सोमवार, ऑगस्ट ०१, २०११

स्मारक काढा स्मारक

आजच पेपर मधे वाचले, की NTC ने राज्य सरकारला सांगितले की बाबा साहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जमीन हवी असेल, तर ती NTC कडून बाजार भावाने घ्यावी लागेल. बाबा साहेब आंबेडकरांचं नाव आलं की सगळे पक्ष आपसातले मत-भेद विसरून एक होतात. चला, निदान बाबा साहेबांनी तेवढं तरी साधलं. नाहीतर रोजच त्यांनी लिहिलेल्या घटनेची पायामल्ली करायला सत्ताधारी आणि विरोधीपक्ष पुढे मागे बघत नाहीत. तर ह्या विरोधकांनी जमीन मोफत द्यायच्या ऐजवी बाजा भाव मागितला म्हणून NTC विरुद्ध संताप व्यक्त केलाय.

असो, पण आता सरकार कडे जनतेला थोरांचे स्मारक देण्या व्यतिरिक्त काय राहिले आहे? जनतेने त्या स्मारकां कडे बघत केवळ भूतकाळात रमून जायचे. आणि ह्या थोरां सारखे नि:स्वार्थी आणि सेवाभावी नेतृत्व आज कुठेही दिसत नाही, ह्या बद्दल टाहो फोडायचा. भविष्याकडे उमेदीने बघता येईल अशा किती गोष्टी आहेत? आणि अशी उमेद असती तर आपण स्मारकांच्या गुंतागुंती पडलो असतो का? आज चीनला बघा. त्या देशासमोर एक उज्जवल भविष्य आहे, म्हणून त्यांचे सरकार माओच्या चुका निदर्शनास आणून देताना घाबरत नाही. आणि त्या चुका सुधारल्याने त्यांची कशी प्रगती झाली, ह्याची केवळ भाषणं न होता, प्रत्यक्ष परिणाम सुद्धा जनतेला दाखवले आहेत.

भारतातील जनतेने ह्या अपेक्षेने सरकारकडे कधी बघायचे? केवळ स्मारक काढून स्मृतींना उजाळा देऊन भविष्य घडत नसतं. ते घडतं सरकारच्या ठाम कर्तृत्वामुळे व्यापक धोरणांमुळे आणि ती धोरणं अमलात आणायच्या हिम्मतीमुळे. हे जर नसेल, तर तुम्ही-आम्ही केवळ स्मारकांचे दर्शन घेऊन धन्यता मानायची! आणि त्या स्मारकांवर अश्रू वहायचे. असे कर्तृत्वान महापुरुष पुन्हा कधी जन्माला येतील?
स्मारक काढा स्मारकSocialTwist Tell-a-Friend

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: