बुधवार, एप्रिल ०८, २००९

घरगुती अपूर्वाई - भाग १

कुठलाही परदेश प्रवास म्हणजे एक मजाच असते. मला अजून एकदाही परदेश प्रवासाचा योग आला नाही, पण इतरांच्या प्रवासाची तयारी बघण्याची संधी अनेक वेळा मिळाली आहे. जर तुम्ही कार्यालया तर्फे कामानिमित्त परदेशी जाणार असाल, तर मग अनेक गोष्टीं मधून सुटका होते, पण जर तुम्ही स्वत:च सगळी तयारी करणार असाल, तर मग काय महाराजा!! केवळ तिकीटे हातात येई पर्यंत काय-काय करावं लागतं. माझा भाऊ अमेरीकेला राहतो. त्याला आईची आठवण आल्याने, त्याने आईला तिकडे बोलावले. घरी सुरू असलेल्या ह्या अपूर्वाईची एक छोटीशी झलक.

परदेश प्रवासाचा नुसता विचार जरी केला तरी पहिल्यांदा काय लागतो, तर व्हिसा. व्हिसा कुठल्या प्रकारचा घ्यायचा इथपासून सुरुवात. म्हणजे तुम्ही तिथे कामानिमित्त जाताय, की नुसतं फिरायला जाताय, कुणाकडे जाताय, वगैरे अनेक प्रश्नांची उत्तरं स्वत:च स्वत:शी ठरवल्यावर व्हिसा बद्दल चौकशी चालू होते. त्यात अनेक देशांचे अनेक नखरे. प्रत्येकाच्या नाना प्रकारच्या मागण्या. त्यात तुम्हाला अमेरीका किंव्हा ब्रिटनला जायचे असेल, तर बघायलाच नको. स्वत:च्या लग्नासाठी आपण जेवढी आणि आपली जेवढी चौकशी केली नसेल तेवढी ह्या देशांचे व्हिसाचे फॉर्म आणि व्हिसा अधिकारी करतात. पार अगदी तुमचं बालवाडीतलं शिक्षण कुठे झालं इथपासून तुमच्या मुलाचं शिक्षण कुठे चालू आहे, इथपर्यंत. शंभर प्रकारचे कागद-पत्र, जन्माचा दाखला, शिक्षणाचे प्रमाणपत्र, नोकरी, तुमची आणि मुलांची, त्यांना वाटल्यास पार आजोबा-पणजोबांची पण. इकडे कोण राहतं, तिकडे कोण राहतं, इथला काय करतो, तिथला काय करतो, वगैरे-वगैरे.

अमेरीकेच्या व्हिसाची मुलाखत म्हणजे नोकरीच्या मुलाखतीपेक्षा बिकट. काय-काय घेऊन जावं लागतं. व्हिसाची तारीख मिळवणे ही सुद्धा एक कसरत असते. इंटरनेटमुळे हल्ली सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. आई-बाबा दोघांचा व्हिसा काढायचा होता. मावशीने एक ओळखीची एजन्ट सांगितली. एजन्ट वगैरे असले की आमच्या आईला अगदी प्रल्हादाला स्वयं भगवान विष्णु भेटल्यासारखा आनंद होतो. आता आपलं काहीही बिघडू शकणार नाही असं तिला वाटतं. तर ह्या एजन्ट बाईंनी शंभर कागद आणायला सांगितले. त्यातले अर्धे परत करून उरलेल्याची एक "फाईल" बनवून दिली. आईची वेगळी फाईल, बाबांची वेगळी. का, ते माहित नाही. तिनेच आई-बाबांसाठी व्हिसाचे शुल्क भरले आणि 'मुलाखतीची' तारीख घेतली.

व्हिसा मुलाखतीची तारीख आली. अमेरीकेच्या व्हिसा कार्यालयात जायचे होते. तिकडे आत मधे काहीही नेता येत नाही. फक्त तुमचे कागद-पत्राची फाईल आणि पाकिट. म्हणून बरीच लोकं आपल्या नातेवाईकाला घेऊन जातात. हे नातेवाईक बिचारे, रस्त्याच्या पलीकडे उन्हा-तान्हाचे, उमेदवारांचं सामान घेऊन उभे किंवा बसलेले असतात. आपल्या अथवा अमेरीकेच्या सरकारने ह्यांचा साठी काही सोय केली तर किती बरं होईल. पण नाही, तसं होणार नाही, कारण अमेरीकेला दहशतवादी हल्ल्याची भिती असल्याने त्यांचा दूतावासाच्या आजू-बाजूला काहीही असता कामा नये असा अलिखित नियम आहे. आणि म्हणूनच ते दूतावासाच्या आंत फार काही नेऊ देत नाहीत. असचं त्या दिवशी मी आई-बाबांचे दूतावासाला मान्य नसलेले सामान घेऊन उभा होतो.
घरगुती अपूर्वाई - भाग १SocialTwist Tell-a-Friend

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: