मंगळवार, नोव्हेंबर २०, २००७

हिंदू धर्म: माझा एक दृष्टीकोन

कधी आपल्या डोक्यात हा विचार आला आहे का? की हिंदू धर्मात ब्रम्हदेवाची अर्धांगिनी सरस्वती, विष्णुची लक्ष्मी आणि शंकराची पार्वती (शक्ति) का आहेत?

ब्रम्हदेव हे अखंड ब्रम्हांडाचे निर्माते. कुठलीही गोष्ट निर्माण करण्यासाठी तिच्या निर्मितीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर निर्माण करत्याला सफलते साठी ज्ञानाची साथ गरजेची आहे. तर मग, निर्मात्या देवाला ज्ञानाच्या देवीची साथ नको का? म्हणून ब्रम्हदेवाच्या साथीला विद्येची देवी सरस्वती आहे.

श्री भगवान विष्णु सर्वांचे पालक आहेत. अर्थात ते त्रिलोकाचे पालन व रक्षण करतात. कुठल्याही गोष्टीचं पालन करण्यासाठी नेहमी साधनांची गरज असते. त्या साधनांच्या वापराचा मोल द्यावा लागतो. धन हे साधन मिळवण्याचा एक अतिशय महत्वपूर्ण मार्ग आहे. शिवाय आपले इतर कार्य पाप अथवा पुण्य कमवण्याचे मार्ग आहेत. म्हणून भगवान विष्णुंच्या साथीला धन/साधनांची देवी लक्ष्मी आहे.

श्री इश्वर शंकर हे त्रिलोकातील पाप व पाप्यांना नष्ट करणारे देव आहेत. नाश करण्यासाठी शक्तिची असण्याची गरज असते. आणि नुसती शक्ति नव्हे, तर कणखर पणे उभी रहाणारी शक्ति असावी लागते. म्हणूनच हिमालय-पुत्री पार्वती (अर्थात शक्ति) ही भगवान शंकराची पत्नी आहे.

ह्याहून पुढे जायचे झाले, तर ह्यांना त्रिदेव म्हणून ह्यांचं एकरूप का आहे? ह्याचं कारण असं की संसारात घडवणूक, पालन आणि नाश, ही तिन्ही कार्य एकत्र चालू राहिली पाहिजेत. एक अगदी सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर बाग काम करणारा माळी घ्या. हा माळी एखादं रोपटं वाढवताना, त्या रोपटाला खत-पाणी देउन त्याचं पालन करतो. त्या रोपटाच्या कुठल्याही भागाला इजा झाली असेल (किव्हा कीड लागली असेल) तर तो भाग नष्ट करतो आणि उरलेल्या भागाचे रक्षण करतो. ह्या सर्वातूनच तो एक सुंदर बाग निर्माण करतो. ही बाग निर्माण करायला त्याला पालन करण्याचं व कुठल्या गोष्टीचा नाश करायचा, ह्या व अजून अनेक विषयांचं ज्ञान असणे गरजेचं आहे !!
हिंदू धर्म: माझा एक दृष्टीकोनSocialTwist Tell-a-Friend

रविवार, जुलै २२, २००७

पु.ल. तुम्ही महान आहात

लेखाच्या शिर्षका बद्दल कुणाचं दुमत होणार नाही. पण तरीही ह्या लेखाला हेच शिर्षक देणं योग्य वाटलं. आज आम्ही आमच्या एका परीचितां कडे गेलो होतो. बरेच दिवस हे परीचित आम्हाला बोलवत होते. त्यामुळे रविवार साधुन मी आमच्या माता-पितां सोबत त्यांचा कडे गेलो. तर आमचे हे परीचित प्राणी प्रेमी आहेत ह्याची आम्हाला कल्पना नव्हती. त्यांचा घरी त्यांनी काय-काय पाळलं आहे! सर्वात जास्त आढळुन येणारा कुत्रा, त्याशिवाय वेगळ्या प्रकारचे मासे आणि एक कासव!! त्यामुळे श्री-विष्णुंच्या पहिल्या दोन अवतारांचं दर्शन झालं.

आता मूळ कोकणातलं आणि तालीम पुण्यातली असल्याने हे सगळं गप्प-पणे बघवलं नाही. ह्या सगळ्या दृश्यावर काही तरी भाष्य केल्या शिवाय आमच्या तिर्थरूपांना रहावलं नाही. खरं तर मलाही माझं मत प्रदर्शन करायचं होतं पण का कुणास ठाउक, मी स्वत:ला रोखून धरलं. तर आमच्या तिर्थरुपांनी (आ. ति.) केलेले प्रश्न आणि आमचे परीचित (आ.प.) ह्यांची उत्तरं हा खेळ बघूया-

संदर्भ: आ.पं. कडचं कासव पाण्यात गटांगळ्या खात होतं आणि श्वास घेण्यासाठी सारखं डोकं वर-खाली करत होतं.
.ति.
: कासव पाण्यात श्वास घेतात की हवेत?
आ.प. : नाही, ते हवेत श्वास घेतात. आपल्या कडची कासवं पाण्यात असतात आणि कधी तरी वर येऊन श्वास घेतात. हा सारखा वर खाली करतो. तरी हा आता छोटा आहे. ह्याला जर मोठ्या टाकीत पहिल्या पासून ठेवलं असतं तर हा अजून मोठा झाला असता. त्याचासाठी आधी एक दगड ठेवला होता पण तो मोठा झाल्यावर त्याच्या अंगात एवढी ताकद आली की तो दगड ढकलुन काचेवर आपटायचा. म्हणून तो दगड काढून टाकला.

संदर्भ: आ.पं. नी मासे पण पाळले आहेत. आ. तिं.ना काही तरी बोलावसं वाटलं (का? असं का वाटलं?) म्हणून त्यांनी आ.पं.कडे मास्यांची विचारपूस चालू केली. आता ते मासे कसे ही असले, कुठूनही आले असले आणि त्यांचं काय होणार, ह्या असल्या गोष्टींनी आ. तिं.ना काहीही फरक पडणार नव्हता. पण मूळ कोकणातलं आणि आयुष्य पुण्यातलं आहे ना! मग, गप्प बसून कसं चालेल?

आ. ति.: मासे झोपतात कसे?

आ.प.: ते steady झाले की समजायचं की ते झोपलेले आहेत. साधारण पणे दुपारच्या वेळेस आणि रात्रीच्या वेळेस ते असे एकदम steady असतात. पण, (त्या मास्यांच्या घोळक्यातल्या एका मास्याकडे बोट दाखवत) ह्याला मी कधीही steady पाहिलेलं नाही. हा टोकदार तोंड असलेला मासा. हा सारखा इकडून तिकडे हिंडत असतो. आणि तो बघा तो फक्त वरच्या भागात फिरतो.

आता तो मासा त्या टाकीत कुठेही फिरो अथवा शेजारच्या कासवाच्या टाकीत उडी मारून कासवाला छळो, मला त्याचं काही सोयर-सुतक नव्हतं. इकडे आ.पं.चं चालूच होतं.

आ.प.: इकडे खालच्या बाजूशी त्याला काही घेणं नसतं. तो खाली येतो ते फक्त ह्या बाकीच्यांना जरा त्रास द्यायला. तो खाली आला की समजायचं ह्याला काही तरी mischief करायची आहे. तो खाली आला की बाकीचे सगळे सावध होतात आणि इकडे-तिकडे पळतात.

अच्छा, तर हे वरच्यांनी खालच्यांना छळणं आणि त्रास देणं हे समस्त प्राणी जमातीत आहे ह्याचा बोध मला प्रथम त्या दिवशी झाला. मला वाटायचं की हे उद्योग फक्त ऑफिसां मधे होतात.

आ.प.: (अजूनही वरच्या छळणाऱ्या मास्या बद्दल सांगताना) तो ना फक्त live food खातो. live food दिलं की त्याचा रंग एकदम मस्त गुलाबी होतो. तरी तो आता एवढाच आहे. मोठ्या टाकीत ठेवलं असतं तर अजून मोठा आणि मस्त झाला असता.

मला एक कळत नव्हतं ह्यांचं कासव, मासे हे सगळे टाकीच्या size प्रमाणे स्वत:चा size ठरवत होते की काय? म्हणजे भिष्म पितामह कसे दिवसाचं नक्षत्र, वेळ, काळ, सुर्याची दिशा बघून आज मरायचं की नाही हे ठरवत होते, तसे हे कासव आणि मास्यांचं मला वाटलं. की टाकी मोठी झाली, तर आपण पण मोठं व्हायचं, टाकी लहान असली की आपण लहान व्हायचं. शेवटी, अंथरूण पाहून पाय पसरणे, ह्यालाच तर म्हणतात ना!

हा संवाद अजून बराच वेळ चालला. सगळा तपशील इथे मांडणं शक्या नाही. पण एकंदरीत वाचकांच्या लक्षात आलं असेल की पाळीव प्राणी, ह्या लेखात पु.लं.नी प्राणी मालकांचे केलेलं वर्णन आणि वर मांडलेला संवाद ह्यात फार काही फरक नाही. एक शेवटचा किस्सा सांगतो, म्हणजे सगळं साम्य लक्षात येईल.

आ.पं. कडे बराच वेळ बसणे झाले. दिवे लागणीची वेळ झाली होती. दिवे लावले सुद्धा होते. आ.पं.चा कुत्रा का कुत्री त्यांचा शेजारी सोफ्यावर लोळत पडलं होतं. आ.पं.नी त्याला अगदी लाडात येऊन विचारलं- "शोनी, गुंडी, झोप आली का तुला? अं, अं?" जणू काही त्या श्वानाचं म्हणनं त्यांना समजत होतं. "झोप आली का तुला? झोप, झोप हं." आता हेच जर आ.पं.च्या दिवट्यांनी केलं असतं (हे म्हणजे दिवे लावणीच्या वेळेस, सोफ्यावर लोळत पडले असते) तर त्यांचा कमरेत लाथा पडल्या असत्या आणि आ.पं.नी त्यांना शुभं करोति म्हणायला पिटाळले असते.

पु.लं.नी खरच उत्तम वर्णन केलय. आपण इतर इंग्रजी लेखकां बद्दल बोलतो, की ते बघा कसं एखाद्या विषयाचा कसून अभ्यास करतात आणि त्यातून कहाणी निर्माण करतात. उदाहरणार्थ John Grisham, Arthur Hailey. पण पु.लं.नी आयुष्यात घडणाऱ्या सामान्य गोष्टींना चाणाक्ष नजरेने हेरून त्याचं एक सुंदर कथानक आपल्या समोर मांडलं आहे. पु.ल. तुम्ही खरंच महान आहात!

पु.ल. तुम्ही महान आहातSocialTwist Tell-a-Friend

गुरुवार, जून १४, २००७

पहिला पाऊस, पहिलं पोहणं

गेला आठवडा-भर खूप उकडत होतं. अगदी बर्फाच्या लादीवर बसलं तरी घाम फुटत होता. असह्य उकाडा, पंखा लावला तरी घाम येणे, आणि सकाळी-सकाळी खोलीत कुणी तरी आल्यावर, बिछाना ओला का लागतो, या बद्दल त्या आलेल्या माणसाच्या डोक्यात शंका येणे, ही सगळी मुंबईत पाऊस पडण्याची ही चिन्ह आहेत. तर, गेला आठवडा भर हे सगळं होत होतं. पण, पावसाला जणू काही I.T. कंपन्यांचं वारं लागलं होतं. म्हणजे, बहुतांश I.T. वाले कसे बंगलोरला जाऊन थडकतात, तसा तो कर्नाटकला पोहचून तिकडेच थांबला होता. महाराष्ट्राची अवस्था त्याला दिसत नव्हती. पण देशाच्या आर्थिक राजधानीचं आकर्षण त्यालाही फार काळ टाळता आलं नाही. आणि शेवटी एकदाचे मान्सून पावसाचे ढग मुंबईच्या आकाशावर दिसू लागले. पण तरीही म्हाणावं तसा पाऊस पडत नव्हता. सकाळी खिडकीतून बाहेर बघावं तर काळे ढग दिसायचे. वाटायचं की चला, आज पाऊस पडेल. पण नाही. आंघोळ करून आलं की सुर्यदेव आकाशात हजर. सुर्याच्या उदयाने, आमच्या पावसाच्या आशा मावळायच्या.
आज सकाळी वर्तमानपत्रात वाचलं की मुंबईत येत्या २४ तासात मान्सूनचे आगमन होणार असा हवामान खात्याने सांगितले आहे. म्हंटलं, म्हणजे जास्तीत जास्त ४८ तासात पावसाची एक तरी सर यायला हरकत नाही. ह्या आनंदात मी छत्री दप्तरात टाकली (पावसात भिजायला मला आवडतं, पण माझ्या कपड्यांना ते आवडत नाही, म्हणून छत्री बाळगावी लागते) आणि वाचनालयात गेलो. तर रस्त्यात पाऊस लागला. लागला काय, शिंतडला. वाटलं, आज पण पाऊस पडत नाही. पण तसं काही झालं नाही. संध्याकाळी आकाश पुन्हा एकदा दाटून आले. अचानक वाटलं की पोहायला जावं. पावसात पोहायची एक वेगळीच मजा आहे. Cast Away चित्रपट ज्यांनी बघितला आहे, त्यांना पावसात पोहण्याची मजा समजू शकेल. अर्थात, त्यात नायकाची जी अवस्था होते, ती होऊ नये, पण तरी पावसात पोहायची मजा काही औरच आहे.
तरणतालावर पोहोचे पर्यंत पाऊस काही चालू झाला नव्हता. पाण्यात उतरलो आणि पोहायला सुरवात केलीच होती की ढग गडगडायला लागले, आणि जोरात पाऊस चालू झाला. पहिल्या पावसात पोहण्याची मजा निराळीच आहे. दिवसभरात तरणतालातले पाणी गरम झाले होते, त्यामुळे पोहताना पाण्याखाली गेल्यावर कोमट पाणी आणि बाहेर आल्यावर थंड पाण्याचा मारा. पाण्याखाली असताना, पाण्यावर पडणाऱ्या पावसाच्या सरीचा आवाज, पाण्यावर आल्यावर तोच आवाज वेगळा ऐकू येणे, हा सगळा अनुभव वेगळाच आहे. शब्दात मांडता येणार नाही अशी भावना निर्माण होते.
पोहणे संपले तरी पाऊस काय थांबायचं नाव काढत नव्हता. बरोबर आहे, पहिला पाऊस आहे, बराच वेळ चालणार. तरणतालावर जाताना छत्री नेली नव्हती. मनसोक्त भिजून (आणि पोहून) झाल्यावर roomवर येताना, पुन्हा एकदा भिजलो. पहिल्या पावसात पोहायची आणि भिजायची माझी इच्छा पुर्ण झाली. छात्रावासात परत आल्यावर वाटेत प्रकल्प भेटला. त्याने मला गरम-गरम चहा पाजला. वा!! गार वातावरण आणि गरम चहा, हे combination म्हणजे जणू स्वर्गच. भिजल्यामुळे तो गरम चहा अजूनच आरामदायक वाटत होता. पहिल्या पावसात भिजायचा कार्यक्रमाचा शेवट, हा कार्यक्रमा प्रमाणेच अत्युत्तम झाला.
पहिला पाऊस, पहिलं पोहणंSocialTwist Tell-a-Friend

मंगळवार, मे १५, २००७

अर्ज़ किया है

१. शायर हैं हम, शायरी हमारा काम है,
कायल हैं इस फ़न के आप, हमे सुधारना आपका काम है,
करते हैं वादा आपसे, की सुधारेंगे अपनी शायरी,
हमारी कोशिश का यह पहला पैग़ाम है।

२. नहीं कोई पैग़ाम उनका सुबह से,
यह बात सोच रहे हैं हम कितनी देर से,
कुछ खाली लग रहा था दिन, कुछ सूनी लग रही थी शाम,
दिल को फ़िर ख्याल आया, आज दिन गुज़रा है बडे अमन से।

३. न खेलो इस दिल से, यह बहुत नाज़ुक है,
नहीं समझोगे तुम, क्या हाल हमारा है,
न कोई साथी, न कोई सहारा है,
यह बेचारा अकेलेपन का मारा है।

४. गर करना हो सवाल, तो शौक से करो,
हर सवाल का मिलेगा जवाब, यह ख्वाईश ना करो,
कुछ ऐसे होते हैं सवाल, जिनके जवाब नहीं होते,
गर न मिले कोई जवाब, तो हमसे रूठा न करो।

५. ख्वाईश है हमारी, हो दिल-ए-तमन्ना बयां शायरी से,
मगर क्या करें, कुदरत ने नहीं नवाज़ा हमें इस फ़न से,
करते हैं मेहनत हम, चाहते हैं हर रोज़,
आज तो एक अच्छा शेर निकले इस दिल से।

फ़नकार: विनय बावडेकर
अर्ज़ किया हैSocialTwist Tell-a-Friend

सोमवार, एप्रिल ३०, २००७

काही फालतू विनोद

१ जपान मधील मराठी शाळेचे नाव काय?
याशिका

२. ह्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे नाव काय?
फुंकून पी

३. अमेरीकेतील कोकणी शाळेचे नाव काय?
शिकागो

४. ह्या शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत?
तुझ्या आईचा घो

५. रशियातल्या सिनेमाघराच्या doorkeeperचे नाव काय?
उभाकाबसकी

६. अफ्रिकेतील तरण तालाचे नाव काय?
या डुम्बा डुम्बा
काही फालतू विनोदSocialTwist Tell-a-Friend

बुधवार, एप्रिल १८, २००७

लता मंगेशकरचा कोकण दौरा

एकदा लता मंगेशकर कोकणात गाण्याचा कार्यक्रम करण्यासाठी मुंबईहून निघाल्या. सहाजिकच त्यांचा बरोबर समूहगायकही होते. लता ताई पुढच्या गाडीत बसून चालल्या होत्या आणि समूहगायकांची गाडी, त्यांचा मागे होती. अचानक, समूहगायकांची गाडी बंद पडली. लता ताई पण गाडी दुरुस्त होईल म्हणून थांबल्या. पण गाडी दुरुस्त व्हायला वेळ लागणार असल्याने समूहगायकांमधील काही जणं लता ताईंना म्हणाली की तुम्ही पुढे गावात जाउन पोहोचा आणि आराम करा, आम्ही मागून येत आहोत.ठरल्यानुसार लता ताई गावात पोहोचल्या आणि समूहगायक येई पर्यंत आराम करत होत्या.

संध्याकाळी, कार्यक्रमाची वेळ होत आली तरी समूहगायक आले नव्हते. आयोजकांना लता ताईंनी सांगितले की समूहगायक असल्या शिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही. आयोजक चिंतीत झाले. तेवढ्यात त्यांचातील एक जण म्हणाला की आपल्या गावातल्या नाटक-मंडळीतील समूहगायक ह्यांचा मदतीस पाठवू. आयोजक खूष झाले. लता ताई पण निश्चिंत झाल्या.

ठरल्या प्रमाणे कार्यक्रम चालू झाला. लता ताई आणि गावातले समूहगायक. देवाला नमन करून कार्यक्रम सुरू करायचा, म्हणून लता ताईंनी पहिलं गाणं म्हंटलं-

ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले,
मला हे दत्तगुरू दिसले, मला हे दत्तगुरू दिसले

समूहगायक गायला लागले-

हिला गं बाई, दत्तगुरू दिसले,
हिला गं बाई, दत्तगुरू दिसले !!!
लता मंगेशकरचा कोकण दौराSocialTwist Tell-a-Friend

सोमवार, मार्च १९, २००७

सूर्यग्रहण पाहिलेला माणूस: म्हणजे मी

काल (म्हणजे १८ मार्चला) संध्याकाळी वर्तमानपत्रात सूर्यग्रहणाची वेळ पाहिली आणि वाटलं की सकाळी सूर्यग्रहण बघावं. कारण अशी संधी पुन्हा कधी मिळेल सांगता येत नाही. म्हणजे सूर्योदय आणि सूर्यग्रहण एकत्र येणे खूप दुर्मिळ असेल. या संधीचा अजून एक फायदा असा की कोणत्याही अतिरिक्त साधनाशिवाय हे ग्रहण बघता येतं. तर ठरल्या प्रमाणे हर्ष आणि मी सकाळी-सकाळी IIT च्या मागच्या टेकडी वर साधारण पणे ६:४५ ला जाऊन पोहोचलो. माझ्याकडे नेहमी प्रमाणे कॅमेरा होताच. उजाडलं होतं, पण सूर्योदय झाला नव्हता. तेवढ्यात दोन-तीन जणं येताना दिसली. ते वर आले तर त्यातला एक आमच्या विभागाचा प्रवीण होता. त्याच्याशी थोडावेळ गप्पा झाल्या.


टेकडी वरून चोहीकडचं दृश्य एकदम छान दिसतं. पुर्वे कडे ठाण्याची खाडी लांबून दिसते. तिथून सूर्य उगवताना मस्त दिसतो. नाहीतर IIT मधे सूर्योदयाचे सुरवातीचे क्षण दिसत नाहीत. सूर्य डोंगराच्या वर आल्यावरच आम्हाला दिसतो. म्हणून ग्रहण बघण्यासाठी टेकडी वर जावं लागलं. तेवढ्यात सूर्य उगवताना दिसला. अर्ध-चंद्रासारखा, आज अर्ध-सूर्य पाहायला मिळाला. सूर्य असा दिसत होता जणू काही आज हनुमानाची सूर्य-फळ खायची इच्छा पूर्ण झाली. सूर्य उघड्या डोळ्यांनी बघेनासा होई पर्यंत थांबायचं ठरलं होतं. सूर्यग्रहणाची त्यामुळे अजून छायाचित्रं काढता आली. ही सकाळ पूर्णपणे ग्रहणमय होती. साधारण पणे ७:१५ वाजता सूर्यप्रकाश प्रखर झाला आणि ग्रहण बघायची विशेष साधनं नसल्यामुळे आम्ही खाली परत यायचं ठरवलं. ग्रहण साधारणपणे ७:४५ला सुटणार होतं.


एकंदरीत अमावस्येची समाप्ती आणि पाडव्याची सुरवात चांगली झाली. कुणाला वाटेल, ग्रहण पाहून कसली वर्षाची सुरवात करायची? यावर माझं म्हणणं असं आहे की हे ग्रहण पाहून देवाला प्रार्थना करा, की देवा, या पुढे जी काही ग्रहणं असतील ती पण या ग्रहणाबरोबर सुटून जाऊ दे आणि येणारं वर्ष निर्विघ्नपणे पार पडू दे. असो, तर आजच्या ह्या ग्रहण-दर्शनाने, मी पण सूर्य(ग्रहण) पाहिलेला माणूस झालो.
सूर्यग्रहण पाहिलेला माणूस: म्हणजे मीSocialTwist Tell-a-Friend

बुधवार, फेब्रुवारी २८, २००७

असं खरंच होतं का?

गेल्या आठवड्यात गोव्याला गेलो होतो. पुण्याहून जायचे असल्याने, बसने जाणे भाग होते. गोव्याला जाणारी प्रत्येक बस मधे एखादा हिन्दी चित्रपट दाखवतात. तो आपल्याला बघायचा नसला तरी बघावा लागतो. ह्याच तत्वाला अनुसरून, मी पण चित्रपट बघत होतो. चित्रपटाचे नाव होते 'Risk'. खरंच, प्रेक्षकांना बरीच रिस्क घ्यावी लागली हो हा चित्रपट बघताना. एक तर 'अब तक छप्पन' नंतर त्याच विषयावर छप्पन चित्रपट झाले आहेत. त्यामुळे 'रिस्क' मधे काहीही नाविन्य नसणार हे ठाऊक होते. तरीही इतर काही पर्याय नसल्याने हा चित्रपट बघत होतो.

तर, ह्या चित्रपटात, नायकाची आई, त्याला सकाळी-सकाळी दाढी करते वेळी सांगत असते की तू लवकरात लवकर लग्न कर, कुठलीही सून आण, मी आशिर्वाद द्यायला तयार आहे, वगैरे. एक तर मुळात दाढीची वेळ ह्या असल्या गप्पांसाठी नसते. त्यात नायक इंस्पेकटर असतो. त्यामुळे आधीच उलट्या बुद्धीचा. तरीही तो हे सगळं बोलणं निमूट पणे ऐकून घेत असतो. तर माता-पुत्रांचा हा संवाद चालू असतो आणि शेवटी आईचं बोलणं एकादाचं संपतं. त्या बोलण्याचा एकंदर सूर 'मुलाचं लवकर लग्न लागावं' असा असतो.

लगेच चित्रपट पुढच्या 'सीन'ला जातो आणि तिथे एक नायिका गाताना आणि नाचताना दिसते. एकंदरीत तिच्याकडे पाहून लक्षात येते की ही आपल्या नायकाची नायिका आहे. आणि ते गाणे संपल्यावर तो नायक खरंच तिला फोन करून तिच्याशी यथेच्छ गप्पा मारतो.

हे सगळं पाहिल्यावर असं वाटलं की हे असं आपल्या आयुष्यात घडू शकतं का? म्हणजे, एखाद्याची आई त्याचा कानाशी लग्नाची कुर-कुर करत असताना, दुसरीकडे त्याची होणारी बायको त्यासाठी गाणं म्हणत असेल. कल्पना करा की आपली आई आपलं लग्न व्हावं म्हणून आपल्या कानाशी कुर-कुर करत आहे. त्यावेळी तिला टाळायचं असेल तर सांगायचं की आई, जास्तं कुर-कुर नको करुस. तुझी ही कुर-कुर संपली की कुठेतरी कुणी तरी मुलगी माझ्यासाठी नक्कीच नाचत किंवा गात असेल. त्यामुळे तू फक्त तुझी कुर-कुर संपली की कोण मुलगी नाचत आहे किंवा गात आहे ह्याचावर लक्ष ठेव. तीच तुझी व्हावी सून असेल! त्यावर तुमच्या आईची प्रतिक्रिया काय आहे ती मात्र नक्की कळवा.

ता.क. हा प्रयोग करायची वेळ माझ्यावर अजून आलेली नाही.
असं खरंच होतं का?SocialTwist Tell-a-Friend

शुक्रवार, फेब्रुवारी १६, २००७

बडीशेप

बहुतेक भारतीय घरांत जेवणानंतर बडीशेप किंवा सुपारी (भाई लोकांना देतात ती नव्हे) खाण्याची एक परंपराच आहे. त्यात बडीशेप अधिक लोकप्रिय आहे. किंबहुना बडीशेप खालल्या शिवाय जेवण संपल्यासारखे वाटत नाही. बडीशेपेचा इतिहास मला फारसा माहीत नाही, पण wikipedia वर जे काही वाचलं त्यावरुन असं लक्षात येतं की भारतात खूप प्राचीन काळापासून बडीशेप मुखवास म्हणून वापरली जाते. आणि सध्या बडीशेपेचे अनेक प्रकार मिळतात. बडीशेपेच्या गोळ्या, ज्या चवीला गोड असतात, पुदीन्याचं कवच असलेली minted बडीशेप, वगैरे-वगैरे.

पण बडीशेप खाण्या मागची माझी कारणे थोडी वेगळीच आहेत. वसतीगृहात जेवण झाल्यावर नेहमीच गोड काहीतरी खावसं वाटायचं. म्हणजे एखादं चॉकलेट वगैरे नेहमी खाल्लं जायचं. ह्या विषयावर एकदा चर्चा झाली असता असं लक्षात आलं की जेवण मुळात तिखट असल्याने आणि कुणालाच तिखट खायची सवय नसल्याने ती तिखटाची चव घालवण्यासाठी गोड खाल्लं जातं. त्यानंतर काही दिवसांनी 'हरीश' नामक हॉटेल मधे जेवणाचा योग आला. हा हरीश वाला आम्हाला देवासारखा आहे. मेस मधे जेवायला चांगलं नसलं की आम्ही त्याचाकडे धाव घेतो. तो शरण आलेल्याला कधीही निराश करत नाही. तर, हरीश मधले जेवण नेहमी प्रमाणे मसालेदार होते. जेवण झाल्यावर, बडीशेप खाल्ली (हरीश मधे साधी बडीशेप मिळते) आणि लक्षात आलं की तिखट/मसालेदारपणाची चव गायब झाली. तेव्हा, अचानक (वीज चमकून म्हणा हवं असेल तर) वाटलं की बडीशेपेचा प्राथमिक उपयोग हा मुखातले सगळे चव काढून टाकण्यासाठी आहे(इंग्रजीत 'neutralising traces of any tastes'). त्यावेळी 'निर्वाण' वगैरे म्हणतात ना, तसं काहीतरी मिळाल्या सारखं वाटलं. मुखवास वगैरे हे तिचे secondary उपयोग आहेत. कारण त्या दिवशी मसालेदार जेवल्यावर काहीही गोड खावसं अथवा प्यावसं वाटलं नाही. तेव्हा पासून ठरवलं, की बडीशेपेचा उपयोग मुखवासासारखा न करता, जिभे वरचे सगळे चव neutralise करण्यासाठी करायचा. तर मंडळी, माझं बडीशेप खाण्या मागचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल.

जाता-जाता.... ह्या हल्लीच्या mint-coated, वगैरे बडीशेपांमधे चव neutralise करण्याची क्षमता नाही. ह्या बडीशेपा खाल्ल्यावर अजून खाव्याश्या वाटतात. खरी बडीशेप म्हणजे ती साधी बडीशेप. आपल्या मुखातुन सगळ्या चवी neutralise करते आणि ती सारखी खावीशी पण नाही वाटत.
बडीशेपSocialTwist Tell-a-Friend