गेला आठवडा-भर खूप उकडत होतं. अगदी बर्फाच्या लादीवर बसलं तरी घाम फुटत होता. असह्य उकाडा, पंखा लावला तरी घाम येणे, आणि सकाळी-सकाळी खोलीत कुणी तरी आल्यावर, बिछाना ओला का लागतो, या बद्दल त्या आलेल्या माणसाच्या डोक्यात शंका येणे, ही सगळी मुंबईत पाऊस पडण्याची ही चिन्ह आहेत. तर, गेला आठवडा भर हे सगळं होत होतं. पण, पावसाला जणू काही I.T. कंपन्यांचं वारं लागलं होतं. म्हणजे, बहुतांश I.T. वाले कसे बंगलोरला जाऊन थडकतात, तसा तो कर्नाटकला पोहचून तिकडेच थांबला होता. महाराष्ट्राची अवस्था त्याला दिसत नव्हती. पण देशाच्या आर्थिक राजधानीचं आकर्षण त्यालाही फार काळ टाळता आलं नाही. आणि शेवटी एकदाचे मान्सून पावसाचे ढग मुंबईच्या आकाशावर दिसू लागले. पण तरीही म्हाणावं तसा पाऊस पडत नव्हता. सकाळी खिडकीतून बाहेर बघावं तर काळे ढग दिसायचे. वाटायचं की चला, आज पाऊस पडेल. पण नाही. आंघोळ करून आलं की सुर्यदेव आकाशात हजर. सुर्याच्या उदयाने, आमच्या पावसाच्या आशा मावळायच्या.
आज सकाळी वर्तमानपत्रात वाचलं की मुंबईत येत्या २४ तासात मान्सूनचे आगमन होणार असा हवामान खात्याने सांगितले आहे. म्हंटलं, म्हणजे जास्तीत जास्त ४८ तासात पावसाची एक तरी सर यायला हरकत नाही. ह्या आनंदात मी छत्री दप्तरात टाकली (पावसात भिजायला मला आवडतं, पण माझ्या कपड्यांना ते आवडत नाही, म्हणून छत्री बाळगावी लागते) आणि वाचनालयात गेलो. तर रस्त्यात पाऊस लागला. लागला काय, शिंतडला. वाटलं, आज पण पाऊस पडत नाही. पण तसं काही झालं नाही. संध्याकाळी आकाश पुन्हा एकदा दाटून आले. अचानक वाटलं की पोहायला जावं. पावसात पोहायची एक वेगळीच मजा आहे. Cast Away चित्रपट ज्यांनी बघितला आहे, त्यांना पावसात पोहण्याची मजा समजू शकेल. अर्थात, त्यात नायकाची जी अवस्था होते, ती होऊ नये, पण तरी पावसात पोहायची मजा काही औरच आहे.
तरणतालावर पोहोचे पर्यंत पाऊस काही चालू झाला नव्हता. पाण्यात उतरलो आणि पोहायला सुरवात केलीच होती की ढग गडगडायला लागले, आणि जोरात पाऊस चालू झाला. पहिल्या पावसात पोहण्याची मजा निराळीच आहे. दिवसभरात तरणतालातले पाणी गरम झाले होते, त्यामुळे पोहताना पाण्याखाली गेल्यावर कोमट पाणी आणि बाहेर आल्यावर थंड पाण्याचा मारा. पाण्याखाली असताना, पाण्यावर पडणाऱ्या पावसाच्या सरीचा आवाज, पाण्यावर आल्यावर तोच आवाज वेगळा ऐकू येणे, हा सगळा अनुभव वेगळाच आहे. शब्दात मांडता येणार नाही अशी भावना निर्माण होते.
पोहणे संपले तरी पाऊस काय थांबायचं नाव काढत नव्हता. बरोबर आहे, पहिला पाऊस आहे, बराच वेळ चालणार. तरणतालावर जाताना छत्री नेली नव्हती. मनसोक्त भिजून (आणि पोहून) झाल्यावर roomवर येताना, पुन्हा एकदा भिजलो. पहिल्या पावसात पोहायची आणि भिजायची माझी इच्छा पुर्ण झाली. छात्रावासात परत आल्यावर वाटेत प्रकल्प भेटला. त्याने मला गरम-गरम चहा पाजला. वा!! गार वातावरण आणि गरम चहा, हे combination म्हणजे जणू स्वर्गच. भिजल्यामुळे तो गरम चहा अजूनच आरामदायक वाटत होता. पहिल्या पावसात भिजायचा कार्यक्रमाचा शेवट, हा कार्यक्रमा प्रमाणेच अत्युत्तम झाला.