शुक्रवार, नोव्हेंबर २७, २००९

शांताराम: समीक्षा

हे पुस्तक बाजारात येऊन काही वर्षं झाली आहेत. पण हे माझ्या हाती गेल्या महिन्यातच पडलं. त्यामुळे त्याची ही समीक्षा करण्यास लौकिक दृष्टया उशीर झाला आहे. आणि ही समीक्षा वाचून ग्रेगरी डेविड रॉबर्ट्स ला काहीही फरक पडणार नाही. तरी पण, पुणेकर असल्याने आपल्या मताची पिंकं टाकणं गरजेचं आहे. असो, पुस्तक असो वा नाटक वा सिनेमा, समीक्षेच्या बाबतीत मी अत्यंत टुकार आहे. तस्मात् लोकांनी हे वाचून निराश होऊ नये.

तर आपण सर्व जाणता की शांताराम ही ग्रेगरीची आत्मकथा आहे. त्याने जाहीर रित्या ह्याची कबुली दिल्याचे स्मरत नाही, पण एकंदरीत वाचल्यावर हे लक्षात येतं. साधारण पणे १९८०-१९९२ दरम्यानच्या त्याच्या मुबंईतील कृत्यांची ही कहानी आहे. त्याने ज्या प्रकारे सगळ्या ठिकणांचं आणि घटनांचं विस्तृत वर्णन केलय, त्यावरून हे लक्षात येतं की तो त्यात असल्याशिवाय हे काही होऊ शकत नाही. कोणताही डॉन असंच कुणालाही आपल्या कारवाया सांगणार नाही. तरीपण, शांताराम बद्दल माझं असं मत आहे. कल्पना करा, तुम्ही रोज रात्री झोपायच्या आधी रोजनिशी लिहिता. नित्य नियमाने, न चुकता. त्यात दिवसभराच्या साऱ्या घटनांची तपशीलवार नोंद करता. आणि हा विधि न चुकता १०-१५ वर्षं चालु ठेवता. ह्या कालावधीच्या शेवटी तुम्ही त्या रोजनिशितील मसालेदार किस्से निवडता आणि त्यांना व्यवस्थित पणे जोडता. जिथे जोडता येत नाही, तिथे नवीन चॅप्टर्स बनवता। हे सगळं करून ते छापून आणा. तुमचं शांताराम तयार झालं. अर्थात ते त्या पुस्तका प्रमाणे प्रसिद्ध होण्यासाठी तुम्ही सुद्धा ग्रेगरी सारखं आयुष्य जगलं असलं पाहिजे. ९-५ नोकरी करून आणि सुट्टी असली की दुपारचं निस्त्याचं खाऊन एक मस्तं झोप काढून शांताराम तयार होत नाही. हे पुस्तक आकाराने अर्ध केलं तरी काहीही फरक पडणार नाही. काही ठिकाणी उगाचाची री ओढलेली असल्या सारखी वाटते. पण कुठलाही प्रसंग प्रस्तुत करताना कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही. ज्या मुंबई शहराची घाई प्रसिद्ध आहे, त्या घाईला ह्या पुस्तकात सपेशल बगल देण्यात आली आहे. पण ह्यात एक अत्यंत शरमनाक बाब ही आहे की त्यात त्याने सरकारी व्यवस्थेतील सगळा नाकर्तेपणा उघडा केला आहे. पोलिस आणि अंडर वर्ल्ड मधले संबंध, कस्टम आणि पोलिसांमधली लाचखोरी, वगैरे सविस्तर पणे दिलेली आहे. मुंबईतून खोट्या पासपोर्ट, व्हिसा, नोटा, वगैरेचे धंदे कसे व कुठे चालतात ह्याची तपशीलवार माहिती त्याने दिली आहे. आणि एवढं सगळं असताना आपण अगदी कौतुकाने ग्रेगरी कडे पाहतो. तो आपल्या व्यवस्थेला नागडी करून गेला. जमेची बाजू एवढीच की तो इतर राज्यातून आलेल्या लोकांपेक्षा लवकर मराठी शिकला आणि बोलायला लागला.
शांताराम: समीक्षाSocialTwist Tell-a-Friend