सोमवार, ऑक्टोबर २५, २०१०

खेळ अनेक, कोच फक्त एकनुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धे नंतर  प्रत्येक क्रीडा संगठनेची स्वतंत्र बैठक झाली. राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या खेळात खेळाडूंनी काय पराक्रम गाजवले याचा आढावा घेण्यासाठी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाची बैठक भरली. सुरेश कलमाडी जरी सध्या CWG मधील घोटाळ्यांच्या वादात अडकले असले, तरी ते भरतीय ऑलिम्पिक संगठनेचे अध्यक्ष म्हणून बैठकीला हजर होते. कुस्ती, मुष्टी-युद्ध आणि नेमबाजी (दोन्ही, बंदूकीची आणि धनुष्य बाणाची) मधील कर्तबगारीने SAI वाले खुश होते. अथलेटिक्स मधे सुद्धा भारताने समाधानकारक कामगिरी केली होती. आताच्या बैठकीचा मुख्य अजेन्डा होता मिशन एशियाड.

बहुतांश खेळाडूंनी दमदार कामगिरी केली असली, तरी त्यांचा चीन सारख्या देशा समोर निभाव लागणे कठीण आहे, हे सर्वांना माहित होते. केवळ काही निवडक खेळांमधे आपली सरशी आहे, हे माहित होते. खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय हवी म्हणून काय करता येईल, ह्याचा विचार चालू होता. तेवढ्यात, कुणाच्या तरी डोक्यात ही भन्नाट कल्पना आली. SAI आणि IOA च्या अधिकार्‍यांना ही फेअर & लवली ची जाहिरात दाखवली. एक सावळी मुलगी, जिला सायकलिंग बर्‍यापैकी येतं, पण त्यात पैसा नाही. आणि तिची स्वप्नं पण खूप मोठी. म्हणून ती हे क्रीम लावायला सुरवात करते. ते क्रीम लावल्याने ती सावळ्याची एकदम गोरी होते. गोरी झाल्याने तिचा आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास आल्याने, तिला फारसा सराव न करता सुद्धा सायकलिंगची स्पर्धा जिंकता येते. एवढच नव्हे, तर स्पर्धा जिंकायला तिला थोडा सुद्धा घाम गाळावा लागत नाही. स्पर्धेचा शेवट बघा ना, ती एवढी ताजी-तवानी वाटते, की जणू आत्ताच स्पर्धा चालू झाली आहे. आणि, ती केवळ जिंकत नाही, तर कुठल्यातरी कम्पनीच्या ब्रॅन्ड अम्बॅसेडरचं कंत्राट पण मिळवते.

पण अधिकार्‍यांना फार काही पटेना. मग त्यांना ह्या क्रीमच्या इतर जाहिराती दाखवण्यात आल्या. त्यातही तसच. मुलगी सावळी, क्रीम लावलं की आत्मविश्वास वाढतो, मग तिला हवी असलेली नोकरी मिळते आणि यशस्वी होते. बाकी काही करावं लागत नाही. क्रीम लावायचं, यशस्वी व्हायचं. क्षेत्र अनेक, यशस्वी होण्याची गुरुकिल्ली एक-- फेअर & लवली क्रीम.

आतील गोटातली बातमी अशी आहे, की सर्व अधिकार्‍यांना ही आयडीया आवडली. कुठलाही खेळ जिंकण्यासाठी फार काही करावं लागणार नाही. केवळ फेअर & लवली चे ठराविक डोस चेहर्‍यावर फासले, की सुवर्ण पदक आपले!! तर, एशियाड मधील सर्व खेळांसाठी ह्या कंपनीला कोच बनवण्याचं जवळ-जवळ निश्चित झालं आहे. फेअर & लवली बनवणारी कंपनी प्रत्येक टीम बरोबर आपला एक माणूस नेमणार. ह्या कोचचं काम असं की खेळाचा सराव चालू होण्या अगोदर त्याने/तिने खेळाडूंना सर्वाधिक फायद्यासाठी हे क्रीम कसं लावायचं ह्या बाबतीतलं मार्गदर्शन करायचं. 

भारतीय ऑलिम्पिक संगठनेचे अध्यक्ष श्री सुरेश कलमाडी (राष्ट्रकुल गेम्स फेम) ह्यांचं म्हणणं असं आहे की ह्या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड बघता त्यांनीच आमच्या खेळाडूंना प्रशिक्षित करावं. ह्या कंपनीचं अचूक प्रशिक्षण लाभलं तर ह्यावेळचं एशियाड हे पदकांच्या बाबतीत भारताचं सर्वात यशस्वी एशियाड ठरेल, ह्या बाबत शंका नाही!! कलमाडींवर विश्वास ठेवायला हरकत नाही, असं अनेक खेळाडूंचं म्हणणं आहे. कारण अर्धवट पूर्ण झालेल्या इमारती आणि राष्ट्रकुल खेळ तोंडावर असताना सुद्धा कलमाडींनी वचन दिलं होतं की ह्या वेळचं राष्ट्रकुल स्पर्धा अविस्मरणीय ठरतील आणि त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं.

ह्याबाबतीत फेअर & लवली कंपनीच्या प्रवक्तेंनी काही बोलण्यास नकार दिला. कंत्राट बहाल झाल्याशिवाय आपण ह्या विषयी काही बोलू शकत नाही, पण बहाल झालाच तर देशाच्या प्रतिमेसाठी आम्ही आमच्या सर्व क्रीमच्या ट्यूब्स खेळाडूंच्या चेहर्‍यावर फासण्यासाठी पाठवून देऊ, असं ते म्हणाले.
खेळ अनेक, कोच फक्त एकSocialTwist Tell-a-Friend

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: