बुधवार, डिसेंबर १०, २००८

शिव वडा विक्रेत्यास पत्र

मित्रहो, तुम्ही शिव वडा बद्दल ऐकले असेलच। नसेल तर गूगल वर शोधा नक्की कळेल

तर, शिव वडा विक्रेत्यास प्रेरणा देण्या साठी हे एक पत्र आहे. काल्पनिक आहे, पण वाचकांनी वाचून आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.

शिव-वडा विक्रेत्यास पत्र**,+

गरम वड्यास आठवावे । जीवित्व तृणवत्‌ मानावें ॥
इहलोकीं परलोकीं रहावें । शिव-वडा रुपें ॥१॥

शिव-वडाचा खप चालिला । म्हणजे कार्यभाग आटोपला ॥
वडा ठायीं ठायीं तुंबला । म्हणजे तोटा ॥२॥

आहे तितुके वडे खपवावें । पुढे आणिक वाढवावें ।
शिव-वडामय करावें । जगा मध्यें ॥३॥

राज्यामधील सकळ लोक । वडा देऊन करावे ग्राहक ॥
लोकांमनी इतर पाक । उपजोचिं नयें ॥४॥

सेनाप्रमुखांचे पाठिंबा देणे । सेनाप्रमुखांचे प्रोत्साहन देणे॥
सेनाप्रमुखांचे उचलून धरणे । शिव-वड्याला ॥५॥

शिव-वड्याची आठवावी चव । शिव-वड्याचा आठवावा ग्राहक-बांधव ॥
शिव-वड्याचा वाढता प्रभाव । भूमंडळी ॥६॥

त्याहून करावे विशेष । तयांसी म्हणावे शिव-वडाधीश ॥
याउपरी विशेष । काय लिहावें ॥७॥


**हे पत्र काल्पनिक असून असं पत्र लिहून कुणाचं मन अथवा भावना दुखवायचा हेतु अजिबात नाही.

+ ह्या पत्राची प्रेरणा समर्थ रामदासांनी संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रातून घेतली आहे.
शिव वडा विक्रेत्यास पत्रSocialTwist Tell-a-Friend

मंगळवार, सप्टेंबर ३०, २००८

सज्जन कोण?

सज्जन कोण? मानव कोण? तो, जो सुशिक्षित आहे (सुशिक्षित = शाळेत अथवा कॉलेजला गेलेला (ली) )? की तो ज्याला भोवतालची जाण आहे आणि जगातल्या प्रत्येक गोष्टीला मान देऊ शकतो? उदाहरणार्थ, मी भा.प्रौ.सं. (मुंबई) (IIT Bombay) च्या छात्रावासात राहतो. आता भा.प्रौ.सं. म्हणजे देशातील विद्वान, विचारवंत मुलं असलेलं ठिकाण. तुम्हाला वाटेल की या ठिकाणी सगळ्यांना नसेल, पण बहुतेक जणांना आपल्या सामाजिक कर्तव्यांची जाणीव असेल. पण, असं तुम्हाला क्वचितच दिसेल. खरं तर ही शर्मेची गोष्ट आहे, पण काय करणार, सत्य आहे.

अगदी सोपं उदाहरण घ्या. छात्रावासाच्या खानावळीत चार वेळेला मुलांना आहार मिळतो (सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, संध्याकाळी पुन्हा नाष्टा आणि रात्री जेवण). आता छात्रावासातलं जेवण. ते काही घरच्या जेवणासारखं चविष्ट नसणार. पण ते अगदी काही टाकाऊ पण नसतं. खानावळीत किती अन्न वाया जातं (म्हणजे जे अन्न मुलं पूर्ण न खाता टाकून देतात ते) हे मोजण्यासाठी एक यंत्रणा आहे. छात्रावासात रोज सरासरी १२५ किलो अन्न वाया जातं. हे वजन सकाळच्या नाष्ट्या पासून रात्रीच्या जेवणापर्यंतच्या अन्नाचं वजन आहे. आता मला बरीच जणं सांगतात की ह्या वजनात अंड्याची टरफलं, शेंगाच्या साली, पिळलेल्या लिंबाच्या फोडी, इ. गोष्टींचं वजन पण येतं. मी तर अगदी ते वजन अर्ध्याने कमी करायला तयार आहे. तरीपण, दिवसा गणिक ६०-७० किलो अन्न वाया घालवणे हे कुठल्या सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे?

बरं जो जेवण टाकतो, त्याला जाब विचारावा, तर तो म्हणतो की जेवण चांगलं झालं नाही म्हणून टाकलं. एकदा झालं, दोनदा झालं, पण रोज काय जेवण एवढं वाईट बनत नाही की ६०-७० किलो वाया जावं. आणि अन्न वाया घालवणारे पण तेच. इतर फार काही वेगळे चेहरे दिसत नाहीत अन्न वाया घालवताना. मग ह्या गोष्टीचा काय अर्थ होतो? की काही ठराविक जणं रोजच्या रोज फार काही कारण नसताना अन्न वाया घालवतात. अनेक चमत्कारिक कारणं ऐकायला मिळतात. एकाने विचारलं की मी जर हे अन्न वाया नाही घालवलं तर काही फायदा होणार आहे का? अरे बाबा, तू जेवणाचे पैसे देतोस, ह्याचा अर्थ असा नाही की तू अन्न वाया घालवू शकतोस. तुला पाहिजे तेवढे जेवण्यास तू मोकळा आहेस. ते स्वातंत्र्य तुझ्या कडून हिरावलेले नाही. मग अन्न वाया घालवण्याची वेळ का येते?

अजून एक कारण असं ऐकायला मिळतं की मुलांना पुन्हा-पुन्हा बॅन-मेरी पाशी जाऊन वाढून घ्यायचा कंटाळा येतो, म्हणून आधीच जास्त वाढून घेतात आणि मग टाकतात. रोज जेउन सुद्धा ह्यांना आपल्या जेवणाचा अंदाज येत नाही? आपण कुठली गोष्ट किती खाऊ शकतो हे कळायला किती दिवस लागतात? आता ही मुलं भारतातल्या एका अग्रमानांकित प्रौद्योगिकी संस्थेतली आहेत. इथल्या मुलांना कौतुकाने "क्रीम ऑफ द नेशन" म्हणून संबोधलं जातं. इथल्या अभियंतांकडून भारताचं तंत्रज्ञान विकसित व्हावं अशी अपेक्षा आहे. ज्यांना आपल्या जेवणाचा अंदाज येत नाही त्यांना तंत्रज्ञान विकास कितपत जमणार?

हाच आहे का आपला सुसंस्कृत समाज? आपल्या भोवताली मुलं कुपोषणाने मरत आहेत, असं असताना, इथे मात्र ६०-७० किलो अन्न दिवसाला वाया घालवायचं आणि वर तोंड करून ते कृत्य कसं चुकीचं नाही आहे अशी विधानं करायची. हीच का आपली संस्कृती? पैसे देऊन मोकळं झालं की वाट्टेल तसं वागयचं आणि आपल्या जवाबदारीचं अजिबात भान नाही ठेवायचं. ह्या चंगळवादाच्या नाही त्या सवयी लागल्या की काय होतं हे वेगळ्याने सांगायची गरज नाहीये. पण एक सुजलाम-सुफलाम भारत पहायचा असेल तर आपण आपली दृष्टी बदलली पाहिजे. अन्न मिळणे हा जसा आपला हक्क आहे, तसचं ते वाया न घालवणे ही आपली जवाबदारी आहे. आणि जवाबदारीची जाणीव असली की एक आदर्श समाज घडवायला कितीसा वेळ लागणार?
सज्जन कोण?SocialTwist Tell-a-Friend

सोमवार, जुलै १४, २००८

पावले चालली अमेरीकेच्या दिशेने

७ ऑगस्ट. हर्षद अमेरीकेला जाणार. महीना पण उरला नाही. पु.लं. चं "अपूर्वाई" कथाकथन आठवलं. हल्ली घरी तशीच परिस्तिथी असते. हे घेतलं का, ते घेतलं का? विमान कंपनीने किती वजन नेण्याची सूट दिली आहे? प्रत्येक वस्तू घेताना, ह्या वस्तूचं किती वजन भरतय असा प्रश्न पडणे आणि विचारणे. गेले दोन महीने ठळक खरेदी झाल्यावर (म्हणजे कपडे, चादरी, पांघरूणं, जेवण बनवण्याची उपकरणं, इ.) आता मजल किरकोळ खरेदी (साबण, पावडर, बूट, बूट-पॉलीश, इ.) पर्यंत पोहोचली आहे, किंबहुना ती पण संपली आहे. आता बाकीच्या गोष्टींची जुळवा-जुळव चालू आहे.
पर्वाच त्याच्याशी फोनवर बोललो. आता त्याला तिथे जाण्याचे वेध लागल्याचे जाणवले. इथून किती डॉलर न्यायचे, कुठला फोन घ्यायचा, प्री-लोडेड कार्ड घ्यायचं की नेहमीचं डेबीट कार्ड न्यायचं? अशा प्रश्नांची उत्तरं मिळवणे चालू आहे. त्याच्याशी बोलताना जाणवलं की आता हा महीन्याभरानंतर जे उड्डाण भरणार, ते थेट आम्हाला दोन वर्षांनी भेटणार. हर्षद, जो एक फोन केल्यावर मला स्टेशनवर घ्यायला यायचा, सकाळी सातच्या डेक्कनला काहीही कुर-कुर न करता यायचा. माझ्या बरोबर वैशालीला, दुर्गाला, सकाळी वेताळ टेकडीवर फिरायला येणारा, सोसायटी मधल्या नवीन घडा-मोडी सांगणारा, आता दोन वर्षं मला भेटणार नाही! आईशी बोलताना हे सगळं आठवलं (आणि थोडं आता लिहीताना).
पाखरं मोठी झाली, दाण्याच्या शोधात निघाली! हर्षद पण मोठा झाल्याचं जाणवायला लागलं. प्रत्येक बाबतीत खर्चं करताना, हे पैसे आपले नसून आपल्या आई-वडीलांचे आहेत, हा विचार करूनच तो ठरवतो. अमेरीकेत स्वत:चा उदर-निर्वाह चालू ठेवण्यासाठी त्याची धडपड चालू आहे. आई-वडीलां कडून पैसे न मागवता आपला अभ्यास पूर्ण करायची त्याची जिद्द बघून थक्क व्ह्यायला होतं. अर्थात सुरवातीच्या एक-दोन महीन्यांपुरता त्याला जे पैसे लागणार, ते आई-बाबा देतीलच. त्याची ही धडपड पाहून मनात एकच इच्छा निर्माण होते- हर्षद, यशस्वी भव!!
पावले चालली अमेरीकेच्या दिशेनेSocialTwist Tell-a-Friend

गुरुवार, जून १९, २००८

गो मुंबई कार्डाचे सत्य

मुंबईच्या बेस्ट उपक्रमाने आणि पश्चिम मध्य उपनगरीय रेल्वेंनी प्रवाशांच्या सोई साठी एक अभिनव योजना जाहिर केली . ह्या योजने अंतर्गत एक pre-paid कार्ड खरेदी करून ते एकच कार्ड रेल्वे अथवा बसचं टिकिट काढण्यासाठी वापरता येतं . ह्या कार्डाला "गो-मुंबई कार्ड" असे नाव देण्यात आले. वृत्तपत्रांमधे ह्या कर्डाची खूप प्रसिद्धी करण्यात आली. ह्या कार्डामुळे मुंबईकरांना प्रवास किती सोयीचा होईल हे सांगण्यात आले. मुख्य म्हणजे तिकिटाच्या रांगेची कटकट मिटणार होती. आणि त्या शिवाय बस मधे टिकिट काढताना सुटे पैशे बाळगायची गरज उरणार नव्हती. रेल्वेचा प्रवास सुरु करताना सुरवातीच्या स्टेशनला असलेल्या स्मार्ट कार्ड रीडर समोर आपले कार्ड धरायाचे . गंताव्याला पोहचल्यावर तिथून बाहेर पडताना पुन्हा एकदा त्या स्टेशन वरच्या स्मार्ट कार्ड समोर धरायाचे. असं केल्यावर आपल्या कार्डातून प्रवास भाड्याची कपात होते. तसेच बसने प्रवास करताना कंडक्टरला आपले गंतव्य सांगितले की तो तेवढे भाड़े आपल्या कार्डातून वजा करणार.

वृत्तपत्रांमधे ह्या कर्डाची खूप प्रसिद्धी करण्यात आली. दादर सारख्या मोठ्या स्टेशनवर ह्या कार्डाची जाहिरात करायला लोकं नेमली. ह्या लोकांनी पत्रकं वाटून प्रवाशांना "गो मुंबई" कार्डा बद्दल माहिती दिली. ह्या कर्डाची प्रसिद्धी फक्त रेल्वे करताना दिसत होती. बेस्ट वाले असलं काही करताना दिसत नव्हते. तरी ह्या कार्डाचे फायदे वाचून मी ते घ्यायचे ठरवले. त्या प्रमाणे बेस्टच्या एका केंद्रावर गेले असता तिथे कळाले की सध्या हे कार्ड फक्त मध्य रेल्वेवर चालतं. पश्चिम रेल्वेने अजून स्मार्ट कार्ड रीडर बसवलेच नाहीयेत. ते बसवायला अजून एक-दोन महीने जातील. शिवाय हे कार्ड बेस्ट मधे फक्त एका मार्गावर वापरता येतं. थोडक्यात म्हणजे, ते कार्ड फक्त पास म्हणून उपयोगी पडतं. ह्या कार्डाचा बेस्ट मधे टिकिट काढण्यासाठी केव्हा पासून उपयोग करता येईल हे बेस्ट मधल्या लोकांना सुद्धा माहित नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी अजून बराच अवकाश आहे.
गो मुंबई कार्डाचे सत्यSocialTwist Tell-a-Friend

सोमवार, मे १९, २००८

दाटला चोहीकडे अंधार

संशोधनाचे सुरुवातीचे दिवस मोठे मजेत गेले. नवीन-नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या गोष्टीं मागचं विज्ञान जाणून घेतल्यावर ते शोध ज्यांनी लावले, त्यांच्या बुद्धी बद्दल एक वेगळाच आदर वाटायचा. म्हणजे अजूनही वाटतो. पण संशोधन कार्यात, केवळ हे सगळं करून चालत नाही. सगळा आधीचा इतिहास वाचल्यावर त्याचा उपयोग कुठे करता येतो का, हे दाखवायचे असते. किंवा त्याचा वापर करून त्यापेक्षा चांगला सिद्धान्त मांडायचा असतो. आपल्या बुद्धीची खरी कस तिथे असते. ह्या कामात केवळ बुद्धी असून चालत नाही. त्याबरोबर ढिगाने संयम लागतो.


कारण, आहे ती सगळी प्रगती लोकांच्या प्रचंड अनुभवातून झालेली असते. ते सर्व अनुभव एक-दीड वर्षात स्वत: समजून मग त्यातील उणे काय आहेत हे काढून, किंवा ह्या क्षेत्रात अजून काय करता येईल हे सांगता येणे खूप कठीण असते. कधी-कधी आहे ते समजायलाच खूप वेळ लागतो. ते आत्मसात करून मग स्वत: त्यावर विचार करून आपल्या संशोधनासाठी काय करता येईल हे सांगायला अजूनच वेळ जातो. त्यातून आजू-बाजूला इतर लोकांचे काम बघून वाटते की आपण खूपच मागे आहोत. अशा वेळेस मन खूप उदास होते. पुष्कळ वेळा असं वाटतं की संशोधन सोडून द्यावं, आणि दुसरं काहीतरी करावं. पण मग, त्या दुसरं काहीतरी मधे असच होणार नाही, हे कशावरून? आणि संशोधन जरा अजून थोडे दिवस चालू ठेवलं तर मार्ग दिसेल, ही एक भोळी अशा असते मनाला.

ह्या काळात शिक्षणेतर कुठलाही कार्यक्रम हाती घेतला, तरी असं वाटतं की आपण वेळ फुकट घालवतोय. मला छायाचित्रीकरणाची हौस आहे, पण सध्या असं वाटतं की उगाच वेळ घालवतोय. मध्यंतरी पोहण्याचा कॅम्प लावला होता. तिथे जाताना सुद्धा वाटायचं की उगाच चाललोय, ह्यापेक्षा अभ्यास केला तर काहीतरी दिशा सापडेल. मनात सारखा एकच विचार- आपल्याला संशोधनाची दिशा कधी आणि कशी सापडणार? पण अशाने अभ्यास सुद्धा नीट होईना. त्यामुळे अजूनच मन खचत होतं.


पण एके दिवशी विचार केला की सारखं चिंतन करण्यात काही अर्थ नाही. आता आपल्याला रुचेल ते वाचायचं. आणि त्या वाचनातच संशोधनाची दिशा शोधायची. त्यानुसार कामाला सुरुवात केलेली आहे. काम निर्विघ्नपणे करता यावं ह्यासाठी सगळ्या सार्वजनिक कामांतून माघार घेतली. ही कां आता इतरांवर सोपवली. शिक्षणेतर बाकी कामं चालू ठेवली आहेत. तरी एक-दोन अडचणी आहेतच. त्यातून स्वत:च बाहेर पडलं पाहिजे. त्यासाठी सध्या प्रयत्न चालू आहेत. बघूया त्या प्रयत्नांना यश मिळतं का?
दाटला चोहीकडे अंधारSocialTwist Tell-a-Friend

गुरुवार, मे ०८, २००८

गेली भिती सारी

तसं पोहायला मला लहानपणापासूनच येतं. पण ते पोहणं म्हणजे नुसतं पोहणं होतं. त्याला फार काही तंत्र नव्हतं. नुसतं आपलं तरंगायचं आणि पाण्यात पुढे सरकत रहायचे. त्यामुळे एकतर वेग येत नव्हता आणि दुसरं म्हणजे कधीही पोहून झाल्यावर व्यायाम झाल्या सारखे वाटत नव्हते. म्हणूनच IIT मधे Intermediate camp ची घोषणा झाल्यावर त्यात सहभागी होण्याचं मी आणि स्वानन्द ने निश्चित केले. पहिल्या दिवशी रेड्डी सरांना कॅम्पला येण्या संबंधी विचारले. सर म्हणाले की १ कि.मी. पोहता आले तरच तुम्हाला कॅम्प मधे सहभागी होता येईल. झाली ना पंचाईत! या आधी पोहायचो, पण १ कि.मी.? कधीच नाही. फार तर फार ०.५ कि.मी. पोहलो होतो. आणि ते झाल्यावर खोली वर येऊन आडवा झालो होतो. तरी पण स्वानन्दच्या सांगण्यावरून पाण्यात उतरलो.

आमच्या बरोबर त्या कॅम्पला इयत्ता ३री ते साधारण ७वी ची मुलं होती. ती पोहण्यात इतकी तरबेज होती की मला ओशाळल्या सारखं झालं. मग ठरवलं की आता पीछे हाट नाही. पोहूनच दाखवायचं. रेड्डी सरांना आधी कल्पना दिली की पोहणे सुमार आहे, त्यामुळे थोडं गडबड होऊ शकते. पण सरांनीच मला प्रोत्साहन दिलं. म्हणाले की हरकत नाही. तू जर प्रयत्न केलास तर होईल.

मग काय, उतरलो आणि लागलो पोहायला. हळू-हळू करत धापा टाकत जवळ-जवळ ०.७५ कि.मी. पोहलो. सर म्हणाले चालेल. उद्या पासून यायला हरकत नाही. एक परीक्षा पार झाली! पुढचे १५ दिवस आता खडतर तपश्चर्येचे आहेत. पण अजिबात तंत्र-शुद्ध पोहणे येत नसताना मला एवढे पोहता आले हे पाहून माझा आत्मविश्वास एकदम वाढला. पोहण्या बद्दलची जी माझी भिती होती ती पूर्ण पणे नाहीशी झाली. आता १५ दिवसांनी काय होते ते बघू.

गेली भिती सारीSocialTwist Tell-a-Friend

गुरुवार, मे ०१, २००८

मामलेदाराची मिसळ

परीक्षा संपली!!! नेहमी पेक्षा अवघड गेली. पण ती संपल्याचा आनन्द साजरा करायचा होता. किंबहुना, ती कठीण गेल्याचे दुःख बुडवायचे होते. मग काय, सुशांतशी जी-टॉक वर चॅटींग झाले आणि ठरवले.... तुम्हाला काय वाटते, की गम का साथी रम? नाही.... बरेच दिवस आम्ही ठाण्यातल्या प्रसिद्ध मिसळवाल्या बद्द्ल ऐकत होतो. आणि ते बरेच दिवस तिथे न जाण्याचे एक कारण म्हणजे आम्ही त्याची ख्याती ऐकून घाबरत होतो... आम्हाला असं सांगाण्यात आलं होतं की त्याच्या मिसलीचा पहिला घास घेतल्या पासून नाका-तोंडातून पाणी वहायला सुरवात होते. पण गेल्या सोमवारी अभिजीत, सुशांत आणि मी हिम्मत करून गेलो.

राम-राणा जन्मला ती तळतळीत दुपारची वेळ होती (हा डायलॉग पु.लं.चा आहे, हे ठाऊक आहे मला). आम्ही मजल-दर-मजल करत एकदाचे त्या मामलेदाराच्या मिसळीच्या केन्द्रावर पोहोचलो. तिकडे पार रामच्या शेंडी पासून मारुतीच्या शेपटा पर्यंत रांग (हा पण डायलॉग पु.लं.चा आहे). आम्ही धीर करून रांगेत उभे राहीलो. रांग सांभाळयाला एक माणूस असल्याने मधे घुसणे कुणाला शक्य नव्हते. पाच मिनिटातच बाक-देवता आमच्यावर प्रसन्न झाली. बाकावर आम्ही तिघेही विराजमान होताच क्षणी, ऑर्डर सोडली- ३ मिसळ-पाव आणि ३ ताक. मिसळ आली आणि आम्ही तिच्या कडे २ क्षण नुसते बघत होतो. इतक्या दिवसांची उरात बाळगलेली इच्छा आज पूर्ण होत होती. लाल मिर्चीच्या रंगाने उजळून निघालेली ती तर्री, फरसाणाला पूर्ण पणे आपल्या रंगाचे करून आम्हाला आव्हान देत होती- असेल हिम्मत तर खाऊन दाखव. मग काय, पोटात कावळे ओरडत होतेच. आम्ही पण पावाचा तुकडा मोडला आणि तो तुकडा मिसळीत बुचकळला. पहिला घास.... जरा जपूनच... काय आहे, अगदी सचीन तेंडुलकर सुद्धा मॅग्राचा पहिला बॉल जपूनच खेळतो. त्या मिसळीच्या तिखटपणाची एवढी ख्याती ऐकली होती म्हणून पहिला घास घेताना जरा घाबरलो होतो.

पण पहिला घासा नंतर आम्ही सावरलो. मिसळ एवढी काय तिखट नव्हती. मिसळचं आम्हाला सांगितलेले वर्णन म्हणजे पर्थ टेस्टच्या आधी केलेल्या शॉन टेटच्या वर्णना सारखे होते. त्यानंतर शॉन टेटचा समाचार आपल्या फलंदाजांनी ज्या प्रकारे घेतला, त्याच प्रकारे आम्ही मिसळीचा घेतला. मधे-मधे ताकाचा आस्वाद घेत होतो. पहिली वेळ असल्याने थोडी सावधगिरी बाळगलेली बरी असते.

अखेरचा पावाचा तुकडा मिसळीत बुडवून खाताना आमच्या सगळ्यांच्या मुखावर एक वेगळेच तृप्तीचे भाव होते. इतके दिवसाची इच्छा अखेर पूर्ण झाली होती. तिथून बाहेर पडताना ह्या पंढरीची वारी जमेल तेवढ्या वेळा करायची असे ठरवूनच आम्ही निघालो.

मामलेदाराची मिसळSocialTwist Tell-a-Friend