बुधवार, सप्टेंबर २८, २०११

बेजवाबदार पत्रकारिता आणि वृत्तवार्ता

रविवारी रात्री IIT Bombay मधील हॉस्टेल १२, १३ आणि १४ च्या मेस मधे जे जेवण दिलं गेलं त्यामुळे अनेक ह्या तिन्ही हॉस्टेल मधील बहुतांश विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. ह्या जेवणात चायनीज पदार्थ होते. हक्का नुडल्स, वेज फ्राईड राईस, एग फ्राईड राईस आणि (अधिक पैसे भरून) चिकन. मेसच्या मेनू मधे ह्या जेवणाला ’ड्राय डिनर’ अशी नोंद असते. ड्राय डिनर मधील हे पदार्थ थोड्या-फार फरकाने गेली ८ वर्ष आहेत. मेस मधे विष-बाधा होण्याची ही पहिलीच घटना आहे. 

पण ही बातमी मिळताच वृत्तपत्रांनी मात्र त्याची एक खमंग बातमी बनविण्याचे ठरवले. लागलीच बातम्या झळकल्या. बातमीदारकांनी नीटशी शहानिशा करायचे प्रयत्नच केले नाहीत. १-२ मुलांशी बोलून त्यांचा प्रतिक्रिया अशा छापल्या जणू काय गेलं अनेक वर्ष IIT  ह्या मामल्याकडे दुर्लक्ष करत आलं आहे. सकाळने बातमी छापली आहे: 
आयआयटीसारख्या संस्थेत भोजनासारख्या संवेदनशील बाबींमध्ये इतका निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पौष्टिक पद्धतीचे भोजन पुरविण्याऐवजी चायनीज मंच्यूरियनसारखे जंक फूड देण्यात येत असल्याने आयआयटी प्रशासनाने भोजन व्यवस्थेकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असल्याचा आरोप केला जातोय. खासगी कंत्राटदाराऐवजी स्वतःच्याच प्रशासकीय यंत्रणेअंतर्गत आयआयटीमार्फत खानावळ का चालविण्यात येत नाही, विद्यार्थ्यांना भोजन देण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाते का, प्रशिक्षित व कुशल कर्मचाऱ्यांऐवजी सामान्य कर्मचारी खानावळीत का नेमले जातात, असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत. 
हे अत्यंत बेजावदार वृत्त आहे.  मेस मधे पौष्टिक जेवणाची काळजी घेतली जाते. ह्या मेसच्या मेनू मधे कोबी, फ्लॉवर, पालक, पनीर, इ. भाज्या आठवड्यातून एकदा तरी असतात. चायनीज जेवण महिन्यातून एकदाच असते. आणि ह्या साठी सकाळला फार मेहनत सुद्धा घ्यावी लागली नसती. हॉस्टेलच्या संकेत स्थळावरच मेनू उपलब्ध आहे. तेवढे जरी कष्ट घेतले असते, तर वरील बातमीचा भाग अर्धा झाला असता. हा मेनू सुद्धा दर ४-६ महिन्यांनी हॉस्टेल मधील विद्यार्थ्यांच्या संमतीनेच बनवला जातो. ह्या साठी तिन्ही हॉस्टेल मधे Referendum होतं आणि मुलांनी उचलून धरलेल्या पदार्थांनाच मेनू मधे जागा मिळते.  माहिती उपलब्ध असताना सकाळने दिशाभूल केली आहे.

कंत्राट देऊन मेस चालविणे हे गेले ८ वर्षं सुरू आहे. तेव्हा कुठल्याही वृत्तपत्राने वरील प्रश्न का नाही विचारले? IIT तर्फे चालविण्यात येणार्‍या मेस मधे मेसची वेळ संपायच्या अगोदरच जेवण संपलेलं असतं. बरं दर वर्षी कंत्राट बदलताना IIT विद्यार्थ्यांना विचारतं की तुम्हाला कंत्राटी मेस पाहिजे की IITची. दर वर्षी मुलांनी कंत्राटी मेसचा आग्रह धरला आहे. मेस मधील समस्या सोडविण्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी मेस कंत्राटदाराबरोबर मिटींग घेतली जाते. ह्या मिटींग मधे, विद्यार्थी प्रतिनिधी, तिन्ही हॉस्टेलचे वॉर्डन आणि हॉल मॅनेजर उपस्थित असतात. मेस मधील तक्रारींचा आणि अडचणींचा आढावा घेतला जातो आणि दोन्ही बाजूंच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले जातात. आणि कंत्राटदाराने काही हलगर्जीपणा केला असेल, तर त्याचावर दंड ठोकण्यात येतो. हे सगळं सकाळला माहित करून घ्यावसं का नाही वाटलं?

महाराष्ट्र टाईम्सने तर ह्याही पेक्षा सुरस वृत्त छापलं आहे.
या सर्व प्रकाराबाबत 'आयआयटी' प्रशासनाने गुप्तता पाळली असून विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
गुप्तता? हॉस्टेल मधे? हे शक्य तरी आहे का? हॉस्टेल मधे जे-जे काही घडतं ते उघडपणे समोर येतं. बरं, त्यात हॉस्टेल काउंसिल मधे असणारे कुणा-ना-कुणाचे तरी मित्र असतात. त्यामुळे सर्व माहिती हॉस्टेलभर पसरायला वेळ लागत नाही. तर ह्या घटने बाबतीत IITने गुप्तता पाळलीच असेल तर ती वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांपासून. विद्यार्थ्यांना लागलीच सगळी माहिती मिळाली असेल. आणि कसले तणावाचे वातावरण? काळजी नक्कीच असेल. एवढे विद्यार्थी आजारी आहेत म्हंटल्यावर प्रत्येकाला एकामेकाची काळजी असणारच. सगळ्यांचा एखादा तरी मित्र आजारी असेलच. पण तणाव कसला? म.टा. ने तर IITच्या Directorचं नाव सुद्धा नीट छापलं नाहीये. त्यांचं नाव खाखर नसून खखर आहे. हे वृत्त छापण्या साठी किती काळजी घेतली आहे, ते ह्यावरून लक्षात येतं.

मेस मधील खाण्याच्या दर्जा विषयी नेहमीच कुणाची तरी तक्रार असते. २००० हून अधिक मुलं असली की प्रत्येकाला समाधानी ठेवता येत नाही. पण ८ वर्षं आणि ४ कंत्रादार पाहिलेल्या ह्या मेस मधे अशी घटना पहिल्यांदाच घडत आहे. गेल्या ८ वर्षात लक्षावधी जेवणं वाढली आहेत ह्या मेस मधे. येथील अन्न खाऊन स्वत:ची वजनं ३-४ किलो वाढवून हजारो विद्यार्थी बाहेर पडले आहेत. ही घटना निश्चितपणे काळजीची असली तरी असले बेजवाबदार वार्तांकन वृत्तपत्रांनी करू नयेत. ह्यातून काहीही साध्य होणार नाही.

टीप: ह्या मेस बद्दल आणि एकंदरीत तेथील पद्धतीं बद्दल मला माहिती असल्याचे कारण म्हणजे मी २००४-२०११ ह्याच मेस मधे जेवत होतो. मी IIT Bombayचा विद्यार्थी आहे आणि हॉस्टेल १२चा भूतपूर्व रहिवासी.
बेजवाबदार पत्रकारिता आणि वृत्तवार्ताSocialTwist Tell-a-Friend

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: