रविवार, एप्रिल १७, २०११

का पूजितो त्यास आम्ही??

भारताने क्रिकेट विश्व चषक जिंकल्यावर पुन्हा एकदा एकच चर्चा पुढे आली. ह्या देशात क्रिकेट खेळ नसून धर्म आहे. आम्ही इतर खेळांना तेवढे प्राधान्य देत नाही, वगैरे, वगैरे. क्रिकेटच्या अनुयायांनी पुन्हा जुन्या घोषणा उफाळून आणल्या. "Cricket is my religion, Sachin is my God." क्रिकेट हा धर्म असेल, तर सचिन आमुचा दैवत आहे. महेन्द्र ढोणी पासून जहीर खान पर्यंत आणि शेजारच्या पान टपरीवाल्या पासून ते पंचतारांकित हॉटेल मधील हेड-शेफ पर्यंत सगळेच असे म्हणतात. आणि ते योग्यच आहे.

अनेक विचारवंत असंही मत मांडतात, की क्रिकेटच्या वेळी देशात जी एकता दिसून येते, ती पुढे पण टिकली पाहिजे. पण हल्लीच्या वातावरणात, क्रिकेट शिवाय दुसरी कुठली गोष्ट आम्हाला एकत्र आणू शकणार आहे? राजकारणी स्वत:ची झोळी भरण्याच्या नादात गुंतले आहेत. एका मागून एक घोटाळे बाहेर निघत आहेत. आणि ह्या घोटाळ्यां मधे कुणालाही आज पर्यंत शिक्षा झालेली नाही! ह्या घोटाळ्यांचं नुकसान बघितलं की धडकीच भरते. ७०,००० कोटींचा कॉमन वेल्थ घोटाळा काय, १,७६,००० कोटींचा स्पेक्ट्रम घोटाळा काय. आता बहुतेक आकडे सुद्धा संपतील ह्या घोटाळ्यांचं आकलन करण्या साठी. ६४ कोटींचा बोफोर्स घोटाळा त्या मानाने अगदी लहान मुलांचा खेळ वाटायला लागलाय. भ्रष्टाचाराचा राक्षस सगळीकडे फोफावलाय. 

हे काय कमी होतं, तर मतांचं राजकारण खेळत, राजकारण्यांनी जनतेला जातीयवादात  अडकवलं आहे. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला जातीत आणि प्रातांत अडकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मतं पाहिजेत म्हणून कधी मराठांना हाताशी धरलं तर कधी दलितांना, तर कधी सर्वांना एकत्र घेण्याची घोषणा झाली. दर पाच वर्षांनी पुन्हा तोच जाहिरनामा वाचून दाखवायचा आणि नवीन स्वप्न दाखवायची. भंग झालेल्या स्वप्नांचं दु:ख ह्यांना होत नाही, त्याचं वाईट वाटत नाही.

सरकारी अधिकारी एक कागद इकडचा तिकडे करायचे पैसे मागतो. तुमच्या हक्काचे पैसे आणि सवलती मिळविण्यासाठी तुम्हाला त्यांचा खिसा गरम आणि तुमचा खिसा रिता करावा लागतो. APMC मधील व्यापारी, माथाडी कामगार मिळून शेतकरी व ग्राहक, दोघांना लुटतात. रिक्षावाला पाहिजे त्या ठिकाणी यायला तयार नसतो, बस-कंडक्टर नेहमीच सुट्टे पैस्यांवरून वाद घालतो. एवढं सगळं निराश वातावरण आजू-बाजूला असताना, माणसानं प्रेरणेसाठी आणि दिलास्यासाठी कुठे बघावं?

आणि म्हणूनच मैदानावर स्वत:च्या कर्तबगारीने जग जिंकणार्‍या सचिन तेंडुलकर कडे आम्ही सगळेच भक्तिभावाने पाहतो. गेली २१-२२ वर्षं त्याने भारतीय क्रिकेटची धुरा एकट्याने संभाळली आहे. सचिन म्हणजेच भारतीय क्रिकेट, हे समीकरण अगदी हल्ली पर्यंत होतं. मॅच फिक्सिंगच्या घृणास्पद काळात सुद्धा त्याचावर कुणीही संशयाचं बोट सुद्धा ठेवू शकलं नाही. तो जेव्हा फलंदाजीसाठी क्रीजवर येतो, तेव्हा अखंड भारताच्या आशा घेऊन येतो, सफल झाला तर कित्येक कोटी लोकांना आपल्या रोजच्या कटकटीच्या जीवनातून आनंद मिळतो. पण असफल ठरला, तर कित्येकांना निराशेत बुडवू शकतो. त्याचं देवा सारखंच आहे. देव सुद्धा दर वेळेला आपल्या इच्छा पूर्ण करतोच असं नाही. आणि केल्या तरी, त्या पाहिजे त्या वेळेसच पूर्ण होतील असं ही नाही. बघा ना, सचिनचं शंभरावं शतक पाकिस्तान विरुद्ध यावं, अशी इच्छा असताना, ती पूर्ण झाली नाही. त्याने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक ठोकावं ही इच्छा सुद्धा अपूरी राहिली. पण भारताने सामना जिंकावा, ही आपली इच्छा त्याने वारंवार पुरी केली आहे. त्याचाकडे क्रिकेट बद्दल कुठलाही नवस बोला, तो अनेक वेळा नवसाला पावतो.

अंधुक वाटणार्‍या परिस्थितीत तो, काही क्षणासाठी का होईना, आनंदाचा प्रकाश घेऊन येतो. आणि म्हणूनच तर तो आम्हाला पूजनीय वाटतो. केवळ युद्ध झालं तरच, आम्ही सगळे भारतीय एकत्र येऊन भारतीय सैन्याला आणि देशाला पाहिजे ती मदत करू. पण युद्ध कुणाला हवं आहे?
का पूजितो त्यास आम्ही??SocialTwist Tell-a-Friend

३ टिप्पण्या:

हेरंब म्हणाले...

छान लिहिलंय.. १०१% सहमत !!

फक्त एकच विनंती. 'त्या' ब्लॉगची लिंक काढून टाकता आली तर बघा.. असल्या ब्लॉग्जना अनावधानानेही प्रसिद्धी मिळायला नको. धन्यवाद.

Vinay म्हणाले...

हेरंब,
विनंती मान्य! "त्या" ब्लॉगची लिंक काढून टाकण्यात आली आहे.

तुझ्या टिप्पणी साठी धन्यवाद.

Sagar Kokne म्हणाले...

सचिन माझा लाडका....आणि सगळ्यांचाच...!