सोमवार, जुलै १४, २००८

पावले चालली अमेरीकेच्या दिशेने

७ ऑगस्ट. हर्षद अमेरीकेला जाणार. महीना पण उरला नाही. पु.लं. चं "अपूर्वाई" कथाकथन आठवलं. हल्ली घरी तशीच परिस्तिथी असते. हे घेतलं का, ते घेतलं का? विमान कंपनीने किती वजन नेण्याची सूट दिली आहे? प्रत्येक वस्तू घेताना, ह्या वस्तूचं किती वजन भरतय असा प्रश्न पडणे आणि विचारणे. गेले दोन महीने ठळक खरेदी झाल्यावर (म्हणजे कपडे, चादरी, पांघरूणं, जेवण बनवण्याची उपकरणं, इ.) आता मजल किरकोळ खरेदी (साबण, पावडर, बूट, बूट-पॉलीश, इ.) पर्यंत पोहोचली आहे, किंबहुना ती पण संपली आहे. आता बाकीच्या गोष्टींची जुळवा-जुळव चालू आहे.
पर्वाच त्याच्याशी फोनवर बोललो. आता त्याला तिथे जाण्याचे वेध लागल्याचे जाणवले. इथून किती डॉलर न्यायचे, कुठला फोन घ्यायचा, प्री-लोडेड कार्ड घ्यायचं की नेहमीचं डेबीट कार्ड न्यायचं? अशा प्रश्नांची उत्तरं मिळवणे चालू आहे. त्याच्याशी बोलताना जाणवलं की आता हा महीन्याभरानंतर जे उड्डाण भरणार, ते थेट आम्हाला दोन वर्षांनी भेटणार. हर्षद, जो एक फोन केल्यावर मला स्टेशनवर घ्यायला यायचा, सकाळी सातच्या डेक्कनला काहीही कुर-कुर न करता यायचा. माझ्या बरोबर वैशालीला, दुर्गाला, सकाळी वेताळ टेकडीवर फिरायला येणारा, सोसायटी मधल्या नवीन घडा-मोडी सांगणारा, आता दोन वर्षं मला भेटणार नाही! आईशी बोलताना हे सगळं आठवलं (आणि थोडं आता लिहीताना).
पाखरं मोठी झाली, दाण्याच्या शोधात निघाली! हर्षद पण मोठा झाल्याचं जाणवायला लागलं. प्रत्येक बाबतीत खर्चं करताना, हे पैसे आपले नसून आपल्या आई-वडीलांचे आहेत, हा विचार करूनच तो ठरवतो. अमेरीकेत स्वत:चा उदर-निर्वाह चालू ठेवण्यासाठी त्याची धडपड चालू आहे. आई-वडीलां कडून पैसे न मागवता आपला अभ्यास पूर्ण करायची त्याची जिद्द बघून थक्क व्ह्यायला होतं. अर्थात सुरवातीच्या एक-दोन महीन्यांपुरता त्याला जे पैसे लागणार, ते आई-बाबा देतीलच. त्याची ही धडपड पाहून मनात एकच इच्छा निर्माण होते- हर्षद, यशस्वी भव!!
पावले चालली अमेरीकेच्या दिशेनेSocialTwist Tell-a-Friend