आज परळला गेलो होतो, तेव्हा येताना मत्स्याहार करायचं ठरवलं होतं. ३-४ महिन्यांपुर्वी मालवणला गेलेलो असताना, तिकडे हॉटेल चैतन्य मधे जेवायचा योग आला होता. तेथील जेवण अतिशय उत्कृष्ट होतं. त्या वेळेस वाटलं होतं की असं जेवण मुंबईत किंवा पुण्यात मिळेल का? तोच त्या चैतन्यवाल्याने आपलं कार्ड दिलं ज्यात त्यांच्या मुंबईच्या शाखेचा पत्ता होता. मुंबईत हॉटेल चैतन्य राम गणेश गडकरी चौकात आहे. ठाकूर कटपीसच्या समोर. पण दुर्दैव असं की ते फक्त घरी घेऊन जाण्यास डबे देतात. तिकडे बसून जेवायची सोय नाही!! आणि हे त्यांच्या कार्डावर दिलं नसल्याने, तिकडे जाईस तोवर ह्याची कल्पना नव्हती. आता झाली का पंचाईत? जेवण बांधून येथे पवईला येई पर्यंत ते पूर्णपणे थंडं झालं असतं आणि थंडं मासा काय खायची इच्छा नव्हती. मग वाटलं की आजचा बेत काही पूर्ण होत नाही. म्हणून आम्ही पुन्हा दादर स्टेशनच्या दिशेने वळलो. तोच कोहिनूर मिलला लागून असलेल्या पदपथावरून दादर स्टेशनच्या दिशेने जाताना हॉटेल गोमान्तक लॉजिंग-बोर्डिंग दिसलं. ते पाहिल्यावर म्हण्टलं की आज आपल्या नशीबात मत्स्याहार आहेच. असा विचार करून आत शिरलो. जागा पण लगेच मिळाली. पहिल्यांदाच आलेलो असल्याने, काय मागवायचे हे कळत नव्हते. म्हणजे इथला चांगला पदार्थ कुठला, अथवा ह्या हॉटेलची खासियत काय, हे काहीच माहित नव्हतं. अशा वेळेला, आई-बाबांचा हुकूमी एक्का वापरला. थाळी मागवली!! विचारलं, पापलेट थाळी आहे का? वेटर हो म्हणाला. मग काय, पापलेट थाळीची ऑर्डर दिली. आणि ऑर्डर देते वेळेस लक्षात होतं की कोकणात चपात्यांपेक्षा "वडे" केव्हाही चांगले. म्हणून त्याला सांगितलं की थाळी मधे चपाती नको, वडे दे. हॉटेल मधली सेवा तत्पर आहे. खाद्यपदार्थांचे दर सुद्धा वाजवी आहेत. एवढ्या मोक्याच्या ठिकाणी असून देखील दर सर्वसामान्यांना परवडण्याजोगे आहेत. फक्त आतील विद्युत रोशणाई जरा सुधारली तर बरं होईल. वेटर सुद्धा संध्याकाळी नऊ वाजता प्रसन्न चेहर्याने वावरत होते. माश्याची थाळी, वड्यां सकट, १५ मिनिटात आली!! ४ वडे, एक मध्यम आकारचं पापलेट, कालवण, कांदा-लिंबू, सोल-कढी आणि भात. मी पण जोरात ताव मारला. भूक तर लागलीच होती. पापलेट चवीला चांगलं होतं. मुळात मासा चांगला होता. सोल-कढी सुद्धा चांगली होती. आणि मुख्य म्हणजे हे सगळं वट्ट ११८ रुपयात. एवढं जेवल्यावर दादर स्टेशनला आलो. लाजरी शेजारच्या पानाच्या टपरीवर पान खाल्लं. आणि फलाटावर येऊन कुल्फी खाल्ली. तेवढ्यात ठाणे लोकल आली. ती रिकामी पाहून चटकन त्यात उडी मारून घरच्या प्रवासाला लागलो.
रविवार, जून ०६, २०१०
गोमंतक लॉजिंग-बोर्डिंग हॉटेल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा