शनिवार, डिसेंबर २६, २००९

पावनखिंड: रणजीत देसाई


इतिहास शाळेच्या पुस्तकांमधे वाचून नंतर जर त्याचाकडे बघितलं नाही, तर त्यातले अनेक आश्चर्यजनक आणि कौतुकास्पद पैलू आपल्याला दिसत नाहीत आणि कळतही नाहीत. इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेलं असतं, अफ़झलखानाचा वध झाल्यानंतर आदिलशाहीच्या सैन्यात गडबड उडाली आणि त्या गोंधळाचा फायदा घेऊन मावळ्यांनी त्या सैन्याला अक्षरश: कापून काढले. जे शत्रू शरण आले, त्यांना सोडून दिले. ह्या पलीकडे फारतर फार एवढीच माहिती असते की खानाच्या सैन्यातला दारूगोळा, हत्ती, घोडे, इत्यादि, मावळ्यांनी जप्त केले. पण हे माहित नसेल, की महाबळेश्वरच्या दिशेने पळणार्‍या आदिलशाईच्या फौजेला रोखण्याचे काम बाजीप्रभू देशपांडे कडे होते. आणि बाजींनी त्या पळणार्‍या सैन्याची वाट अडवण्यासाठी एका लंगड्या तोडप्याच्या मदतीने रडतोंडीच्या घाटातली झाडं इतकी सफाईने खापलून ठेवली होती की हलक्या धक्क्याने सुद्धा ती पाडून वाट बंद करता येत होती. बाजींना फुलाजी नावाचे आणि बाजीं एवढेच शूर, थोरले बंधू होते, हे सुद्धा अनेक जणांना माहित नसेल.

असल्या गोष्टी माहित होण्यासाठी गरज असते इतिहासाच्या पुस्तकातून बाहेर डोकावण्याची. आणि इथेच गरज भासते बाबासाहेब पुरंदरे आणि रणजीत देसाईं सारख्या शिवप्रेमी लेखकांची. पावनखिंड, हे रणजीत देसाईंनी लिहिलेलं बाजीप्रभूंचं एक संक्षिप्त चरित्र. बाजींची आणि महाराजांची भेट कशी घडली, तिथपासून ते पावनखिंडीत बाजी आणि फुलाजींनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यापर्यंतच्या प्रवासाची माहिती ह्या पुस्तकात आहे. बाजी हे आधी कृष्णाजी बांदलांचे प्रधान होते. शिवाजी महाराजांनी बांदलांना हरवून बाजींना आपल्या बाजूने केलं. बाजीं कडून त्यांनी जासलोडचा किल्ला वसवला आणि त्याची पाहणी करताना, महाराज एवढे मोहात पडले की जासलोडच्या गडाचे नाव त्यांनी मोहनगड ठेवले. कोंडाण्याचा सिंहगड का झाला, हे सर्वांना ठाऊक आहे. पण खेळणाचा विशालगड कसा झाला, हे पावनखिंड मधून कळतं.

पावनखिंड म्हणजे बाजींच्या बुद्धिमत्तेची आणि अचाट शौर्याची कहाणी. शिवाजी महाराजांनी माणसं कशी निवडली आणि तयार केली ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच पावनखिंड. बाजींकडून पन्हाळा आणि जासलोडचे गड तयार करून घेतले. युद्धात व्यवहारी निर्णय घेण्यास शिवकले. बाजींनी सुद्धा हे सगळे अनुसरले आणि त्यातून अनेक गोष्टी शिकले. ह्याचं उदाहरण पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी दिसून येतं. सिद्दी जोहारने गडावर तोफांचा भडीमार केला, तेव्हा बाजींनी संयम बाळगून सिद्दीला आपल्या तयारीची दाद लागू दिली नाही. आपल्या तयारी बद्दल शत्रूला गाफिल ठेवणे फायद्याचे असते, हे बाजी शिवाजी महाराजां कडून शिकले. पण, इंग्रजांनी जेव्हा आपली लांब पल्ल्याची तोफ डागून बाजींना आव्हान दिले, तेव्हा काली तोफ डागून इंग्रजांना त्यांनीच पळवून लावलं. म्हणजेच शत्रूला गाफिल ठेवलं तरी स्वत:ची हानी होऊ द्यायची नाही. ही कथा आहे स्वामी-निष्ठ बाजी आणि फुलाजींची. बांदल हरले तरी बाजींनी बांदलांची साथ सोडली नाही. आणि शिवाजीला राजा मानल्यावर त्याचावर सुद्धा जीव ओवाळून टाकला. अर्थात बाजींसारखा इमानदार सेनापती मिळण्यासाठी राज्यकर्ते सुद्धा शिवरायांसारखे हवेत. पावनखिंडीतल्या अतिंम युद्धाचे वर्णन अप्रतीम आहे. वाचताना युद्धाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. स्वामी रक्षणासाठी त्वेषाने लढणारे बाजी आणि फुलाजी, गडावर मावळ्यांच्या खांद्याला खांदा भिडवून लढणारे शिवाजी महाराज, ह्यांचा पराक्रम वाचून एकदम भरून येतं. अवघ्या तीनशे मावळ्यांनी आदिलशाहीची २५०० हून अधिक संख्या आणि बळ असलेली फौज पुढे जाऊ दिली नाही. हे मावळे आपल्या राजासाठी प्राण अर्पण करायला कसे तयार झाले, ह्याचं अखंड चित्र पावनखिंड मधे रंगवलं आहे.
पावनखिंड: रणजीत देसाईSocialTwist Tell-a-Friend

मंगळवार, डिसेंबर १५, २००९

कोटिच्या कोटि उड्डाणे

मला कोटि करणारे, किंवा चॅट वर स्थिती संदेश म्हणून लक्ष-वेधी वन-लायनर्स अथवा थोरा-मोठ्यांचे (?) बोल लावणार्‍यांचा हेवा वाटतो. हे लोक ह्या सगळ्या गोष्टी कुठून आणतात? आणि लक्षात कसं ठेवतात? ह्यांच्या एवढा व्यासंग माझा का नाहीये? अश्या अनेक प्रश्नांनी मला सध्या ग्रासलं आहे. आजचं सकाळी विकासने लावलेला स्थिती संदेश पहा-

अगर प्यारा है तुम्हे माँ का पल्लू ... ...तो गाड़ी चला जरा हल्लू हल्लू
संदेश एकदम लक्ष वेधक आहे. पण एकदम हास्याची कारंजे फुलवणारा आहे. बाकी विकास आमच्या गटात असली वाक्य टाकण्याचा तज्ञ म्हणून प्रसिद्ध होता. पण बाकी अनेकजण प्रसिद्ध व्यक्तिंचे (तितके प्रसिद्ध नसलेले) बोल, उर्दू, हिंदीतली शायरी, संतांचे बोल वगैरे सर्रास लावतात आणि नित्य-नियमाने बदलतही असतात. अनेकजण एकदम फिलोसोफिकल संदेश लावतात. थेट रविंद्रनाथांच्या किंवा अगदी टॉलेमी-ऍरिटोटलच्या. पण एवढा गहन विचार करणं मला शक्य नाही. त्यामुळे मी स्थिती संदेश लावत नाही. आज म्हणून लावायचं ठरवलं आहे- "Searching for a good status message!"
कोटिच्या कोटि उड्डाणेSocialTwist Tell-a-Friend

शुक्रवार, नोव्हेंबर २७, २००९

शांताराम: समीक्षा

हे पुस्तक बाजारात येऊन काही वर्षं झाली आहेत. पण हे माझ्या हाती गेल्या महिन्यातच पडलं. त्यामुळे त्याची ही समीक्षा करण्यास लौकिक दृष्टया उशीर झाला आहे. आणि ही समीक्षा वाचून ग्रेगरी डेविड रॉबर्ट्स ला काहीही फरक पडणार नाही. तरी पण, पुणेकर असल्याने आपल्या मताची पिंकं टाकणं गरजेचं आहे. असो, पुस्तक असो वा नाटक वा सिनेमा, समीक्षेच्या बाबतीत मी अत्यंत टुकार आहे. तस्मात् लोकांनी हे वाचून निराश होऊ नये.

