गुरुवार, फेब्रुवारी ०२, २०१२

PMPMLचे टप्प्याचे वाहतूक का?

बरेच दिवस ह्या विषयावर लिहीन असे डोक्यात होते, पण काही कारणांमुळे राहून गेले. तर आज हा विषय पुन्हा आठवला तो नुकत्याच घडलेल्या PMPMLच्या प्रवासामुळे. मला नळ-स्टॉप वरून आयडियल कॉलनीला यायचे होते. त्यासाठी तिकीट काढले, तर डेक्कन कॉर्नर ते जय भवानी नगर असे तिकीट मिळाले, ज्याचे भाडे रु. ७ आकारले गेले. आता डेक्कन कॉर्नर हे नळ-स्टॉपच्या ३ थांब्या अगोदर येतं, तर जय भवानी नगर हे आयडियल कॉलनीच्या २ थांब्यानंतर येतं. म्हणजेच मी दिलेल्या भाड्यापेक्षा एकूण ५ थांबे कमी प्रवास केला. तरीही माझ्या कडून सर्व प्रवासाचे पैसे आकारले गेले. ह्याचं कारण असं आहे, की डेक्कन कॉर्नर ते जय भवानी नगर, हा भाड्याचा एक टप्पा आहे. आणि कुठलेही तिकीट हे त्या टप्प्याचे दिले जाते. 

पण अश्या टप्प्याच्या प्रवासाचे तिकीट का द्यायचे? आता तर PMPMLच्या कंडक्टर कडे तिकीट देण्यासाठी संगणकीकृत यंत्र आहे. ते वापरून त्यांना प्रवासाचे कि.मी. च्या आधारावर तिकीट देणे शक्य आहे. रिक्षाचे प्रवास भाडे देखील प्रत्येक कि.मी. (किंवा त्याचा भाग, every k.m. or part thereof) च्या तत्वावर आहे. नळ-स्टॉप ते आयडियल कॉलनी हे अंतर जवळ-जवळ ३ कि.मी. आहे. तर डेक्कन ते जय भवानी नगर, हे अंतर जवळ-जवळ ५.५ कि.मी. आहे. कुठल्याही प्रवाश्याने ह्या अतिरिक्त अंतराचे पैसे का भरावे? पहिला टप्पा एखाद्या ठराविक अंतराचा ठेवायला हरकत नाही. कारण त्यातून बस सेवेशी संबंधित Fixed Costs आकारता येतील. पण पुढील प्रवास भाड्याचा आकार  टप्प्यानुसार न होता किती अंतर प्रवास केला, ह्याचा आधारावर केला जावा. ह्यातून प्रवाश्यांना फायदा होईल आणि भाडे आकारण्यातही पारदर्शकता येईल.
PMPMLचे टप्प्याचे वाहतूक का?SocialTwist Tell-a-Friend