मंगळवार, सप्टेंबर ३०, २००८

सज्जन कोण?

सज्जन कोण? मानव कोण? तो, जो सुशिक्षित आहे (सुशिक्षित = शाळेत अथवा कॉलेजला गेलेला (ली) )? की तो ज्याला भोवतालची जाण आहे आणि जगातल्या प्रत्येक गोष्टीला मान देऊ शकतो? उदाहरणार्थ, मी भा.प्रौ.सं. (मुंबई) (IIT Bombay) च्या छात्रावासात राहतो. आता भा.प्रौ.सं. म्हणजे देशातील विद्वान, विचारवंत मुलं असलेलं ठिकाण. तुम्हाला वाटेल की या ठिकाणी सगळ्यांना नसेल, पण बहुतेक जणांना आपल्या सामाजिक कर्तव्यांची जाणीव असेल. पण, असं तुम्हाला क्वचितच दिसेल. खरं तर ही शर्मेची गोष्ट आहे, पण काय करणार, सत्य आहे.

अगदी सोपं उदाहरण घ्या. छात्रावासाच्या खानावळीत चार वेळेला मुलांना आहार मिळतो (सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, संध्याकाळी पुन्हा नाष्टा आणि रात्री जेवण). आता छात्रावासातलं जेवण. ते काही घरच्या जेवणासारखं चविष्ट नसणार. पण ते अगदी काही टाकाऊ पण नसतं. खानावळीत किती अन्न वाया जातं (म्हणजे जे अन्न मुलं पूर्ण न खाता टाकून देतात ते) हे मोजण्यासाठी एक यंत्रणा आहे. छात्रावासात रोज सरासरी १२५ किलो अन्न वाया जातं. हे वजन सकाळच्या नाष्ट्या पासून रात्रीच्या जेवणापर्यंतच्या अन्नाचं वजन आहे. आता मला बरीच जणं सांगतात की ह्या वजनात अंड्याची टरफलं, शेंगाच्या साली, पिळलेल्या लिंबाच्या फोडी, इ. गोष्टींचं वजन पण येतं. मी तर अगदी ते वजन अर्ध्याने कमी करायला तयार आहे. तरीपण, दिवसा गणिक ६०-७० किलो अन्न वाया घालवणे हे कुठल्या सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे?

बरं जो जेवण टाकतो, त्याला जाब विचारावा, तर तो म्हणतो की जेवण चांगलं झालं नाही म्हणून टाकलं. एकदा झालं, दोनदा झालं, पण रोज काय जेवण एवढं वाईट बनत नाही की ६०-७० किलो वाया जावं. आणि अन्न वाया घालवणारे पण तेच. इतर फार काही वेगळे चेहरे दिसत नाहीत अन्न वाया घालवताना. मग ह्या गोष्टीचा काय अर्थ होतो? की काही ठराविक जणं रोजच्या रोज फार काही कारण नसताना अन्न वाया घालवतात. अनेक चमत्कारिक कारणं ऐकायला मिळतात. एकाने विचारलं की मी जर हे अन्न वाया नाही घालवलं तर काही फायदा होणार आहे का? अरे बाबा, तू जेवणाचे पैसे देतोस, ह्याचा अर्थ असा नाही की तू अन्न वाया घालवू शकतोस. तुला पाहिजे तेवढे जेवण्यास तू मोकळा आहेस. ते स्वातंत्र्य तुझ्या कडून हिरावलेले नाही. मग अन्न वाया घालवण्याची वेळ का येते?

अजून एक कारण असं ऐकायला मिळतं की मुलांना पुन्हा-पुन्हा बॅन-मेरी पाशी जाऊन वाढून घ्यायचा कंटाळा येतो, म्हणून आधीच जास्त वाढून घेतात आणि मग टाकतात. रोज जेउन सुद्धा ह्यांना आपल्या जेवणाचा अंदाज येत नाही? आपण कुठली गोष्ट किती खाऊ शकतो हे कळायला किती दिवस लागतात? आता ही मुलं भारतातल्या एका अग्रमानांकित प्रौद्योगिकी संस्थेतली आहेत. इथल्या मुलांना कौतुकाने "क्रीम ऑफ द नेशन" म्हणून संबोधलं जातं. इथल्या अभियंतांकडून भारताचं तंत्रज्ञान विकसित व्हावं अशी अपेक्षा आहे. ज्यांना आपल्या जेवणाचा अंदाज येत नाही त्यांना तंत्रज्ञान विकास कितपत जमणार?

हाच आहे का आपला सुसंस्कृत समाज? आपल्या भोवताली मुलं कुपोषणाने मरत आहेत, असं असताना, इथे मात्र ६०-७० किलो अन्न दिवसाला वाया घालवायचं आणि वर तोंड करून ते कृत्य कसं चुकीचं नाही आहे अशी विधानं करायची. हीच का आपली संस्कृती? पैसे देऊन मोकळं झालं की वाट्टेल तसं वागयचं आणि आपल्या जवाबदारीचं अजिबात भान नाही ठेवायचं. ह्या चंगळवादाच्या नाही त्या सवयी लागल्या की काय होतं हे वेगळ्याने सांगायची गरज नाहीये. पण एक सुजलाम-सुफलाम भारत पहायचा असेल तर आपण आपली दृष्टी बदलली पाहिजे. अन्न मिळणे हा जसा आपला हक्क आहे, तसचं ते वाया न घालवणे ही आपली जवाबदारी आहे. आणि जवाबदारीची जाणीव असली की एक आदर्श समाज घडवायला कितीसा वेळ लागणार?
सज्जन कोण?SocialTwist Tell-a-Friend