रविवार, एप्रिल २६, २००९

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय: नक्की पहा

आता पर्यंत तुम्ही मी शिवाजी राजे भोसले बोलतोय च्या बर्‍याच समीक्षा वाचल्या असतील. म्हणूनच ही समीक्षा नसून एक प्रोत्साहन आहे. तुम्हाला हा सिनेमा बघण्यासाठीचं. हा सिनेमा जरूर बघा. कारण महाराजांचे बोल कुणीही दुर्लक्षित करू शकत नाही. ह्या सिनेमा मधे, महाराजांनी केलेला उपदेश अमुल्य आहे. तो केवळ मराठी माणसाला लागू होत नसून स्वाभिमानाने जगू इच्छिणार्‍या प्रत्येकासाठी आहे.

ह्या सिनेमात उगीचच "मराठी संस्कृतीचं" उदो-उदो केलं जात नाही. मधू सप्रे, विदिशा पावटे, मुग्धा गोडसे, ह्यांचं कौतुक दादा फाळके, आशुतोष गोवारीकर, अनिक काकोडकर, इ. एवढेच केले आहे. म्हणजे, मराठी माणूस जसा pioneer आहे, तसा आधुनिक पण आहे. ह्या सिनेमातील नायक आपल्या मुलीला उगाचच मध्यम वर्गीय संस्कृतीच्या नावा खाली सिनेमात भाग घेण्यापासून रोखत नाही.

दुसरं म्हणजे शिवाजी महाराजांचं दिनकरराव भोसलें बरोबर संभाषण. त्यातले काही संवाद जिव्हारी लागतात. उदाहरणार्थ: "स्वराज्याचे तोरण फुल-बाजारात विकत मिळत नाही. त्या साठी युद्ध करावं लागतं, प्राणांची आहुती द्यावी लागते." अजून एक: "आमची कुठेही शाखा नाही अशी पाटी लावता. ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्याचा अभिमान बाळगता", अशी मराठी हॉटेल-खानावळी चालवणार्‍यांवर टीका, खरीच पटते.

तिसरं म्हणजे मकरंद अनासपुरेचं कॉमिक टाईमिंग आणि संवाद. "केसभर गजरा आणि गावभर नजरा". ह्या व्यतिरिक्त, ह्या सिनेमात समाजातल्या अनेक समस्या दाखवल्या आहेत. उदाहरणार्थ, बांधकाम व्यावसायिक आणि महानगर पालिकेतील कर्मचार्‍यांची जुगलबंदी, त्यातून होणारा सामान्य माणसाला त्रास. शिक्षण सम्राटांची मनमानी आणि जीव घेण्या स्पर्धेमुळे अर्ध्या टक्क्याने मार्क कमी झाल्याने पाहिजे त्या ठिकाणी प्रवेश न मिळणे.

एकूणच हा सिनेमा पाहिला तर एवढे लक्षात येतं की स्वाभिमानाने जगायचं असेल तर त्यासाठी लढावं लागणार. कारण आजच्या परिस्थितीला आपला नाकर्तेपणाच जवाबदार आहे. शिवाजी जन्माला यावा आणि तो सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरात.
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय: नक्की पहाSocialTwist Tell-a-Friend

शुक्रवार, एप्रिल २४, २००९

घरगुती अपूर्वाई-भाग २

ह्या लेखाचा पुर्वार्ध येथे वाचायला मिळेल.
अमेरीकी दूतावासाच्या बाहेरचं दृश्य म्हणजे एक जत्राच असते. अनेक व्हिसाभिलाषी आणि त्यांचे नातेवाईक तिथे जमलेले असतात. आंत जाणारे असतात, त्यांना शुभेच्छा देताना बघावं. उमेदवार तरुण अथवा घरातला धाकटा असेल, तर तो मोठ्यांच्या पाय पडून त्यांचे आशिर्वाद घेतो. थोरले, धाकट्यांच्या शुभेच्छा घेऊन आंत शिरतात. हे शुभेच्छा आणि आशिर्वाद अशा प्रकारे दिले जातात, जणू काही ही उमेदवाराची सरो-की-मरो करणारी मुलाखत आहे. आंत जाणार्‍या लोकांच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा उत्साह असतो, एक उत्सुकता असते. ह्या द्राविडी-प्राणायामातून बाहेर पडल्यावर स्वप्नांच्या देशात (?) जायला मिळणार आहे. बरं, ही उमेदवार मंडळी आंत गेली की बाहेर उभ्या असलेल्या नातेवाईकांकडे वाट बघणे, ह्या शिवाय काही पर्याय नसतो. व्हिसाचं काम संपायला जवळ-जवळ २-३ तास लागतात. मी पण आई-बाबांची वाट बघत त्या दूतावासाच्या समोरच्या पदपथावर बसलो होतो.

