सोमवार, ऑगस्ट २६, २०१३

राज बब्बर: self-contracdicting नेता

राज बब्बर ह्यांच्या सिनेमा कारकिर्दीत फार काही उल्लेखनीय घडलं नाही. मुळात त्याचे सिनिमे बघून, हा माणूस कसं काय अभिनेता बनू शकतो, असंच वाटायचं. त्यात हे भाऊ आता खासदार आहेत. आधी समाजवादी होते, आता कांग्रेसचे सेक्युलर खासदार आहेत. भारतात खासदार झालात की तुम्ही वस्तुस्थिती पासून दूर जाता. ज्या जनतेचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, ती जनता काय परिस्थितीत रहाते, ह्याचा अनेक खासदारांना विसर पडतो. बरोबर आहे, आजच्या जमान्यात संसदेच्या उपाहार गृहा मध्ये रु. १.५० ला चहा आणि रु. १५ पेक्षा कमी किमतीत बिर्याणी खायला मिळत असताना बाहेरच्या हॉटेल मधल्या किमती कशाला माहित असतील? बरं, हे बाहेर गेले जरी जेवायला तर खासदार साहेबांकडून बिल कोण घेणार? घेतलं तर ह्यांचा अपमान होतो आणि तो न सहन झाल्याने ते आणि त्यांचे समर्थक हॉटेल वाल्याला त्याची "जागा" दाखवून देतात. 

असो, पण बब्बर साहेब फ्लॉप का राहिले? ह्याचे उत्तर ह्या दोन विडिओ मध्ये कळेल.

ह्या विडिओ मध्ये बब्बर साहेब म्हणतात की मुंबई (त्यांची बंबई) मध्ये ते रु. १२ मध्ये पोट भरून जेवू शकतात. आणि हे घरात नाही बरे, तर बाहेर कुठल्या तरी खानावळीत किंवा हॉटेल मधे. आणि काय जेवू शकतात तर, भरपूर भात (त्यांचा हाता कडे बघा म्हणजे तुम्हाला किती भात मिळतो ते कळेल), आमटी, सांबर आणि थोडी भाजी!! अबब, एवढे जेवले तर माणूस दुपारची एक वामकुक्षी काढू शकेल!! पण हे हॉटेल कुठे आहेत मुंबई मध्ये, ते सांगणे मात्र त्यांनी हुशारी ने टाळले.


पण, त्यांना जेव्हा कळाले की आपली काही तरी चूक झाली आहे, तेव्हा त्यांनी जे स्पष्टीकरण दिले, ते तर अजूनच अचाट आहे. मुळात त्यांना लक्षात आलं कि ते शहर जेव्हा खरंच "बंबई" होतं, तेव्हा रु. १२ मध्ये जेवायला मिळत असे. पण आता हे मुंबई आहे आणि तिकडे एवढ्या स्वस्तात जेवण मिळणे कठीण आहे. त्या नंतर साहेबांनी हे पुचाट स्पष्टीकरण दिले.ह्यात भाऊंच सांगणं असं की  रु. १२ मध्ये २ तंदूर रोटी (कारण त्या मोठ्या असतात), अर्धी प्लेट दाल (आमटी) आणि १ चमचा भाजी खाऊ शकतो. कसं काय? तर हॉटेल वाल्याकडे १ च्या ऐवजी १/२ प्लेट दाल मागायची, आणि १ प्लेट भाजी ऐवजी १ चमचा मागायची!! असं काही द्यायला हॉटेल वाला तरी तयार होईल का? आणि त्यापूर्वी भात, सांबर आणि भाजी खाणारा बब्बर आता रोटी-दाल वर का आला? की भात-सांबर रु. १२ मध्ये मिळणार नाही ह्याची त्याला प्रचीती झाली? हा माणूस(?) स्वतःच्याच विधानाला खोडून काढत आहे! अरे तू जसा हॉटेल वाल्या कडे १ चमचा भाजी, १/२ प्लेट दाल मागत आहेस ना, तसंच लोकांनी योजना आयोगाच्या  माणशी र. १००० (शहरा मध्ये) महिन्याच्या बजेटला रु. ३३ दिवसाला असे विभागले! साधे गणित जमू नये की काय? तसेच गावाकडे माणशी रु. ८१६ च्या महिन्याच्या बजेटला रु. २६ दिवसाला असे विभागले. हे जर तू नाकारत असशील तर तुझ्या सारखा नाकर्ता कुणीच नाही असे म्हणावे लागेल. आणि हे आकडे चूक की बरोबर हा वाद मी घालू इच्छीत नाही, पण हे योजना आयोगाचे आकडे आहेत.

बब्बरचे चित्रपट थेटर मध्ये जाऊन बघण्या सारखे तर अजिबात नव्हते! पण, तरी त्याला सांगितलं की तुझा चित्रपट ३ तासांचा आहे. त्याचे तिकीट त्या काळी रु. २० असायचे. त्यातील आम्हाला फक्त गाणी बघायची आहेत. ती गाणी १/२ तासाची आहेत. तर तू  रु. ३ मध्ये आम्हाला तुझ्या चित्रपटातील गाणी बघू देशील का? तो तयार होईल का? तुम्हा खासदारांना जर सांगितले की तुम्ही जेवढा वेळ संसदेत चर्चा कराल, तेवढ्या वेळाचाच पगार घ्यायचा. तू तयार होशील का? नाही ना!! अनेक ठिकाणी प्रो-राटा (pro-rata) तत्वा वर गोष्टी घेता येत नाहीत. हॉटेल सुद्धा त्यातील एक जागा आहे. मग ज्या गोष्टी करणे शक्य नाही, त्या तू गरिबांना तरी कशाला करायला सांगतोस रे बाबा? 
राज बब्बर: self-contracdicting नेताSocialTwist Tell-a-Friend

सोमवार, मार्च १८, २०१३

आसाराम बापूंचे आध्यात्मिक थोतांड!!

आसाराम बापूं बद्दल मला पहिल्या पासून विशेष प्रेम नव्हते. कारण अनेक वर्षांपूर्वी आमची आई त्यांचे टी. व्ही. वरील कार्यक्रम सकाळी-सकाळी बघायची आणि त्यामुळे आमची झोप मोड व्हायची. त्यामुळे ह्या महाभागाचा मी फार काळ पाठलाग केला नाही. आणि गेल्या काही महिन्यातील त्यांची कृत्य बघता त्याना लहानपणीच सोडले ह्याचा आता मला आनंद होतो. "भाऊ" म्हणून विनंती केली असती तर दिल्लीतील त्या मुलीचा बलात्कार त्या इतर मुलांनी केला नसता, अशी मुक्ताफळं उधळल्यावर तर माझी खात्रीच पटली की हा माणूस आध्यात्मिक असूच शकत नाही. ज्यांना आपल्यातील पाशवी वृत्तींना काबूत ठेवता आले नाही, अश्या माणसांना दोषी न ठरवता, ह्या महाभागांनी त्या असहाय मुलीलाच दोष दिला. वर सल्ला, की बलात्कार होत असेल तर देवाचे नाव घ्या आणि बलात्कारी माणसाला भाऊ म्हणून हाक मारा. अहो कशाला त्या नात्याला दुषित करत आहात?

ह्याच आसाराम बापूंनी पर्वा नागपूर मध्ये होळी खेळण्याच्या नावा खाली पाण्याची अक्षम्य नासाडी केली. महाराष्ट्र राज्य भीषण दुष्काळाने ग्रस्त असताना होळी साठी पाण्याची एवढी नासाडी करायची हे शिकवण कुठल्या आध्यात्माच्या पुस्तकात किंवा लिखाणात सापडली? राज्यात जिथे अनेक गावां मध्ये लोकं पाण्यासाठी वणवण भटकत आहेत, पाण्या अभावी जनावरे मृत्युमुखी पडत आहेत, तिथे हे महाभाग आणि त्यांचे शिष्यगण पाण्याची होळी खेळण्यात धन्यता मानत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकी कडे पाणी वाचविण्याची कळकळीने विनंती करत असताना, हे बापूजी पाण्याची नासाडी करण्यात धन्यता मानतात. वर आडमुठेपणा, आम्ही पाण्यानेच होळी खेळणार!! म्हणे "केवळ" ६००० लि. पाणी वापरले. बापू, एवढ्या पाण्यात U.N.च्या संकेतांनुसार जवळ-जवळ ५० लोकांची दिवसाची पाण्याची गरज भागू शकते!! दुष्काळ जन्य  परिस्थिती लक्षात घेता त्यांची २ दिवसांची गरज भागू शकते. आहात कुठे? आणि तुम्ही हे पाणी मोकळ्या मैदानावर उडवून लावले! शिवाय ह्या पाण्याने माखालेल्यांनी ते घालविण्यासाठी पुन्हा आंघोळ केली आणि अतिरिक्त पाणी वापरले ते वेगळेच. म्हणे काय तर होळी खेळल्याने लोकांचे आजार दूर होतात. वा रे, डॉक्टर! हे तुमच्या कडून आधी कधी नाही ऐकले. तुमच्या बरोबर होळी खेळायला आलेल्या भक्तांना असे काय आजार होते जे तुम्ही त्यांचावर असे पाणी उडवून दूर केले? ह्याचे प्रमाण काय? तुम्ही ते सिद्ध करा, मग आम्ही तुमचा नक्कीच सत्कार करू. पण हे न करू शकल्यास तुम्ही आध्यात्मातून सन्यास घ्या आणि असले अमानुष प्रकार बंद करा. हे पाणी जर तुम्ही स्वखर्चाने दुष्काळी गावांमध्ये पिण्यासाठी पाठवले असते तर कित्येक तहानलेली माणसं तृप्त झाली असती. पण नाही, स्वतःची विवेक बुद्धी गहाण ठेवून आपण केलेल्या चुकांना अजून अधिक पोरकट आणि बिनडोक बडबड करून झाकायचा प्रयत्न करायचा! आणि पिडीत जनतेच्या गरजांचा अजिबात विचार न करणे ह्यात कसले आले आध्यात्म? हा तर थोतांडपणा आहे. 
आसाराम बापूंचे आध्यात्मिक थोतांड!!SocialTwist Tell-a-Friend

शनिवार, डिसेंबर २२, २०१२

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?

फार फार वर्षां पूर्वी असाच प्रश्न लोकमान्यांनी केसरी मधून विचारला होता. सरकार बदलले, पण प्रश्न तिकडेच आहे. दिल्लीत झालेल्या अमानुष सामूहिक बलात्कारा विरुद्ध राष्ट्रपती भवनाजवळ निदर्शनं करणाऱ्या अहिंसक तरुण जमावा वर पोलिसांनी ऐन थंडीत पाण्याच्या फवाऱ्याचा (water cannon) मारा केला आणि लाठ्या चालवल्या. ह्या जमावाला रोखून धरण्यासाठी सरकार कडे दुसरा उपाय नाही? अरे, त्यांचा कडे अशी काय हत्यारं होती कि त्यांच्यावर अश्रुधाराचे गोळे फेकावे लागले? थंड पाण्याचे जबरदस्त फवारे त्यांचा अंगावर मारले? बहुतांश लोकं  तिकडे आपल्या व आपल्या आई-बहिण-मैत्रिणींसाठी एक सुरक्षित दिल्ली (आणि देश) मागण्यासाठीच गेले होते ना? 

सरकारचं Public Relations खातं आहे की नाही? असा प्रश्न पडतो. ह्या जमावावर पोलिसी लाठ्या चालविण्या आधी जर पंत प्रधान किंवा राष्ट्रपती येउन बोलले असते, तर असा प्रकार घडला असता का? आपण काम करत आहोत असं लोकांना जाणीव करून देणे गरजेचे वाटत नाही का? अणु करार आणि किरकोळ व्यापारात थेट परकीय गुंतवणुकी साठी  देशाला संबोधणारे आणि (युधिष्ठिरा सारखे) आपलं सरकार पणावर लावणारे पंत प्रधान देशाच्या जनतेला का संबोधत नाहीत? सोनिया गांधी सुद्धा थेट मिडीयाशी  न बोलता त्यांचा विश्वासूं मार्फत बोलताना दिसल्या. राष्ट्रपतींनी तर अजूनही काही प्रतिक्रिया दिली नाही. जर ह्या जमावाशी संवाद साधला असता तर किती कष्ट वाचले असते? जनतेला सुद्धा दिलासा मिळाला असता की सरकार काहीतरी करतंय. पण नाही, आपली ताकद नको तिकडे दाखविण्याची हौस सरकारला उगीचच आहे.

तिकडे अमेरीकेत सुद्धा वारंवार अनेक ठिकाणी नि:शस्त्र लोकांवर गोळीबार होत असतो आणि त्यात भरपूर जीव हानी होते. पण न्यू-टाउन मध्ये हि घटना झाल्यावर उठलेल्या उद्रेकाला शांत करण्यासाठी त्यांचे राष्ट्रपती टी. व्ही. वर आले आणि त्यांनी देशाला त्या घटने बाबत आपण काय करू इच्छितो ह्या बद्दल संवाद साधला. त्यातील किती गोष्टी प्रत्यक्षात उतरतील ही नंतरची गोष्ट, पण आपला राष्ट्रपती आपल्या साठी काहीतरी करतोय असं  तरी लोकाना वाटलं. आणि इकडे उलटेच. देशाचे भावी पंत प्रधान होण्याची इच्छा असलेले (आपल्यला कितीही नको असले तरी) राहुल गांधी सुद्धा ह्यावर काही बोलत नाहीत. मग हे सरकार जनतेसाठी नेमके काय करणार आहे? आधीच अनेक भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये बरबटलेल्या ह्या सरकारला अजून काय विशेषणं  भूषवायची आहेत?  युवकांवर लाठीचार्ज करणे सोपे आहे, पण त्यांचाशी संवाद साधून मार्ग काढणे कठीण. सरकारला सगळ्याच बाबतीत सोपे मार्ग काढून प्रश्न झटकून द्यायचे आहेत का? ह्याचे उत्तर तरी कुणीतरी द्यावे.
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?SocialTwist Tell-a-Friend

शनिवार, ऑक्टोबर २७, २०१२

अपूर्व हेमंत

 पु. ल. देशपांडेंच अपूर्वाई वाचलं होतं. त्यात त्यांनी जपान मधील हेमंत ऋतूचं कौतुक केलं होतं. हेमंतातील झाडा-फुलांचे ते निरनिराळे रंग, आल्हाददायक वातावरण इ. खरंच बघत बसण्यासारखे आहे. आणि हा ऋतू संपू नये असं वाटत रहातं. आणि पु.लंनी त्यात लिहीलं सुद्धा आहे, की खरतर हेमंतापेक्षा वसंताचे अधिक कौतुक होत असले तरीही हेमंताची मजा काही औरच आहे. आणि खरच आहे, बघा वसंता मध्ये किती उत्सव होत असतात. वसंत व्याख्यान माला, अनेक संगीत उत्सव, वगैरे. पण हेमंता मध्ये असे उत्सव होताना पाहिले आहेत का?

खरेतर हेमंत चाहूल घेऊन येतो ते येणाऱ्या शिशिराची. म्हणजेच गोठून टाकणाऱ्या काळाची. पान गळती, बोचरे वारे, भर दुपारीसुद्धा उन्हाची ऊब नसते (अर्थात, भारतात बहुतांश ठिकाणी शिशिर ऋतुच सहन करण्यासारखा असतो). म्हणजेच काय, तर एका निर्जीव अवस्थेची नांदी होत असते. म्हणूनच कदाचित हेमंताचे तेवढे कौतुक होत नसावे. समोर निर्जीव अवस्था दिसत असताना, कौतुक कोण करेल?

वसंताचं तसं नसतं. वसंत म्हणजेच एका नव्या पर्वाची सुरवात असते. नवीन उमलेल्या कळ्या, झाडांना नवीन पानं यायला सुरु झालेली असतात. निर्जीवते कडून सजीवते कडे  जाणारा काळ  म्हणजेच वसंत. आणि म्हणूनच त्याचे कौतुक. ते ही योग्यच आहे म्हणा. फिनिक्स पक्ष्या सारखा स्वतःच्या राखेतून पुन्हा जन्मास येण्याची करामत वसंतातच दिसते.

पण म्हणून हेमंताचे सौंदर्य काही कमी होत नाही. उलटपक्षी हेमंतातच सृष्टीची उलथापालथ दिसून येते. झाडांवरील पानांचे विविध रंग, हवेतील आल्हाददायक बदल, इ. केवळ हेमंताची वैशिष्ट्ये. जणू सृष्टीचा एक संदेश. बाबांनो, जरीही पुढे एक गोठवून टाकणारा, निर्जीव वाटणारा काळ येणार असेल, तरीही माझे सौंदर्य बघण्यासारखे आहे. ग्रीष्म आणि वर्षा ऋतूत हिरवीगार दिसणारी झाडं एवढी लोभस वाटत नाहीत, जेवढी हेमंतात वाटतात. एके काळी केवळ हिरव्या रंगांच्या अनेक छटांनी भरलेली झाडांची पानं हेमंत येताच विविध रंग धारण करतात. एकाच झाडावर हिरवी, पिवळी, लाल, शेंदूरी, इ. अनेक रंगांची पानं एकाच वेळेस पहायला मिळतात.
 त्यामुळेच कदाचित हेमंतामध्ये एक चैतन्य निर्माण करायची शक्ती आहे. ते चैतन्य अल्प काळासाठी असले तरीही. शेवट समोर दिसत असला ना, की एक अंतिम झुंज द्यायची अद्भुत शक्ती सर्वांच्यात असते. इतिहासात अश्या अंतिम झुंजाच्या अनेक घटना गाजलेल्या आहेत. आणि अश्याच घटना चैतन्य निर्माण करण्यासाठी वापरल्या जातात. बघा ना, "चमक उठी सन सत्तावन में  वह  तलवार पुरानी  थी, खूब लडी  मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी" ही कविता ऐकल्यावर अंगात  अचानक चैतन्य संचारल्या सारखं होतं. अगदी देवा समोर लावलेला दिवा सुद्धा शांत व्हायच्या आधी सर्वात प्रखर प्रकाश देतो. म्हणूनच शोले मध्ये बसंती सुद्धा वीरूला वाचविण्यासाठी, ``जब तक है जान, जान-ए-जहां मै नाचूंगी`` असं गाऊन असलेल्या शक्ती पलीकडे नाचू शकते. येणाऱ्या शिशिरासाठी सृष्टी सुद्धा ``आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम-राम घ्यावा`` असं अगदी थाटात म्हणते.
अपूर्व हेमंत SocialTwist Tell-a-Friend

सोमवार, ऑगस्ट ०६, २०१२

संस्कृती आणि तिचे दर्शन

 खरं सांगायचे झाले तर देश सोडल्यावरच आपल्याला संस्कृती वगैरे शब्द आठवायला लागतात. पिकतं तिथे विकत नाही तेच खरं. पण शेवटी संस्कृती म्हणजे काय? ही व्याख्या अनेक वेळा उलगडत नाही. त्यात सुद्धा जागतिकीकरणाच्या लाटेत जिथे सगळच सारखं वाटायला लागतं, तिकडे वेगळे दिसण्याची समानता बर्‍याच लोकांत दिसून येते. त्यांचे हे वेगळे पण दिसून आले ते एडमंटन मधील Heritage Festival मधे. 

जवळ-जवळ ८५ हून अधिक देशांमधील विविध खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि तेथील अनेक हस्तकला व सांस्कृतिक वस्तूंचे स्टॉल लावले होते. पार अगदी प्रगत असलेल्या इंग्लंड-फ्रान्स पासून ते विकसनशील आणि अनेक आपदांनी त्रस्त असलेल्या आफ्रिकेतील इरिट्रिया, सुदान, सोमालियातील देशांचे स्टॉल होते. इंग्लंड आणि वेल्स मधील फरक प्रत्येकाच्या स्टॉलला भेट दिल्यावर कळतो. नेदरलंड्स आणि फ्रांस मधला फरक त्यांच्या नृत्यातील उद्देश्यामुळे लक्षात येतो. हाव-भाव आणि हाल-चाल मध्ये सूक्ष्म फरक असला तरी त्या नृत्याचं उद्देश्य काय (म्हणजे हे नृत्य का केलं जात आहे)? हेच त्या दोन देशातील संस्कृतीतला फरक. साधं लोकर कसं विणलं जातं ह्या वरून हे फरक लेक्षात येतात. सूक्ष्म अभ्यासकाला हेच लहान फरक ध्यानात येतात आणि लक्षात रहातात. संस्कृतीं मधील हे फरक जाणून बुजून केले आहेत असं ही नाही. आपलं वेगळेपण दिसून यावं याचा अट्टाहस नाही!! केवळ तिथल्या भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितींमुळे निर्माण झालेले हे फरक. शिवाय प्रत्येक मनुष्याच्या नजरेतील फरकामुळे सुद्धा हे फरक घडत असतातच.

फरक आहेत तसेच साम्यपण आहेत. इराण, इराक, तुर्की, ग्रीस, इस्रायल ह्या देशांमधील खाद्य पदार्थांमधे इतकं साम्य आहे की आज हे देश एक-मेकांच्या एवढ्या विरोधात का आहेत ते कळत नाही. तिच गत भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशची. ह्या तिन्ही देशांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल बघितले की काहीच वेगळे जाणवत नाही. पदार्थांची नावे सारखीच, चव सुद्धा जवळ-जवळ सारखीच. केवळ तेथील स्थानिक परिस्थितीनुसार काही वेगळ्या घटकांचा वापर. अर्थात भारत-पाकिस्तान मधील संबंध (किंवा त्यांचा अभाव) याला सांस्कृतिक कारण नसून राजकीय (आकांक्षा नव्हे, तर) हाव व धर्मांधपणा जास्ती कारणीभूत आहे, असे माझे मत आहे. अनेक दक्षिण अमेरिकी देशांच्या पदार्थांमधे साम्य दिसते. तसेच त्यांचे पदार्थ स्पॅनिश व पोर्तुगीज पदार्थांशी थोडं फार साम्य राखून आहेत. स्पेन आणि पुर्तगालचं त्या देशांवरील एकेकाळच्या वर्चस्वाची ही दिसून येणारी गाथा आहे.

ह्या Heritage Festival मधून अनेक गोष्टी समोर आल्या. संस्कृतींमधील साम्य व सूक्ष्म फरक तर दिसलेच, पण ह्यांच्या खाद्यपदार्थांमधून त्यांचे (पूर्वापार चालू) असेलेले संबंध सुद्धा दिसून आले. उदाहरणार्थ, इराणी/इराकी पदार्थांमधे वापरले जाणारे मसाले (मिर्च्या, मिरी, इ.) पाहून लक्षात येतं की ह्या देशांचे भारताबरोबर किती जुने व्यापारी संबंध आहेत. जिलबी ह्या पदार्थाचा उगम मध्य-पूर्व आशिया मध्ये आहे. सिरीया किंवा जॉर्डन मधे. तो पदार्थ आफ्रिकी व्यापारी आणि मोगल व तत्सम आक्रमणकर्त्यां मार्फत भारतात पोहोचला. त्याच प्रमाणे सामोसा, हा उत्तर-भारतीय लोकां मधील अत्यंत प्रिय नाष्ट्याचा प्रकार केनीयाच्या व फिजीच्या मेनू मध्ये पण दिसतो. ह्याचा उगम सुद्धा मध्य आणि मध्य-पूर्व आशियात आहे.

असो, ह्या सगळ्या तांत्रिक व ऐतिहासिक गोष्टी झाल्या. तात्पर्य काय, तर संस्कृती म्हणजे आजू-बाजूच्या रहाणीमानानुसार तयार झालेली एक जीवन पद्धती. त्याकाळी तयार झालेली, जेव्हा शहरातील एका टोका पासून दुसर्‍या टोकाला जायचे म्हणजे दिवसभराची ‘पिकनिक’ असायची. आणि ८४ लक्ष योनीं मधील केवळ मनुष्य योनी मधील जीवाने अस्तित्वापलीकडील जगणे आनंददायी, रममाण आणि अधिक सुसह्य होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची फळे म्हणजेच संस्कृती!!
संस्कृती आणि तिचे दर्शनSocialTwist Tell-a-Friend

रविवार, एप्रिल १५, २०१२

निवडक मालिका

असं म्हणतात की दूरदर्शनच्या जमान्यात जेव्हा रविवारी सकाळी रामायण किंवा महाभारत लागायचं तेव्हा रस्ते ओस पडलेले असायचे. मुळात लोकं आपली सगळी कामं ह्या दोन मालिकांची वेळ लक्षात घेऊनच ठरवायची. म्हणजे, रविवारी सकाळी चिकन अथवा मासे हे ८:३० च्या आत घरात असायचे. हीच गोष्ट संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या मालिकांची. १००, ब्योमकेश बक्षी, सुरभी, इ. संध्याकाळी ७:०० वाजता कामं अशी हवीत की ती टी.व्ही. समोर बसून करता येतील. तसेच रात्री ९:०० वाजता जेवायला बसले पाहिजे किंवा जेवण उरकले असले पाहिजे. कारण त्यावेळेस मालिका सुरू व्हायच्या.  

नंतर केबलचा  जमाना आला आणि पावसाळ्यात कुत्र्यांचा शेपटा जश्या उगवतात, त्याच प्रमाणे मालिका सुरू झाल्या. देशभर सासवा-सुनांची भांडणे गाजू लागली. प्रत्येक मालिकेत कोण तरी कुणा विरुद्ध कट रचत असायचे. घरातील बायका उंची कपडे आणि दागिने घालून कारस्थाने रचू लागली. त्यामुळेच अनेक सुज्ञ जणांना मालिकांचा कंटाळा आला आणि कामं करण्याची घडी बिघडूनच गेली. कारण आता मालिकाच बघायची नाही, तर कामे कधीही करता येतील!

पण हे दृश्य हल्ली थोडं बदलायला लागलं आहे. झी मराठी वर पहिल्यांदा सा रे ग म प मध्ये Little Champs मुळे थोडी शिस्त आली. त्यानंतर पुन्हा सगळं फिसकटले. पण हल्लीच सुरू झालेल्या 'उंच माझा झोका' आणि 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ह्यामुळे पुन्हा थोडी शिस्त आली. आता कामं उरकून ८:०० वाजता टी. व्ही. समोर बसायचे, ते एका लग्नाची... चा पहिला ब्रेक होई पर्यंत हलायचे नाही. त्या ब्रेक मध्ये जेवण वाढून घ्यायचे आणि जेवायला बसायचे. ह्या २ मालिकांमुळे सगळं कुटुंब एकत्र येतं आणि यमू (रमा)-महादेवराव व राधा-घना च्या सुख-दु:खात सामील होतो. ह्या मालिकांमुळे पुन्हा एकदा कामाची शिस्त आली आहे आणि थकून-भागून घरी आल्यावर चांगले काहीतरी पहावयास मिळेल ही आशा टिकून आहे.
निवडक मालिकाSocialTwist Tell-a-Friend

बुधवार, मार्च २८, २०१२

पर्यायी वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन केव्हा?

गोव्या मध्ये नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी आपल्या बजेट मध्ये वाहतुकीच्या इंधनावर कर कमी केल्याने तिकडे पेट्रोल जवळ-जवळ ११ रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे काम एका भाजपच्या सरकारने केल्यामुळे कदाचित माध्यमांना त्याला फार प्रसिद्धी द्यावीशी कदाचित गरज वाटली नाही.  पण ही बातमी बाहेर पडल्यावर अपेक्षे प्रमाणे इतर राज्यांतून तिथल्या-तिथल्या जनतेचे आवाज उठले की गोव्या प्रमाणे त्यांचा सरकारने देखील पेट्रोल वरील कर कमी करून सामान्यांना दिलासा द्यावा.

सरकारचे काम केवळ कर वसुलीचे नसून, गरजेप्रमाणे देशाच्या जीवनमानाला गती आणि वळण देण्याचे सुद्धा आहे. आपण आपल्या गरजेच्या ७०% खनिज तेल आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीं मधील चढ-उताराची झळ आपल्याला सहन करावी लागणारच आहे. आणि सरकार तरी किती वेळ बाजार भावापेक्षा कमी किमतीला पेट्रोल आणि डीझेल विकणार आहे? लक्षात घ्या, जे पैसे तेल कंपन्यांना तूट भरून काढण्यासाठी मिळतात, ते आपणच आधी कर म्हणून भरलेले असतात. शिवाय, पेट्रोल-डीझेल वर अप्रत्यक्ष कर असल्याने तो सर्व वापरकर्त्यांना भरावा लागतो. ह्या देशातील ३% पेक्षा कमी लोक आयकर भारतात. अशा परिस्थितीत अप्रत्यक्ष करातूनच सरकारला पैसे मिळू शकतात.

त्यामुळेच मला असे वाटते की सरकारने कर कमी न करता ह्या पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून मिळणारा पैसा पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी वापरावा. त्याचा वापर अशा प्रकारे नक्कीच करता येईल-
  1. पेट्रोल-डीझेल च्या विक्रीतून कर रूपाने आलेल्या पैश्याचा वापर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी वापरावा. विशेषतः शहरांमध्ये बी. आर. टी. सारखे प्रकल्प योजनाबद्ध रीतीने अमलात आणावे. सार्वजनिक वाहतूकीलाच (बस व एस. टी.) ह्या रस्त्यांच्या वापराची परवानगी असावी.
  2. बसच्या सोई साठी उड्डाणपूल बांधून त्यावरून केवळ सार्वजनिक वाहतूक जाईल ह्याची दक्षता घ्यावी. उड्डाणपुलावर बस-थांबे बांधून, त्यावर चढ-उतार करण्यासाठी elevator आणि जिना बसवावा. ह्यातूनच नागरिकांची सोय होईल.
  3. सर्व रस्त्यांचा कडेला cycle-track बांधावेत. शिवाय ह्या track वर हरित पट्टे बनवावेत, ज्या कारणाने सायकल स्वारांना उन्हाची झळ बसणार नाही.
  4. रस्त्याचं पुनर्नियोजन अशा प्रकारे करावं ज्याने सायकल स्वारांना आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य मिळेल. उ. सायकल वाल्यांना कमीत-कमी चढ-उतार असला पाहिजे. रस्ते क्रॉस करताना त्यांची सोय आधी बघितली पाहिजे. 
  5. शिवाय, बस मधून उतरल्यावर प्रवाश्यांना आपल्या इच्छित स्थळी चालत जावे लागते. त्यासाठी उत्तम पद-पथ तयार करावे.
  6. हे सगळे केल्यावर, ह्या सगळ्या विस्ताराची देखभाल चोखपणे सरकार (किंवा पालिका) ने करावी.
पेट्रोल-डीझेल वरील अवलंबत्व कमी करण्यासाठी ह्या सगळ्याची गरज आहे. आणि नागरिकांनी सुद्धा केवळ पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी टाहो न फोडता, अशा पर्यायी वाहतुकीचा पाठ पुरावा करून सरकारला ते अमलात आणण्यासाठी भाग पाडले पाहिजे. तरच आपले भवितव्य सुसह्य होईल.
पर्यायी वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन केव्हा?SocialTwist Tell-a-Friend