सोमवार, मे १०, २०१०

प्रकाशन हक्क (कॉपीराईट) संबंधी थोडंसं

कालच मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, दादरच्या दा. सा. वा. सभागृहात पार पडला. कार्यक्रम अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण होता. त्या बद्दल कांचन ताई, महेंद्र काका आणि रोहन चौधरीं चे आभार मानायलाच हवेत. इतर ब्लॉगर्सच्या काय समस्या आहेत, किंवा द्विधा आहेत, हे लक्षात आलं. त्या द्विधा किंवा समस्यांचं थोडं फार निराकरण करायाचा माझा हा प्रयत्न आहे.

आनंद घारे काका यांनी एक अत्यंत कळीचा प्रश्न समोर ठेवला. की ई-मेल मधून फॉरवर्ड म्हणून आलेले, किंवा इंटरनेटवर उपलब्ध असलेली छायाचित्र आपण आपल्या ब्लॉग वर वापरू शकतो का? वापरली तर त्या चित्रांच्या प्रकाशन हक्कांचं काय? हा प्रश्न मांडल्यावर असं लक्षात आलं की अनेक ब्लॉगर्सना कॉपीराईट्स संबंधी फार धूसर माहिती आहे. नेटभेट वर ह्या विषयावर लेख आलेले आहेत, पण म्हण्टलं की आपण आपल्या परीने हा विषय मांडावा.

आपल्याला जर प्रकाशन हक्क भंग करण्याच्या धोक्यापासून दूर रहायचं असेल, तर एक नियम लक्षात ठेवा. जर कुठल्याही छायाचित्रा सोबत प्रकाशन हक्कां बद्दल काहीच लिहिलं नसेल, तर आपण सर्व हक्क छायाचित्राच्या मालका कडे राखीव आहेत, असं समजावं. त्याचं कारण असं की जर प्रकाशन हक्कां बद्दल मनात द्विधा असेल, तर आपण आपल्या दृष्टीने सुरक्षित बाजू घ्यावी. न जाणो, ह्या माहिती जालाच्या कुठल्या कोपर्‍यातून तो छायाचित्रकार तुम्हाला शोधून काढेल आणि कायदेशीर कारवाईची धमकी देईल. दुसरं असं, की परवानगी शिवाय त्याचं छायाचित्र वापरणं हे सुद्धा तात्विक दृष्टिकोनातून चुकीचं आहे. अहो, साधं आपलं पेन कुणी न विचारता घेतलं तरी आपली चिडचिड होते!! अनेकजण म्हणतात की छायाचित्र टाकून त्याच्या सोबत आपण जर लिहिलं की हे अमक्या-अमक्या च्या वेबसाईट वरून घेतलं आहे, किंवा हे छायाचित्र अमक्याचं आहे, असं लिहिलं आणि त्याचा दुवा दिला, तर सर्वसाधारण पणे कुणीही आक्षेप घेत नाही. पण हे गृहीत धरणं चुकीचं आहे. ते छायाचित्र तयार करण्यामागे किती कष्ट लागले असतील हे आपल्याला थोडीच माहित आहे? म्हणून हे कधीही गृहीत धरू नका.

मग ह्याच्यातून मार्ग काय? जर आपल्याला छायाचित्र वापरणे अनिवार्य असेल, तर काय करता येईल? त्यावर महेंद्र काकांनी सुचवलेला एक उपाय म्हणजे, गुगलवर कॉपीराईट फ्री छायाचित्रांचा शोध घेता येतो आणि ती वापरता येतात. अशा छायाचित्रांना रॉयल्टी फ्री छायाचित्रं असे ही म्हणतात. दुसरं असं की flickr वर किंवा picasa वर Creative Commons License अंतर्गत प्रकाशीत केलेली छायाचित्र शोधावी. Creative Commons (CC) License, हे प्रकाशकाला आणि वापरकरत्यांना अतिशय सोप्या भाषेत समजेल असा परवाना आहे. ह्या परवान्याच्या अंतर्गत आपण आपले छायाचित्र अथवा लेख अथवा अन्य कुठलीही प्रकाशन योग्य गोष्ट आपल्याला पहिजे त्या रितीने प्रकाशीत करू शकतो. उदाहरणार्थ, जर मला माझ्या छायाचित्राचा मुक्त वापर करण्याची मुभा द्यायची असेल, तर मी CCचं Attribute परवाना वापरू शकतो. पण जर मला असं वाटलं की हे छायाचित्र इतरांनी स्वत: पैसे कमवण्यासाठी वापरू नये, किंवा ह्या छायाचित्रा मधे कोणताही बदल न करता ते आहे तसं वापरावं, तर मी त्यांचा Attribute-Non Commercial-No Derivatives परवाना वापरू शकतो. असे एकंदरीत ८-९ परवाने CCच्या अंतर्गत उपलब्ध आहेत. शिवाय कुठल्याही परवान्यावर सूट द्यायची मुभा प्रकाशका कडे आहे. त्यामुळे ती परवानगी मिळवीणे फार कठीण नाही. म्हणूनच हल्ली CC परवान्याच्या अंतर्गत आपले लेख, छायाचित्र, इ. प्रसिद्ध करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

असो, एवढं सगळं असूनही लोक CC परवाना पाळतीलच असं नाही. त्यातही 'मी वापरलं तर कुणाला कळतय', ही भावना असणारच. पण आपण जर एका सुजाण, सुसंस्कृत समाजाचे नागरिक आहोत, तर प्रकाशकाच्या मालकी कडे काना-डोळा करून कसं चालेल? पण लक्षात ठेवा, माहिती जालावर कुठलीही गोष्ट गृहीत धरणे धोकादायक आहे. टायगर वुड्स कसा फसला, हे विसरू नका. अर्थात तो माहिती जालावर फसला नाही, पण माहिती तंत्रज्ञानाच्या धोक्यांना दुर्लक्षित केल्यामुळे फसला. आपल्याला त्रास, मनस्ताप, इ. होईल अशी कुठलीही गोष्ट करू नका.
प्रकाशन हक्क (कॉपीराईट) संबंधी थोडंसंSocialTwist Tell-a-Friend

७ टिप्पण्या:

Mahendra म्हणाले...

हे पोस्ट लिहिलं फार बरं केलंस. अतिशय उपयुक्त पोस्ट आहे हे. बरंच कन्फ्युजन आहे या गोष्टीबाबत.

Vinay म्हणाले...

धन्यवाद काका!! कधी कधी असल्या द्विधांमुळे आपण कारण नसताना अडचणीत येऊ शकतो. म्हणून मनात आलं की आपण आपल्या परीने काही गोष्टी स्पष्ट कराव्यात.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

विनयजी, काल आपण ही उपयुक्त माहिती देऊन आणि आज लगेच त्यावर पोस्ट लिहून बरं केलंत. या CC लायसन्स अंतर्गत जी काही माहिती आहे, ती माझ्या ब्लॉगवाले या ब्लॉगवर मराठीत देण्याचा प्रयत्न नक्की करेन.

Vinay म्हणाले...

कांचन ताई, तुम्हाला ह्या बद्दल अजून माहिती पाहिजे असेल, तर मला जरूर कळवा. मी तुम्हाला लेख लिहून देऊ शकतो.

sm म्हणाले...

very useful post about copy right
thanks

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

स्वागत आहे! मेळाव्यात मी ब्लॉगवाले या ब्लॉगबद्दल थोडीफार कल्पना दिली होती. त्या ब्लॉगवर जर आपण कॉपीराईट संबंधी विस्तृत माहिती लिहू शकलात तर बरं होईल. मी आपल्याला अतिथी लेखक (Guest Author) म्हणून आमंत्रण पाठवू का?

Vinay म्हणाले...

@कांचन ताई,

नक्की पाठवा. मला लेख लिहून तयार करायला ३-४ दिवस लागतील. माझा ई-मेल vinayb81 [at] gmail [dot] com आहे.

@sm,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.