कधी आपल्या डोक्यात हा विचार आला आहे का? की हिंदू धर्मात ब्रम्हदेवाची अर्धांगिनी सरस्वती, विष्णुची लक्ष्मी आणि शंकराची पार्वती (शक्ति) का आहेत?
ब्रम्हदेव हे अखंड ब्रम्हांडाचे निर्माते. कुठलीही गोष्ट निर्माण करण्यासाठी तिच्या निर्मितीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर निर्माण करत्याला सफलते साठी ज्ञानाची साथ गरजेची आहे. तर मग, निर्मात्या देवाला ज्ञानाच्या देवीची साथ नको का? म्हणून ब्रम्हदेवाच्या साथीला विद्येची देवी सरस्वती आहे.
श्री भगवान विष्णु सर्वांचे पालक आहेत. अर्थात ते त्रिलोकाचे पालन व रक्षण करतात. कुठल्याही गोष्टीचं पालन करण्यासाठी नेहमी साधनांची गरज असते. त्या साधनांच्या वापराचा मोल द्यावा लागतो. धन हे साधन मिळवण्याचा एक अतिशय महत्वपूर्ण मार्ग आहे. शिवाय आपले इतर कार्य पाप अथवा पुण्य कमवण्याचे मार्ग आहेत. म्हणून भगवान विष्णुंच्या साथीला धन/साधनांची देवी लक्ष्मी आहे.
श्री इश्वर शंकर हे त्रिलोकातील पाप व पाप्यांना नष्ट करणारे देव आहेत. नाश करण्यासाठी शक्तिची असण्याची गरज असते. आणि नुसती शक्ति नव्हे, तर कणखर पणे उभी रहाणारी शक्ति असावी लागते. म्हणूनच हिमालय-पुत्री पार्वती (अर्थात शक्ति) ही भगवान शंकराची पत्नी आहे.
ह्याहून पुढे जायचे झाले, तर ह्यांना त्रिदेव म्हणून ह्यांचं एकरूप का आहे? ह्याचं कारण असं की संसारात घडवणूक, पालन आणि नाश, ही तिन्ही कार्य एकत्र चालू राहिली पाहिजेत. एक अगदी सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर बाग काम करणारा माळी घ्या. हा माळी एखादं रोपटं वाढवताना, त्या रोपटाला खत-पाणी देउन त्याचं पालन करतो. त्या रोपटाच्या कुठल्याही भागाला इजा झाली असेल (किव्हा कीड लागली असेल) तर तो भाग नष्ट करतो आणि उरलेल्या भागाचे रक्षण करतो. ह्या सर्वातूनच तो एक सुंदर बाग निर्माण करतो. ही बाग निर्माण करायला त्याला पालन करण्याचं व कुठल्या गोष्टीचा नाश करायचा, ह्या व अजून अनेक विषयांचं ज्ञान असणे गरजेचं आहे !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा