शुक्रवार, जुलै ०२, २०१०

विश्वकरंडक आणि विश्वयुद्ध

फुट्बॉलची २०१० फिफा विश्वकरंडक स्पर्धा ११ जूनला दक्षिण आफ्रिकेत चालू झाली. हा फुटबॉलचा महाकुंभ चालू झाला आणि तुलनांचा महापूर सुद्धा चालू झाला. सगळ्यात लोकप्रिय ठरली ती फुटबॉलची आणि द्वितीय विश्वयुद्ध (महायुद्ध) ह्यांची.

खरं तर हा पोस्ट लिहायला उशीर झालाय, पण उशीरा का होईना, पोस्ट केलं पाहिजे. आज (शुक्रवार, दि. ३ जुलै) पासून उपांत्य-पूर्व सामने चालू होतील. पण जरा तुलना करुया विश्वयुद्ध आणि इंग्लंड-जर्मनी ह्यांच्यातला २७ जूनला झालेल्या बाद फेरीतल्या सामन्याचं.

समानता:
  1. "ब्लिट्झक्रेग"चा वापर: द्वितीय विश्वयुद्धात, जर्मन सैन्यानं सुरवातीच्या काळात ब्लिट्झक्रेग अर्थात विद्युत गति युद्ध तंत्र अवलंबून अनेक विजय संपन्न केले होते आणि शत्रु-पक्षास जेरीस आणले होते. ह्या सामन्यात देखील जर्मनीच्या मिड-फिलडर्स आणि स्ट्रायकर्सनी असंच विद्युत गतिचा खेळ करून इंग्लंडच्या बचाव फळीला पेचात पकडलं. क्लोसंने जर्मनी साठी केलेला दुसरा गोल पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल. आणि ६९ व्या मिनिटांत ओझीलने मिड-फिल्ड मधून जर्मनीच्या डी-बॉक्स पर्यंत केलेल्या दौडीने इंग्लंडच्या बचाव फळीला भांबावून सोडलं होतं. त्याचा फायदा घेऊन म्युलरने गोल केला.
  2. सुरवातीचं जर्मन वर्चस्व: विश्वयुद्धाप्रमाणेच सामन्यातही सुरवातीला जर्मन वर्चस्व होतं. इंग्लंड कडे जरी बॉलचं पोसेशन अधिक वेळ असलं तरी जर्मन स्ट्रायकर्सनी इंग्लंडच्या बचाव फळीला जरा सुद्धा उसंत घेऊ दिली नाही.
  3. एका व्यक्तिचं वलय: द्वितीय विश्वयुद्धात इंग्लंडची सर्व दारोमदार विंस्टन चर्चिल नावाच्या झुंजार नेत्यावर होती. ह्या विश्वचषकात इंग्लंडची दारोमदार वेन रूनी वर होती. दुर्दैवाची गोष्ट अशी, की दोघांचे ही इंग्रजी लिपीतील नाव "W" वरून चालू होत असले, तरीही रूनी चर्चिल सारखा प्रभावी ठरला नाही. त्याची खेळी निष्प्रभ ठरली.
  4. म्युनीक मधील जर्मन नेतृत्व: द्वितीय विश्वयुद्धात जर्मनीचं नेतृत्व करणार्‍या हिटलरची राजकीय कारकिर्दाची सुरवात म्युनीक शहरातच झाली होती. जर्मन संघाचा कर्णधार फिलिप लामची कारकिर्द सुद्धा बायर्न म्युनीक क्लब तर्फे खेळताना बहरली. राष्ट्रीय़ स्तरावर नाव गाजवण्या आधी दोघांनी ही म्युनीक मधे नाव कमावलं होतं.
  5. त्रयस्थ संगठनांचा कमकुवतपणा: लीग ऑफ नेशन्सच्या कमकुवत आणि नेमस्त स्वभावामुळे जर्मनीला मोकळं रान मिळालं होतं आणि ही गोष्ट त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी कारणीभूत ठरली. सामन्यात सुद्धा रेफरी आणि लाईन्समनचे हात बांधले असल्या कारणाने त्यांनी लॅम्पार्डचा गोल नामंजूर केला. त्यामुळे इंग्लंडला धक्का बसला आणि जर्मनीचं मनोबल वधारलं.

विषमता:
  1. जर्मन वर्चस्व कायम: विश्वयुद्धात जरी जर्मनीचं वर्चस्व निवळून मित्र राष्ट्रांचं स्थापित झालं असलं, तरी सामन्यात जर्मनीने शेवट पर्यंत वर्चस्व कायम राखलं.
  2. इंग्लिश खाडी: विश्वयुद्धात ही खाडी इंग्लंड साठी एक नैसर्गिक सुरक्षात्मक खंदका सारखी होती. पण सामन्यात जर्मन स्ट्रायकर्स आणि इंग्लिश बाचाव फळीतल्या खाडी एवढ्या अंतराचा जर्मन खेळाडूंनी पुरेपूर फायदा उचलला.
  3. अमेरिकेची भूमिका: विश्वयुद्धात अमेरिकेने इंग्लंडला मदत करून जर्मनीचा पराभव केला होता. पण ह्या विश्वकरंडक स्पर्धेत अमेरिके मुळेच इंग्लंडला जर्मनीला सामोरं जावं लागलं. पात्रता फेरीत जर अमेरिकेने इंग्लंडला १-१ च्या बरोबरीत रोखलं नसतं तर त्या दिवशी अमेरिका जर्मनी बरोबर खेळत असती आणि इंग्लंड घाना बरोबर.
विश्वकरंडक आणि विश्वयुद्धSocialTwist Tell-a-Friend

1 टिप्पणी:

Devendra म्हणाले...

प्रिय विनय,
तुला आठवत असेलच अस नाही पण मराठी ब्लॉगरच्या मुंबई मेळाव्यात आपण आजुबाजुला बसलो होतो. तोच मी. तुझा ब्लॉग मी नंतरच्या ३-४ दिवसात वाचला होता पण त्यावर काहीच टिपण्णी केली नव्हती. आज ठरवल की तुझ्याशी परत संपर्क साधायचा. त्यासाठी मग तुझ्या ब्लॉग शिवाय दुसरा पर्यायच नाही.
कुमार केतकरां सारखे विचारवंत आपल्यातच का बर असावेत. इंग्रजी वर्तमानपत्रात मराठी माणसां बद्दल इतक गरळ ओततात त्या वेळी हे विचारवंत गप्प का असतात?.
कोणीही यावे टिकली मारुन निघुन जावे अस का होत? मला अस वाटत की केतकरां सारख्यांना अनुलेखान मारण हाच चांगला उपाय आहे. नाहीतरी लोकसत्तेचे माजी संपादक या शिवाय त्यांची दुसरी ओळख काय आहे.
असो.
कॉपीराईट बद्दलचा तुझा लेख माझ्या नवोदिताला छान मार्गदर्शन करणारा आहे. फ़ुटबॉलच्या सामन्याच जरा वेगळ्या पद्धतीने केलेल विष्लेषण मला आवडल. संपर्कात राहण मला आवडेल आणि तुलाही. लिहीण्याच आळस मला आहे म्हणुन कधी वेळ लागेल पण संपर्कात राहण्याचा माझा प्रयत्न नक्किच असेल