तर आपण सर्व जाणता की शांताराम ही ग्रेगरीची आत्मकथा आहे. त्याने जाहीर रित्या ह्याची कबुली दिल्याचे स्मरत नाही, पण एकंदरीत वाचल्यावर हे लक्षात येतं. साधारण पणे १९८०-१९९२ दरम्यानच्या त्याच्या मुबंईतील कृत्यांची ही कहानी आहे. त्याने ज्या प्रकारे सगळ्या ठिकणांचं आणि घटनांचं विस्तृत वर्णन केलय, त्यावरून हे लक्षात येतं की तो त्यात असल्याशिवाय हे काही होऊ शकत नाही. कोणताही डॉन असंच कुणालाही आपल्या कारवाया सांगणार नाही. तरीपण, शांताराम बद्दल माझं असं मत आहे. कल्पना करा, तुम्ही रोज रात्री झोपायच्या आधी रोजनिशी लिहिता. नित्य नियमाने, न चुकता. त्यात दिवसभराच्या साऱ्या घटनांची तपशीलवार नोंद करता. आणि हा विधि न चुकता १०-१५ वर्षं चालु ठेवता. ह्या कालावधीच्या शेवटी तुम्ही त्या रोजनिशितील मसालेदार किस्से निवडता आणि त्यांना व्यवस्थित पणे जोडता. जिथे जोडता येत नाही, तिथे नवीन चॅप्टर्स बनवता। हे सगळं करून ते छापून आणा. तुमचं शांताराम तयार झालं. अर्थात ते त्या पुस्तका प्रमाणे प्रसिद्ध होण्यासाठी तुम्ही सुद्धा ग्रेगरी सारखं आयुष्य जगलं असलं पाहिजे. ९-५ नोकरी करून आणि सुट्टी असली की दुपारचं निस्त्याचं खाऊन एक मस्तं झोप काढून शांताराम तयार होत नाही. हे पुस्तक आकाराने अर्ध केलं तरी काहीही फरक पडणार नाही. काही ठिकाणी उगाचाची री ओढलेली असल्या सारखी वाटते. पण कुठलाही प्रसंग प्रस्तुत करताना कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही. ज्या मुंबई शहराची घाई प्रसिद्ध आहे, त्या घाईला ह्या पुस्तकात सपेशल बगल देण्यात आली आहे. पण ह्यात एक अत्यंत शरमनाक बाब ही आहे की त्यात त्याने सरकारी व्यवस्थेतील सगळा नाकर्तेपणा उघडा केला आहे. पोलिस आणि अंडर वर्ल्ड मधले संबंध, कस्टम आणि पोलिसांमधली लाचखोरी, वगैरे सविस्तर पणे दिलेली आहे. मुंबईतून खोट्या पासपोर्ट, व्हिसा, नोटा, वगैरेचे धंदे कसे व कुठे चालतात ह्याची तपशीलवार माहिती त्याने दिली आहे. आणि एवढं सगळं असताना आपण अगदी कौतुकाने ग्रेगरी कडे पाहतो. तो आपल्या व्यवस्थेला नागडी करून गेला. जमेची बाजू एवढीच की तो इतर राज्यातून आलेल्या लोकांपेक्षा लवकर मराठी शिकला आणि बोलायला लागला.
शांताराम: समीक्षाSocialTwist Tell-a-Friend

सोमवार, ऑगस्ट १७, २००९

रामधारी सिंह दिनकर: रश्मिरथी

रश्मिरथी हे श्री रामधारी सिंह दिनकर यांचं महाभारता वर केलेलं महाकाव्य। त्यातली एक कविता इथे प्रस्तुत करण्यात येत आहे। ह्या कवितेतला काही भाग गुलाल सिनेमा मधे पियूष मिश्रा ने म्हंटला होता। तो भाग ठळक करण्यात आला आहे। ह्या कवितेत दिनकरांनी युधिष्ठिराचा संदेश घेऊन पोहोचलेल्या श्रीकृष्णाचा आणि दुर्योधनाचा संवाद वर्णन केलेला आहे।

वर्षों तक वन में घूम-घूम,
बाधा विघ्नों को चूम चूम,
सह धूप घाम पानी पत्थर,
पांडव आए कुछ और निखर|

सौभाग्य ना सब दिन सोता है,
देखें आगे क्या होता है |

मैत्री की राह दिखाने कॉम
सबको सुमार्ग पर लाने को,
दुर्योधन को समझाने को,
भीषण विध्वंस से बचाने को |

भगवान हस्तिनापुर आए,
पांडव का संदेशा लाए |

दो न्याय अगर तो आधा दो,
पर इसमें भी यदि बाधा हो,
तो दे दो केवल पाँच ग्राम,
रखो अपनी धरती तमाम |

हम वहीं खुशी से खाएंगे,
परिजन पे असि उठाएंगे |

दुर्योधन वह भी दे सका,
आशीष समाज की ले सका,
उल्टे हरि को बांधने चला,
जो था असाध्य साधने चला|

जब नाश मनुज पर छाता है,
पहले विवेक मर जाता है |

हरि ने भीषण हुंकार दिया,
अपना स्वरूप विस्तार किया,
डगमग डगमग दिग्गज डोले,
भगवान कुपित होकर बोले |

ज़ंजीर बढ़ा अब साध मुझे,
हाँ हाँ दुर्योधन बाँध मुझे|

यह देख गगन मुझमें लय है,
यह देख पवन मुझमें लय है,
मुझमें विलीन झंकार सकल,
मुझमें लय है संसार सकल |

अमरत्व फूलता है मुझमें,
संहार झूलता है मुझमें,

उदयाचल मेरे दीप्त भाल,
भू-मंडल वक्षस्थल विशाल,
भुज परिधी बाँध को घेरे है,
मैनाक मेरु पग मेरे हैं |

दीप्ते जो ग्रह नक्षत्र निकर,
सब है मेरे मुख के अंदर |

दृग हो तो दृश्य अखंड देख,
मुझमें सारा ब्रम्हांड देख,
चर-अचर जीव जग क्षर अक्षर,
नश्वर मनुष्य सुर जाती अमर |

शत कोटि सूर्य शत कोटि चंद्र,
शत कोटि सरित सर सिंधु मंद्र |
शत कोटि ब्रम्‍हा विष्णु महेश,
शत कोटि जलपति जिश्नू धनेश,
शत कोटि रुद्र शत कोटि काल,
शत कोटि दंड धर लोकपाल |

ज़ंजीर बनाकर साध इन्हे,
हाँ हाँ दुर्योधन बाँध इन्हे |

भूतल अटल पाताल देख,
गत और अनागत काल देख,
यह देख जगत का आदि सृजन,
यह देख महाभारत का रण |

मृतकों से पटी हुई भू है,
पहचान कहाँ इसमें तू है |

अंबर का कुन्तल जाल देख,
पद के नीचे पाताल देख,
मुठ्ठी में तीनों काल देख,
मेरा स्वरूप विक्राल देख |

सब जन्म मुझीसे पाते हैं,
फिर लौट मुझीमें आते हैं |

जिव्हा से कढ़ती ज्वाल सघन,
सांसों से पाता जन्म पवन,
पड़ जाती मेरी दृष्टि जिधर,
हसने लगती सृष्टि उधर |

मैं जबही मूंदता हूँ लोचन,
छा जाता चारों ओर मरण |

बाँधने मुझे तू आया है,
ज़ंजीर बड़ी क्या लाया है?
यदि मुझे बाँधने चाहे मन,
पहले तू बाँध अनंत गगन |

सुने को साध न सकता है,
वह मुझे बाँध कब सकता है?

हित वचन नहीं तूने माना,
मैत्री का मूल्य न पहचाना,
तो ले अब मैं भी जाता हूँ,
अंतिम संकल्प सुनाता हूँ |

याचना नही अब रण होगा,
जीवन जय या कि मरण होगा |


टकराएँगे नक्षत्र निखर,
बरसेगी भू पर वहीं प्रखर,
फ़न शेषनाग का डोलेगा,
विक्राल काल मुँह खोलेगा |

दुर्योधन रण ऐसा होगा,
फ़िर कभी नहीं जैसा होगा|

भाई भाई पर टूटेंगे,
विष बाण बूंद से छूटेंगे,
सौभाग्य मनुज के फूटेंगे,
वायस श्रिगाल सुख लूटेंगे |

आख़िर तू भूशायी होगा,
हिंसा का परदायी होगा |

थी सभा सन्न लोग डरे,
चुप थे या थे बेहोश पड़े,
केवल दो नर ना अघाते थे,
धृतराष्ट्र विदुर सुख पाते थे |

कर जोड़ प्रमुदित निर्भय,
दोनों पुकारते थे जय जय ||
रामधारी सिंह दिनकर: रश्मिरथीSocialTwist Tell-a-Friend

गुरुवार, जुलै ३०, २००९

अवघा रंग एकचि झाला

काल बरेच वर्षांनी नाटक पाहिला गेलो. शेवटचं नाटक पाहिलं होतं सही रे सही. त्यानंतर, तब्बल पाच वर्षांनी हे नाटक पाहिलं. अवघा रंग एकचि झाला. ह्या नाटका बद्दल अनेक जणांकडून चांगलं ऐकलं होतं, त्यामुळे ते बघावसं वाटत तर होतं. त्यात, झी मराठी वर अमोल बावडेकर ने सादर केलेलं "रंग रंग, पांडुरंगी रंग रंग", हे गाणं ऐकून माझी हे नाटक बघायची इच्छा अजूनच तीव्र झाली. त्यात हे संगीत नाटक. आमच्या पिढीला संगीत नाटक कधी पाहायला मिळालं नाही. म्हणून एकदा संगीत नाटक कसं असतं हे पण बघायचं होतं. काल योग जुळून आल्याने, हे सगळं एकदाचं जमलं.

नाटकाबद्दल म्हणायचं तर, नाटक खूपच छान आहे. नाटकातली कीर्तनं आणि इतर गाणी सुद्धा अप्रतीम आहेत. नाटकाच्या कथेचा पाया जरी जुना असला (दोन पिढींच्या विचारां मधला फरक) तरी कुठे कुठे हा फरक दिसतो, हे मात्र बघण्या सारखं आहे. विशेष म्हणजे, संगीत नाटक असून देखील, ते गाण्यांनी गजबजलं नाहीये. नाटकातले अनेक विनोदी क्षण गंभीर वातावरणात थोडा दिलासा देऊन जातात. नाटकातील पात्रांचा अभिनय उत्तम आहे. प्रसाद सावकारां सारखे दिग्गज कलाकाराच्या जोडीला, स्वरांगी मराठे सारखी उगवती कलाकार पण आहे. पार सावकारांपासून ते स्वरांगी पर्यंत सर्व नटांनी आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. शिवाय, संगीत नाटक असल्याने गायन सुद्धा सुरेख असणे गरजेचे आहे. ह्या क्षेत्रातही सर्वांनी आपापली कामगिरी चोख बजावली आहे. अमोल बावडेकरला आपण सा-रे-ग-म-प आजचा आवाज, मधे ऐकलं आहेच. त्याचा गायनावर सुरेश वाडकरांची छाप आहे. विशेष म्हणजे, स्वरांगीचा आवाज सुद्धा अतिशय गोड आणि सुमधुरआहे. कठीण-कठीण-कठीण किती, ह्या गाण्यावर, स्वरांगीला वन्स मोर मिळाला, आणि तिने सुद्धा खिलाडू वृत्तीने पुन्हा एकदा त्या गाण्यातले एक पद म्हणून दाखवले.

नाटकाचा शेवट फक्त जरा घाई-गडबडीत केल्या सारखा वाटतो. म्हणजे कसं, मंगलाष्टकं जर लांबली, तर मुहूर्त चुकू नये म्हणून भटजींची कशी घाई होते, तसं ह्या नाटकातल्या शेवटा बद्दल वाटलं. पण नाटकाच्या शेवटाला, स्वरांगी आणि अमोल रंगमंचा वरून उतरून प्रेक्षकांमधे आले आणि सर्व नाट्यरसिकांचं अभिवादन स्वीकारलं. नाटकाचा शेवट करण्याची ही अभिनव पद्धत मला खूप आवडली.

दुसरं म्हणजे आमच्या आजी-आजोबां बरोबर संगीत नाटकाला दाद देणारी पिढी सुद्धा लोप पावल्या सारखी वाटली. कारण नाट्यगृहात, कुणीही गाण्याला टाळ्यांखेरीज इतर दाद देत नव्हतं. आता आम्ही असं ऐकलं आहे, की संगीत नाटकामधे दिग्गजांनी प्रत्येक गाण्याला वन्स मोर मिळवला आहे. ते त्यांचं कर्तृत्व आहेच, शिवाय त्या कलेची जाण असलेल्या प्रेक्षांचा सुद्धा त्यात वाटा आहे. ह्या नाटकातली बरीचशी गाणी वन्स मोर घेण्या सारखी होती, पण फक्त स्वरांगीच्या गाण्याला वन्स मोर मिळाला.

जाता-जाता एक सांगायला हरकत नाही. अमोल बावडेकर आणि माझं नातं लागतं. मला सारखं त्याला जाऊन भेटावसं वाटत होतं. पण ते जमेल असं दिसत नव्हतं. मी आणि सुशांत, परत ठाणे स्टेशनला चालत आलो. लोकल साठी उभे होतो, तेवढ्यात अमोल आणि जान्हवी पणशीकर सुद्धा त्याच लोकल साठी आले. सुशांत आणि मी अमोल्च्या मागून त्याच डब्यात शिरलो. ट्रेन मधे अमोलशी ओळख करून घेतली. ठाणे ते कांजूर, त्याचाशी १० मिनिटे गप्पा मारल्या. अमोल सुद्धा मन मोकळे पणाने बोलला. नातं असल्याने, एकमेकांना घरी येण्याचे आमंत्रण देण्यात आले. बघू आता तो कधी आमच्या घरी येतो ते. तो पर्यंत, तुम्ही पहायला विसरू नका- अवघा रंग एकचि झाला.

अवघा रंग एकचि झालाSocialTwist Tell-a-Friend

शुक्रवार, जुलै ०३, २००९

सरकारला फुकट आणि सामान्यांना फरफट

मंगळवारी वांद्रे-वरळी सागरी-पूलाचा शुभारंभ झाला. त्या पुलाचे नाव काय ठेवायचे, हे पण ठरले आणि त्यावर रास्त वादही झाला. मुंबईकरांना पाच दिवस पुल फुकट वापरायची मुभा सरकारने दिली. पण ह्या सगळ्या धांदलीत, ह्या पूलाचं बांधकाम कुणासाठी केलं आहे, ह्याचा मात्र विसर पडला. सामान्य माणसांना आपल्या कार्यालयात जायला सुविधा व्हावी, म्हणून ना पूल बांधला? की फक्त चार-चाकी धारक श्रीमंत नागरिकांसाठी? विद्यमान आमदार, खासदार, सरकारी नोकर आणि त्यांच्या गाड्या ह्या पूलावरून काहीही टोल न भरता फुकट जाऊ शकतात. रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या, ह्यांना टोल माफी समजण्याजोगे आहे. पण आमदार, खासदार ह्यांना का फुकट? आणि ते सुद्धा सदैव!

ज्या गाड्यांमुळे रस्त्यावर एवढी गर्दी झाली, वाहतुकीची गती मंदावली, त्या गाड्यांसाठी नव-नवीन पूल बांधून देण्यात येत आहे. पण सार्वजनिक वाहतुकीला सुधारण्यासाठी तोकडे आणि नाममात्र प्रयत्न चालू असल्याचं दिसतं. बेस्ट परिवहनने राज्य शासनाकडे ह्या सागरी पूलावर बस गाड्यांना आकारण्यात येणार्‍या टोल मधे सूट देण्यासाठीचा अर्ज केला. ती सूट मिळाली असता, तिकिटाचे शुल्क नाममात्र वाढवून ह्या सागरी मार्गावरून बेस्टला सेवा पुरविता आली असती. ही सूट किमान सामान्य गाड्यांना तरी देण्यात यायला पाहिजे होती. वातानूकुलित गाड्यांना नसती दिली तरी एकवेळ समजण्याजोगे आहे. पण सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमति विमल मुंदडांनी स्पष्टपणे सांगितले की बेस्टला कुठल्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही. त्यामुळे बेस्टला ह्या मार्गावरून बस सेवा पुरवायची झाली तर साधरण पणे ३-४ रुपयांनी तिकिटाचे दर वाढवावे लागतील. हे सामान्य जनतेला परवडण्यासारखं आहे का? गाडीधारक श्रीमंतांचा वेळ आणि पैसा वाचावा म्हणून का हा पूल बांधला?

ह्या उलट, इतर गाड्यांकडून जरा ज्यादा कर आकारून त्यातून मिळणारा निधी सरकारने बेस्टच्या सवलतीतली तूट भरून काढण्यासाठी वापरावा. पण तसं न करता सरकारने बेस्ट प्रवाश्यांना ह्या सागरी मार्गाच्या वापरापासून वंचित केलं आहे. त्या मिळणार्‍या करातून बेस्ट यंत्रणा अजून सक्षम करावी. जेणे करून लोकं स्वत:च्या गाडीचा वापर कमी आणि सार्वजनिक वाहतुकीचा अधिक प्रयोग करतील. सार्वजनिक वाहतुक जर सक्षम असेल तर गाड्या काढून रस्ते भरायला कोण येणार आहे?

असो हा ब्लॉग वाचणार्‍यांनी किमान एक काम करावं. वृत्तपत्रात एक पत्र पाठवावं. त्यात बेस्टला टोल मधे सवलत सरकारने द्यावी असा मजकूर लिहावा. एवढी सगळी पत्र बघून वृत्तपत्र त्याची बातमी नक्कीच करेल. निदान त्यातून तरी सरकार काहीतरी बोध घेईल, अशी आशा करुया. ह्या शिवाय बेस्टला ह्या मार्गावर सूट मिळण्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल, ते केलेत तरी उत्तम.
सरकारला फुकट आणि सामान्यांना फरफटSocialTwist Tell-a-Friend

शनिवार, जून २७, २००९

कभी कभी... मेरे दिल में खयाल आता है

मला एक सवय आहे. कुठलं ही काम करायला घेतलं, की त्या कामाच्या परिणामांची एक रूपरेषा माझ्या डोक्यात तयार होते. ते काम कसे व्हावे, त्या कामाचा अंतिम परिणाम कसा असावा, ह्या सगळ्या गोष्टींचा एक निकष तयार होतो. ते काम त्या निकषां प्रमाणे व्हावे ह्या साठी मी प्रयत्न पण करतो. आणि अनेक वेळा प्रयत्न करूनही ते काम त्याठरवलेल्या निकषांपेक्षा कमीच पडतं. पण काम व्यवस्थित पार पडतं. अशा वेळेस मला आपले प्रयत्न कमी पडल्याचंदु: होतं. कदाचित माझे निकष खूप उच्च असतील. ते थोडं-थोडं करत वर नेता, मी कदाचित पहिल्याझटक्यातच स्वतः कडून जास्ती अपेक्षा करत असेन. पण मग आधी पासून अपेक्षा उंचावल्या नाहीत तर कुठेपोहोचायचे आहे, ते कसं कळणार?

असो, मी माझ्याबद्दल असे निकष ठेवत असल्याने, मी इतरांकडूनही काही निकष पूर्ण करण्याची अपेक्षा ठेवतो. माझं हे लिखाण थोडं बुचकळ्यात टाकण्या सारखं असू शकतं, पण हे खरं आहे. उदाहरणार्थ, मी शिक्षक लोकांकडूननवीन गोष्टी उत्साहाने शिकण्याची अपेक्षा ठेवतो. आणि मला असेही वाटते की ते शिक्षक असल्याने, त्यांनी नवीनगोष्टी पटकन आत्मसात कराव्यात. कारण वर्षानुवर्ष तेच विषय शिकवत असल्याने, त्यांचं त्या विषयातील ज्ञानआणि विषयावरील पकड मजबूत होते, असा माझा समज आहे. पण अनेक वेळा हेच शिक्षक, कठीण विषयालाबगल देऊन सोपा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात धडपडताना दिसतात. आमचं आता वय झालं हे कारण सांगून तेजवाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा तरूण शिक्षकही असलं करताना दिसतात. हे पाहून मन खिन्नहोतं. असं वाटतं की हेच लोकं नवीन पिढी घडवणारे आहेत. आणि नवीन कठीण विषय शिकण्याची ह्यांच्यातचउत्सुकता नसेल, तर विद्यार्थ्यांना
नवीन गोष्टी शिकण्यासाठी हे लोकं कसं प्रवृत्त करणार? त्याही पेक्षा खिन्न करणारी गोष्टं म्हणजे शिक्षक वर्गाचास्वतः कष्ट करून विषय समजून घेण्याचा अनुत्साह. थोडं समजवून दिल्यावर पुढचं तुम्ही करून पहा असं सांगितलंकी लगेच दुसर्या दिवशी हजर होतात. हे समजलं नाही, समजावून सांगा. विचारावं, काय समजलं नाही ते सांगा, तर उत्तर मिळतं काहीच समजलं नाही. सगळं सांगा.

अरे का? थोडे कष्टं घ्या की. तुम्ही पहिल्यांदा धडपडणार, समजायला वेळ लागणार, एका झटक्यासमजणार नाही, हे सर्व स्विकारा. जरा कागदावरून कलम चालवा. जरा डोक्याला चालवा. मग उमजेल सगळं. हेएवढं सगळंसांगावसं वाटतं, पण काय करणार? आम्ही काय ज्ञानेश्वर नव्हे. रेड्या कडून वेद वदवून घ्यायला. सगळ्या जास्तीदु: ह्या गोष्टीचं होतं की हीच मंडळी आपल्या महाविद्यालयात परत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांवर आपली सत्ताचालवतात. तिकडे त्यांना हजेरी, सबमिशन ह्या गोष्टींवरून हडकवतात आणि मार्कांची भीती दाखवतात.

म्हणूनच कधी-कधी एकांताच्या क्षणी (म्हणजे मी एकटा असताना) असं वाटतं की आपण स्वतः बद्दल एवढे उच्चनिकष का ठेवायचे? आपल्या पेक्षा कमी कष्ट करून सत्ता गाजवणारे लोकं आपलं आयुष्य सुखाने जगत आहेतआणि त्यांचा उदर-निर्वाह सुद्धा व्यवस्थित चालू आहे. त्यांना आयुष्यात इतर काही मिळो अथवा न मिळो, पण असले उच्च निकष गाठण्याचे दडपण तरी बाळगावे लागत नाही. आणि म्हणूनच ते निकष न गाठल्याचे दु:ख पणत्यांना होत नाही. पण असं दुय्यम आयुष्य जगणार्‍यां मुळे ह्या समाजाचं काय होत आहे? आज शिक्षकी पेशा कडेखूप आदराने बघणारी किती लोकं आहेत? किंबहुना इतर काही जमले नाही म्हणून शिक्षक झाला, असं अनेक वेळेला ऐकायला मिळतं. आणि हल्लीच्या शिक्षकांकडे बघून तशी शंका सुद्धा निर्माण होते.

असो, शिक्षक हे एक उदाहरण झालं. अशी अजून बरीच उदाहरणं आहेत. पण मी ह्या बद्दल अजून लिहीत नाही. कारण अशी दुसर्‍यांवर टीका करायला मी काही नोबेल पुरस्कार विजेता नाही. पण कधी-कधी वाटतं की आपले निकष तरचुकत नाहीत ना?
कभी कभी... मेरे दिल में खयाल आता हैSocialTwist Tell-a-Friend

शुक्रवार, जून १२, २००९

आयला, पावसाला कुठे नेला?

हा प्रश्न हवामान खात्याला उद्देशून नसून, पश्चिम बंगाल मधे आलेल्या "आयला" नामक चक्रीवादळाला आहे. हवामान खात्याच्या बातमीनुसार, ह्या चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टी वरच्या पावसाळी हवेचीच हवा गुल केली आहे. भारताच्या पूर्व किनार्‍यावर जर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, तर पश्चिम किनार्‍यावरच्या मानसूनची प्रगती देशाच्या अंतर्गत भागात होते. पण "आयला" मुळे असा पट्टा तयार न झाल्यामुळे, पश्चिमी मानसूनची प्रगती जणू काही थांबलीच आहे. म्हणजे झालं असं की आयलामुळे पूर्व किनार्‍यावरचं तपमान कमी झालं. कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यासाठी उच्च तपमान आणि शुष्क वातावरण लागतं. चक्रीवादळामुळे तपमानही खाली आलं आणि आर्द्रता सुद्धा वाढली. आता पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यासाठी थोडा काळ जावा लागेल. त्याशिवाय पश्चिमेकडचा मानसून पुढे सरकणार नाही.

सध्या मानसून रत्नागिरीच्या किनार्‍यावर अडकून पडलाय. त्याला तिकडून पुढे सरकायला अजून एक आठवडा तरी लागेल. कारण साधारणपणे एका आठवड्यानंतर पूर्व किनार्‍यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पश्चिमी मानसून पुढे सरकेल. हवामान खात्यानुसार आता मुंबईत मानसून जुलई मधेच येईल. म्हणजे अख्खा जून महीना कोरडाच रहाणार.
आयला, पावसाला कुठे नेला?SocialTwist Tell-a-Friend

सोमवार, जून ०८, २००९

स्मारक: महाराजांचे आणि खानाचे

बरेच दिवस ह्या विषयावर लिहायचे केले होते. पण, विसरून जात होतो. उद्धव ठाकरेंच्या कालच्या वर्तमानपत्रातल्या वक्तव्यामुळे ह्याची पुन्हा आठवण झाली. खरं म्हणजे उद्धव ठाकरे माझ्या मनातलेच बोलले. त्यामुळे अजून काय लिहावे तेच कळत नाही. समर्थ, दादोजी आणि गागाभट्टांचा द्वेष करणार्‍यांनी खरं तर आधी उद्धव ठाकरेंच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. त्याशिवाय त्यांनी हा ब्राम्हण द्वेष चालू ठेवण्यात कुठलीच मर्दांगी नाही.

समर्थांनी संभाजी राजेंना पत्र लिहिलं. त्यात त्यांनी संभाजींना राज्य कसं करावं आणि स्वराज्य कसं टिकवावं हे सांगितलं. त्या काव्य पत्रातील शेवटची चार पदं इथे देतोय-

शिवराजास आठवावें । जीवित्व तृणवत् मानावे ॥
इहलोकीं परलोकीं राहावे । कीर्तिरूपें ॥१५॥
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥
शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥
शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥
शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥१७॥
सकळ सुखांचा त्याग । करून साधिजे तो योग ॥
राज्यसाधनाची लगबग । कैसी असे ॥१८॥
त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥
या उपरी विशेष । काय लिहावें ॥१९॥

महाराजांबद्दल एवढे गौरवोद्गार समर्थांनी काढले आहेत. आणि शेवटच्या कडव्यात त्यांनी पुरुष कोणाला म्हणावे हे ही लिहिलं आहे. आता महाराजांच्या कृतिपेक्षा विशेष काही करायला मेटे, चोंदे, गायकवाड आदिंना काही जमलं आहे असं दिसत नाही. त्यामुळे त्यांना 'पुरुष' म्हणावे काय, असा प्रश्न आहे. दुसरं असं, की शिवरायांबद्दल एवढं कौतुक आणि आकलन समर्थांनी केलं आहे, ते काय महाराजांना जवळून जाणल्या शिवाय? दर वर्षी राम-नवमीच्या उत्सवाला महाराजां तर्फे रसद सज्जनगडावर पोहोचवली जायची. महाराजांना समर्थांविषयी आस्था असल्या शिवाय का ही सहायता केली जात होती? ह्याचा ही हे मराठा नेते विरोध करतील.

दुसरं म्हणजे, उद्धव ठाकरे म्हणतात तसं, ह्या मराठा नेत्यांना अफझलखानाची कबर आणि त्याचं दर्ग्यात झालेलं रूपांतर चालतं. ते कुणी तोडायचं बोलत नाही. प्रतापगडाच्या पायथ्याशी हिंदू-मुसलमान दंगे होतात. अफझलखानाचा तथाकथित स्मृतिदिन असला की तिथे तंग वातावरण असतं. तर एवढे वर्ष ह्या मराठा नेत्यांना अफझलखानाचा उदो-उदो होत असल्याचं खटकलं नाही. इतिहासानुसार खान हा संत नसून त्याने तुळजापूर, पंढरपूर, इ. देवळं उध्वस्थ केली, हिंदूना- मग ते ब्राम्हण असो किंवा मराठा- छळलं होतं. तो इतिहास विसरून त्या खानाची कबर आणि त्याचं दर्ग्यात झालेलं रुपांतर ह्या मराठा नेत्यांना कसं खपतं? प्रतापगडावर चाललेला हा तमाशा ह्यांना कसा काय चालतो? दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास हे स्वराज्याच्या विरोधात तरी नव्हते.

थोडक्यात सांगायचे झाले, तर ज्यांनी स्वराज्य घडवून आणले, त्यांचा स्मारकाबद्दल एवढा वाद निर्माण होतोय. आणि जो स्वराज्यावर चाल करून आला, त्याच्या स्मारकाचा दर्गा होऊन तिकडे उरुस वगैरे साजरे होत आहेत. ही हिंदवी स्वराज्याची चेष्टा नाही तर अजून काय आहे?
स्मारक: महाराजांचे आणि खानाचेSocialTwist Tell-a-Friend

शनिवार, मे ३०, २००९

वाचा आणि गप्प बसा

महाराष्ट्र शासनाने अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा आणि स्मारक बांधायचे ठरवले आहे. त्यासाठी नेहमी प्रमाणे एक समिती नेमण्यात आली आहे. आणि नेहमी सारखं ही सरकारी समिती पण वादाच्य भोवर्‍यात सापडली आहे. पण ह्या वेळेस हा वाद निराळा आहे. ह्या वादने जातीय वळण घेतले आहे आणि महारष्ट्र सरकार त्याबद्दल मूग गिळून गप्प बसलं आहे. मुख्यमंत्रांनी काही विधानं केली आहेत, पण तरीही ह्या वादाला जातीय रंग देणे थांबत नाहीये.

काही मराठा संगठनांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या अध्यक्ष पदी झालेल्या निवडीला विरोध केला आहे. वास्तविक पाहता बाबासाहेबांची निवड ही अध्यक्ष पदी झाली नसून त्यांना सल्लागार म्हणून नेमलं आहे. त्यांची पात्रता नसती तर विरोध ठीक होता. पण शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा अभ्यास बाबासाहेब पुरंदरे ह्यांचा इतका कोणीच केला नसेल. किंबहुना शिवाजी राजांवर पुरंदरेंचं वाक्य हे शेवटचा शब्द मानला जातो. बरं ह्या मराठा संगठनांचा शिवशाहीरांना विरोध फक्त ते ब्राम्हण आहेत म्हणून आहे. ह्या मराठा संगठनांच्या मते, शिवशाहीरांनी महराजां बद्दल चुकीचा इतिहास पसरवला आहे. त्यांचा मते, दादोजी कोंडदेव हे महराजांचे गुरू नव्हतेच. पण ह्या 'विद्वानांनी' त्या संदर्भात एकही पुरावा दिला नाही. महराजांचे गुरू जर दादोजी नव्हते तर कोण होते? त्यपुढे जाऊन ह्या संगठनांनी तर कहर केलाय. रामदास स्वामी हे महाराजांचे आध्यातमिक गुरू नाही असा त्यांचा दावा आहे. स्वर्गातून पाहत असलेल्या महाराजांना काय वाटत असेल? ह्याच साठी केला होता का अट्टाहास? समर्थांनी दासबोधात असल्या मूर्खांची काय लक्षणं दिली आहेत ते वाचले पाहिजे. म्हणजे हे मराठा इतिहासाचे रक्षण करते समर्थ-संभाजी महाराज ह्यांच्यातला तो प्रसिद्ध पत्रव्यवहारही नाकारायला कमी करणार नाहीत. त्यात तर समर्थांनी शिवरायांचं कौतुकच केलं आहे. आणि त्यांनी संभाजी राजेंना शिवाजींचा आदर्श ठेवायला सांगितलं आहे.

असो, पण पुरोगामी महाराष्ट्रात असे बिनबुडाचे आरोप आणि वक्तव्य करणे आणि जातीयवाद निर्माण करणे हे धोकादायक आहे. आंधळेपणाने ब्राम्हणांचा विरोध करून त्यांना समाजात हिणवणे हे कितपत बरोबर आहे? बाबासाहेब पुरंदरे सारख्या विद्वानांचा काही लोकं वाट्टेल तसा जाहीर पणे अपमान करतात आणि त्याविरोधात सरकार काहीही करत नाही? त्यांनी जितकी वर्ष महाराजांच्या इतिहास संशोधनात घालवली आहेत, तितकी वर्ष ह्या मराठा संगठनांनी हातात पुस्तकं तरी धरली आहेत का? ह्याच मराठा संगठनांच्या अज्ञानी हट्टाला दुजोरा देत महाराष्ट्र सरकारने ह्या वर्षीचा दादोजी कोंडदेव पुरस्कार अजून जाहीर केला नाही. काही छुटपुट संगठनांपुढे राज्य शासन एवढं हतबल झालं? शिवाजी महाराजांवरून हे असलं राजकारण करायचं आणि जातीद्वेष करायचा? पुरंदरेंनी जर चुकीचा इतिहास लिहिला आहे, तर बरोबर इतिहास कुठे आहे? आणि त्या इतिहासाला दुजोरा देणारी टिपणं आणि कागदपत्र कुठे आहेत? ह्या संगठनांनी नुसताच ओरडा आरडा न करता पुराव्यानिशी पुरंदरेंना चुकीचे ठरवून दाखवावे. नाहीतर त्यांनी आपल्या खाक्या उगीच दाखवू नयेत. बाबासाहेब पुरंदर्‍यांनी, एका सज्जन माणसाला शोभेल असं वागून काहीही प्रतिक्रिया दिली नाहीये. पण त्यांच्या गप्प बसल्याचा फायदा ह्या संगठनांनी घेऊन त्यांचावर वाट्टेल ते आरोप लादणं सुरुच ठेवलं आहे.

आणि ह्या सगळ्या गोष्टींवर आपण जनतेने काय करायचं? राज ठाकरेंना कुस्तीसाठी बोलवून हा प्रश्न सोडवायचा असल्या मार्गाचा प्रस्ताव करणारे अनंत चोंदे आणि प्रवीण गायकवाड ह्यांचे काय करावे? आपण हे सगळं वाचून केवळ गप्प बसायचं का?
वाचा आणि गप्प बसाSocialTwist Tell-a-Friend

शनिवार, मे २३, २००९

ट्रक सुभाषितं

खरं तर मला बस, गाडी, इत्यादि पेक्षा रेल्वेने प्रवास करायला आवडतं. एकतर ट्रेन मनात येईल तिकडे थांबत नाही. दुसरं म्हणजे त्यांच्या पॅन्ट्री कार मधून वेळो-वेळी काहीतरी खायला-प्यायला येत असतं. त्यामुळे भूक लागली तर कुठल्याही हॉटेल अगर ढाब्याची वाट न बघता पाहिजे तेव्हा खाता येतं.

पण बस किंवा कारने प्रवास करायचा झाला, की मला एक वेगळी मजा वाटते. आणि विशेष म्हणजे मला ट्रकच्या मागे लिहिलेल्या पाट्या वाचण्यात एक विशिष्ट आनंद मिळतो. ट्रकच्या पाठीवर अनेक सुभाषितं आणि बहुजन हिताय असे संदेश दिसतात. त्यात काही एकदम मजेशीर देखील असतात. खरं म्हणजे माझं ह्या विषयात फार काही संशोधन नाही. कारण मी ट्रक मागच्या सुभाषितांची नोंदणी कधी केली नाही. तरी पण ही झलक समजावी. ट्रकच्या मागील बाजूस आढळलेल्या काही पाट्यांचा हा एक नमूना आहे-

१. कंडोम वापरा, एड्स टाळा. ह्या संदेशा बद्दल आम्ही असं ऐकलं होतं की सरकार तर्फे हा संदेश चिकटवल्याचे काही तरी इनाम रक्कम मिळते. त्यामुळे आमच्या पैकी काही जणांच्या मनात आपापल्या मोटरसायकलवर हा संदेश चिकटवण्याचा विचार आला होता.

२. सौ में से ९९ बेईमान, फिरभी मेरा भारत महान. देशातील सत्य परिस्थिती कथन करणारा महानुभाव. पण एकतरी सत्यवादी अजून भारतात उरलाय, ह्याचं आपल्याला समाधान वाटू देणारा अनेक ठिकाणी दिसतो.

३. जलो, मगर दिये की तरह. Turning threats into opportunities असा महत्वाचा व्यवस्थापकीय सल्ला देणारा.

४. आई-वडीलांचा आशीर्वाद, आईची पुण्याई वगैरे लिहिणारे आधुनिक श्रावण बाळ सुद्धा असतात.

५. मी पळतो, तू का जळतो? असं सांगून आपल्याला षडरिपुंपैकी एकाची आठवण करून देणारा भेटतो.

ह्याहून जास्ती काही मला सध्या आठवत नाहीत. पण आठवली, किव्हा नवीन दिसली, तर ती संग्रहीत करून ह्या लेखाचा दुसरा भाग म्हणून प्रसिद्ध करीन. दरम्यान, वाचकांना काही पाट्या माहीत असतील, तर त्यांनी त्याची नोंद टिप्पणीं मधे करावी. अश्या टिप्पण्या ह्या लेखाचा पुढील भाग म्हणून वाचकांच्या नावा सकट प्रसिद्ध करण्यात येईल.
ट्रक सुभाषितंSocialTwist Tell-a-Friend

रविवार, एप्रिल २६, २००९

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय: नक्की पहा

आता पर्यंत तुम्ही मी शिवाजी राजे भोसले बोलतोय च्या बर्‍याच समीक्षा वाचल्या असतील. म्हणूनच ही समीक्षा नसून एक प्रोत्साहन आहे. तुम्हाला हा सिनेमा बघण्यासाठीचं. हा सिनेमा जरूर बघा. कारण महाराजांचे बोल कुणीही दुर्लक्षित करू शकत नाही. ह्या सिनेमा मधे, महाराजांनी केलेला उपदेश अमुल्य आहे. तो केवळ मराठी माणसाला लागू होत नसून स्वाभिमानाने जगू इच्छिणार्‍या प्रत्येकासाठी आहे.

ह्या सिनेमात उगीचच "मराठी संस्कृतीचं" उदो-उदो केलं जात नाही. मधू सप्रे, विदिशा पावटे, मुग्धा गोडसे, ह्यांचं कौतुक दादा फाळके, आशुतोष गोवारीकर, अनिक काकोडकर, इ. एवढेच केले आहे. म्हणजे, मराठी माणूस जसा pioneer आहे, तसा आधुनिक पण आहे. ह्या सिनेमातील नायक आपल्या मुलीला उगाचच मध्यम वर्गीय संस्कृतीच्या नावा खाली सिनेमात भाग घेण्यापासून रोखत नाही.

दुसरं म्हणजे शिवाजी महाराजांचं दिनकरराव भोसलें बरोबर संभाषण. त्यातले काही संवाद जिव्हारी लागतात. उदाहरणार्थ: "स्वराज्याचे तोरण फुल-बाजारात विकत मिळत नाही. त्या साठी युद्ध करावं लागतं, प्राणांची आहुती द्यावी लागते." अजून एक: "आमची कुठेही शाखा नाही अशी पाटी लावता. ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्याचा अभिमान बाळगता", अशी मराठी हॉटेल-खानावळी चालवणार्‍यांवर टीका, खरीच पटते.

तिसरं म्हणजे मकरंद अनासपुरेचं कॉमिक टाईमिंग आणि संवाद. "केसभर गजरा आणि गावभर नजरा". ह्या व्यतिरिक्त, ह्या सिनेमात समाजातल्या अनेक समस्या दाखवल्या आहेत. उदाहरणार्थ, बांधकाम व्यावसायिक आणि महानगर पालिकेतील कर्मचार्‍यांची जुगलबंदी, त्यातून होणारा सामान्य माणसाला त्रास. शिक्षण सम्राटांची मनमानी आणि जीव घेण्या स्पर्धेमुळे अर्ध्या टक्क्याने मार्क कमी झाल्याने पाहिजे त्या ठिकाणी प्रवेश न मिळणे.

एकूणच हा सिनेमा पाहिला तर एवढे लक्षात येतं की स्वाभिमानाने जगायचं असेल तर त्यासाठी लढावं लागणार. कारण आजच्या परिस्थितीला आपला नाकर्तेपणाच जवाबदार आहे. शिवाजी जन्माला यावा आणि तो सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरात.
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय: नक्की पहाSocialTwist Tell-a-Friend

शुक्रवार, एप्रिल २४, २००९

घरगुती अपूर्वाई-भाग २

ह्या लेखाचा पुर्वार्ध येथे वाचायला मिळेल.
अमेरीकी दूतावासाच्या बाहेरचं दृश्य म्हणजे एक जत्राच असते. अनेक व्हिसाभिलाषी आणि त्यांचे नातेवाईक तिथे जमलेले असतात. आंत जाणारे असतात, त्यांना शुभेच्छा देताना बघावं. उमेदवार तरुण अथवा घरातला धाकटा असेल, तर तो मोठ्यांच्या पाय पडून त्यांचे आशिर्वाद घेतो. थोरले, धाकट्यांच्या शुभेच्छा घेऊन आंत शिरतात. हे शुभेच्छा आणि आशिर्वाद अशा प्रकारे दिले जातात, जणू काही ही उमेदवाराची सरो-की-मरो करणारी मुलाखत आहे. आंत जाणार्‍या लोकांच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा उत्साह असतो, एक उत्सुकता असते. ह्या द्राविडी-प्राणायामातून बाहेर पडल्यावर स्वप्नांच्या देशात (?) जायला मिळणार आहे. बरं, ही उमेदवार मंडळी आंत गेली की बाहेर उभ्या असलेल्या नातेवाईकांकडे वाट बघणे, ह्या शिवाय काही पर्याय नसतो. व्हिसाचं काम संपायला जवळ-जवळ २-३ तास लागतात. मी पण आई-बाबांची वाट बघत त्या दूतावासाच्या समोरच्या पदपथावर बसलो होतो.

सवयी प्रमाणे, माझं इकडे-तिकडे बघण्यात टाईम-पास चालू झाला. लोकं आपला वेळ घालवण्यासाठी काय-काय आणतात. सगळ्यात सोपं म्हणजे वर्तमान पत्र. पण इतरही बरेच टाईम-पास असतात, हे तिकडे गेल्यावर कळतं. मला वाटायचं की एका माणसाच्या व्हिसाला एवढी २-३ माणसं कशाला? पण ते खूप उपयोगी पडतात, अशा वेळेस. एका कुटुंबातली २-३ माणसं असतात. उमेदवार आंत गेला, की बरोबर आणलेली एक चादर त्या पदपथावर पसरतात आणि गप्पा कुटायला सुरवात! ते थेट उमेदवार मुलाखत संपवून येई पर्यंत. सोबत, आपण जणू काय सहलीला आलोय ह्या थाटात खायला-प्यायला अनेक पदार्थही घेऊन येतात आणि तोंडाचा हा व्यायाम पण चालू करतात. काही चतुर जणांनी आजू-बाजूची हॉटेल टंचाई लक्षात घेऊन तिकडेच खाण्या-पिण्याच्या (कदाचित बेकायदेशीर) टपर्‍या टाकल्या आहेत. एक सॅण्डविच वाला, एक चणे-शेंगदाणे वाला, एक कुल्फीवाला, एक पाणी वाला असे काही जणं तिथे आपला धंदा चालवतात. आणि त्यांचा धंदा चांगला चालतो.

जसा-जसा वेळ पुढे जातो, तसे-तसे एक-एक उमेदवार आपापल्या मुलाखती संपवून बाहेर निघतात. अनेकांच्या चेहर्‍यावर आनन्द असतो, तर काहींच्या चेहर्‍यांवर निराशा. ज्यांना व्हिसा मिळतो ते असा काही जल्लोष करतात जणू त्यांनी विश्व-करंडक जिंकलाय. बोर्डात मार्कं पडले असते, तरीही त्यांना एवढा आनन्द झाला नसता. रस्त्या पलीकडचे त्यांचे नातेवाईक पण ह्या जल्लोषात सामील होतात. आपल्याकडे कसं, भारतीय संघ टी-२० विश्व-करंडक जिंकून आला, तेव्हा त्या संघापेक्षा जास्ती आनन्द त्यांच्या चाहत्यांना झाला, तसं हे दृश्य असतं. म्हणजे संघ यायच्या आधीच जल्लोष चालू. तिथे नुसत्या उमेदवाराच्या चालीवरून लक्षात येतं की त्याला/तिला व्हिसा मिळाला आहे की नाही. "मिल गया" चा नुसता जय-घोष चालू होतो. तो (ती) आला(ली) की "काय मग पार्टी कधी?" पासून "काय प्रश्न विचारले? तू काय उत्तरं दिलीस?" वगैरे.

ह्या उलट व्हिसा नाकारलेला(ली) उमेदवार, आपले खांदे टाकून परत येताना दिसतो(ते). त्याला/तिला पाहताच, नातेवाईकांच्यात चर्चा सुरू, "काय झालं असेल?" तो/ती आला(ली) की प्रश्नांचा भडीमार. काय झालं? कशामुळे नाकारला? कोण होता मुलाखत घेणारा? ह्या शेवटच्या प्रश्नाचं बर्‍याच वेळा एकच उत्तर असतं. "हां तो, त्याचा बद्दल ऐकलं आहे. त्याचा कडे व्हिसा गेला की समजायचं. त्याने बर्‍याच लोकांचा व्हिसा नाकारलाय." त्यातले काही जणं मग म्हणतात, "जाऊ दे रे(गं) पुन्हा अर्ज करू."

ह्या अशा प्रकारचे जयघोष आणि शोक पाहून पदपथावर वाट बघत असलेला ह्याच विचारात मग्न असतो- "माझा नातेवाईक बाहेर आला की जल्लोष होणार की ऑक्टोबर अटेम्प्ट मारावा लागणार?" करमणूकीचं हे एक साधन आहे. नाहीतर कानाला एमपी-३ प्लेयर लावून एकदाचं जगाच्या वेगळं होऊन जाणे. तिसरा पर्याय म्हणजे, "नेमका मीच मिळालो होतो का ह्यांना" असा विचार करत आत वातानूकुलित हवेत बसलेल्या आपल्या नातेवाईकांच्या नावाने, ब्रीच-कॅन्डीच्या त्या उन्हात, शंख करायचा.

ह्या अशा प्रकारच्या विविध रंग आणि भावना दाखवणार्‍या व्हिसा मुलाखतीचा खेळ बघत असतानाच, रस्त्या पलीकडून आई-बाबा येताना दिसले. ह्यांचं काय झालं असा विचार येता-क्षणी तिकडून आई ने मोठं हास्य करून, मान डोलावली त्या वेळेला मी पण मनात म्हण्टलं "मिल गया!!!"
घरगुती अपूर्वाई-भाग २SocialTwist Tell-a-Friend

सोमवार, एप्रिल १३, २००९

दिन का शुभारम्भ

उन्हाळ्याच्या दिवसातही सकाळच्या हवेत किंचीत गारवा,
सकाळी चांगलं अर्धा तास झालेलं पोहणं,
त्यानंतर खाल्लेले गरमागरम पोहे ,
आणि पोह्यांचा सोबतीला चहा गरम ,
ह्याहून सुंदर नसेल, दिन का शुभारंभ
दिन का शुभारम्भSocialTwist Tell-a-Friend

बुधवार, एप्रिल ०८, २००९

घरगुती अपूर्वाई - भाग १

कुठलाही परदेश प्रवास म्हणजे एक मजाच असते. मला अजून एकदाही परदेश प्रवासाचा योग आला नाही, पण इतरांच्या प्रवासाची तयारी बघण्याची संधी अनेक वेळा मिळाली आहे. जर तुम्ही कार्यालया तर्फे कामानिमित्त परदेशी जाणार असाल, तर मग अनेक गोष्टीं मधून सुटका होते, पण जर तुम्ही स्वत:च सगळी तयारी करणार असाल, तर मग काय महाराजा!! केवळ तिकीटे हातात येई पर्यंत काय-काय करावं लागतं. माझा भाऊ अमेरीकेला राहतो. त्याला आईची आठवण आल्याने, त्याने आईला तिकडे बोलावले. घरी सुरू असलेल्या ह्या अपूर्वाईची एक छोटीशी झलक.

परदेश प्रवासाचा नुसता विचार जरी केला तरी पहिल्यांदा काय लागतो, तर व्हिसा. व्हिसा कुठल्या प्रकारचा घ्यायचा इथपासून सुरुवात. म्हणजे तुम्ही तिथे कामानिमित्त जाताय, की नुसतं फिरायला जाताय, कुणाकडे जाताय, वगैरे अनेक प्रश्नांची उत्तरं स्वत:च स्वत:शी ठरवल्यावर व्हिसा बद्दल चौकशी चालू होते. त्यात अनेक देशांचे अनेक नखरे. प्रत्येकाच्या नाना प्रकारच्या मागण्या. त्यात तुम्हाला अमेरीका किंव्हा ब्रिटनला जायचे असेल, तर बघायलाच नको. स्वत:च्या लग्नासाठी आपण जेवढी आणि आपली जेवढी चौकशी केली नसेल तेवढी ह्या देशांचे व्हिसाचे फॉर्म आणि व्हिसा अधिकारी करतात. पार अगदी तुमचं बालवाडीतलं शिक्षण कुठे झालं इथपासून तुमच्या मुलाचं शिक्षण कुठे चालू आहे, इथपर्यंत. शंभर प्रकारचे कागद-पत्र, जन्माचा दाखला, शिक्षणाचे प्रमाणपत्र, नोकरी, तुमची आणि मुलांची, त्यांना वाटल्यास पार आजोबा-पणजोबांची पण. इकडे कोण राहतं, तिकडे कोण राहतं, इथला काय करतो, तिथला काय करतो, वगैरे-वगैरे.

अमेरीकेच्या व्हिसाची मुलाखत म्हणजे नोकरीच्या मुलाखतीपेक्षा बिकट. काय-काय घेऊन जावं लागतं. व्हिसाची तारीख मिळवणे ही सुद्धा एक कसरत असते. इंटरनेटमुळे हल्ली सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. आई-बाबा दोघांचा व्हिसा काढायचा होता. मावशीने एक ओळखीची एजन्ट सांगितली. एजन्ट वगैरे असले की आमच्या आईला अगदी प्रल्हादाला स्वयं भगवान विष्णु भेटल्यासारखा आनंद होतो. आता आपलं काहीही बिघडू शकणार नाही असं तिला वाटतं. तर ह्या एजन्ट बाईंनी शंभर कागद आणायला सांगितले. त्यातले अर्धे परत करून उरलेल्याची एक "फाईल" बनवून दिली. आईची वेगळी फाईल, बाबांची वेगळी. का, ते माहित नाही. तिनेच आई-बाबांसाठी व्हिसाचे शुल्क भरले आणि 'मुलाखतीची' तारीख घेतली.

व्हिसा मुलाखतीची तारीख आली. अमेरीकेच्या व्हिसा कार्यालयात जायचे होते. तिकडे आत मधे काहीही नेता येत नाही. फक्त तुमचे कागद-पत्राची फाईल आणि पाकिट. म्हणून बरीच लोकं आपल्या नातेवाईकाला घेऊन जातात. हे नातेवाईक बिचारे, रस्त्याच्या पलीकडे उन्हा-तान्हाचे, उमेदवारांचं सामान घेऊन उभे किंवा बसलेले असतात. आपल्या अथवा अमेरीकेच्या सरकारने ह्यांचा साठी काही सोय केली तर किती बरं होईल. पण नाही, तसं होणार नाही, कारण अमेरीकेला दहशतवादी हल्ल्याची भिती असल्याने त्यांचा दूतावासाच्या आजू-बाजूला काहीही असता कामा नये असा अलिखित नियम आहे. आणि म्हणूनच ते दूतावासाच्या आंत फार काही नेऊ देत नाहीत. असचं त्या दिवशी मी आई-बाबांचे दूतावासाला मान्य नसलेले सामान घेऊन उभा होतो.
घरगुती अपूर्वाई - भाग १SocialTwist Tell-a-Friend

शनिवार, मार्च १४, २००९

पुण्यातील एक दुकान

डेक्कन कॉर्नर वर इंटरनॅशनल बुक हाऊसच्या शेजारी एक नारळ वाला आहे. तो त्याच्या दुकानावर कमी आणि इतर ठिकाणी जास्त असतो. परवाच मी आणि आई देवळात जायच्या वेळी तिकडे नारळ घेण्या साठी थांबलो. साहेब नेहमी प्रमाणे दुसरी कड़े गेले होते. शेजारच्या बाईला विचारले असता ती म्हणाली की तो येईलच थोड्या वेळात. पण आईला धीर नव्हता. ती पुढच्या दुकानात नारळ बघायला गेली. तेवढ्यात माझं लक्ष त्या दुकानात वाजत असलेल्या रेडियो वर गेलं. "जाइए आप कहाँ जाएंगे, ये नज़र लौट के फ़िर आएगी" हे गाणं वाजत होतं. मनात म्हण्तलं की रेडियोला पण दुसरं गाणं वाजवता आलं नाही. हे म्हणजे आम्हाला एक प्रकारचं आवाहन होतं. दुसरी कडून नारळ घेउन दाखावाच। आई पुढे गेली होती. मी त्या दुकानासमोरच थांबलो होतो. तेवढ्यात तो दुकानदार आला आणि मला विचारलं काय पाहिजे. मी सांगितलं की आईला नारळ पाहिजे होता पण ती आता पुढे गेली. इकडे रेडियोवर अजून तेच गाणं वाजत होतं. "जाइए आप कहाँ जाएंगे?" मला हसू आलं. आणि समोरून आई येताना दिसली. तिला विचारलं "काय झालं?" म्हणाली ते दूकान बंद आहे. म्हण्टलं आता इथे घे. नाहीतरी दुकानदार तुझी वाट बघत बसलाय. दुकानात गाणं चालू होतं- "जाइए आप कहाँ जाएंगे, ये नज़र लौट के फ़िर आएगी". प्रसंगाला अगदी शोभून गाणं होतं.
पुण्यातील एक दुकानSocialTwist Tell-a-Friend

शनिवार, फेब्रुवारी २८, २००९

रहमानचा जय हो, पण....

अल्ला रखा रहमान (हे रहमानचं पूर्ण नाव) आणि गुलज़ारना स्लमडॉग मिलिनीयरच्या शीर्षक गीतासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. सगळ्यांना (आणि मला सुद्धा) खूप आनंद झाला. एवढा की आमचा आनंद गगनात मावेना. भारतीय संगीताला परदेशात सन्मान मिळाला ही खूपच अभिमानास्पद बाब आहे.

रहमानचा मी रोजा पासून चाहता आहे. त्याने हिंदी चित्रपट संगीतात एक नवीन क्रांती आणली. नाहीतर आपण आजही अनू मलिकची "प्रेरीत" गाणी ऐकत बसलो असतो. रहमान मुळे अनू मलिकवर आळा बसला आणि तो सध्या "इंडियन आयडल" मधे जावेद अख्तरांचा विरोध करत बसतो. रहमानच्या सगळ्या हिंदी चित्रपटांतील गाणी माझ्या कडे आहेत. अनेक वेळा त्याची तामिळ गाणी पण मी ऐकतो. त्याचे संगीत एवढे बेधुंद करणारे आहे की भाषेचा कोठेही अडथळा जाणवत नाही.

एवढे सगळे असूनही रहमानने टाईम्स ऑफ इंडीया ह्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत असं म्हंटलं- "This award legitimises our music and the aspirations of hundreds of other musicians." का? असं का? रहमान कडे आजही भारतातले अनेक होतकरू संगीतकार आदर्श म्हणून बघतात. आणि तो आदर्श राहण्यासाठी त्याचे संगीत पुरेसे आहे. त्यासाठी ऑस्कर पारितोषिकाची गरज नाही. आपण आपल्या संगीताला मान्यता मिळण्यासाठी पाश्चात्य देशांकडे बघायची काय गरज आहे? रहमान सारख्या अनेक कलाकारांबद्दल भारतवासीयांना असीम प्रेम आणि आदर वाटतो. पण त्यासाठी ऑस्करची गरज खरचं आहे का? हिन्दुस्तानी, कार्नाटिक संगीत मधले अनेक गायक आणि वादक ऑस्कर न मिळता सुद्धा आम्हाला अत्यंत प्रिय आहेतच ना? चित्रपट संगीत म्हंटलं तर महम्म्द रफ़ी, मुकेश, लता मंगेशकर, इ. कलाकार आम्हाला सध्याच्या पिढीतल्या गायकांपेक्षा अधिक प्रिय आहेत. लतादीदी आणि आशा-ताई (खरं म्हणजे माझ्या मावशी-आत्यांच्या वयाच्या आहेत ह्या दोघी) तर केवळ भारतात नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कलेवर प्रेम करण्यासाठी कु्ठल्याही पाश्चिमात्य पुरस्काराची गरज नव्हती.

असो. रहमानला ऑस्कर मिळाला त्यात आनंद आहे, अभिमान पण आहे, तरीपण असं वाटतं की त्याने हे वक्तव्य करायची गरज नव्हती. कलाकाराच्या गुणांना भारतीय लोकांनी नेहमीच सन्मान दिला आहे, त्यांना आपल्या हृदयात वेगळं स्थान दिलेलं आहे. म्हणूनच पु.ल., ग.दि.मा., सुधीर फडके, महम्मद रफ़ी, इ. कलाकारांना आजही अनेक लोकं आदर्श मानतात आणि त्यांचा सन्मानही करतात.
रहमानचा जय हो, पण....SocialTwist Tell-a-Friend

शनिवार, जानेवारी २४, २००९

देवळातील एक दिवस

गोवा म्हंटलं तर सगळ्यांना आठवतात तिथले समुद्र किनारे, त्यावर वावरणारे परदेशी पर्यटक (विशेष करून स्त्री-पर्यटक) आणि पाण्या एवढी स्वस्त दारू. पण माझ्या साठी गोवा म्हणजे ह्यातलं काही नसतं. माझ्यासाठी गोवा म्हणजे मस्त डोंगरांच्या मधे लपलेलं शांतादुर्गेचं देऊळ, समोर असलेली मारूतीची टेकडी, सकाळचा देवीला सोवळं नेसून केलेला अभिषेक, दुपारी देवीची आरती, त्यानंतर पुरोहितांकडे गरम-गरम अस्सल कोकणी पद्धतीचा आमटी-भात, संध्याकाळी देवळाच्या आवारात निवांतपणे मारलेल्या गप्पा, रात्रीचं कीर्तन आणि आरती आणि आरती नंतर मिळणारा प्रसाद.

शांतादुर्गेच्या देवळातला गाभारा म्हणजे एक छोटी जत्राच असते. तेथील महाजनांचे पुरोहित ठरलेले असल्याने, एक पुरोहित ५-६ जणांना घेऊन देवीच्या अभिषेकला बसतात. देवीचा अभिषेक दोन भागात पार पडतो. पहिल्या भागात गणपती पूजा, संकल्प, इ. केलं जातं. त्यासाठी देवीच्या आसनासमोर खाली बसायला असलेली जागा वापरतात. तदनंतरच्या भागात देवीच्या मूर्तीवर अभिषेक होतो. एका पुरोहितांचे महाजन देवीवर अभिषेक करायला लागले, की दुसरे पुरोहित आणि त्यांचे महाजन गणपतीच्या पूजेला सुरुवात करतात. इथपासून खरा विस्मय सुरू होतो. आता तुम्हाला लक्षात येईल की मी गाभाऱ्याला छोटी जत्रा का म्हंटलं. महाजनांचा एक गट देवीवर अभिषेक करत असतो. त्या गटासाठी त्यांचे पुरोहित मोठ्या आवाजात मंत्र म्हणत असतात. त्याच वेळेस दुसरा गट त्यांच्या पुरोहितां बरोबर खाली गणपती पूजेला बसलेला असतो. त्या गटासाठी त्यांचे पुरोहित गणपती पूजेचे, संकल्प सोडण्याचे इ. मंत्र म्हणत असतात. हे सगळं एकाच वेळी चालू असतं. बरं, त्याच बरोबर इतर पुरोहितांची दुपारच्या आरतीची पण तयारी चालू असते. एवढ्या सगळ्यात त्यांचे आपसातले विषय पण चालू असतात. पण एकाही पुरोहिताचे मंत्र काही चुकत नाहीत.

ह्यावेळेला गेलो होतो, तेव्हा देवळाला रंग देण्याचं काम चालू होतं. एकीकडे विविध पूजांचे मंत्र, दुसरीकडे पुरोहितांचे रंग-काम करणाऱ्या लोकांना सुचना आणि रंग-काम मजुरांची आपसात बडबड, हे सगळं स्वतंत्र रित्या चालू होतं. आणि महाजन वर्ग, एखाद्या आज्ञाकारक पण कंटाळलेल्या विद्यार्थ्याप्रमाणे एकीकडे पुरोहितांचे मंत्र आणि सुचना ऐकत होते आणि दुसरीकडे रंग काम बघत होते.

एवढं सगळं लिहिण्याचे कारण काय? तर असं की पुरोहितांचा एकाग्रपणा बघून मी थक्क झालो. मला गायत्री मंत्र येतं. अगदी झोपेतून उठवून कोणी म्हणायला सांगितलं तरी मी न चुकता म्हणू शकेन. पण तिकडे माझ्या बरोबर पुरोहितांनी गायत्री मंत्र म्हणायला सुरुवात केली की माझी लय जाते आणि मंत्र चुकतो. मग मी त्यांचं मंत्र ऐकून समाधान मानतो. पण हे सगळे पुरोहित एवढ्या सगळ्या गोंगाटात आपले मंत्र न चुकता म्हणतात. वैदिक शिक्षण पद्धतीचा हा परिणाम आहे का? लालखी/पालखी उत्सवाच्या वेळेस तर शंभर-एक लोकांच्या अखंड घाई गर्दीत ते मंत्र आणि पूजा सांगून पालखीची वाट मोकळी करतात. कोण पालखीचे फोटो काढतय, कोण आपसात गप्पा मारतय, पण त्यांना काही फरक पडत नाही. त्यांच्या ह्या एकाग्रतेला साष्टांग वंदन करावसं वाटतं.
देवळातील एक दिवसSocialTwist Tell-a-Friend