सवयी प्रमाणे, माझं इकडे-तिकडे बघण्यात टाईम-पास चालू झाला. लोकं आपला वेळ घालवण्यासाठी काय-काय आणतात. सगळ्यात सोपं म्हणजे वर्तमान पत्र. पण इतरही बरेच टाईम-पास असतात, हे तिकडे गेल्यावर कळतं. मला वाटायचं की एका माणसाच्या व्हिसाला एवढी २-३ माणसं कशाला? पण ते खूप उपयोगी पडतात, अशा वेळेस. एका कुटुंबातली २-३ माणसं असतात. उमेदवार आंत गेला, की बरोबर आणलेली एक चादर त्या पदपथावर पसरतात आणि गप्पा कुटायला सुरवात! ते थेट उमेदवार मुलाखत संपवून येई पर्यंत. सोबत, आपण जणू काय सहलीला आलोय ह्या थाटात खायला-प्यायला अनेक पदार्थही घेऊन येतात आणि तोंडाचा हा व्यायाम पण चालू करतात. काही चतुर जणांनी आजू-बाजूची हॉटेल टंचाई लक्षात घेऊन तिकडेच खाण्या-पिण्याच्या (कदाचित बेकायदेशीर) टपर्‍या टाकल्या आहेत. एक सॅण्डविच वाला, एक चणे-शेंगदाणे वाला, एक कुल्फीवाला, एक पाणी वाला असे काही जणं तिथे आपला धंदा चालवतात. आणि त्यांचा धंदा चांगला चालतो.

जसा-जसा वेळ पुढे जातो, तसे-तसे एक-एक उमेदवार आपापल्या मुलाखती संपवून बाहेर निघतात. अनेकांच्या चेहर्‍यावर आनन्द असतो, तर काहींच्या चेहर्‍यांवर निराशा. ज्यांना व्हिसा मिळतो ते असा काही जल्लोष करतात जणू त्यांनी विश्व-करंडक जिंकलाय. बोर्डात मार्कं पडले असते, तरीही त्यांना एवढा आनन्द झाला नसता. रस्त्या पलीकडचे त्यांचे नातेवाईक पण ह्या जल्लोषात सामील होतात. आपल्याकडे कसं, भारतीय संघ टी-२० विश्व-करंडक जिंकून आला, तेव्हा त्या संघापेक्षा जास्ती आनन्द त्यांच्या चाहत्यांना झाला, तसं हे दृश्य असतं. म्हणजे संघ यायच्या आधीच जल्लोष चालू. तिथे नुसत्या उमेदवाराच्या चालीवरून लक्षात येतं की त्याला/तिला व्हिसा मिळाला आहे की नाही. "मिल गया" चा नुसता जय-घोष चालू होतो. तो (ती) आला(ली) की "काय मग पार्टी कधी?" पासून "काय प्रश्न विचारले? तू काय उत्तरं दिलीस?" वगैरे.

ह्या उलट व्हिसा नाकारलेला(ली) उमेदवार, आपले खांदे टाकून परत येताना दिसतो(ते). त्याला/तिला पाहताच, नातेवाईकांच्यात चर्चा सुरू, "काय झालं असेल?" तो/ती आला(ली) की प्रश्नांचा भडीमार. काय झालं? कशामुळे नाकारला? कोण होता मुलाखत घेणारा? ह्या शेवटच्या प्रश्नाचं बर्‍याच वेळा एकच उत्तर असतं. "हां तो, त्याचा बद्दल ऐकलं आहे. त्याचा कडे व्हिसा गेला की समजायचं. त्याने बर्‍याच लोकांचा व्हिसा नाकारलाय." त्यातले काही जणं मग म्हणतात, "जाऊ दे रे(गं) पुन्हा अर्ज करू."

ह्या अशा प्रकारचे जयघोष आणि शोक पाहून पदपथावर वाट बघत असलेला ह्याच विचारात मग्न असतो- "माझा नातेवाईक बाहेर आला की जल्लोष होणार की ऑक्टोबर अटेम्प्ट मारावा लागणार?" करमणूकीचं हे एक साधन आहे. नाहीतर कानाला एमपी-३ प्लेयर लावून एकदाचं जगाच्या वेगळं होऊन जाणे. तिसरा पर्याय म्हणजे, "नेमका मीच मिळालो होतो का ह्यांना" असा विचार करत आत वातानूकुलित हवेत बसलेल्या आपल्या नातेवाईकांच्या नावाने, ब्रीच-कॅन्डीच्या त्या उन्हात, शंख करायचा.

ह्या अशा प्रकारच्या विविध रंग आणि भावना दाखवणार्‍या व्हिसा मुलाखतीचा खेळ बघत असतानाच, रस्त्या पलीकडून आई-बाबा येताना दिसले. ह्यांचं काय झालं असा विचार येता-क्षणी तिकडून आई ने मोठं हास्य करून, मान डोलावली त्या वेळेला मी पण मनात म्हण्टलं "मिल गया!!!"
घरगुती अपूर्वाई-भाग २SocialTwist Tell-a-Friend

सोमवार, एप्रिल १३, २००९

दिन का शुभारम्भ

उन्हाळ्याच्या दिवसातही सकाळच्या हवेत किंचीत गारवा,
सकाळी चांगलं अर्धा तास झालेलं पोहणं,
त्यानंतर खाल्लेले गरमागरम पोहे ,
आणि पोह्यांचा सोबतीला चहा गरम ,
ह्याहून सुंदर नसेल, दिन का शुभारंभ
दिन का शुभारम्भSocialTwist Tell-a-Friend

बुधवार, एप्रिल ०८, २००९

घरगुती अपूर्वाई - भाग १

कुठलाही परदेश प्रवास म्हणजे एक मजाच असते. मला अजून एकदाही परदेश प्रवासाचा योग आला नाही, पण इतरांच्या प्रवासाची तयारी बघण्याची संधी अनेक वेळा मिळाली आहे. जर तुम्ही कार्यालया तर्फे कामानिमित्त परदेशी जाणार असाल, तर मग अनेक गोष्टीं मधून सुटका होते, पण जर तुम्ही स्वत:च सगळी तयारी करणार असाल, तर मग काय महाराजा!! केवळ तिकीटे हातात येई पर्यंत काय-काय करावं लागतं. माझा भाऊ अमेरीकेला राहतो. त्याला आईची आठवण आल्याने, त्याने आईला तिकडे बोलावले. घरी सुरू असलेल्या ह्या अपूर्वाईची एक छोटीशी झलक.

परदेश प्रवासाचा नुसता विचार जरी केला तरी पहिल्यांदा काय लागतो, तर व्हिसा. व्हिसा कुठल्या प्रकारचा घ्यायचा इथपासून सुरुवात. म्हणजे तुम्ही तिथे कामानिमित्त जाताय, की नुसतं फिरायला जाताय, कुणाकडे जाताय, वगैरे अनेक प्रश्नांची उत्तरं स्वत:च स्वत:शी ठरवल्यावर व्हिसा बद्दल चौकशी चालू होते. त्यात अनेक देशांचे अनेक नखरे. प्रत्येकाच्या नाना प्रकारच्या मागण्या. त्यात तुम्हाला अमेरीका किंव्हा ब्रिटनला जायचे असेल, तर बघायलाच नको. स्वत:च्या लग्नासाठी आपण जेवढी आणि आपली जेवढी चौकशी केली नसेल तेवढी ह्या देशांचे व्हिसाचे फॉर्म आणि व्हिसा अधिकारी करतात. पार अगदी तुमचं बालवाडीतलं शिक्षण कुठे झालं इथपासून तुमच्या मुलाचं शिक्षण कुठे चालू आहे, इथपर्यंत. शंभर प्रकारचे कागद-पत्र, जन्माचा दाखला, शिक्षणाचे प्रमाणपत्र, नोकरी, तुमची आणि मुलांची, त्यांना वाटल्यास पार आजोबा-पणजोबांची पण. इकडे कोण राहतं, तिकडे कोण राहतं, इथला काय करतो, तिथला काय करतो, वगैरे-वगैरे.

अमेरीकेच्या व्हिसाची मुलाखत म्हणजे नोकरीच्या मुलाखतीपेक्षा बिकट. काय-काय घेऊन जावं लागतं. व्हिसाची तारीख मिळवणे ही सुद्धा एक कसरत असते. इंटरनेटमुळे हल्ली सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. आई-बाबा दोघांचा व्हिसा काढायचा होता. मावशीने एक ओळखीची एजन्ट सांगितली. एजन्ट वगैरे असले की आमच्या आईला अगदी प्रल्हादाला स्वयं भगवान विष्णु भेटल्यासारखा आनंद होतो. आता आपलं काहीही बिघडू शकणार नाही असं तिला वाटतं. तर ह्या एजन्ट बाईंनी शंभर कागद आणायला सांगितले. त्यातले अर्धे परत करून उरलेल्याची एक "फाईल" बनवून दिली. आईची वेगळी फाईल, बाबांची वेगळी. का, ते माहित नाही. तिनेच आई-बाबांसाठी व्हिसाचे शुल्क भरले आणि 'मुलाखतीची' तारीख घेतली.

व्हिसा मुलाखतीची तारीख आली. अमेरीकेच्या व्हिसा कार्यालयात जायचे होते. तिकडे आत मधे काहीही नेता येत नाही. फक्त तुमचे कागद-पत्राची फाईल आणि पाकिट. म्हणून बरीच लोकं आपल्या नातेवाईकाला घेऊन जातात. हे नातेवाईक बिचारे, रस्त्याच्या पलीकडे उन्हा-तान्हाचे, उमेदवारांचं सामान घेऊन उभे किंवा बसलेले असतात. आपल्या अथवा अमेरीकेच्या सरकारने ह्यांचा साठी काही सोय केली तर किती बरं होईल. पण नाही, तसं होणार नाही, कारण अमेरीकेला दहशतवादी हल्ल्याची भिती असल्याने त्यांचा दूतावासाच्या आजू-बाजूला काहीही असता कामा नये असा अलिखित नियम आहे. आणि म्हणूनच ते दूतावासाच्या आंत फार काही नेऊ देत नाहीत. असचं त्या दिवशी मी आई-बाबांचे दूतावासाला मान्य नसलेले सामान घेऊन उभा होतो.
घरगुती अपूर्वाई - भाग १SocialTwist Tell-a-Friend