बुधवार, सप्टेंबर २८, २०११

बेजवाबदार पत्रकारिता आणि वृत्तवार्ता

रविवारी रात्री IIT Bombay मधील हॉस्टेल १२, १३ आणि १४ च्या मेस मधे जे जेवण दिलं गेलं त्यामुळे अनेक ह्या तिन्ही हॉस्टेल मधील बहुतांश विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. ह्या जेवणात चायनीज पदार्थ होते. हक्का नुडल्स, वेज फ्राईड राईस, एग फ्राईड राईस आणि (अधिक पैसे भरून) चिकन. मेसच्या मेनू मधे ह्या जेवणाला ’ड्राय डिनर’ अशी नोंद असते. ड्राय डिनर मधील हे पदार्थ थोड्या-फार फरकाने गेली ८ वर्ष आहेत. मेस मधे विष-बाधा होण्याची ही पहिलीच घटना आहे. 

पण ही बातमी मिळताच वृत्तपत्रांनी मात्र त्याची एक खमंग बातमी बनविण्याचे ठरवले. लागलीच बातम्या झळकल्या. बातमीदारकांनी नीटशी शहानिशा करायचे प्रयत्नच केले नाहीत. १-२ मुलांशी बोलून त्यांचा प्रतिक्रिया अशा छापल्या जणू काय गेलं अनेक वर्ष IIT  ह्या मामल्याकडे दुर्लक्ष करत आलं आहे. सकाळने बातमी छापली आहे: 
आयआयटीसारख्या संस्थेत भोजनासारख्या संवेदनशील बाबींमध्ये इतका निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पौष्टिक पद्धतीचे भोजन पुरविण्याऐवजी चायनीज मंच्यूरियनसारखे जंक फूड देण्यात येत असल्याने आयआयटी प्रशासनाने भोजन व्यवस्थेकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असल्याचा आरोप केला जातोय. खासगी कंत्राटदाराऐवजी स्वतःच्याच प्रशासकीय यंत्रणेअंतर्गत आयआयटीमार्फत खानावळ का चालविण्यात येत नाही, विद्यार्थ्यांना भोजन देण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाते का, प्रशिक्षित व कुशल कर्मचाऱ्यांऐवजी सामान्य कर्मचारी खानावळीत का नेमले जातात, असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत. 
हे अत्यंत बेजावदार वृत्त आहे.  मेस मधे पौष्टिक जेवणाची काळजी घेतली जाते. ह्या मेसच्या मेनू मधे कोबी, फ्लॉवर, पालक, पनीर, इ. भाज्या आठवड्यातून एकदा तरी असतात. चायनीज जेवण महिन्यातून एकदाच असते. आणि ह्या साठी सकाळला फार मेहनत सुद्धा घ्यावी लागली नसती. हॉस्टेलच्या संकेत स्थळावरच मेनू उपलब्ध आहे. तेवढे जरी कष्ट घेतले असते, तर वरील बातमीचा भाग अर्धा झाला असता. हा मेनू सुद्धा दर ४-६ महिन्यांनी हॉस्टेल मधील विद्यार्थ्यांच्या संमतीनेच बनवला जातो. ह्या साठी तिन्ही हॉस्टेल मधे Referendum होतं आणि मुलांनी उचलून धरलेल्या पदार्थांनाच मेनू मधे जागा मिळते.  माहिती उपलब्ध असताना सकाळने दिशाभूल केली आहे.

कंत्राट देऊन मेस चालविणे हे गेले ८ वर्षं सुरू आहे. तेव्हा कुठल्याही वृत्तपत्राने वरील प्रश्न का नाही विचारले? IIT तर्फे चालविण्यात येणार्‍या मेस मधे मेसची वेळ संपायच्या अगोदरच जेवण संपलेलं असतं. बरं दर वर्षी कंत्राट बदलताना IIT विद्यार्थ्यांना विचारतं की तुम्हाला कंत्राटी मेस पाहिजे की IITची. दर वर्षी मुलांनी कंत्राटी मेसचा आग्रह धरला आहे. मेस मधील समस्या सोडविण्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी मेस कंत्राटदाराबरोबर मिटींग घेतली जाते. ह्या मिटींग मधे, विद्यार्थी प्रतिनिधी, तिन्ही हॉस्टेलचे वॉर्डन आणि हॉल मॅनेजर उपस्थित असतात. मेस मधील तक्रारींचा आणि अडचणींचा आढावा घेतला जातो आणि दोन्ही बाजूंच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले जातात. आणि कंत्राटदाराने काही हलगर्जीपणा केला असेल, तर त्याचावर दंड ठोकण्यात येतो. हे सगळं सकाळला माहित करून घ्यावसं का नाही वाटलं?

महाराष्ट्र टाईम्सने तर ह्याही पेक्षा सुरस वृत्त छापलं आहे.
या सर्व प्रकाराबाबत 'आयआयटी' प्रशासनाने गुप्तता पाळली असून विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
गुप्तता? हॉस्टेल मधे? हे शक्य तरी आहे का? हॉस्टेल मधे जे-जे काही घडतं ते उघडपणे समोर येतं. बरं, त्यात हॉस्टेल काउंसिल मधे असणारे कुणा-ना-कुणाचे तरी मित्र असतात. त्यामुळे सर्व माहिती हॉस्टेलभर पसरायला वेळ लागत नाही. तर ह्या घटने बाबतीत IITने गुप्तता पाळलीच असेल तर ती वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांपासून. विद्यार्थ्यांना लागलीच सगळी माहिती मिळाली असेल. आणि कसले तणावाचे वातावरण? काळजी नक्कीच असेल. एवढे विद्यार्थी आजारी आहेत म्हंटल्यावर प्रत्येकाला एकामेकाची काळजी असणारच. सगळ्यांचा एखादा तरी मित्र आजारी असेलच. पण तणाव कसला? म.टा. ने तर IITच्या Directorचं नाव सुद्धा नीट छापलं नाहीये. त्यांचं नाव खाखर नसून खखर आहे. हे वृत्त छापण्या साठी किती काळजी घेतली आहे, ते ह्यावरून लक्षात येतं.

मेस मधील खाण्याच्या दर्जा विषयी नेहमीच कुणाची तरी तक्रार असते. २००० हून अधिक मुलं असली की प्रत्येकाला समाधानी ठेवता येत नाही. पण ८ वर्षं आणि ४ कंत्रादार पाहिलेल्या ह्या मेस मधे अशी घटना पहिल्यांदाच घडत आहे. गेल्या ८ वर्षात लक्षावधी जेवणं वाढली आहेत ह्या मेस मधे. येथील अन्न खाऊन स्वत:ची वजनं ३-४ किलो वाढवून हजारो विद्यार्थी बाहेर पडले आहेत. ही घटना निश्चितपणे काळजीची असली तरी असले बेजवाबदार वार्तांकन वृत्तपत्रांनी करू नयेत. ह्यातून काहीही साध्य होणार नाही.

टीप: ह्या मेस बद्दल आणि एकंदरीत तेथील पद्धतीं बद्दल मला माहिती असल्याचे कारण म्हणजे मी २००४-२०११ ह्याच मेस मधे जेवत होतो. मी IIT Bombayचा विद्यार्थी आहे आणि हॉस्टेल १२चा भूतपूर्व रहिवासी.
बेजवाबदार पत्रकारिता आणि वृत्तवार्ताSocialTwist Tell-a-Friend

बुधवार, सप्टेंबर २१, २०११

तुमचा पत्ता काय?

भारतात असताना कुणालाही पत्ता विचारला की एक छोटं पान भर लिहील्या शिवाय पत्ता पूर्ण होत नसे. म्हणजे बघा ना, साधारण पणे एखादा पत्ता असा असतो:
फ्लॅट क्र. ४, न्यू गणेश सोसायटी, सर्व्हे क्र. अ/१२३/ब३०२,
रावसाहेब थोरात कन्या शाळा रस्ता,
पतीत पावन राम मंदीरा जवळ,
फातीमानगर, पुणे - ४११३९२
 आता कसं एकदम पत्ता वाटतो. तरीही, हा पत्ता तुम्हाला पहिल्या झटक्यात मिळेलच ह्याची खात्री नसते. मिळालाच, तर ते तुमचं भाग्य आहे. पत्ता सांगणारा देखील सांगतो, की शाळा नाही कळाली तर थोपटे चौक विचारा, तिथून ५ मिनिटावर शाळेचं वळण आहे. फातीमानगर गाठल्यावर, एका पानाच्या टपरीवर तुम्हाला विचारावच लागेल- "रावसाहेब थोरात कन्या शाळा कुठे आली हो?" बरं त्यातही ह्या शाळेचं स्थानिक नाव वेगळं असू शकतं. ती एकेकाळी पुणे नगरपालिका शाळा क्र. ३२३ सुद्धा असू शकते. त्यामुळे तिचं नाव पालिका शाळा म्हणूनच प्रसिद्ध असतं. नवीन पूर्ण नाव विचारल्यास पानवाल्याला माहित नसण्याची दाट शक्यता असते. मग तुम्ही थोपटे चौक विचारता. ह्या सगळ्या दिव्यातून बाहेर पडून एकदाचं ते वळण सापडतं, ते राम मंदीर दिसतं आणि त्या मागची न्यू गणेश सोसायटी सापडते. 

कट-टू साता समुद्रापलीकडे. इथे कॅनडा मधे आलो, तेव्हा पहिल्यांदा येताना मित्राला त्याचा पत्ता विचारला होता. सुरवातीला त्याचाकडेच रहायची सोय असल्याने त्याचा पत्ता लागणार होता. आणि तुम्ही कॅनडा मधे कुठे रहाणार आहात ह्याची माहिती इमिग्रेशनच्या वेळेस देणे गरजेचे असते. हे देखील गमतीशीरच आहे म्हणा. माणूस नवीन नोकरीच्या अथवा शिक्षणाच्या ठिकाणी येतो. त्यावेळेस तो कुठे रहाणार आहे, ह्याची त्याला कशी कल्पना असेल? तरीही तुम्ही रहाण्याच्या ठिकाणाचा पत्ता द्यायचा असतो. असो, तर विषयांतर घडू न देता, मित्राने कळवले की त्याचा पत्ता खालील प्रमाणे आहे (हा पत्ता काल्पनिक आहे, पण येथील पत्त्यांचे स्वरुप असेच असते)
9803 20th Avenue,
Edmonton, Alberta 
A1B 3C4
त्याला म्हटले, झाला पत्ता? म्हणाला हो, इथे पत्ता असाच असतो. वरील पत्त्याचाअ अर्थ असा, की 98th Street आणि 20th Avenue वरील 3 नंबर क्रमांकाचं घर त्याचं. टॅक्सी वाल्याला हा पत्ता सांगितल्या तो बरोबर आणून सोडेल. किंवा तुमच्या फोनच्या GPS मधे हा पत्ता टाकला तरी तो तुम्हाला तुम्ही आहात तिथून त्या पत्त्या पर्यंतचा मार्ग अचूक दाखवेल. म्हणाला इथे ही गल्ली, तो चौक वगैरे असं पत्त्यात नसतं. म्हटलं अरे हा काय पत्ता झाला? सगळं शहर नुसतं Street आणि Avenue मधे वाटून टाकलं. हे केकचे तुकडे केल्या सारखे आहे. उभे कापले की Street बदलते, आडवे कापले की Avenue. तरी येथील काही Street अगर Avenue ला नावं देखील आहेत. उदाहरणार्थ, Whyte Avenue, University Avenue, Stony Plain Road, इत्यादि. पण हे अपवाद आहेत. इतर वेळीस तुम्ही केवळ एका Street आणि Avenue क्रमांकाचे धनी. दूरभाष कंपन्यांसाठी कसे, तुम्ही केवळ एक क्रमांक म्हणून असता, तसे. त्याला म्हटलं, पत्ता म्हणजे म्हणजे कसा पाहिजे

पाटलाच्या बखरी म्होरं मारुतीच्या देवळाच्या आडाल्ल्या अंगाला, 
मुक्काम हरणगाव, पोष्ट किंकवडी, जिल्हा सातारा.

संदर्भ: माझे पौष्टीक जीवन, लेखक: पु.ल. देशपांडे

मग कसं, कुठे तरी गेल्या सारखं वाटतं.
तुमचा पत्ता काय?SocialTwist Tell-a-Friend

शनिवार, सप्टेंबर १७, २०११

वार लक्षात ठेवण्याची भानगड

हॉस्टेल ला होतो तेव्हा भिंती वर कॅलेंडर असलं तरी ते महिन्याला बदललं जायचं असं क्वचित व्हायचं. हॉस्टेल वर असल्या शुल्लक गोष्टीं कडे फार लक्ष ठेवलं जायचं नाही. पण मग आठवड्याचा वार कसा लक्षात ठेवायचा? कारण त्यावरूनच आज T.A. duty आहे की नाही हे कळायचं. हळू हळू वार लक्षात ठेवायची माझी एक अनोखी पद्धत विकसित झाली. हॉस्टेलच्या मेस मध्ये आज काय मेनू आहे, हे बघून वार ठरवायला जमायला लागले. खरं तर IIT मध्ये वार लक्षात ठेवून फार काही फरक पडणार नव्हता. पण सोमवार आणि गुरुवार च्या दिवशी मांसाहार करायचा नसतो, ह्या कारणाने तरी वार लक्षात ठेवणे गरजेचे होते. 

पण आता IIT सुटलं आणि नशिबी Edmonton (Canada) आलं. इथे सुद्धा दिनचर्या तिकडच्या सारखीच आहे. सुकाली उठून University ला जाणे, आणि संध्याकाळी काम उरकून घरी येणे. पण आता समस्या अशी आहे की वार कसे लक्षात ठेवायचे? कारण घरी कॅलेंडर नेहमी प्रमाणे नाहीच. आणि देश सुटला तरी वार पाळणे सोडले नाही. रोजच्या घर-University-घर ह्या चर्येत दिवसाचं भान कुठे रहातं? आणि आता जेवण स्वतःच बनवावं लागत असल्याने कुठला ही मेनू नाही. जे फ्रीज मध्ये असेल, ते घेऊन भाजी बनवायची आणि भात लावायचा. त्यामुळे ते ही साधन आता हातातून गेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनिवार आणि रविवार लक्षात ठेवणे. कारण ह्या दोन वारीच कपडे धुणे आठवड्याचा बाजार करणे ही कामं होऊ शकतात. पण प्रश्न असा आहे, की हे सगळं लक्षात कसं ठेवायचं? मोबाईल वर बघणे हा एक पर्याय झाला. पण दर वेळी तो हाताशी असेलच असं नाही. त्यामुळे कॅलेंडर घेऊन येणे, ह्या व्यतिरिक्त काही पर्याय नाही असं दिसायला लागलं आहे.
वार लक्षात ठेवण्याची भानगडSocialTwist Tell-a-Friend