शनिवार, जानेवारी २४, २००९

देवळातील एक दिवस

गोवा म्हंटलं तर सगळ्यांना आठवतात तिथले समुद्र किनारे, त्यावर वावरणारे परदेशी पर्यटक (विशेष करून स्त्री-पर्यटक) आणि पाण्या एवढी स्वस्त दारू. पण माझ्या साठी गोवा म्हणजे ह्यातलं काही नसतं. माझ्यासाठी गोवा म्हणजे मस्त डोंगरांच्या मधे लपलेलं शांतादुर्गेचं देऊळ, समोर असलेली मारूतीची टेकडी, सकाळचा देवीला सोवळं नेसून केलेला अभिषेक, दुपारी देवीची आरती, त्यानंतर पुरोहितांकडे गरम-गरम अस्सल कोकणी पद्धतीचा आमटी-भात, संध्याकाळी देवळाच्या आवारात निवांतपणे मारलेल्या गप्पा, रात्रीचं कीर्तन आणि आरती आणि आरती नंतर मिळणारा प्रसाद.

शांतादुर्गेच्या देवळातला गाभारा म्हणजे एक छोटी जत्राच असते. तेथील महाजनांचे पुरोहित ठरलेले असल्याने, एक पुरोहित ५-६ जणांना घेऊन देवीच्या अभिषेकला बसतात. देवीचा अभिषेक दोन भागात पार पडतो. पहिल्या भागात गणपती पूजा, संकल्प, इ. केलं जातं. त्यासाठी देवीच्या आसनासमोर खाली बसायला असलेली जागा वापरतात. तदनंतरच्या भागात देवीच्या मूर्तीवर अभिषेक होतो. एका पुरोहितांचे महाजन देवीवर अभिषेक करायला लागले, की दुसरे पुरोहित आणि त्यांचे महाजन गणपतीच्या पूजेला सुरुवात करतात. इथपासून खरा विस्मय सुरू होतो. आता तुम्हाला लक्षात येईल की मी गाभाऱ्याला छोटी जत्रा का म्हंटलं. महाजनांचा एक गट देवीवर अभिषेक करत असतो. त्या गटासाठी त्यांचे पुरोहित मोठ्या आवाजात मंत्र म्हणत असतात. त्याच वेळेस दुसरा गट त्यांच्या पुरोहितां बरोबर खाली गणपती पूजेला बसलेला असतो. त्या गटासाठी त्यांचे पुरोहित गणपती पूजेचे, संकल्प सोडण्याचे इ. मंत्र म्हणत असतात. हे सगळं एकाच वेळी चालू असतं. बरं, त्याच बरोबर इतर पुरोहितांची दुपारच्या आरतीची पण तयारी चालू असते. एवढ्या सगळ्यात त्यांचे आपसातले विषय पण चालू असतात. पण एकाही पुरोहिताचे मंत्र काही चुकत नाहीत.

ह्यावेळेला गेलो होतो, तेव्हा देवळाला रंग देण्याचं काम चालू होतं. एकीकडे विविध पूजांचे मंत्र, दुसरीकडे पुरोहितांचे रंग-काम करणाऱ्या लोकांना सुचना आणि रंग-काम मजुरांची आपसात बडबड, हे सगळं स्वतंत्र रित्या चालू होतं. आणि महाजन वर्ग, एखाद्या आज्ञाकारक पण कंटाळलेल्या विद्यार्थ्याप्रमाणे एकीकडे पुरोहितांचे मंत्र आणि सुचना ऐकत होते आणि दुसरीकडे रंग काम बघत होते.

एवढं सगळं लिहिण्याचे कारण काय? तर असं की पुरोहितांचा एकाग्रपणा बघून मी थक्क झालो. मला गायत्री मंत्र येतं. अगदी झोपेतून उठवून कोणी म्हणायला सांगितलं तरी मी न चुकता म्हणू शकेन. पण तिकडे माझ्या बरोबर पुरोहितांनी गायत्री मंत्र म्हणायला सुरुवात केली की माझी लय जाते आणि मंत्र चुकतो. मग मी त्यांचं मंत्र ऐकून समाधान मानतो. पण हे सगळे पुरोहित एवढ्या सगळ्या गोंगाटात आपले मंत्र न चुकता म्हणतात. वैदिक शिक्षण पद्धतीचा हा परिणाम आहे का? लालखी/पालखी उत्सवाच्या वेळेस तर शंभर-एक लोकांच्या अखंड घाई गर्दीत ते मंत्र आणि पूजा सांगून पालखीची वाट मोकळी करतात. कोण पालखीचे फोटो काढतय, कोण आपसात गप्पा मारतय, पण त्यांना काही फरक पडत नाही. त्यांच्या ह्या एकाग्रतेला साष्टांग वंदन करावसं वाटतं.
देवळातील एक दिवसSocialTwist Tell-a-Friend

३ टिप्पण्या:

Minanath Dhaske म्हणाले...

Mitra,

Dhanyawaad..
Mazya blog la tuzya portal var sthan dilabaddal...
Savistar nantar bolu.

रचना म्हणाले...

तुमचा blog खूपच आवडला....
आपले अनेक गोष्टींबद्दल चे विचार जुळले.....
त्याचा आनंद झाला....
तशीच शांतादुर्गेच्या बाबतीतील post आवडली....
शांतादुर्गा हे आमचं कुलदैवत...आणि तुमचा आणि माझा गोव्याचा experience पण सारखाच...

Vinay म्हणाले...

रचना,
धन्यवाद! तुम्हाला माझा ब्लॉग आवडल्या बद्दल. असेच भेट देत रहा ह्या ब्लॉग वर.