राज बब्बर ह्यांच्या सिनेमा कारकिर्दीत फार काही उल्लेखनीय घडलं नाही. मुळात त्याचे सिनिमे बघून, हा माणूस कसं काय अभिनेता बनू शकतो, असंच वाटायचं. त्यात हे भाऊ आता खासदार आहेत. आधी समाजवादी होते, आता कांग्रेसचे सेक्युलर खासदार आहेत. भारतात खासदार झालात की तुम्ही वस्तुस्थिती पासून दूर जाता. ज्या जनतेचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, ती जनता काय परिस्थितीत रहाते, ह्याचा अनेक खासदारांना विसर पडतो. बरोबर आहे, आजच्या जमान्यात संसदेच्या उपाहार गृहा मध्ये रु. १.५० ला चहा आणि रु. १५ पेक्षा कमी किमतीत बिर्याणी खायला मिळत असताना बाहेरच्या हॉटेल मधल्या किमती कशाला माहित असतील? बरं, हे बाहेर गेले जरी जेवायला तर खासदार साहेबांकडून बिल कोण घेणार? घेतलं तर ह्यांचा अपमान होतो आणि तो न सहन झाल्याने ते आणि त्यांचे समर्थक हॉटेल वाल्याला त्याची "जागा" दाखवून देतात.
असो, पण बब्बर साहेब फ्लॉप का राहिले? ह्याचे उत्तर ह्या दोन विडिओ मध्ये कळेल.
ह्या विडिओ मध्ये बब्बर साहेब म्हणतात की मुंबई (त्यांची बंबई) मध्ये ते रु. १२ मध्ये पोट भरून जेवू शकतात. आणि हे घरात नाही बरे, तर बाहेर कुठल्या तरी खानावळीत किंवा हॉटेल मधे. आणि काय जेवू शकतात तर, भरपूर भात (त्यांचा हाता कडे बघा म्हणजे तुम्हाला किती भात मिळतो ते कळेल), आमटी, सांबर आणि थोडी भाजी!! अबब, एवढे जेवले तर माणूस दुपारची एक वामकुक्षी काढू शकेल!! पण हे हॉटेल कुठे आहेत मुंबई मध्ये, ते सांगणे मात्र त्यांनी हुशारी ने टाळले.
पण, त्यांना जेव्हा कळाले की आपली काही तरी चूक झाली आहे, तेव्हा त्यांनी जे स्पष्टीकरण दिले, ते तर अजूनच अचाट आहे. मुळात त्यांना लक्षात आलं कि ते शहर जेव्हा खरंच "बंबई" होतं, तेव्हा रु. १२ मध्ये जेवायला मिळत असे. पण आता हे मुंबई आहे आणि तिकडे एवढ्या स्वस्तात जेवण मिळणे कठीण आहे. त्या नंतर साहेबांनी हे पुचाट स्पष्टीकरण दिले.
ह्यात भाऊंच सांगणं असं की रु. १२ मध्ये २ तंदूर रोटी (कारण त्या मोठ्या असतात), अर्धी प्लेट दाल (आमटी) आणि १ चमचा भाजी खाऊ शकतो. कसं काय? तर हॉटेल वाल्याकडे १ च्या ऐवजी १/२ प्लेट दाल मागायची, आणि १ प्लेट भाजी ऐवजी १ चमचा मागायची!! असं काही द्यायला हॉटेल वाला तरी तयार होईल का? आणि त्यापूर्वी भात, सांबर आणि भाजी खाणारा बब्बर आता रोटी-दाल वर का आला? की भात-सांबर रु. १२ मध्ये मिळणार नाही ह्याची त्याला प्रचीती झाली? हा माणूस(?) स्वतःच्याच विधानाला खोडून काढत आहे! अरे तू जसा हॉटेल वाल्या कडे १ चमचा भाजी, १/२ प्लेट दाल मागत आहेस ना, तसंच लोकांनी योजना आयोगाच्या माणशी र. १००० (शहरा मध्ये) महिन्याच्या बजेटला रु. ३३ दिवसाला असे विभागले! साधे गणित जमू नये की काय? तसेच गावाकडे माणशी रु. ८१६ च्या महिन्याच्या बजेटला रु. २६ दिवसाला असे विभागले. हे जर तू नाकारत असशील तर तुझ्या सारखा नाकर्ता कुणीच नाही असे म्हणावे लागेल. आणि हे आकडे चूक की बरोबर हा वाद मी घालू इच्छीत नाही, पण हे योजना आयोगाचे आकडे आहेत.
बब्बरचे चित्रपट थेटर मध्ये जाऊन बघण्या सारखे तर अजिबात नव्हते! पण, तरी त्याला सांगितलं की तुझा चित्रपट ३ तासांचा आहे. त्याचे तिकीट त्या काळी रु. २० असायचे. त्यातील आम्हाला फक्त गाणी बघायची आहेत. ती गाणी १/२ तासाची आहेत. तर तू रु. ३ मध्ये आम्हाला तुझ्या चित्रपटातील गाणी बघू देशील का? तो तयार होईल का? तुम्हा खासदारांना जर सांगितले की तुम्ही जेवढा वेळ संसदेत चर्चा कराल, तेवढ्या वेळाचाच पगार घ्यायचा. तू तयार होशील का? नाही ना!! अनेक ठिकाणी प्रो-राटा (pro-rata) तत्वा वर गोष्टी घेता येत नाहीत. हॉटेल सुद्धा त्यातील एक जागा आहे. मग ज्या गोष्टी करणे शक्य नाही, त्या तू गरिबांना तरी कशाला करायला सांगतोस रे बाबा?