बुधवार, फेब्रुवारी २८, २००७

असं खरंच होतं का?

गेल्या आठवड्यात गोव्याला गेलो होतो. पुण्याहून जायचे असल्याने, बसने जाणे भाग होते. गोव्याला जाणारी प्रत्येक बस मधे एखादा हिन्दी चित्रपट दाखवतात. तो आपल्याला बघायचा नसला तरी बघावा लागतो. ह्याच तत्वाला अनुसरून, मी पण चित्रपट बघत होतो. चित्रपटाचे नाव होते 'Risk'. खरंच, प्रेक्षकांना बरीच रिस्क घ्यावी लागली हो हा चित्रपट बघताना. एक तर 'अब तक छप्पन' नंतर त्याच विषयावर छप्पन चित्रपट झाले आहेत. त्यामुळे 'रिस्क' मधे काहीही नाविन्य नसणार हे ठाऊक होते. तरीही इतर काही पर्याय नसल्याने हा चित्रपट बघत होतो.

तर, ह्या चित्रपटात, नायकाची आई, त्याला सकाळी-सकाळी दाढी करते वेळी सांगत असते की तू लवकरात लवकर लग्न कर, कुठलीही सून आण, मी आशिर्वाद द्यायला तयार आहे, वगैरे. एक तर मुळात दाढीची वेळ ह्या असल्या गप्पांसाठी नसते. त्यात नायक इंस्पेकटर असतो. त्यामुळे आधीच उलट्या बुद्धीचा. तरीही तो हे सगळं बोलणं निमूट पणे ऐकून घेत असतो. तर माता-पुत्रांचा हा संवाद चालू असतो आणि शेवटी आईचं बोलणं एकादाचं संपतं. त्या बोलण्याचा एकंदर सूर 'मुलाचं लवकर लग्न लागावं' असा असतो.

लगेच चित्रपट पुढच्या 'सीन'ला जातो आणि तिथे एक नायिका गाताना आणि नाचताना दिसते. एकंदरीत तिच्याकडे पाहून लक्षात येते की ही आपल्या नायकाची नायिका आहे. आणि ते गाणे संपल्यावर तो नायक खरंच तिला फोन करून तिच्याशी यथेच्छ गप्पा मारतो.

हे सगळं पाहिल्यावर असं वाटलं की हे असं आपल्या आयुष्यात घडू शकतं का? म्हणजे, एखाद्याची आई त्याचा कानाशी लग्नाची कुर-कुर करत असताना, दुसरीकडे त्याची होणारी बायको त्यासाठी गाणं म्हणत असेल. कल्पना करा की आपली आई आपलं लग्न व्हावं म्हणून आपल्या कानाशी कुर-कुर करत आहे. त्यावेळी तिला टाळायचं असेल तर सांगायचं की आई, जास्तं कुर-कुर नको करुस. तुझी ही कुर-कुर संपली की कुठेतरी कुणी तरी मुलगी माझ्यासाठी नक्कीच नाचत किंवा गात असेल. त्यामुळे तू फक्त तुझी कुर-कुर संपली की कोण मुलगी नाचत आहे किंवा गात आहे ह्याचावर लक्ष ठेव. तीच तुझी व्हावी सून असेल! त्यावर तुमच्या आईची प्रतिक्रिया काय आहे ती मात्र नक्की कळवा.

ता.क. हा प्रयोग करायची वेळ माझ्यावर अजून आलेली नाही.
असं खरंच होतं का?SocialTwist Tell-a-Friend

शुक्रवार, फेब्रुवारी १६, २००७

बडीशेप

बहुतेक भारतीय घरांत जेवणानंतर बडीशेप किंवा सुपारी (भाई लोकांना देतात ती नव्हे) खाण्याची एक परंपराच आहे. त्यात बडीशेप अधिक लोकप्रिय आहे. किंबहुना बडीशेप खालल्या शिवाय जेवण संपल्यासारखे वाटत नाही. बडीशेपेचा इतिहास मला फारसा माहीत नाही, पण wikipedia वर जे काही वाचलं त्यावरुन असं लक्षात येतं की भारतात खूप प्राचीन काळापासून बडीशेप मुखवास म्हणून वापरली जाते. आणि सध्या बडीशेपेचे अनेक प्रकार मिळतात. बडीशेपेच्या गोळ्या, ज्या चवीला गोड असतात, पुदीन्याचं कवच असलेली minted बडीशेप, वगैरे-वगैरे.

पण बडीशेप खाण्या मागची माझी कारणे थोडी वेगळीच आहेत. वसतीगृहात जेवण झाल्यावर नेहमीच गोड काहीतरी खावसं वाटायचं. म्हणजे एखादं चॉकलेट वगैरे नेहमी खाल्लं जायचं. ह्या विषयावर एकदा चर्चा झाली असता असं लक्षात आलं की जेवण मुळात तिखट असल्याने आणि कुणालाच तिखट खायची सवय नसल्याने ती तिखटाची चव घालवण्यासाठी गोड खाल्लं जातं. त्यानंतर काही दिवसांनी 'हरीश' नामक हॉटेल मधे जेवणाचा योग आला. हा हरीश वाला आम्हाला देवासारखा आहे. मेस मधे जेवायला चांगलं नसलं की आम्ही त्याचाकडे धाव घेतो. तो शरण आलेल्याला कधीही निराश करत नाही. तर, हरीश मधले जेवण नेहमी प्रमाणे मसालेदार होते. जेवण झाल्यावर, बडीशेप खाल्ली (हरीश मधे साधी बडीशेप मिळते) आणि लक्षात आलं की तिखट/मसालेदारपणाची चव गायब झाली. तेव्हा, अचानक (वीज चमकून म्हणा हवं असेल तर) वाटलं की बडीशेपेचा प्राथमिक उपयोग हा मुखातले सगळे चव काढून टाकण्यासाठी आहे(इंग्रजीत 'neutralising traces of any tastes'). त्यावेळी 'निर्वाण' वगैरे म्हणतात ना, तसं काहीतरी मिळाल्या सारखं वाटलं. मुखवास वगैरे हे तिचे secondary उपयोग आहेत. कारण त्या दिवशी मसालेदार जेवल्यावर काहीही गोड खावसं अथवा प्यावसं वाटलं नाही. तेव्हा पासून ठरवलं, की बडीशेपेचा उपयोग मुखवासासारखा न करता, जिभे वरचे सगळे चव neutralise करण्यासाठी करायचा. तर मंडळी, माझं बडीशेप खाण्या मागचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल.

जाता-जाता.... ह्या हल्लीच्या mint-coated, वगैरे बडीशेपांमधे चव neutralise करण्याची क्षमता नाही. ह्या बडीशेपा खाल्ल्यावर अजून खाव्याश्या वाटतात. खरी बडीशेप म्हणजे ती साधी बडीशेप. आपल्या मुखातुन सगळ्या चवी neutralise करते आणि ती सारखी खावीशी पण नाही वाटत.
बडीशेपSocialTwist Tell-a-Friend