शनिवार, फेब्रुवारी २६, २०११

क्रिकेट: फलंदाजाच्या बाजूने झुकलेला

सध्याच्या क्रिकेट विश्व चषकाच्या ज्वरामुळे क्रिकेट बद्दल वाचन जरा जास्तीच होत आहे. खेळा मधील तांत्रिक मुद्दे, त्याचा इतिहास, काही विवादास्पद घटना, त्यावरील तज्ञांचे,  खेळाडूंचे मत आणि त्यांची मानसिक परिस्थिती ह्या बद्दल वाचण्याची मजा काही औरच आहे. कारण मी क्रिकेट खेळून नव्हे, तर वाचून आणि बघून अधिक शिकलो आहे. 
क्रिकेटचा सुरवातीचा इतिहास पाहता, हा खेळ थोड्या फार प्रमाणात गोलंदाजांच्या पारड्यात झुकलेला दिसेल. त्यातील काही कारणं नैसर्गिक आहेत. उदाहरणार्थ, पिच रात्रभर उघडी (uncovered) ठेवल्याने, फलंदाजांकडे सुरक्षेचे फार उपाय नसल्याने आणि क्षेत्ररक्षणाची रचना करण्यास पूर्ण मुभा असल्याने. हळू-हळू  हे माप फलंदाजांच्या पारड्यात झुकू लागलं. आणि एक काळ असाही आला जिथे दोघांना समान संधी होत्या. पण त्यानंतर मात्र ते पारडं फलंदाजाच्या पारड्यात जे झुकायला लागलं, ते अजूनही तसच आहे. ह्याची कल्पना तुम्हाला समाजातील प्रतिक्रियांमधून दिसून येतील. आज कुठल्याही पालकाला विचारा, तो म्हणेल, माझा मुलगा सचीन सारखा क्रिकेटपटू व्हावा. फार क्वचीत कुणीतरी असा म्हणताना दिसेल, "माझा मुलगा अनिल कुंबळे सारखा क्रिकेटपटू व्हावा." समाजाने सुद्धा गोलंदाजांना दुय्यम स्थान दिलेलं आहे. 

त्याचं अजून एक उदाहरण म्हणजे "बॅकिंग अप". बॅकिंग अप म्हणजे, एकदा गोलंदाजाने धावायला सुरवात केली की नॉन-स्ट्रायकर एन्डला असलेला फलंदाज चेंडू टाकण्या आधीच पॉपिंग क्रीज़ मधून बाहेर येतो. ह्यामुळे त्याला पटकन धाव काढायची संधी मिळते. पण तो जर खूपच बाहेर गेला, तर गोलंदाजाला नॉन-स्ट्रायकरला धावचीत करता येतं. पण गोलंदाजाने असं केलं तर त्याच्या ह्या कृत्याला "unsportsmanlike behaviour", अर्थात खिलाडू वृत्तीचा अभाव, असं म्हण्टलं जातं. एवढच काय, तर बातमीदारां पासून समालोचक आणि तज्ञांपर्यंत सर्व त्या गोलंदाजाची चीर-फाड करतात. १९४७ साली विनू मंकडांनी बिल ब्राऊन ह्या ऑस्ट्रेलियन फलंदाला अशा रितीने धावचीत केल्यापासून्ह्या पद्धतीने बाद करण्यास "मंकडवले" (Mankaded) असं म्हणतात. ह्या घटनेनंतर ICC/MCC ने नियम बदलले आणि एकदा का गोलंदाजाने चेंडू फेकण्यासाठी हात फिरवला, तर त्याला नॉन-स्ट्रायकरला मंकडवता येत नाही. म्हणजे, पुन्हा एकदा फलंदाजाच्या सोयीचा निर्णय झाला.

नॉन-स्ट्रायकरला मंकवडलं नाही तर गोलंदाजाच्या खिलाडू वृत्तीचं कौतुक केलं जातं. कोर्टनी वॉल्शने १९८७ साली पाकिस्तानच्या सलीम जाफरला न मंकडवता केवळ चेतावनी देऊन सोडलं. त्यामुळे वॉल्शचं जगभर कौतुक झालं. पण पाकिस्तानने मॅच जिंकली. ह्याचा तोटा वेस्ट इंडीजला झाला. जर वॉल्शने जाफरला बाद केलं असतं तर वर्ल्ड कपचं चित्र वेगळं असू शकलं असतं.

मंकवडल्याने गोलंदाजाची अखिलाडू वृत्ती (खिलाडू वृत्तीचा अभाव) दिसते. पण चेंडू फेकला देखील नसताना क्रीज सोडून धाव घेण्यास सुरू करण्यात फलंदाजाचा अखिलाडूपणा नाही का? "चीकी सिंगल"च्या परिस्थितीत हा क्षेत्ररक्षण करणार्‍यांवर अन्याय ठरत नाही का? एक वॅलिड चेंडू पडल्या अगोदरच एका वॅलिड धाव घेण्याचा प्रयत्न हे परस्परविरोधी वाटत नाही का? क्रिकेटचे नियम म्हणतात की चेंडू पूर्ण फेकून होई पर्यंत नॉन-स्ट्रायकरने क्रीज सोडू नये आणि तसे केल्यास तो धावचीत केला जाऊ शकतो. तर मग त्या प्रकारे बाद केल्यास गोलंदाज अखिलाडू का ठरतो.  बहुमत असं आहे, की नॉन-स्ट्रायकर चुकून क्रीजच्या बाहेर जातो. ज्या फलंदाजाला आपली क्रीज माहित नाही, तो काय फलंदाजी करणार? पण त्याला केवळ चेतावनी देऊन सोडलं आणि त्या फलंदाजाने पुढे शतक ठोकलं, तर मग? किंवा मॅच-विनिंग डाव खेळला तर? त्याचा ह्या चुकीचं फळ क्षेत्ररक्षण करण्यार्‍या संघाने का भोगावं? आंतर्राष्ट्रीय क्रिकेट खेळणार्‍या प्रत्येक खेळाडूला त्यातील ठळक नियम माहित असतात. उत्कृष्ट दर्जाच्या खेळाडूंना बारकावे पण माहित असतात. तर मग फलंदाजाने नियमाचे उल्लंघन का करावे? आणि नियमांच्या चौकटीत राहून सुद्धा गोलंदाजाने टिका का सहन करावी? एकंदर काय, तर क्रिकेट हा batsman centric (फलंदाजी केंद्रीत) खेळ झाल्याने गोलंदाजी/क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाचे हात जितके बांधता येतील तितके बांधण्यात आले आहेत.
क्रिकेट: फलंदाजाच्या बाजूने झुकलेलाSocialTwist Tell-a-Friend