नुकताच पार पडलेल्या महिला कबड्डी विश्व चषकात भारताच्या महिलांनी सुवर्णपदक मिळविण्याची उत्तम कामगिरी केली. ही कामगिरी बजावल्यावर त्यांचावर अभिनंदनाचा आणि पुरस्कारांचा वर्षाव झाला. फेसबुक वर आणि twitter वर शुभेच्छांचा वर्षाव आणि क्रिकेट सोडून अशा खेळांना पाठींबा देण्याचे अनेकांनी गाऱ्हाणे घातले. केवळ योगायोगाने ह्याच काळात भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. म्हणूनच अनेक क्रिकेट प्रेक्षकांनी देशातल्या क्रिकेट मध्ये माखलेल्या जनतेला हे आव्हान केले. पण, कबड्डी विश्व चषक कधी चालू झाला, त्या स्पर्धेत किती संघ होते, कोणत्या देशातील होते, ह्याची माहिती अनेक जणांना नाही. शिवाय, ज्या मिडीयावाल्यांनी आज ह्या खेळाडूंची बाजू उचलून धरली आहे आणि जे त्यांचावर आता अनेक कार्यक्रम करीत आहेत, त्यांनी ह्या स्पर्धे बद्दल ब्र देखील उच्चारला नाही. सेहवाग-धोनी मधील तथा-कथित वादाला फ्रंट-पेज वर जागा मिळाली, पण कबड्डी विश्व चषकाची नांदी ह्यांना दिसली नाही. त्यामुळे आता चाललेले कौतुक खोखलेपणाचे वाटते. ह्या संघात किती खेळाडू होते, हे सुद्धा सांगणे अनेकांना कठीण जाईल, त्यांची नावे सांगणे तर सोडाच!!
आणि विश्व चषक जिंकल्यावर अपेक्षे प्रमाणे अनेक राज्य सरकारांनी खेळाडूंवर बक्षिसांची खैरात जाहीर केली. ही बक्षिसे ह्या खेळाडूंना कधी मिळतील माहित नाही, आणि त्या साठी त्यांना किती जोडे झिजवावे लागतील हे पण सांगता येत नाही. पण, केवळ बक्षिसे वाटून आणि जेत्यांना शासकीय नोकरी जाहीर करून देशात क्रीडा संस्कृती रुजणार नाही. शासनाने क्रीडा संबंधित सुविधांमध्ये सुद्धा लक्ष पुरविले पाहिजे. खेळाडूंना कुठल्या प्रकारच्या सुविधा पाहिजेत, त्याची व्यवस्था करावी. शिवाय, खेळाला (कुठल्याही कारणास्तव) राम-राम ठोकल्यावर त्यांना नोकरी मिळवून देण्याची मदत करावी. ही नोकरी शासकीय असण्याची काही गरज नाही. कारण एवढे समर्थ खेळाडू मनात असेल तर कुठेही चमकू शकतात. ह्यातूनच दर्जेदार खेळाडूंचे एक talent pool तयार होईल. लक्षात घ्या, ज्या १२ जणी विश्व चषकात खेळल्या, त्यांची निवड शेकडो मुलीं मधून झाली आहे. त्यामुळे केवळ जे जिंकले त्यांचे कौतुक न करता ज्यांनी ह्या खेळात राज्य व राष्ट्रीय पातळीवर भाग घेतला आहे, त्यांचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. सहाजिकच विश्व चषक मधील खेळाडूंना अधिक मोबदला मिळेल, पण निदान दुसऱ्या फळीतील खेळाडूंना वाळीत टाकल्या सारखे तरी वाटणार नाही. आणि म्हणूनच केवळ बक्षिसे आणि नोकऱ्या जाहीर करून संपणार नाही, तर क्रीडा संस्कृती बहरून येण्यासाठी खेळाडूंच्या बाबतीत दीर्घ कालीन योजना राबविण्याची गरज आहे. तरच इतर खेळांमध्ये सुद्धा आपण वर्चस्व गाजवू शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा