बुधवार, फेब्रुवारी २८, २००७

असं खरंच होतं का?

गेल्या आठवड्यात गोव्याला गेलो होतो. पुण्याहून जायचे असल्याने, बसने जाणे भाग होते. गोव्याला जाणारी प्रत्येक बस मधे एखादा हिन्दी चित्रपट दाखवतात. तो आपल्याला बघायचा नसला तरी बघावा लागतो. ह्याच तत्वाला अनुसरून, मी पण चित्रपट बघत होतो. चित्रपटाचे नाव होते 'Risk'. खरंच, प्रेक्षकांना बरीच रिस्क घ्यावी लागली हो हा चित्रपट बघताना. एक तर 'अब तक छप्पन' नंतर त्याच विषयावर छप्पन चित्रपट झाले आहेत. त्यामुळे 'रिस्क' मधे काहीही नाविन्य नसणार हे ठाऊक होते. तरीही इतर काही पर्याय नसल्याने हा चित्रपट बघत होतो.

तर, ह्या चित्रपटात, नायकाची आई, त्याला सकाळी-सकाळी दाढी करते वेळी सांगत असते की तू लवकरात लवकर लग्न कर, कुठलीही सून आण, मी आशिर्वाद द्यायला तयार आहे, वगैरे. एक तर मुळात दाढीची वेळ ह्या असल्या गप्पांसाठी नसते. त्यात नायक इंस्पेकटर असतो. त्यामुळे आधीच उलट्या बुद्धीचा. तरीही तो हे सगळं बोलणं निमूट पणे ऐकून घेत असतो. तर माता-पुत्रांचा हा संवाद चालू असतो आणि शेवटी आईचं बोलणं एकादाचं संपतं. त्या बोलण्याचा एकंदर सूर 'मुलाचं लवकर लग्न लागावं' असा असतो.

लगेच चित्रपट पुढच्या 'सीन'ला जातो आणि तिथे एक नायिका गाताना आणि नाचताना दिसते. एकंदरीत तिच्याकडे पाहून लक्षात येते की ही आपल्या नायकाची नायिका आहे. आणि ते गाणे संपल्यावर तो नायक खरंच तिला फोन करून तिच्याशी यथेच्छ गप्पा मारतो.

हे सगळं पाहिल्यावर असं वाटलं की हे असं आपल्या आयुष्यात घडू शकतं का? म्हणजे, एखाद्याची आई त्याचा कानाशी लग्नाची कुर-कुर करत असताना, दुसरीकडे त्याची होणारी बायको त्यासाठी गाणं म्हणत असेल. कल्पना करा की आपली आई आपलं लग्न व्हावं म्हणून आपल्या कानाशी कुर-कुर करत आहे. त्यावेळी तिला टाळायचं असेल तर सांगायचं की आई, जास्तं कुर-कुर नको करुस. तुझी ही कुर-कुर संपली की कुठेतरी कुणी तरी मुलगी माझ्यासाठी नक्कीच नाचत किंवा गात असेल. त्यामुळे तू फक्त तुझी कुर-कुर संपली की कोण मुलगी नाचत आहे किंवा गात आहे ह्याचावर लक्ष ठेव. तीच तुझी व्हावी सून असेल! त्यावर तुमच्या आईची प्रतिक्रिया काय आहे ती मात्र नक्की कळवा.

ता.क. हा प्रयोग करायची वेळ माझ्यावर अजून आलेली नाही.
असं खरंच होतं का?SocialTwist Tell-a-Friend

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

mar khaycha ka ???? aai cha?????????

vidyadhar dikkr