सोमवार, मे १९, २००८

दाटला चोहीकडे अंधार

संशोधनाचे सुरुवातीचे दिवस मोठे मजेत गेले. नवीन-नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या गोष्टीं मागचं विज्ञान जाणून घेतल्यावर ते शोध ज्यांनी लावले, त्यांच्या बुद्धी बद्दल एक वेगळाच आदर वाटायचा. म्हणजे अजूनही वाटतो. पण संशोधन कार्यात, केवळ हे सगळं करून चालत नाही. सगळा आधीचा इतिहास वाचल्यावर त्याचा उपयोग कुठे करता येतो का, हे दाखवायचे असते. किंवा त्याचा वापर करून त्यापेक्षा चांगला सिद्धान्त मांडायचा असतो. आपल्या बुद्धीची खरी कस तिथे असते. ह्या कामात केवळ बुद्धी असून चालत नाही. त्याबरोबर ढिगाने संयम लागतो.


कारण, आहे ती सगळी प्रगती लोकांच्या प्रचंड अनुभवातून झालेली असते. ते सर्व अनुभव एक-दीड वर्षात स्वत: समजून मग त्यातील उणे काय आहेत हे काढून, किंवा ह्या क्षेत्रात अजून काय करता येईल हे सांगता येणे खूप कठीण असते. कधी-कधी आहे ते समजायलाच खूप वेळ लागतो. ते आत्मसात करून मग स्वत: त्यावर विचार करून आपल्या संशोधनासाठी काय करता येईल हे सांगायला अजूनच वेळ जातो. त्यातून आजू-बाजूला इतर लोकांचे काम बघून वाटते की आपण खूपच मागे आहोत. अशा वेळेस मन खूप उदास होते. पुष्कळ वेळा असं वाटतं की संशोधन सोडून द्यावं, आणि दुसरं काहीतरी करावं. पण मग, त्या दुसरं काहीतरी मधे असच होणार नाही, हे कशावरून? आणि संशोधन जरा अजून थोडे दिवस चालू ठेवलं तर मार्ग दिसेल, ही एक भोळी अशा असते मनाला.

ह्या काळात शिक्षणेतर कुठलाही कार्यक्रम हाती घेतला, तरी असं वाटतं की आपण वेळ फुकट घालवतोय. मला छायाचित्रीकरणाची हौस आहे, पण सध्या असं वाटतं की उगाच वेळ घालवतोय. मध्यंतरी पोहण्याचा कॅम्प लावला होता. तिथे जाताना सुद्धा वाटायचं की उगाच चाललोय, ह्यापेक्षा अभ्यास केला तर काहीतरी दिशा सापडेल. मनात सारखा एकच विचार- आपल्याला संशोधनाची दिशा कधी आणि कशी सापडणार? पण अशाने अभ्यास सुद्धा नीट होईना. त्यामुळे अजूनच मन खचत होतं.


पण एके दिवशी विचार केला की सारखं चिंतन करण्यात काही अर्थ नाही. आता आपल्याला रुचेल ते वाचायचं. आणि त्या वाचनातच संशोधनाची दिशा शोधायची. त्यानुसार कामाला सुरुवात केलेली आहे. काम निर्विघ्नपणे करता यावं ह्यासाठी सगळ्या सार्वजनिक कामांतून माघार घेतली. ही कां आता इतरांवर सोपवली. शिक्षणेतर बाकी कामं चालू ठेवली आहेत. तरी एक-दोन अडचणी आहेतच. त्यातून स्वत:च बाहेर पडलं पाहिजे. त्यासाठी सध्या प्रयत्न चालू आहेत. बघूया त्या प्रयत्नांना यश मिळतं का?
दाटला चोहीकडे अंधारSocialTwist Tell-a-Friend

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

NOt able to read in Firefox. Pls correct this.