बुधवार, जून ०१, २०११

लेडीज मार्केट: हाँग काँग

हाँग काँग जसं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, तसच ते इलेट्रोनिक वस्तूंसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आपण कुठेही पर्यटनासाठी गेलो, की तिकडून आठवण म्हणून काही तरी घेऊन येतोच. साधं महाबळेश्वरला गेलो, तर तिकडून वेताची छडी किंवा स्ट्रॉबेरी घेऊन आल्या शिवाय रहावत नाही.

हाँग काँगला गेलं असताना, लेडीज मार्केटला भेट देणं हे कर्तव्य आहे. ह्या मार्केटची ख्याती, तिथे मिळणार्‍या बायकांच्या उपयोगाच्या वस्तूंमुळे झाली, पण तरी आता तिकडे अनेक गोष्टी मिळतात. साध्या सेफ्टी पीन पासून ते घड्याळ इ. इलेट्रोनिक वस्तू तिथे मिळतात. थोडक्यात म्हणजे, हाँग काँग मधील लेडीज मार्केटची तुलना पुण्यातील तुळशीबागेशीच होऊ शकते. पण तिथे इलेट्रॉनिक वस्तू घेताना सावधानता बाळगावी. कारण बर्‍याचवेळा हा माल बनावट असतो आणि तो टिकण्याची काहीही गॅरंटी नसते. त्याशिवाय सुट्टे देताना नकली नोटा परत मिळण्याचे प्रमाण सुद्धा या इलेक्ट्रॉनिक बाजारात घडू शकतात. पण बाकी माल घेताना जीवाची फार तळमळ होऊ नये.

लेडीज मार्केट दुपारी १२:०० वाजल्या पासून रात्री ११:३० पर्यंत खुले असते. त्यासाठी दोन रस्ते बंद करून रस्त्यावरच दुकानं लावली जातात. इथे घेण्या सारख्या अनेक गोष्टी आहेत. हाँग काँग मधील पर्यटन स्थाळांच्या प्रतिकृति, प्राडा, गुची, इ. नामवंत लेबल्सची फेक उत्पादनं, ब्रेसलेट, माळा, बेल्ट, की-चेन, लहान मुलांची खेळणी आणि त्या सर्व गोष्टी ज्या तुळशीबागेत सुद्धा मिळतील. अनेक दुकानं असल्यामुळे आपल्या कडे पर्याय सुद्धा भरपूर असतात.

एक गोष्ट ध्यानी ठेवावी, की ह्या बाजारात कुठलीही वस्तू घेताना किमतीवर हुज्जत घालणे गरजेचे आहे. ज्याला उत्तम हुज्जत घालता आली तो तरला. पण, ज्याला नाही घालता आली, तो डुबलाच. जी काही किंमत दुकानदारीणीने (येथील बहुतेक ‘दुकानं’ बायका चालवतात) सांगितली असेल, त्याचा ३५-४०% किमती वरून आपण बोली चालू करावी. बाई खवळते, मोठ्याने आरडा-ओरडा केल्यासारखे बोलू लागते. पण आपण डगमगायचं नाही. बहुतांश लोकं चिनी असल्याने, त्यांची भाषा आपल्याला कळत नाही. म्हणून हे बारगेनिंग, कॅलक्युलेटर वर चालतं. दोन्ही पार्ट्या एक-एक करून आपल्या किमती त्यावर टाईप करतात. आणि दोन-तीन फेर्‍या (राउंड्स) झाल्यावर दोन्ही पक्ष एका किमतीवर राजी होतात, किंवा सौदा तोडून टाकतात. सौदा तुटला तरी हरकत नाही. बाई शिव्या सुद्धा घालेल, पण आपण निगरगट्टपणे पुढच्या दुकानाकडे मोर्चा वळवायचा. कुठल्या न कुठल्या दुकानात आपल्याला पाहिजे ती वस्तू पाहिजे त्या किमतीत मिळतेच.
लेडीज मार्केट: हाँग काँगSocialTwist Tell-a-Friend