सोमवार, एप्रिल ०५, २०१०

द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा

कल्पना करा, जर भगवान शंकर, आपल्या पुराणांमधे सांगितल्या प्रमाणे भगवान नसून, एक साधरण मानव असते, ज्याला त्याच्या कर्मांमुळे "महादेव" ही पदवी लाभते. असं असतं तर इतिहासात काय झालं असतं? महादेव ही पदवी धारण करणारा धरती वरील त्याच्या कर्मामुळेच त्या पदवीवर पोहचत असेल तर?

ह्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अमीश ह्यांच्या "द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा" मधे. वास्तविक मेलुहा एक प्राचीन भारतातील उत्तर-पश्चीमेकडील (बहुतेक नैऋत्य, आपला मराठीतील दिशांचा खूप गोंधळ होतो, बुवा) एक प्रगत राज्य होतं. लोहथल, मोहन-जो-दारो, हडप्पा ही मेलुहातील शहरं. तर अमीश ह्यांनी इतिहास आणि पुराण कथा, ह्यांचा मेळ घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, हे पुस्तक इतिहास आणि दंत-कथा ह्यांच्या आधारावर लिहिले आहे.

कथेची सुरुवात होते कैलासातील मानसरोवराजवळ. दिनचर्या आटोपून शिव, त्यांचे गण आणि उरलेला कबीला संध्याकाळी थोडी विश्रांती घेत असताना पाकृती समाजातील लोकं त्यांच्यावर हल्ला करतात. ह्या पाकृती कबील्याला मानसरोवरावर स्वत:चं वर्चस्व स्थापित करायचं असतं. त्या दिवशी मेलुहातील काही सैनिक वाट हरवून शिवाच्या गणांच्या ताब्यात सापडलेले असतात. त्यांच्या सेनापतीचे नाव असते नंदी. तर हे सैनिक शिवाच्या गणांबरोबर पाकृती कबील्याच्या सैनिकांचा हल्ला परतवून लावतात. शिव ह्या रोजच्या युद्धाला पार कंटाळतो. त्यातच नंदी त्याच्या समोर एक प्रस्ताव मांडतो. तू तुझ्या कबील्या सोबत जर मेलुहाला आलास, तर ते इथल्यापेक्षा चांगलं आयुष्य जगतील. रोजच्या मारामारीला कंटाळलेला शिव कबील्याबरोबर मानसरोवर सोडून मेलुहाला येतो.

तिथे पहिल्या दिवशी त्याच्या कबील्याला औषध पाजलं जातं आणि त्यांना एका तात्पुरत्या निवासस्थानी ठेवण्यात येतं "क्वॉरंटाईन" मधे. पहिल्या रात्रीच शिवाचा अख्खा कबीला तापाने फणफणायला लागतो. केवळ शिवाला ताप येत नाही, फक्त तो घामाने डबडबून जातो. मेलुहातील वैद्य तातडीने रुग्णांची सुश्रुशा करायला लागतात. त्यांची मुख्य वैद्य शिवाला आंघोळ करायला सांगते. आंघोळ करून शिव येतो, तर त्याला आपला घसा एकदम थंड झाल्या सारखा जाणवतो. त्याला पाहून मुख्य वैद्य आश्चर्याने जवळ-जवळ बेशुद्ध होते. कारण विचारल्यास ती त्याला म्हणते, "हे प्रभू! आपण प्रकटलात!! आमचा उद्धार झाला!!"

तिचं असं बेशुद्ध पडण्याचं कारण काय? मेलुहा मधे ज्या तारणहारा बद्दल दंतकथा प्रसिद्ध आहेत, त्यात शिव बसतो का? आणि बसला तर तो नियती ने त्याच्या गळ्यात घातलेल्या कार्याला पूर्णत्वास नेण्यास तो तयार होईल का? अमीशने अतीशय सुरेख रित्या शिवाची ही कहाणी लिहिलेली आहे. शिव सर्वसाधारण माणूस असल्याने माणसाच्या सगळ्या प्रवृत्त्या त्याच्या आढळतात. उदाहरणार्थ, पुण्यवान कोण, पापी कोण, ह्याच्या व्याख्या तो स्वत: जाणून घेत नाही तर मेलुही प्रजेत रूढ झालेल्या व्याख्यांवर विश्वास ठेवतो. पण त्याला प्रत्येक टप्प्यावर जाणवतं की जे दिसतं तसं नसतं. त्यामुळे तो व्यथित होतो. त्याची ही व्यथा दूर करणारे आणि त्याला त्याच्या उद्देश्याच्या जवळ घेऊन जाणारे कोण आहेत? ह्या सगळ्या कार्या मधे सतीचा, नंदीचा आणि गणांचा काय सहभाग आहे? त्यांची भूमीका सुद्धा एकदम सुरेख पद्धतीने मांडली आहे!

द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा हे शिवावरील त्रिखंडीय पुस्तकांपैकी पहिलं खंड आहे. ह्यातला दुसरा खंड सुद्धा लवकरच बाजारात येत आहे. आणि हे पुस्तक वाचल्यावर दुसर्‍या खंडाच्या आगमनाची उत्कंठता नक्कीच वाढेल!
द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहाSocialTwist Tell-a-Friend

२ टिप्पण्या:

Naniwadekar म्हणाले...

"वास्तविक मेलुहा एक प्राचीन भारतातील उत्तर-पश्चीमेकडील (बहुतेक नैऋत्य, आपला मराठीतील दिशांचा खूप गोंधळ होतो, बुवा) एक प्रगत राज्य होतं."

श्री बावडेकर : आत्ताच सुभाषितांपासून इथपर्यंत प्रवास घडला. गफ़ार खाँ होते तो 'वायव्य सरहद्‌द प्रान्त' तुम्हाला माहीत असेलच. नसला तर लक्षात ठेवा, म्हणजे दिशांचा प्रश्न सुटला. हा प्रान्त अखंड भारताच्या उत्तर-पश्चिमेला आहे, हे सहज़ लक्षात रहातं. मग लक्ष्मणशास्त्री ज़ोशींचं स्मरण करून नकाशावर वा--ई लिहा. म्हणजे उत्तर-पूर्व = ईशान्य.
मग खालून वर असं आ-ई लिहा.
दक्षिण-पूर्व = आग्नेय.
उरलेली दक्षिण-पश्चिम ही नैऋत्य.

तुमचा ब्लॉग आवडला.

- डी एन

Vinay म्हणाले...

श्री नानिवडेकर,

तुम्ही दिशा लक्षात ठेवण्यासाठी सुचविलेल्या युक्ती बद्दल शतश: धन्यवाद. तुम्हाला ब्लॉग आवडला ही आनंदाची गोष्ट आहे! असेच परत येत रहा!!