शनिवार, डिसेंबर २६, २००९

पावनखिंड: रणजीत देसाई


इतिहास शाळेच्या पुस्तकांमधे वाचून नंतर जर त्याचाकडे बघितलं नाही, तर त्यातले अनेक आश्चर्यजनक आणि कौतुकास्पद पैलू आपल्याला दिसत नाहीत आणि कळतही नाहीत. इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेलं असतं, अफ़झलखानाचा वध झाल्यानंतर आदिलशाहीच्या सैन्यात गडबड उडाली आणि त्या गोंधळाचा फायदा घेऊन मावळ्यांनी त्या सैन्याला अक्षरश: कापून काढले. जे शत्रू शरण आले, त्यांना सोडून दिले. ह्या पलीकडे फारतर फार एवढीच माहिती असते की खानाच्या सैन्यातला दारूगोळा, हत्ती, घोडे, इत्यादि, मावळ्यांनी जप्त केले. पण हे माहित नसेल, की महाबळेश्वरच्या दिशेने पळणार्‍या आदिलशाईच्या फौजेला रोखण्याचे काम बाजीप्रभू देशपांडे कडे होते. आणि बाजींनी त्या पळणार्‍या सैन्याची वाट अडवण्यासाठी एका लंगड्या तोडप्याच्या मदतीने रडतोंडीच्या घाटातली झाडं इतकी सफाईने खापलून ठेवली होती की हलक्या धक्क्याने सुद्धा ती पाडून वाट बंद करता येत होती. बाजींना फुलाजी नावाचे आणि बाजीं एवढेच शूर, थोरले बंधू होते, हे सुद्धा अनेक जणांना माहित नसेल.

असल्या गोष्टी माहित होण्यासाठी गरज असते इतिहासाच्या पुस्तकातून बाहेर डोकावण्याची. आणि इथेच गरज भासते बाबासाहेब पुरंदरे आणि रणजीत देसाईं सारख्या शिवप्रेमी लेखकांची. पावनखिंड, हे रणजीत देसाईंनी लिहिलेलं बाजीप्रभूंचं एक संक्षिप्त चरित्र. बाजींची आणि महाराजांची भेट कशी घडली, तिथपासून ते पावनखिंडीत बाजी आणि फुलाजींनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यापर्यंतच्या प्रवासाची माहिती ह्या पुस्तकात आहे. बाजी हे आधी कृष्णाजी बांदलांचे प्रधान होते. शिवाजी महाराजांनी बांदलांना हरवून बाजींना आपल्या बाजूने केलं. बाजीं कडून त्यांनी जासलोडचा किल्ला वसवला आणि त्याची पाहणी करताना, महाराज एवढे मोहात पडले की जासलोडच्या गडाचे नाव त्यांनी मोहनगड ठेवले. कोंडाण्याचा सिंहगड का झाला, हे सर्वांना ठाऊक आहे. पण खेळणाचा विशालगड कसा झाला, हे पावनखिंड मधून कळतं.

पावनखिंड म्हणजे बाजींच्या बुद्धिमत्तेची आणि अचाट शौर्याची कहाणी. शिवाजी महाराजांनी माणसं कशी निवडली आणि तयार केली ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच पावनखिंड. बाजींकडून पन्हाळा आणि जासलोडचे गड तयार करून घेतले. युद्धात व्यवहारी निर्णय घेण्यास शिवकले. बाजींनी सुद्धा हे सगळे अनुसरले आणि त्यातून अनेक गोष्टी शिकले. ह्याचं उदाहरण पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी दिसून येतं. सिद्दी जोहारने गडावर तोफांचा भडीमार केला, तेव्हा बाजींनी संयम बाळगून सिद्दीला आपल्या तयारीची दाद लागू दिली नाही. आपल्या तयारी बद्दल शत्रूला गाफिल ठेवणे फायद्याचे असते, हे बाजी शिवाजी महाराजां कडून शिकले. पण, इंग्रजांनी जेव्हा आपली लांब पल्ल्याची तोफ डागून बाजींना आव्हान दिले, तेव्हा काली तोफ डागून इंग्रजांना त्यांनीच पळवून लावलं. म्हणजेच शत्रूला गाफिल ठेवलं तरी स्वत:ची हानी होऊ द्यायची नाही. ही कथा आहे स्वामी-निष्ठ बाजी आणि फुलाजींची. बांदल हरले तरी बाजींनी बांदलांची साथ सोडली नाही. आणि शिवाजीला राजा मानल्यावर त्याचावर सुद्धा जीव ओवाळून टाकला. अर्थात बाजींसारखा इमानदार सेनापती मिळण्यासाठी राज्यकर्ते सुद्धा शिवरायांसारखे हवेत. पावनखिंडीतल्या अतिंम युद्धाचे वर्णन अप्रतीम आहे. वाचताना युद्धाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. स्वामी रक्षणासाठी त्वेषाने लढणारे बाजी आणि फुलाजी, गडावर मावळ्यांच्या खांद्याला खांदा भिडवून लढणारे शिवाजी महाराज, ह्यांचा पराक्रम वाचून एकदम भरून येतं. अवघ्या तीनशे मावळ्यांनी आदिलशाहीची २५०० हून अधिक संख्या आणि बळ असलेली फौज पुढे जाऊ दिली नाही. हे मावळे आपल्या राजासाठी प्राण अर्पण करायला कसे तयार झाले, ह्याचं अखंड चित्र पावनखिंड मधे रंगवलं आहे.
पावनखिंड: रणजीत देसाईSocialTwist Tell-a-Friend

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: