खरं तर दिवाळी संपून बरेच दिवस झाले. म्हणजे, जवळ-जवळ महिना झाला. आता तर तुमच्या घरातील दिवाळीचा फराळ सुद्धा संपला असेल. पण ही पोस्ट लिहायला उशीर झाला!! असो, भारता बाहेरील ही माझी पहिली दिवाळी. पण दिवाळीच्या दिवशी इथे काहीही विशेष नसल्यामुळे चुकल्या-चुकल्या सारखं वाटत होतं. घरी कसं दिवाळीची चाहूल जवळ-जवळ महिन्याभर आधी पासून लागते. आई फराळाचं सामान घेऊन येते, नव्या पणत्या येतात, घरी आलं की कुठल्या ना कुठल्या फराळाची चव घ्यायला सांगून त्या फराळाची शबरीची बोरं करण्यात येतात. पण इथे रोजचे जेवण करण्याचे वांदे, तर स्पेशल फराळ कुठला होतोय?
असो, अमेरिकेत अथवा कॅनडात आल्यावर कुठलाही सण त्या दिवशी साजरा न होता, जवळचा शनिवार बघून साजरा केला जातो. इथे केवळ १ जुलै (कॅनडाचा स्थापना दिवस) आणि ख्रिसमस त्याच दिवशी साजरे केले जातात. बाकी सगळे सण एखादा शुक्रवार अथवा सोमवार बघून त्या दिवशी साजरे होतात. म्हणजेच, लोकांना शनिवारी सामूहिक रित्या तो साजरा करता येतो. त्याच नियमाला धरून एडमंटन मधील मराठी भाषिक मंडळाने १२ नोव्हेंबरला २०११ सालचा दिवाळी उत्सव साजरा केला. येथील मराठी समाज तसा छोटाच आहे. मराठी मंडळाचे सदस्य असलेले ३९ परिवार आणि तेवढेच नसलेले धरले, तर एकूण ७०-८० परिवारांचा मराठी समाज. ह्या समाजाने एकत्र येऊन मराठी सण साजरे करणे खरेच कौतुकास्पद आहे.
असो, तर येथील हिन्दू समाज मंदिरात ह्या वेळचा दिवाळी कार्यक्रम पार पडला. लहान मुलांनी चांगल्या मराठी गाण्यांवर नाच केला, मोठ्यांनी सुद्धा गाणी गायली. कौतुक म्हणजे, बॉस्टनहून नुकत्याच इथे आलेल्या एका बाईंनी लावणी नाच सादर केला. त्यासाठी तिने खास नऊ-वारी साडी नेसऊन तयार होऊन येण्याचे कष्ट घेतले. स्वत:चे रोजचे काम करून असा नाच बसवणे हे सुद्धा कौतुक करण्याजोगे आहे. शिवाय शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रहात असताना सुद्धा तालमीसाठी ह्या मुलांना एकत्र आणण्याचे काम करणारे त्यांचे पालकही धन्य आहेत. पण असे कष्ट घेतल्यानेच बांधिलकी वाढते, आपले मराठी संस्कार पैलतिरी थोड्या-फार प्रमाणात जपता येतात.
कोणताही मराठी सांस्कृतिक कार्यक्रम, शिवाजी महाराज आणि पु.ल. देशपांडे, ह्यांच्या शिवाय पूर्ण होत नाही. इथे सुद्धा तेच झाले. कॅलगरीहून आलेल्या मराठी मंडळातील लोकांनी अफझलखान वध सादर केला, जो मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, ह्या चित्रपटातील ‘महाराजांची किर्ती बेफाम’ ह्या पोवाड्यावर बसवला होता. कार्यक्रमानंतर झालेल्या भोजनाच्या कार्यक्रमात थोड्याफार ओळखी झाल्या. चेहरे अनोळखी असल्याने, आधी आम्ही कॅलगरीहून आलोय, असं इथल्या लोकांना वाटलं. पण एडमंटन मधे नवीन आहोत, हे ऐकल्यावर मात्र सगळ्यांनी नीट चौकशी केली. कुठून आलात, कधी आलात, थंडीची तयारी झाली ना. इकडे रहाता कुठे, काम काय करता, इ. नेहमीचे प्रश्न झाल्यावर, काहीही अडचण आली तर आमच्याशी संपर्क साधायला संकोचू नका असेही सांगितले. एका काकांनी तर तुला काय वाद्य वाजवता येतं? असं विचारलं. म्हणजेच मंडळाच्या पुढच्या कार्यक्रमात माझा प्रोग्रॅम ठेवण्यात आला असता. असो, मला काही वाजवता येत असते तर माझं वाजवणं एडमंटन मधेच ऐकलं असतं लोकांनी. भारतात एवढे दिग्गज आहेत, की माझ्याकडे कुणीही ढूंकुन देखील पाहिलं नसतं. म्हंटलं नाही बाबा, मी काही वाजवत नाही. पण थोडं फार कथा-कथन करता येतं. पण त्यावर काहीही पुढे झालं नाही.
कार्यक्रमाचं स्थळ तसं शहरापासून ‘लांब’ असल्याने, अनेकांनी विचारलं की काही सोय नसेल तर आम्ही सोडू. म्हंटलं चालेल, जवळच्या बस स्टॉप पर्यंत सोडा, तर म्हणाले, नाही, घरा पर्यंत सोडू. लोकांचा हा मदतीचा स्वभाव पाहून बरं वाटलं. आम्ही थोडेसे ओशाळूनच Titus Rodriguez ह्यांचा बरोबर गाडीतून घरी आलो. एकूण, दिवाळीच्या दिवशी नाही, तरी एका दिवशी मराठी लोकं एकत्र भेटली, सण साजरा केला, आणि आमच्या सारख्या नवीन लोकांना आपलसं केलं, हे पाहून ती संध्याकाळ मजेत गेली.