मंगळवार, मे १८, २०१०

ब्लॉग लेआऊट आणि ब्लॉग

अनेक दिवस हे मनात होतं, एकदा ब्लॉगच्या लेआऊट विषयी लिहावं. कारण, अनेक ब्लॉग वाचले, त्यात ब्लॉग कडे आकर्षित करणारी पहिली गोष्टं म्हणजे त्या ब्लॉगचा लेआऊट आणि त्याची रंग-संगती. चांगले ब्लॉग बेढब लेआऊट मुळे मार खातात आणि सुमार दर्जाचे ब्लॉग निदान लेआऊट मुळे थोडा वेळ तरी एखाद्या वाचकाला आकर्षित करतात.

सगळ्यात पहिली गोष्ट. अशी एखादी टेम्पलेट घ्यावी ज्यात आपला मजकूर ठळक पणे दिसून येईल. टेम्पलेट निवडताना ह्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात- एकतर ब्लॉगच्या मजकुराच्या फॉन्टचा रंग काय असेल? किंवा काय ठेवायचा. त्यासाठी मजकूरा मागची बॅकग्राऊंड कोणत्या रंगाची आहे हे ठरवा. उगीच "स्टाईल" मारण्यासाठी भडक रंग किंवा विचित्र रंग-संगती निवडू नये. ब्लॉगची बॅकग्राऊंड आणि मजकूर, ह्यांचे रंग काँट्रासटिंग हवे. म्हणजे मजकूर हा बॅकग्राऊंड वर उठून दिसला पाहिजे. त्याच्या उलट नव्हे.

दुसरा मुद्दा. ब्लॉग टेम्पलेट मधले "साईड-बार". अनेक टेम्पलेट २-कॉलम, किंवा ३-कॉलमचे असतात. त्यातला सगळ्यात मोठा कॉलम मजकूरासाठी असतो आणि दुसरा किंवा तिसरा अतिरिक्त माहिती साठी असतो. ह्या कॉलम्सचा वापर केवळ त्यासाठीच करावा. तुमच्या स्क्रीनची ५०% पेक्षा अधिक जागा मजकुराच्या कॉलमने व्यापली पाहिजे. उरलेल्या जागेत हे बाकीचे कॉलम आले पाहिजेत. आणि मुख्य कॉलम आणि अतिरिक्त कॉलम मधला फरक जाणवला पाहिजे. नाहीतर वाचणार्‍याचा गोंधळ उडून ब्लॉग मधलं स्वारस्य निघून जाण्याची शक्यता असते.

अनेकजण ह्या अतिरिक्त कॉलम्स मधे अनेक प्रकारचे विजेट्स टाकतात. विजेट्स आकर्षक असले तरी त्यांचा अतिरेक करू नये. वाचक विजेट्स कडे नव्हे, आपल्या लेखनाकडे बघत असतात. विजेट्स मुळे त्यांना लेख शोधायला वेळ लागू नये. किंवा विजेट्स आणि जाहिरातींच्या मधे लेख झाकला जाऊ नये. मुख्यत: अतिरिक्त कॉलम्स मधे आपल्या विषयी (सांगण्यासारखं असेल तर) थोडसं, ब्लॉग आर्कायिव्ह, आपण जर कुठल्या (कायद्याने मान्य असलेल्या) संघटनेचे किंवा नेटवरील फोरमचे सदस्य असलो तर त्यांचे बोध चिन्ह आणि फार तर एक-दोन अजून विजेट्स असावीत. तुम्ही ब्लॉग वर जर जाहिराती टाकणार असाल, तर ते शक्यतो मजकुराच्या खालच्या भागात टाकावेत. साईड बार मधे टाकू नयेत, नाहीतर त्यांच्या ऍनिमेशन्समुळे वाचकाचं लक्ष विचलित होतं. लक्षात ठेवा, आपला ब्लॉग वाचला जातो तो आपल्या लेखांमुळे, जाहिरातींमुळे नाही.

आणि सगळ्यात शेवटचं, पण तितकंच महत्वाचं म्हणजे भाषा. भाषा ही नेहमी शुद्ध असावी. अशुद्ध भाषेमुळे मन चल-बिचल होतं आणि पुढचा मजकुर वाचायची इच्छा निघून जाते. जर ब्लॉग विश्वात आपल्याला आपलं स्थान निर्माण करायचं असेल तर भाषेची काळजी घेतलीच पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा होत नाही, की प्रत्येक इंग्रजी शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द वापरलाच पाहिजे. तुम्ही साहित्य लिहित असाल, तर ठीक आहे, पण दैनंदिन वाचनासाठी लिहित असाल, तर बोली भाषेतले शब्द वापरावे. म्हणजे उगीच कॉम्प्युटरला संगणक म्हणत सुटू नये.

असो, तर शेवटी काय, आपला ब्लॉग एकदम सुटसुटीत असावा. उगीच मुंबईच्या लोकल सारखी त्यावर इतर शुल्लक माहितीची गर्दी नसावी आणि सरळ-सोप्या भाषेत लिहून तो अधिक-अधिक वाचकांना समजेल ह्याचा प्रयत्न करावा.
ब्लॉग लेआऊट आणि ब्लॉगSocialTwist Tell-a-Friend

सोमवार, मे १०, २०१०

प्रकाशन हक्क (कॉपीराईट) संबंधी थोडंसं

कालच मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, दादरच्या दा. सा. वा. सभागृहात पार पडला. कार्यक्रम अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण होता. त्या बद्दल कांचन ताई, महेंद्र काका आणि रोहन चौधरीं चे आभार मानायलाच हवेत. इतर ब्लॉगर्सच्या काय समस्या आहेत, किंवा द्विधा आहेत, हे लक्षात आलं. त्या द्विधा किंवा समस्यांचं थोडं फार निराकरण करायाचा माझा हा प्रयत्न आहे.

आनंद घारे काका यांनी एक अत्यंत कळीचा प्रश्न समोर ठेवला. की ई-मेल मधून फॉरवर्ड म्हणून आलेले, किंवा इंटरनेटवर उपलब्ध असलेली छायाचित्र आपण आपल्या ब्लॉग वर वापरू शकतो का? वापरली तर त्या चित्रांच्या प्रकाशन हक्कांचं काय? हा प्रश्न मांडल्यावर असं लक्षात आलं की अनेक ब्लॉगर्सना कॉपीराईट्स संबंधी फार धूसर माहिती आहे. नेटभेट वर ह्या विषयावर लेख आलेले आहेत, पण म्हण्टलं की आपण आपल्या परीने हा विषय मांडावा.

आपल्याला जर प्रकाशन हक्क भंग करण्याच्या धोक्यापासून दूर रहायचं असेल, तर एक नियम लक्षात ठेवा. जर कुठल्याही छायाचित्रा सोबत प्रकाशन हक्कां बद्दल काहीच लिहिलं नसेल, तर आपण सर्व हक्क छायाचित्राच्या मालका कडे राखीव आहेत, असं समजावं. त्याचं कारण असं की जर प्रकाशन हक्कां बद्दल मनात द्विधा असेल, तर आपण आपल्या दृष्टीने सुरक्षित बाजू घ्यावी. न जाणो, ह्या माहिती जालाच्या कुठल्या कोपर्‍यातून तो छायाचित्रकार तुम्हाला शोधून काढेल आणि कायदेशीर कारवाईची धमकी देईल. दुसरं असं, की परवानगी शिवाय त्याचं छायाचित्र वापरणं हे सुद्धा तात्विक दृष्टिकोनातून चुकीचं आहे. अहो, साधं आपलं पेन कुणी न विचारता घेतलं तरी आपली चिडचिड होते!! अनेकजण म्हणतात की छायाचित्र टाकून त्याच्या सोबत आपण जर लिहिलं की हे अमक्या-अमक्या च्या वेबसाईट वरून घेतलं आहे, किंवा हे छायाचित्र अमक्याचं आहे, असं लिहिलं आणि त्याचा दुवा दिला, तर सर्वसाधारण पणे कुणीही आक्षेप घेत नाही. पण हे गृहीत धरणं चुकीचं आहे. ते छायाचित्र तयार करण्यामागे किती कष्ट लागले असतील हे आपल्याला थोडीच माहित आहे? म्हणून हे कधीही गृहीत धरू नका.

मग ह्याच्यातून मार्ग काय? जर आपल्याला छायाचित्र वापरणे अनिवार्य असेल, तर काय करता येईल? त्यावर महेंद्र काकांनी सुचवलेला एक उपाय म्हणजे, गुगलवर कॉपीराईट फ्री छायाचित्रांचा शोध घेता येतो आणि ती वापरता येतात. अशा छायाचित्रांना रॉयल्टी फ्री छायाचित्रं असे ही म्हणतात. दुसरं असं की flickr वर किंवा picasa वर Creative Commons License अंतर्गत प्रकाशीत केलेली छायाचित्र शोधावी. Creative Commons (CC) License, हे प्रकाशकाला आणि वापरकरत्यांना अतिशय सोप्या भाषेत समजेल असा परवाना आहे. ह्या परवान्याच्या अंतर्गत आपण आपले छायाचित्र अथवा लेख अथवा अन्य कुठलीही प्रकाशन योग्य गोष्ट आपल्याला पहिजे त्या रितीने प्रकाशीत करू शकतो. उदाहरणार्थ, जर मला माझ्या छायाचित्राचा मुक्त वापर करण्याची मुभा द्यायची असेल, तर मी CCचं Attribute परवाना वापरू शकतो. पण जर मला असं वाटलं की हे छायाचित्र इतरांनी स्वत: पैसे कमवण्यासाठी वापरू नये, किंवा ह्या छायाचित्रा मधे कोणताही बदल न करता ते आहे तसं वापरावं, तर मी त्यांचा Attribute-Non Commercial-No Derivatives परवाना वापरू शकतो. असे एकंदरीत ८-९ परवाने CCच्या अंतर्गत उपलब्ध आहेत. शिवाय कुठल्याही परवान्यावर सूट द्यायची मुभा प्रकाशका कडे आहे. त्यामुळे ती परवानगी मिळवीणे फार कठीण नाही. म्हणूनच हल्ली CC परवान्याच्या अंतर्गत आपले लेख, छायाचित्र, इ. प्रसिद्ध करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

असो, एवढं सगळं असूनही लोक CC परवाना पाळतीलच असं नाही. त्यातही 'मी वापरलं तर कुणाला कळतय', ही भावना असणारच. पण आपण जर एका सुजाण, सुसंस्कृत समाजाचे नागरिक आहोत, तर प्रकाशकाच्या मालकी कडे काना-डोळा करून कसं चालेल? पण लक्षात ठेवा, माहिती जालावर कुठलीही गोष्ट गृहीत धरणे धोकादायक आहे. टायगर वुड्स कसा फसला, हे विसरू नका. अर्थात तो माहिती जालावर फसला नाही, पण माहिती तंत्रज्ञानाच्या धोक्यांना दुर्लक्षित केल्यामुळे फसला. आपल्याला त्रास, मनस्ताप, इ. होईल अशी कुठलीही गोष्ट करू नका.
प्रकाशन हक्क (कॉपीराईट) संबंधी थोडंसंSocialTwist Tell-a-Friend

गुरुवार, मे ०६, २०१०

सन्माननीय कुमार केतकर यांस

नमस्कार,
आपला लोकसत्तेतला अग्रलेख वाचला. शीर्षक पण भन्नाट आहे.
महाराष्ट्रची 'वाट'चाल : मुंबई मिळाली, महाराष्ट्र हरवला!
आपण महाराष्ट्राच्या चुकांचा एकदम पंचनामाच तयार केला आहे. मराठी रंगभूमीने, साहित्याने, कलाक्षेत्राने उरलेल्या भारतावर काहीच प्रभाव पाडला नाही, असा तुमचा तर्क आहे. ह्या उलट बंगाली आणि हिंदी साहित्याने आणि कलाक्षेत्राने आपली एक वेगळी छाप पाडली, असं तुमचं म्हणणं आहे. साहित्यासाठी उदाहरणं देताना तुम्ही रविन्द्रनाथांचं उदाहरण देता. पण रविन्द्रनाथ हे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात यायच्या आधी होते, हे विसरलात. हिंदी भाषेतील लेखकांमधे तुम्ही प्रेमचंदचं उदाहरण देता, इंग्रजीत मुल्कराज आनंद. पण ह्या सर्वांचा कार्यकाळ महाराष्ट्र राज्य निर्माण होण्या आधीचा आहे, हे तुम्ही विसरता. मुल्कराज आनंद जरी स्वातंत्र्यानंतर हयात होते, तरी त्यांचं साहित्य लेखन थांबलं होतं.

ह्या उलट पु.ल. हे राज्य स्तरावरील एकमेव साहित्यिक होते, की ज्यांच्या सभांमुळे तुमच्या लाडक्या कॉंग्रेस पक्षाचे खासदार पडले आणि जनता पक्षाचे खासदार निवडून आले. स्वातंत्र्यानंतर आणि संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापने नंतर एक महाश्वेता देवी वगळता असे किती साहित्यिक आहेत, ज्यांच्या भाषणांनी निवडणुकीची दिशा बदलू शकते?

राजकारणात तुम्ही जे म्हणता ते सत्य असेलही. पहिले, सी.डी. देशमुख आणि त्या नंतर यशवंतराव चव्हाण ह्यांच्या शिवाय केंद्रात एकही प्रभावी नेता महाराष्ट्रातून झाला नाही. पण सुनील प्रभू आणि मनोहर जोशींचे कार्य आपण एकदम कचर्‍यात टाकून दिले! त्या दोघांच्या कामाला सर्व स्तरावरून प्रशंसा मिळाली होती, हे विसरलात.

महाराष्ट्राचा इतिहास शिवाजी महाराज आणि पेशवे ह्यांच्या बरोबर संपतो, असं तुम्ही लिहिलं आहे. पण ह्याच महाराष्ट्रात लोकमान्य टिळक आणि आगरकरां सारखे स्वातंत्र्य सैनिक आणि समाज सुधारक तयार झाले. सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके सुद्धा महाराष्ट्रातले. चाफेकर बंधू, सावरकर बंधू, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, हे सगळे महाराष्ट्रातले. ह्यांच्या सारखे नेते इतर कुठल्या राज्याला लाभले का? तुम्ही "सिमबॉलिझम" वर भर देताय, म्हणून मी पण तेच करतोय. नाहीतर अजून खोल जाऊन तर्क-वितर्क करता येईल.

हिंदी चित्रपट क्षेत्रात सुद्धा तेच. तुम्ही ’उत्तरे’ कडील लोकांचे वर्चस्व आहे असं म्हणता. पण सोईस्कर पणे लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर ह्यांना विसरता. तनुजा आणि शोभना समर्थ ह्यांना पण तुमच्या मते काहीही किम्मत नाही. अमोल पालेकर, आणि एकेकाळी सगळ्या हृदयांची धक-धक उडवणारी माधुरी दिक्षित हे मराठीच आहेत. मराठी भाषेतील दोन चित्रपट ऑस्करच्या स्पर्धे साठी निवडले गेले आहेत. हिंदी वगळता इतर कुठल्याही भाषेतील भारतीय चित्रपट ऑस्करला गेले नाहीत, हे तुम्ही विसरलात.

ह्या सगळ्या बाबींकडे लक्ष देऊन माहिती मिळवताना तुमची इतकी दमछाक झाली की क्रीडा क्षेत्राकडे तुमचे दुर्लक्षच झाले. आणि ह्या क्षेत्रातले महाराष्ट्राचे योगदान (किंवा त्याचा अभाव) नमूद करायचं राहून गेलं. तर तुम्हाला आठवण करून देतो. ऑल्मपिक स्पर्धेत व्यक्तिगत खेळां मधे आज पर्यंत भारताला केवळ पाच पदकं मिळाली आहेत. पैकी पहिलं, महाराष्ट्राच्याच खाशाबा जाधंवांनी मिळवलं होतं. अंजली वेदपाठक, अभिजीत कुंटे, भाग्यश्री ठिपसे, प्रवीण ठिपसे, हे मराठीच आहेत. आणि क्रिकेट बद्दल काय बोलावं? माधव मंत्री, सुनील गावस्कर, सचीन तेंडुलकर, विजय हजारे, विजय मांजरेकर, हृषिकेश कानिटकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, अजीत आगरकर, जहीर खान, हे अस्सल मराठीच आहेत. ह्यांच्या योगदानाचा उल्लेख करावासा वाटला नाही तुम्हाला?

तुम्ही म्हणता तसं महाराष्ट्रात आपल्या मना सारख्या सर्वच गोष्टी घडल्या नसतील. पण सर्व काही नकारार्थी नेण्या सारखे सुद्धा घडलं नाही. पण एखाद्याला केवळ उणीवाच काढायच्या असतील, तर असे इंग्लंड-अमेरिकेत गेलेले अनेक भारतीय-मुळाचे लोक आहेत, जे भारत-निंदेला आपले जीवित कार्य मानतात. तुम्हालाही त्यांच्यात सामील व्ह्यायचे आहे का? बरं एवढा सगळा उणीवांचा पाढा वाचून दाखवल्यावर त्यातून बाहे पडायचा मार्ग काय, ह्या विषयी एकही अक्षर लिहिलं नाहीत? हे म्हणजे डॉक्टरने आजाराची सगळी कारणं सांगून औषधं न देता पेशंटला घालवून देण्या सारखे झाले. तर सांगायचा मुद्दा असा, की जरी आम्ही मराठी लोकं काही क्षेत्रात मागे पडलो असलो, तरी तुम्ही म्हणता तसं सगळं संपल्या सारखं नाही. आणि तुमचे असे नकारार्थक लेख वाचून कृपया आमच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचवू नका.
सन्माननीय कुमार केतकर यांसSocialTwist Tell-a-Friend