सोमवार, मार्च १८, २०१३

आसाराम बापूंचे आध्यात्मिक थोतांड!!

आसाराम बापूं बद्दल मला पहिल्या पासून विशेष प्रेम नव्हते. कारण अनेक वर्षांपूर्वी आमची आई त्यांचे टी. व्ही. वरील कार्यक्रम सकाळी-सकाळी बघायची आणि त्यामुळे आमची झोप मोड व्हायची. त्यामुळे ह्या महाभागाचा मी फार काळ पाठलाग केला नाही. आणि गेल्या काही महिन्यातील त्यांची कृत्य बघता त्याना लहानपणीच सोडले ह्याचा आता मला आनंद होतो. "भाऊ" म्हणून विनंती केली असती तर दिल्लीतील त्या मुलीचा बलात्कार त्या इतर मुलांनी केला नसता, अशी मुक्ताफळं उधळल्यावर तर माझी खात्रीच पटली की हा माणूस आध्यात्मिक असूच शकत नाही. ज्यांना आपल्यातील पाशवी वृत्तींना काबूत ठेवता आले नाही, अश्या माणसांना दोषी न ठरवता, ह्या महाभागांनी त्या असहाय मुलीलाच दोष दिला. वर सल्ला, की बलात्कार होत असेल तर देवाचे नाव घ्या आणि बलात्कारी माणसाला भाऊ म्हणून हाक मारा. अहो कशाला त्या नात्याला दुषित करत आहात?

ह्याच आसाराम बापूंनी पर्वा नागपूर मध्ये होळी खेळण्याच्या नावा खाली पाण्याची अक्षम्य नासाडी केली. महाराष्ट्र राज्य भीषण दुष्काळाने ग्रस्त असताना होळी साठी पाण्याची एवढी नासाडी करायची हे शिकवण कुठल्या आध्यात्माच्या पुस्तकात किंवा लिखाणात सापडली? राज्यात जिथे अनेक गावां मध्ये लोकं पाण्यासाठी वणवण भटकत आहेत, पाण्या अभावी जनावरे मृत्युमुखी पडत आहेत, तिथे हे महाभाग आणि त्यांचे शिष्यगण पाण्याची होळी खेळण्यात धन्यता मानत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकी कडे पाणी वाचविण्याची कळकळीने विनंती करत असताना, हे बापूजी पाण्याची नासाडी करण्यात धन्यता मानतात. वर आडमुठेपणा, आम्ही पाण्यानेच होळी खेळणार!! म्हणे "केवळ" ६००० लि. पाणी वापरले. बापू, एवढ्या पाण्यात U.N.च्या संकेतांनुसार जवळ-जवळ ५० लोकांची दिवसाची पाण्याची गरज भागू शकते!! दुष्काळ जन्य  परिस्थिती लक्षात घेता त्यांची २ दिवसांची गरज भागू शकते. आहात कुठे? आणि तुम्ही हे पाणी मोकळ्या मैदानावर उडवून लावले! शिवाय ह्या पाण्याने माखालेल्यांनी ते घालविण्यासाठी पुन्हा आंघोळ केली आणि अतिरिक्त पाणी वापरले ते वेगळेच. म्हणे काय तर होळी खेळल्याने लोकांचे आजार दूर होतात. वा रे, डॉक्टर! हे तुमच्या कडून आधी कधी नाही ऐकले. तुमच्या बरोबर होळी खेळायला आलेल्या भक्तांना असे काय आजार होते जे तुम्ही त्यांचावर असे पाणी उडवून दूर केले? ह्याचे प्रमाण काय? तुम्ही ते सिद्ध करा, मग आम्ही तुमचा नक्कीच सत्कार करू. पण हे न करू शकल्यास तुम्ही आध्यात्मातून सन्यास घ्या आणि असले अमानुष प्रकार बंद करा. हे पाणी जर तुम्ही स्वखर्चाने दुष्काळी गावांमध्ये पिण्यासाठी पाठवले असते तर कित्येक तहानलेली माणसं तृप्त झाली असती. पण नाही, स्वतःची विवेक बुद्धी गहाण ठेवून आपण केलेल्या चुकांना अजून अधिक पोरकट आणि बिनडोक बडबड करून झाकायचा प्रयत्न करायचा! आणि पिडीत जनतेच्या गरजांचा अजिबात विचार न करणे ह्यात कसले आले आध्यात्म? हा तर थोतांडपणा आहे. 
आसाराम बापूंचे आध्यात्मिक थोतांड!!SocialTwist Tell-a-Friend