सोमवार, सप्टेंबर २०, २०१०

राशीचक्राचे परचक्र

ज्योतिषातल्या बारा राशी. प्रत्येक राशीचे काहीतरी वैशिष्ट्य. काही गमतीदार, काही गंभीर. ही सगळी राशींची आणि त्या राशीत जन्माला आलेल्या लोकांची गम्मत-जम्मत आपल्या समोर आणली राशीचक्रकार शरद उपाध्ये ह्यांनी. गेली अनेक वर्ष चालू असलेलं त्यांचा राशीचक्र अजूनही प्रयोग झाला तर हाऊसफूल होतं. ह्या लोकप्रियतेचा फायदा घेत, उपाध्येंनी आता टी.व्ही. वर राशीभविष्य बद्दल प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम (मी-मराठी) आणि गमतीदार सासू-सून, सासरे-जावई वर कार्यक्रम (ई. टी.व्ही. मराठी) चालू केले. हे कार्यक्रम तूफान लोकप्रिय आहेत. 

त्यांच्या ई. टी.व्ही वरच्या कार्यक्रमात ते राशीचक्रातील काही गमतीदार किस्से सांगत असतात. म्हणजे कुठल्यातरी राशीचा माणूस अमूक प्रसंगी कसा वागला, तोच दुसर्‍या राशीचा असता तर कसा वागला असता, वगैरे. ई. टी.व्ही.च्या कार्यक्रमात तर, दर वेळेला सासूला सांगतात की तुमची सून अमक्या राशीची आहे म्हणून तिने असं उत्तर दिलं. ती ह्या राशीची असती तर तुमच्या मना सारखं/विरुद्ध उत्तर दिलं असतं, वगैरे. ह्या कार्यक्रमाचे अनेक भाग बघून, सहाजिकच जनसामान्यांमधे सून-रास-नक्षत्र असं त्रैराशिक निर्माण होतं. उदाहरणार्थ, अनेक भागां मधे, उपाध्येंनी वृश्चिक राशी आणि विशाखा नक्षत्रा वर जन्माला आलेल्या मुलीला सून करू नये, असं सांगितलं आहे. त्यामागची कारणं सुद्धा त्यांनी दिली आहेत. पण, ह्या जोडी खाली जन्माला येणारी प्रत्येक मुलगी तशीच वागेल का? याचं उत्तर हमखास "नाही" असंच आहे.

आमच्या ओळखीतील एक वृश्चिक रास आणि विशाखा नक्षत्रा मधे जन्मलेल्या मुलीचं लग्न ठरताना अनेक विघ्न येत आहेत. त्याचं मुख्य कारण उपाध्येंचा उपदेश. त्यामुळे बरीच लोकं तिची पत्रिका सुद्धा हातात घ्यायला तयार नाहीत!! खरं तर, ही मुलगी अत्यंत हुशार आहे, खासगी क्षेत्रातील एका चांगल्या बॅंकेत नोकरीला आहे, आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आहे. पण उपाध्येंच्या शब्दाला ब्रीद वाक्य मानणारे आपल्याकडे बरेच आहेत. पण हा कार्यक्रम गम्मतीचा भाग आहे, त्यातील प्रत्येक शब्द हा त्या विषयावरील शेवटचा शब्द ठरत नाही. हे अनेक लोकांनी अजून लक्षातच घेतलं नाही. थोडक्यात बारीक अक्षरातील "* conditions apply" हे कुणीच वाचलेलं नाही. आता ह्या मुलीच्या बाबतीत उद्भवलेल्या समस्येचं समाधान उपाध्ये देतील का? पत्रिका घेऊन, ती न जुळणे, हा वेगळा भाग आहे. पण लोकांनी ती घ्यायलाच नकार दिला, तर तिच्या लग्न जमायच्या कितीतरी संध्या फुकट गेल्या असतील. राशीचक्रामुळे तिच्या बाबतीत निर्माण झालेलं हे परचक्र कोण दूर करणार?
राशीचक्राचे परचक्रSocialTwist Tell-a-Friend

शुक्रवार, सप्टेंबर १७, २०१०

पी.एच.डी. आणि संस्कृत सुभाषितं

काही संस्कृत सुभाषितं पी.एच.डी. करणार्‍या विद्यार्थ्यांना कशी लागू पडतात, ते पहा

रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्‌
 भास्वानुदेष्यति हसिष्यति पंकजश्री: ।
इत्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार॥
शब्दार्थ:   रात्र संपेल, सकाळ होईल, सूर्य उगवेल, कमळे हसू लागतील (म्हणजे फुलतील) आणि मी येथून बाहेर निघून जाईन. कमळ मिटल्याने त्यात अडकलेला भुंगा असा विचार करत रात्र काढत आहे. पण अरेरे!!, हे काय? ते कमळ (सूर्योदयाच्या आधीच) हत्तीने (मुळा सकट) उपटले.

पी.एच.डी. अर्थ: Simulations/प्रयोग संपतील, त्यातून आलेल्या निकालांचा उपयोग करून मी पेपर प्रकाशित करीन, प्रकाशित झालेल्या पेपरच्या आधाराने माझा शोध प्रबंध लिहून होईल आणि मी ह्या सगळ्यातून  पदवी घेऊन बाहेर पडीन. पण, हे काय दुर्दैव!! सॉफ्टवेअरने चुकीचं उत्तर दिलं/ प्रयोग पूर्णपणे चुकला. आणि भुंग्या प्रमाणेच, विद्यार्थी सुद्धा आहे तिथेच अडकून पडला!!

यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता
साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्त: ।
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या
धिक्ताञ्च तं च मदनं च इमां च मां च ॥
शब्दार्थ: मी जिचा विचार करीत आहे, ती माझ्याबाबती अनासक्त (विरक्त) आहे, तिला अन्य कुणीतरी आवडतो, आणि त्याला अजून वेगळीच कुणीतरी आवडते. अजून दुसरीच कुणीतरी माझ्या विषयी आसक्ति बाळगते. तिचा, त्याचा, त्या मदनाचा, हिचा आणि माझा धिक्कार असो.

पी.एच.डी. अर्थ: काम पुढे सरकेल, ह्या दृष्टीने माझ्या गाईडची मी वाट बघतोय, तो वेगळ्या कुणाचीतरी वाट बघतोय, जो त्याला भेटायला येणार आहे, तो तिसर्‍याच कुणाकडे तरी जाऊन बसलाय, आणि इथे माझं काम माझी वाट बघत आहे (आणि लावत सुद्धा आहे). अशा वेळी, माझा, गाईडचा, त्या तिसर्‍याचा आणि माझ्या कामाचा धिक्कार आहे.
पी.एच.डी. आणि संस्कृत सुभाषितंSocialTwist Tell-a-Friend

शुक्रवार, सप्टेंबर ०३, २०१०

दोन महान गायक, दोन भिन्न शैल्या, पण तेच मोहून टाकणंयू-ट्यूब वरचं हे गाणं पहा. शान चित्रपटातलं जानू मेरी जान गाणं आहे. पहा, म्हणण्या पेक्षा ऐका. ह्यात अमिताभच्या आवाजाला पार्श्वगायन किशोर कुमारचं आहे. आणि शशि कपूरला महम्मद रफीचं. दोघांच्या भिन्न गायन शैली उठून येतात. ०:२० ला सुरू होणारी किशोर कुमारची ओळ ऐका. हेलकावे देत म्हंटलेली ही ओळ, "मैं", "तेरा", इ. शब्दांचा शेवट गाठताना एकदम ते शब्द थांबल्या सारखे जाणवतात. ही साधारण पणे पॉप सिंगर्स किंवा रॅपर्सची शैली असते. पण ह्या शैलीत किशोरदांनी गायलेलं एकदम कानाला मोहक आणि पायांना थिरकवायला लागतं.

आता, ०:५७ ला सुरू होणारी हीच ओळ महम्मद रफींनी गायलेली आहे. ही शैली एकदम स्मूथ वाटते. म्हणजे, कुठेही हेलकावे नाहीत, शब्दाच्या शेवटावर अधिक जोर नाही. इंग्रजीत "हॉट नाईफ थ्रू बटर", ह्या प्रमाणे त्यांची ही ओळ एकदम स्मूथली गायल्या सारखी वाटते. पाय थिरकत नाहीत, पण दाद देण्यासाठी मान डोलायला लागते. खासकरून "सारा हिन्दुस्तान"च्या वेळेस. ही ओळ एका श्वासात गायल्या सारखी वाटते.

विशेषत:, दोघांनी गायलेल्या "मैं तेरा, तू मेरी जाने सारा हिन्दुस्तान" मधला फरक प्रकर्षाने जाणवतो. पण दोन्ही शैल्या तितक्याच मोहक वाटतात, तितक्याच ऐकाव्याशा वाटतात. ह्या दोन्ही महान गायकांना त्रिवार वंदन!!
दोन महान गायक, दोन भिन्न शैल्या, पण तेच मोहून टाकणंSocialTwist Tell-a-Friend