जपानच्या तोहुकू मधील भूकंपानंतर आणि त्यामुळे जैतापुर मधील संभाव्य भूकंपांबद्दलची चर्चा, वार्ता वाचल्यावर आणि ऐकल्यावर, असं लक्षात आलं की अनेक जण भूकंपाची तीव्रता मोजणार्या रिक्टर स्केल बद्दल अनभिज्ञच आहेत. त्यांच्या ह्या अज्ञानाचा फायदा घेत अनेकांनी चुकीच्या बातम्या पसरवण्याला सुरवात केली आहे. माहिती नसल्याने, केवळ भावनांशी खेळून सत्य सफाईदार प्रमाणे लपविण्यात येत आहे.
भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठीची ही रिक्टर स्केल १९३५ साली तयार झाली होती. स्केल वरचा आकडा काढण्यासाठी एक Empirical formula देण्यात आला. ह्या फॉर्म्युलाचं वैशिष्ट्य असं की हा log scale वरचा आहे. म्हणजेच कसं की रिक्टर स्केल वरील भूकंप तीव्रता ५ आणि ६, ह्या दोन आकड्यात फार फरक वाटत नसला, तरी रिक्टर स्केल ६ चा भूकंप हा रिक्टर स्केल ५ च्या भूकंपापेक्षा १० पट तीव्र असतो.
जपान मधील तोहुकूला आलेला भूकंप रिक्टर स्केल ९ एवढ्या तीव्रतेचा होता. एवढ्या तीव्रतेचे भूकंप २० वर्षांतून एखादा होण्याची शक्यता असते. ह्याच भूकंपामुळे फुकिशिमामधील अणु-ऊर्जा केंद्रात प्रचंड नुकसान झालं आणि तेथील अणु भट्ट्यां मधे स्फोट होऊन किरणोत्सर्ग सुरू झाला.
ह्यानंतर जैतापुर मधील आधीच बिकट असलेली परिस्थिती अजून चिघळली. प्रकल्पाला विरोध करणार्यांनी ह्या भूकंपाचा आधार घेऊन आपला विरोध अधिक तीव्र केला. जैतापुर हे Seismic Zone 4 मधे येतं, इथे गेल्या वीस वर्षात भूकंपाचे ९२ धक्के बसले आहेत आणि त्यातील सर्वात मोठा भूकंप रिक्टर स्केल ६.२ एवढ्या तीव्रतेचा होता. प्रथम दर्शनी बघता, ६.२ आणि ९ ह्या आकड्यांमधे फार फरक वाटत नाही. ज्याला रिक्टर स्केल बद्दल माहित नसेल, तो ह्यात सहज रित्या फसला जाऊ शकतो. पण, रिक्टर स्केल ९ म्हणजे हा भूकंप ६.२ च्या मानाने जवळ-जवळ १००० पट अधिक तीव्र होता.
भूकंपातून किती ऊर्जा बाहेर पडते ह्याचा रिक्टर स्केलशी संबंध आहे. म्हणजे, रिक्टर स्केलवर जवढा मोठा आकडा, तेवढीच अधिक ऊर्जा त्या भूकंपामुळे बाहेर पडते. ६.२ तीव्रता असेल, तर साधारण पणे ७० किलो-टन TNT स्फोट केल्या एवढी ऊर्जा बाहेर पडते. अर्थात जवळ-जवळ २९० terra Joules एवढी ऊर्जा. ही जर पूर्ण वापरली गेली, तर जवळ-जवळ १,२०,००० टन उकळतं पाणी वाफेत बदलली जाऊ शकते. तेच जर ही तीव्रता ९ असेल तर ४७० मेगा टन, म्हणजेच ४,७०,००० किलो-टन TNT स्फोटा एवढी ऊर्जा बाहेर पडते. अर्थात, जवळ-जवळ २ exa Joule. ह्या ऊर्जेतून ४४०,०००,००० टन वाफ निर्माण होऊ शकते. कुठे १,२०,००० टन आणि कुठे ४४०,०००,००० टन.
ह्या उदाहरणातून तीव्रतेतील फरक लक्षात आलाच असेल. आकडे दिसायला जरी जवळ वाटले, तरीही फसवे आहेत. आणि म्हणूनच, माहित नसेल तर कुणाचीही फसवणूक करणे आणि भावनांशी खेळणे सहज शक्य आहे.
टीप: ह्यातील सर्व माहिती wikipedia वरून घेतली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा