सोमवार, मे १९, २००८
दाटला चोहीकडे अंधार
गुरुवार, मे ०८, २००८
गेली भिती सारी
तसं पोहायला मला लहानपणापासूनच येतं. पण ते पोहणं म्हणजे नुसतं पोहणं होतं. त्याला फार काही तंत्र नव्हतं. नुसतं आपलं तरंगायचं आणि पाण्यात पुढे सरकत रहायचे. त्यामुळे एकतर वेग येत नव्हता आणि दुसरं म्हणजे कधीही पोहून झाल्यावर व्यायाम झाल्या सारखे वाटत नव्हते. म्हणूनच IIT मधे Intermediate camp ची घोषणा झाल्यावर त्यात सहभागी होण्याचं मी आणि स्वानन्द ने निश्चित केले. पहिल्या दिवशी रेड्डी सरांना कॅम्पला येण्या संबंधी विचारले. सर म्हणाले की १ कि.मी. पोहता आले तरच तुम्हाला कॅम्प मधे सहभागी होता येईल. झाली ना पंचाईत! या आधी पोहायचो, पण १ कि.मी.? कधीच नाही. फार तर फार ०.५ कि.मी. पोहलो होतो. आणि ते झाल्यावर खोली वर येऊन आडवा झालो होतो. तरी पण स्वानन्दच्या सांगण्यावरून पाण्यात उतरलो.
आमच्या बरोबर त्या कॅम्पला इयत्ता ३री ते साधारण ७वी ची मुलं होती. ती पोहण्यात इतकी तरबेज होती की मला ओशाळल्या सारखं झालं. मग ठरवलं की आता पीछे हाट नाही. पोहूनच दाखवायचं. रेड्डी सरांना आधी कल्पना दिली की पोहणे सुमार आहे, त्यामुळे थोडं गडबड होऊ शकते. पण सरांनीच मला प्रोत्साहन दिलं. म्हणाले की हरकत नाही. तू जर प्रयत्न केलास तर होईल.
मग काय, उतरलो आणि लागलो पोहायला. हळू-हळू करत धापा टाकत जवळ-जवळ ०.७५ कि.मी. पोहलो. सर म्हणाले चालेल. उद्या पासून यायला हरकत नाही. एक परीक्षा पार झाली! पुढचे १५ दिवस आता खडतर तपश्चर्येचे आहेत. पण अजिबात तंत्र-शुद्ध पोहणे येत नसताना मला एवढे पोहता आले हे पाहून माझा आत्मविश्वास एकदम वाढला. पोहण्या बद्दलची जी माझी भिती होती ती पूर्ण पणे नाहीशी झाली. आता १५ दिवसांनी काय होते ते बघू.
गुरुवार, मे ०१, २००८
मामलेदाराची मिसळ
राम-राणा जन्मला ती तळतळीत दुपारची वेळ होती (हा डायलॉग पु.लं.चा आहे, हे ठाऊक आहे मला). आम्ही मजल-दर-मजल करत एकदाचे त्या मामलेदाराच्या मिसळीच्या केन्द्रावर पोहोचलो. तिकडे पार रामच्या शेंडी पासून मारुतीच्या शेपटा पर्यंत रांग (हा पण डायलॉग पु.लं.चा आहे). आम्ही धीर करून रांगेत उभे राहीलो. रांग सांभाळयाला एक माणूस असल्याने मधे घुसणे कुणाला शक्य नव्हते. पाच मिनिटातच बाक-देवता आमच्यावर प्रसन्न झाली. बाकावर आम्ही तिघेही विराजमान होताच क्षणी, ऑर्डर सोडली- ३ मिसळ-पाव आणि ३ ताक. मिसळ आली आणि आम्ही तिच्या कडे २ क्षण नुसते बघत होतो. इतक्या दिवसांची उरात बाळगलेली इच्छा आज पूर्ण होत होती. लाल मिर्चीच्या रंगाने उजळून निघालेली ती तर्री, फरसाणाला पूर्ण पणे आपल्या रंगाचे करून आम्हाला आव्हान देत होती- असेल हिम्मत तर खाऊन दाखव. मग काय, पोटात कावळे ओरडत होतेच. आम्ही पण पावाचा तुकडा मोडला आणि तो तुकडा मिसळीत बुचकळला. पहिला घास.... जरा जपूनच... काय आहे, अगदी सचीन तेंडुलकर सुद्धा मॅग्राचा पहिला बॉल जपूनच खेळतो. त्या मिसळीच्या तिखटपणाची एवढी ख्याती ऐकली होती म्हणून पहिला घास घेताना जरा घाबरलो होतो.
पण पहिला घासा नंतर आम्ही सावरलो. मिसळ एवढी काय तिखट नव्हती. मिसळचं आम्हाला सांगितलेले वर्णन म्हणजे पर्थ टेस्टच्या आधी केलेल्या शॉन टेटच्या वर्णना सारखे होते. त्यानंतर शॉन टेटचा समाचार आपल्या फलंदाजांनी ज्या प्रकारे घेतला, त्याच प्रकारे आम्ही मिसळीचा घेतला. मधे-मधे ताकाचा आस्वाद घेत होतो. पहिली वेळ असल्याने थोडी सावधगिरी बाळगलेली बरी असते.
अखेरचा पावाचा तुकडा मिसळीत बुडवून खाताना आमच्या सगळ्यांच्या मुखावर एक वेगळेच तृप्तीचे भाव होते. इतके दिवसाची इच्छा अखेर पूर्ण झाली होती. तिथून बाहेर पडताना ह्या पंढरीची वारी जमेल तेवढ्या वेळा करायची असे ठरवूनच आम्ही निघालो.