि घटना झाल्यावर उठलेल्या उद्रेकाला शांत करण्यासाठी त्यांचे राष्ट्रपती टी. व्ही. वर आले आणि त्यांनी देशाला त्या घटने बाबत आपण काय करू इच्छितो ह्या बद्दल संवाद साधला. त्यातील किती गोष्टी प्रत्यक्षात उतरतील ही नंतरची गोष्ट, पण आपला राष्ट्रपती आपल्या साठी काहीतरी करतोय असं तरी लोकाना वाटलं. आणि इकडे उलटेच. देशाचे भावी पंत प्रधान होण्याची इच्छा असलेले (आपल्यला कितीही नको असले तरी) राहुल गांधी सुद्धा ह्यावर काही बोलत नाहीत. मग हे सरकार जनतेसाठी नेमके काय करणार आहे? आधीच अनेक भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये बरबटलेल्या ह्या सरकारला अजून काय विशेषणं भूषवायची आहेत? युवकांवर लाठीचार्ज करणे सोपे आहे, पण त्यांचाशी संवाद साधून मार्ग काढणे कठीण. सरकारला सगळ्याच बाबतीत सोपे मार्ग काढून प्रश्न झटकून द्यायचे आहेत का? ह्याचे उत्तर तरी कुणीतरी द्यावे.