ह्या ब्लॉगच्या वाचकांमधे, विकिपीडिया न वाचलेला(ली) वाचक, कदाचित अपवादानेच सापडेल. पण गुगल जसं आपलं default search engine आहे, तसंच विकि आपलं default ज्ञानकोश आहे. विकि वरील माहिती क्वचितच चुकीची अथवा एखाद्याच्या विचारसारणीला धरून असते. त्याचा वरील सर्व लेख हे तटस्थ भूमिकेतून लिहिलेले असतात. अगदी सचीन तेंडुलकर पासून ते मनमोहन सिंग पर्यंत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते काँग्रेस पार्टी पर्यंत. विकिवरील माहिती उपलब्ध करून देतात, ते जगातील तुमच्या-आमच्या सारखे सामान्य लोक, जे आपल्या दैनंदिन आयुष्यातून वेळ काढून विकी वरील विषयांसाठी माहिती गोळा करून लिहितात, त्याची सत्यता पडताळतात आणि ती वाढवत रहातात. लोकशाहीचा जगातील सर्वात सफल प्रयोग ह्यापेक्षा दुसरा कुठलाच नसेल. विकि वरील माहिती ही खरोखरच एब्राहम लिंकन ह्यांच्या व्याख्ये प्रमाणे "of the people, by the people and for the people" आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, ही सर्व माहिती विकि तर्फे मोफत पुरविली जाते. ह्या साठी ते एकही रुपया आकारत नाहीत. आणि हे असंच रहावं, हे विकिचे संस्थापक जिमी वेल्स ह्यांचं आणि विकिमीडिया संस्थेचं उद्देश्य आहे.
पण, ज्ञान (किंवा माहिती) जरी मोफत वाटायचं म्हंटलं, तरी ते पोहचवण्याची माध्यमं आहेत, त्यांचावर पैसा खर्चं होतोच. त्यातून सुटका नाही. विकीचं कार्य चालू रहावं ह्या साठी त्यांचा समोर दोन पर्याय आहेत. एक म्हणजे, विकिच्या पानांवर जाहिराती लावायच्या. पण विचार करा, एखादा गहन विषय वाचत असताना, पानाच्या मधेच जाहिरात आली तर? किंवा जाहिरातदारांनी सांगितलं की दिवसा गणिक किमान अमुक एवढे पेज-हिट्स मिळत असतील, त्याच पानांवर जाहिराती टाकण्यास परवानगी आहे, तर? मग चांगले, पण कमी वाचक असलेले विषय विकिने काढायचे का?
दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या-आमच्या सारख्या वाचकांनी विकिला आर्थिक मदत करणे. त्यातूनच हा प्रकल्प जाहिरात मुक्त आणि सदैव मोफत राहील. त्याहूनही महत्वाचं म्हणजे हा प्रकल्प लोकाभिमुख राहील. भारतातून आता पर्यंत दान करण्याची ज्यांची इच्छा होती, त्यांचा समोर एक अडचण होती. विकिपीडिया वाले रुपयां मधे आर्थिक सहायता स्वीकारत नव्हते. तेव्हा डॉलर मधे मदत करणे अनेकांना कठीण होते. पण आता विकि रुपयां मधे सुद्धा आर्थिक सहायता स्वीकारत आहे. त्यामुळे जे कुणी इच्छुक असेल त्यांना आता आपल्या डेबिट कार्डने सुद्धा सहायता करता येईल. आणि जितकी जास्त लोकं सहायता करतील तितकीच विकिची आर्थिक स्थिरता वाढेल, हा प्रकल्प तेवढाच वाढवता येईल. तेव्हा, हा ब्लॉग वाचणार्या विकिच्या सर्व चाहत्यांनी विकिला आर्थिक सहायता करावी आणि आपल्या मित्र-मैत्रीणींना करण्यास प्रोत्साहन द्यावं. आणि हो, किमान सहाय्य रु. ४९चं आहे, जे वाचकांपैकी बर्याच जणांना खूप जास्ती नाहीत.
आणि हो, केवळ आर्थिक सहायता करून थांबायचं नाही. मराठी भाषेतील ज्ञान जर अधिकाधिक लोकां पर्यंत पोहोचवायचं असेल, तर विकिच्या मराठी पृष्ठांवर माहिती जमा करण्यास आणि विकिवरील मराठी लेखांची संख्या वाढविण्यास मदत करा. आणि विकिची माहिती तटस्थ रहावी ह्यासाठी जागरुक पणे प्रयत्न करा. मराठी विकिची तुम्ही कशी मदत करू शकता, ह्या बद्दल अधिक माहितीसाठी मराठी विकिला अवश्य भेट द्या. लक्षात ठेवा मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा!!