मंगळवार, नोव्हेंबर २१, २००६

"आवाज... आवाज": माझा दृष्टीकोन

काही दिवसांपूर्वी पु.लं.चं "आवाज.... आवाज" हा लेख वाचला. अर्थात तो जयवंत दळवींच्या "पु.ल. : एक साठवण" मधे आहे म्हणून. नाहीतर आमच्या पिढीला एवढे जुने लेख वाचायला कुठे मिळणार? असो... लेख वाचता वाचता, मन हळूच जुन्या काळात गेले. जुना म्हणजे त्यावेळेला भारतात संगणक आणायला राजीव गांधींना अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांची परवानगी लागली होती. थोडक्यात काय, मी त्या वेळेला शाळेत जात होतो. कानात लगेच त्या काळचे आवाज घुमू लागले. सकाळी ती चिमण्यांची चिव-चिव, पाववाल्याचा पुंउंउंवांक करणारा हॉर्न, बस-स्टॉप वर गेल्यावर बसचा हॉर्न वाजायची वाट बघणे, वगरे सगळं आठवायला लागलं. या पैकी चिमण्यांची चिव-चिव आणि पाववाल्याचा हॉर्न आयुष्यातुन गायब झाल्यासारखॆ आहे. पुर्वी रिक्षाचे हॉर्न पण पाववाल्याचा हॉर्न सारखे होते, आता रिक्षाचा हॉर्न किररररर करून किर-किर करतो.

काळाच्या रस्त्यावर मन वेगाने धावू लागले. शाळा, कॉलेज पार करत-करत IITला येउन पोहोचले. इथल्या वसतीगृ॒हात पण अनेक आवाजांची सवय लागली होती. उदाहरणार्थ, आमच्या वसतीगृहात परगावुन पालकांचे फोन यायचे, त्यासाठी तीन फोनची सोय होती. रोज संध्याकाळी तिथे फोनपाशी असलेला वॉचमन P.A. system वर घोषणा करायचा- "A-wing room no. 410, external call after two minutes". की मग त्या खोलीत राहणारा, सगळी कामं सोडून फोन घेण्यासाठी पळायचा. हा तो काळ होता, जेव्हा mobile आजच्या सारखे पडीक भावाला उपलब्ध नव्हते. त्यामुळे काही मोजक्या जणांकडेच mobile असायचे. इतर जणं रोज संध्याकाळी जेवण झाल्यावर घरी फोन करायची किव्हा फोनची वाट बघत असायची. ती पण एक मजा असायची.... आपण फोनची वाट बघत असताना दुसऱ्याचा फोन आल्यावर चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे असायचे. ते ही बरोबर आहे. माणूस आपली कामं अर्धवट सोडून आलेला असतो, आणि घरच्यांशी बोलायची उत्सुकता असल्याने अशी क्षणिक निराशा होणे सहाजिक आहे. इथे पु.ल. असते तर त्यांनी एक भन्नाट उपमा दिली असती. पण जाऊदे... ते पु.ल. होते, आम्ही वि.अ. आहोत. वसतीगृहात पाचशेहून अधिक विद्यार्थी, प्रत्येकाच्या फोनची कारणे वेगळी... कुणाला नुसतं बोलायचं असायचं, कुणाला आपल्या यशाचा आनंद घरच्यांबरोबर वाटायचा असतो, कुणाला दु:ख कमीत-कमी बोलुन दाखवाचं असतं. P.A. system वरचा तो आवाज, दिवसातुन एकदा जरी नाही आला, तर चुकल्यासारखं वाटायचं. आपला फोन जरी येणार नसेल, तरी!!

IIT मधलं शिक्षण उरकुन नोकरीला लागलो. एक वर्ष नोकरी केल्यावर IITला परत आलो. सुदैवाने पुर्वीचे वसतीगृह मिळाले. राहायला येउन काही दिवस झाले होते. काही तरी चुकल्या सारखे वाटत होते. लक्षात आले की हल्ली P.A. system वरुन होणाऱ्या घोषणा कमी झाल्या आहेत. मुख्य म्हणजे, तुमचा फोन आलाय, अशी घोषणा कधीच होत नव्हती. असं का व्हावं? लोकांचे पालक एवढे बेफिकिर होणार नाहीत ह्याची खात्री होती. मग घोषणा बंद होण्याचे कारण काय? इथे आधीपासून राहणाऱ्या मित्रांना विचारलं. तेव्हा त्यांनी जे सांगितले, त्यावरुन हा आवाज पण काळाच्या पडद्या आड कायमचा गेला आहे, हे लक्षात आले. ते म्हणाले, हल्ली सगळ्यांकडे mobile असतात, त्यामुळे वसतीगृहाच्या फोन वर कोणाचेही पालक फोन करत नाहीत. त्यामुळे, हल्ली P.A. system वर, वॉचमनचा आवाज बंद झालाय आणि खोल्या-खोल्या मधून mobileच्या विविध प्रकारच्या ringtones ऎकू यायला लागल्या आहेत.

या आठवणीं मधे रमलेलो असताना, मन एकदम भानावर आले. पु.लं.चा लेख संपवून जेवायला गेलो. जेवल्यावर खोलीत आलो. अभ्यास वगरे उरकून झोपायला गेलो... गादीवर पडल्या-पडल्या एक विचार आला... हे जे आवाज आपल्या आयुष्यातुन गेले ते इतरांनी निर्माण केले होते. समजा, आपलाच आवाज गेला, तर काय होइल? छे, कल्पनेने पण मन शहारुन निघाले!! असं झालं तर सगळीच बोंबाबोंब... देवाला म्हंटलं, बाबारे, असं काही होवू देउ नकोस...

पण देवाजीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. काही दिवसातचं तो भयंकर विचार सत्य परिस्तिथीत आला. माझा घसा पूर्ण पणे बसला... एक अक्षर बोलता येत नव्हते. अभिजीत, निखील आणि, स्वानंदच्या सहाय्याने किल्ला लढवीत होतो. आमचे रविवारी दुपारी लागण्याऱ्या मूक-बधिरांच्या बातम्यां सारखे झाले होते. मी इशारे करायचो आणि हे लोकं त्याचं भाषांतर करायचे. देवा, ते तीन दिवस खूप त्रासाचे गेले. मनात बरेच विचार होते, पण सांगता येत नव्ह्ते. अरेरे... पुष्कळ कामं त्यामुळे मागे पडली. चवथ्या दिवशी आवाज आल्यावर, आधी मनसोक्त बोलून घेतले. घरी फोन केला, तिघा मित्रांनी सुटकेच नि:श्वास टाकला, मला पण हायसे वाटले.

काल पुन्हा पु.ल.: एक साठवण पुस्तक हातात घेतले. उरलेलं वाचून काढण्यासाठी. सहज "आवाज.... आवज" ह्या लेखा कडे लक्ष गेले. मनात म्हंटले, एक वेळ इतरांनी निर्माण केलेले आवाज काळाच्या ओघात विलीन झाले तरी चालेल, पण आपला आवाज हा आपल्या बरोबरच कालवश व्हायला पाहिजे. नाहीतर जगणे अजून त्रासदायक आहे.

पु.ल. शेवटी म्हणतात, आयुष्य म्हणजे आवाज, ते संपलं तर शांतताच शांतता. मी त्यात अजून एक जोडू इच्छितो. आयुष्य म्हणजे आपला व इतरांनी निर्माण केलेल्या आवाज. हे दोघं वरण-भाता सारखे आहेत. एका शिवाय दुसऱ्याचा काही उपयोग नाही....
"आवाज... आवाज": माझा दृष्टीकोनSocialTwist Tell-a-Friend