सोमवार, ऑगस्ट ०९, २०१०

हरवलेला रविवार

फार नाही, अगदी १५-२० वर्षां पुर्वी पर्यंतची गोष्ट आहे. रविवारी सकाळी लवकर उठून (ह्या बद्दल हल्लीच्या पिढीला खूपच आश्चर्य वाटणे सहाजिक आहे) आईच्या पहिल्या चहापेक्षा वाट बघितली जायची ती कधी एकदा त्या टी. व्ही. वरच्या सकाळच्या हिंदी बातम्या संपून रंगोली चालू होत आहे, ह्याची. जुनी-नवीन संमिश्र गाण्यांचा आस्वाद घेण्यात चांगला पाऊण तास निघून जायचा. टी. व्ही. चा आवाज त्या दिवशी जरा मोठा असायचा, कारण आंत मधे सकाळची न्याहरी बनविताना आईला पण गाणी ऐकायची असायची.

न्याहरी आणि आंघोळ हे सगळं एकतर सकाळी नऊच्या आंत किंवा तडक साडे-दहा नंतर उरकायची. कारण सकाळी नऊ ते दहा, आधीच्या काळात रामायण लागायचं. त्यावेळी, असं म्हणतात की बाजारं ओस पडलेली असायची (बघायला कोण गेलंय?, आम्ही रामायण बघत बसायचो). खरी मजा तर गावाला असताना यायची. त्याकाळी सगळ्यांकडे टी.व्ही. नव्हता. केवळ मोजक्या घरांमधे असायचा. मग शेजार-पाजारचे, घरी कामाला असलेल्या बायका, वगैरे, सगळ्यांची मैफल जमायची. कैकेयीने रामाला वनवासात धाडण्यासाठी जेव्हा दशरथाकडे गार्‍हाणं घातलं, तेव्हा तिला बायकांनी बोटं मोडून शिव्या घातल्या होत्या (मेली कपाळ-करंटी , कड-कड (बोटं मोडल्याचा आवाज) आणि तत्सम). नंतरच्या काळात महाभारताचे वेड लागले होते. वेड म्हणावे का ध्यास? कारण आजी-आजोबांपासून ते ५-६ वर्षांच्या नातवंडांपर्यंत सगळेच अगदी तन्मयतेने बघायचे. राम वनवासात निघाला, तेव्हा कौशल्या आणि सुमित्रा बरोबर अनेक देशवासीयांनी (विशेषत: स्त्रियांनी) अश्रू ढाळले होते. अखेरच्या लढाईत, रावण पडल्यावर वानरसेने इतकाच जल्लोष बच्चे कंपनीने देखील केला होता. शाळेत जास्ती करून युद्ध-प्रसंगांची चर्चा रंगायची. करुण रसातील प्रसंग बहुधा शाळेतील आम्हा मुलांच्या डोक्यावरूनच जायचे.

ते संपलं, की दहा वाजता मुलांसाठी कार्यक्रम. कार्टून शो. 'गायब आया' हे भारतीय दूरदर्शन वरील सगळ्यात पहिलं कार्टून. त्यानंतर जंगल बुक, डक टेल्स, टेल्स्पिन, पोटली बाबा की, ह्या कार्यक्रमांनी लहान मुलांना अक्षरश: एका वेगळ्याच विश्वात फिरवून आणलं. रामायण-महाभारतवरच्या चर्चांच्या सोबत ह्या कार्यक्रमांची सुद्धा शाळेत मुलं पोस्टमॉर्टेम करीत.

आणि एकदा का ११:०० वाजले, की सगळे आपापल्या कामाला लागायचे. आई, दुपारच्या जेवणाच्या तयारीला; बाबा रविवारचा पेपर वाचायला आणि मुलं खेळणे, किंवा उरलेला गृहपाठाला लागायची. दुपारी सगळं उरकलं की दीड वाजता प्रादेशिक भाषेतील चित्रपट लागायचे. त्यातील काही खूप चांगले असायचे. आता काही आठवत नाही, पण काही चांगले बंगाली सिनेमे बघितले होते त्याचावर. आम्ही ग्वाल्हेरला असताना, मराठी चित्रपट दिसायची ही एकच संधी होती. सर्जा चित्रपट आम्ही असाच एकदा पाहिला होता. आणि तो आधी सुद्धा बघितला असल्या कारणाने तो किती आणि कुठे कापलाय ह्याचीपण चर्चा रंगायची.

दुपारचा चहा झाला, की संध्याकाळी प्रादेशिक सिनेमा लागयचा. म्हणजे, महाराष्ट्रात मराठी सिनेमा, गुजराते गुजराती आणि हिंदी-भाषिक राज्यांमधे हिंदी सिनेमे लागायचे. साप्ताहिकीत कळलेलं असायचं की रविवारी संध्याकाळी कुठला सिनेमा लागणार आहे. त्यामुळे चांगला सिनेमा असेल, तर बाहेर जायचा मोह टाळण्यात यायचा.

रात्रीच्या जेवणानंतर, इंग्रजी बातम्यांच्या नंतरची वेळ सरकारने खास इंग्रजी कार्यक्रमांसाठी राखून ठेवलेली होती. स्ट्रीट हॉक, नाईट रायडर, येस मिनिस्टर आणि पुढे यस प्राईम मिनिस्टर, हे चांगले दर्ज्याचे कार्यक्रम बघायला मिळाले. आणि सगळ्यात शेवती रात्री दहा वाजता "द वर्ल्ड धीस वीक". जागतिक घडा-मोडी सांगणारा प्रणय रॉय चा (तोच तो, एन. डी. टी. व्ही. नामक न्यूज चॅनल सारखं काहीतरी चालवणारा) हा कार्यक्रम जागातील अनेक बातम्या आपल्या घरात आणून द्यायचा. आणि ह्या कार्यक्रमाच्या शेवटी लागणारी ती डनलॉप टायरची जाहिरात. हे सगळं झालं, की रविवार संपायचा. आणि पुढच्या रविवार उगवण्याची वाट बघणं सुरू व्हायचं.

आता ती सगळी मजा गेली. शंभर वाहिन्या आलेल्या आहेत, पण कार्यक्रम तेव्हा सारखे वाटत नाहीत. रविवार सकाळ, म्हणजे गेल्या आठवड्यातील कार्यक्रमांची रिव्हिजन करणे असच झालंय. त्यात आता न्यूज चॅनल वाले तर गेल्या आठवड्यातील कॉमेडी आणि डान्स शोस दाखवून आपल्या मतांची पिंक टाकत असतात. चित्रपटांचे सुद्धा ७-८ चॅनल्स असल्याने बहुदा सगळेच चित्रपट बघून झालेले असतात. आवर्जून रविवारी वाट बघून पहावा, असा एकही चित्रपट उरला नाही. मग काय, बीग-बी फेस्टीवल, सुपरस्टार उत्सव वगैरे चालू केले आहेत. पण आता काही रविवारी सकाळी रस्ते ओस पडत नाहीत. उलट उधाण येतो. शाळेत रविवारच्या कार्यक्रमा ऐवजी काल कुठल्या मॉल मधे खरेदीला गेलो ह्याची चर्चा होते. आणि रविवारी सकाळी लवकर उठण्याची सवय सुद्धा मोडली आहे.
हरवलेला रविवारSocialTwist Tell-a-Friend

६ टिप्पण्या:

Balaji म्हणाले...

Very good post... ekdum refresh zaalya aathavani

हेरंब म्हणाले...

खूप छान पोस्ट.. शेवट तर खुपच मस्त झालाय..

Vinay म्हणाले...

@बालाजी आणि हेरंब,

आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद!

नागेश देशपांडे म्हणाले...

खरं आहे कदाचित रविवारी सकाळी लवकर न उठायची सवय या १०० चॅनलमुळेच लागली असेल.

अहो गेल्या ५ वर्षातील एखादा ही रविवार आठवत नाही.
मात्र १५ वर्षापूर्वीचे जवळपास सर्व रविवार मजेशीर असायचे. तेव्हा ब्रेड हा फक्त रविवारी घरात यायचा, आई प्रत्येकाला दोन-दोन कप चहा आणि हा ब्रेड सर्व भावंड वाटून द्यायची. रंगोली, रामायण, टर्नींग पॉईंट, सिग्मा पाहतांना खुप मजा यायची.

आज १०० चॅनल आहेत मात्र मनोरंजन नाही, नुसता टीआरपी आहे...

dreamer म्हणाले...

Hey Vinay...I loved this post..I got to know about it through Sush's blog.. We have never met but I have heard a lot about you and we have a lot of common friends :) Going through your blog I get the feeling that we are like minded people ..Check out my blog whenever you get time

Vinay म्हणाले...

@Mugdha,

Thanks for your comments!! Having been going through your blog and get the same feeling as you do.