रविवार, एप्रिल १५, २०१२

निवडक मालिका

असं म्हणतात की दूरदर्शनच्या जमान्यात जेव्हा रविवारी सकाळी रामायण किंवा महाभारत लागायचं तेव्हा रस्ते ओस पडलेले असायचे. मुळात लोकं आपली सगळी कामं ह्या दोन मालिकांची वेळ लक्षात घेऊनच ठरवायची. म्हणजे, रविवारी सकाळी चिकन अथवा मासे हे ८:३० च्या आत घरात असायचे. हीच गोष्ट संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या मालिकांची. १००, ब्योमकेश बक्षी, सुरभी, इ. संध्याकाळी ७:०० वाजता कामं अशी हवीत की ती टी.व्ही. समोर बसून करता येतील. तसेच रात्री ९:०० वाजता जेवायला बसले पाहिजे किंवा जेवण उरकले असले पाहिजे. कारण त्यावेळेस मालिका सुरू व्हायच्या.  

नंतर केबलचा  जमाना आला आणि पावसाळ्यात कुत्र्यांचा शेपटा जश्या उगवतात, त्याच प्रमाणे मालिका सुरू झाल्या. देशभर सासवा-सुनांची भांडणे गाजू लागली. प्रत्येक मालिकेत कोण तरी कुणा विरुद्ध कट रचत असायचे. घरातील बायका उंची कपडे आणि दागिने घालून कारस्थाने रचू लागली. त्यामुळेच अनेक सुज्ञ जणांना मालिकांचा कंटाळा आला आणि कामं करण्याची घडी बिघडूनच गेली. कारण आता मालिकाच बघायची नाही, तर कामे कधीही करता येतील!

पण हे दृश्य हल्ली थोडं बदलायला लागलं आहे. झी मराठी वर पहिल्यांदा सा रे ग म प मध्ये Little Champs मुळे थोडी शिस्त आली. त्यानंतर पुन्हा सगळं फिसकटले. पण हल्लीच सुरू झालेल्या 'उंच माझा झोका' आणि 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ह्यामुळे पुन्हा थोडी शिस्त आली. आता कामं उरकून ८:०० वाजता टी. व्ही. समोर बसायचे, ते एका लग्नाची... चा पहिला ब्रेक होई पर्यंत हलायचे नाही. त्या ब्रेक मध्ये जेवण वाढून घ्यायचे आणि जेवायला बसायचे. ह्या २ मालिकांमुळे सगळं कुटुंब एकत्र येतं आणि यमू (रमा)-महादेवराव व राधा-घना च्या सुख-दु:खात सामील होतो. ह्या मालिकांमुळे पुन्हा एकदा कामाची शिस्त आली आहे आणि थकून-भागून घरी आल्यावर चांगले काहीतरी पहावयास मिळेल ही आशा टिकून आहे.
निवडक मालिकाSocialTwist Tell-a-Friend