सोमवार, ऑगस्ट २६, २०१३

राज बब्बर: self-contracdicting नेता

राज बब्बर ह्यांच्या सिनेमा कारकिर्दीत फार काही उल्लेखनीय घडलं नाही. मुळात त्याचे सिनिमे बघून, हा माणूस कसं काय अभिनेता बनू शकतो, असंच वाटायचं. त्यात हे भाऊ आता खासदार आहेत. आधी समाजवादी होते, आता कांग्रेसचे सेक्युलर खासदार आहेत. भारतात खासदार झालात की तुम्ही वस्तुस्थिती पासून दूर जाता. ज्या जनतेचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, ती जनता काय परिस्थितीत रहाते, ह्याचा अनेक खासदारांना विसर पडतो. बरोबर आहे, आजच्या जमान्यात संसदेच्या उपाहार गृहा मध्ये रु. १.५० ला चहा आणि रु. १५ पेक्षा कमी किमतीत बिर्याणी खायला मिळत असताना बाहेरच्या हॉटेल मधल्या किमती कशाला माहित असतील? बरं, हे बाहेर गेले जरी जेवायला तर खासदार साहेबांकडून बिल कोण घेणार? घेतलं तर ह्यांचा अपमान होतो आणि तो न सहन झाल्याने ते आणि त्यांचे समर्थक हॉटेल वाल्याला त्याची "जागा" दाखवून देतात. 

असो, पण बब्बर साहेब फ्लॉप का राहिले? ह्याचे उत्तर ह्या दोन विडिओ मध्ये कळेल.

ह्या विडिओ मध्ये बब्बर साहेब म्हणतात की मुंबई (त्यांची बंबई) मध्ये ते रु. १२ मध्ये पोट भरून जेवू शकतात. आणि हे घरात नाही बरे, तर बाहेर कुठल्या तरी खानावळीत किंवा हॉटेल मधे. आणि काय जेवू शकतात तर, भरपूर भात (त्यांचा हाता कडे बघा म्हणजे तुम्हाला किती भात मिळतो ते कळेल), आमटी, सांबर आणि थोडी भाजी!! अबब, एवढे जेवले तर माणूस दुपारची एक वामकुक्षी काढू शकेल!! पण हे हॉटेल कुठे आहेत मुंबई मध्ये, ते सांगणे मात्र त्यांनी हुशारी ने टाळले.


पण, त्यांना जेव्हा कळाले की आपली काही तरी चूक झाली आहे, तेव्हा त्यांनी जे स्पष्टीकरण दिले, ते तर अजूनच अचाट आहे. मुळात त्यांना लक्षात आलं कि ते शहर जेव्हा खरंच "बंबई" होतं, तेव्हा रु. १२ मध्ये जेवायला मिळत असे. पण आता हे मुंबई आहे आणि तिकडे एवढ्या स्वस्तात जेवण मिळणे कठीण आहे. त्या नंतर साहेबांनी हे पुचाट स्पष्टीकरण दिले.



ह्यात भाऊंच सांगणं असं की  रु. १२ मध्ये २ तंदूर रोटी (कारण त्या मोठ्या असतात), अर्धी प्लेट दाल (आमटी) आणि १ चमचा भाजी खाऊ शकतो. कसं काय? तर हॉटेल वाल्याकडे १ च्या ऐवजी १/२ प्लेट दाल मागायची, आणि १ प्लेट भाजी ऐवजी १ चमचा मागायची!! असं काही द्यायला हॉटेल वाला तरी तयार होईल का? आणि त्यापूर्वी भात, सांबर आणि भाजी खाणारा बब्बर आता रोटी-दाल वर का आला? की भात-सांबर रु. १२ मध्ये मिळणार नाही ह्याची त्याला प्रचीती झाली? हा माणूस(?) स्वतःच्याच विधानाला खोडून काढत आहे! अरे तू जसा हॉटेल वाल्या कडे १ चमचा भाजी, १/२ प्लेट दाल मागत आहेस ना, तसंच लोकांनी योजना आयोगाच्या  माणशी र. १००० (शहरा मध्ये) महिन्याच्या बजेटला रु. ३३ दिवसाला असे विभागले! साधे गणित जमू नये की काय? तसेच गावाकडे माणशी रु. ८१६ च्या महिन्याच्या बजेटला रु. २६ दिवसाला असे विभागले. हे जर तू नाकारत असशील तर तुझ्या सारखा नाकर्ता कुणीच नाही असे म्हणावे लागेल. आणि हे आकडे चूक की बरोबर हा वाद मी घालू इच्छीत नाही, पण हे योजना आयोगाचे आकडे आहेत.

बब्बरचे चित्रपट थेटर मध्ये जाऊन बघण्या सारखे तर अजिबात नव्हते! पण, तरी त्याला सांगितलं की तुझा चित्रपट ३ तासांचा आहे. त्याचे तिकीट त्या काळी रु. २० असायचे. त्यातील आम्हाला फक्त गाणी बघायची आहेत. ती गाणी १/२ तासाची आहेत. तर तू  रु. ३ मध्ये आम्हाला तुझ्या चित्रपटातील गाणी बघू देशील का? तो तयार होईल का? तुम्हा खासदारांना जर सांगितले की तुम्ही जेवढा वेळ संसदेत चर्चा कराल, तेवढ्या वेळाचाच पगार घ्यायचा. तू तयार होशील का? नाही ना!! अनेक ठिकाणी प्रो-राटा (pro-rata) तत्वा वर गोष्टी घेता येत नाहीत. हॉटेल सुद्धा त्यातील एक जागा आहे. मग ज्या गोष्टी करणे शक्य नाही, त्या तू गरिबांना तरी कशाला करायला सांगतोस रे बाबा? 
राज बब्बर: self-contracdicting नेताSocialTwist Tell-a-Friend

सोमवार, मार्च १८, २०१३

आसाराम बापूंचे आध्यात्मिक थोतांड!!

आसाराम बापूं बद्दल मला पहिल्या पासून विशेष प्रेम नव्हते. कारण अनेक वर्षांपूर्वी आमची आई त्यांचे टी. व्ही. वरील कार्यक्रम सकाळी-सकाळी बघायची आणि त्यामुळे आमची झोप मोड व्हायची. त्यामुळे ह्या महाभागाचा मी फार काळ पाठलाग केला नाही. आणि गेल्या काही महिन्यातील त्यांची कृत्य बघता त्याना लहानपणीच सोडले ह्याचा आता मला आनंद होतो. "भाऊ" म्हणून विनंती केली असती तर दिल्लीतील त्या मुलीचा बलात्कार त्या इतर मुलांनी केला नसता, अशी मुक्ताफळं उधळल्यावर तर माझी खात्रीच पटली की हा माणूस आध्यात्मिक असूच शकत नाही. ज्यांना आपल्यातील पाशवी वृत्तींना काबूत ठेवता आले नाही, अश्या माणसांना दोषी न ठरवता, ह्या महाभागांनी त्या असहाय मुलीलाच दोष दिला. वर सल्ला, की बलात्कार होत असेल तर देवाचे नाव घ्या आणि बलात्कारी माणसाला भाऊ म्हणून हाक मारा. अहो कशाला त्या नात्याला दुषित करत आहात?

ह्याच आसाराम बापूंनी पर्वा नागपूर मध्ये होळी खेळण्याच्या नावा खाली पाण्याची अक्षम्य नासाडी केली. महाराष्ट्र राज्य भीषण दुष्काळाने ग्रस्त असताना होळी साठी पाण्याची एवढी नासाडी करायची हे शिकवण कुठल्या आध्यात्माच्या पुस्तकात किंवा लिखाणात सापडली? राज्यात जिथे अनेक गावां मध्ये लोकं पाण्यासाठी वणवण भटकत आहेत, पाण्या अभावी जनावरे मृत्युमुखी पडत आहेत, तिथे हे महाभाग आणि त्यांचे शिष्यगण पाण्याची होळी खेळण्यात धन्यता मानत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकी कडे पाणी वाचविण्याची कळकळीने विनंती करत असताना, हे बापूजी पाण्याची नासाडी करण्यात धन्यता मानतात. वर आडमुठेपणा, आम्ही पाण्यानेच होळी खेळणार!! म्हणे "केवळ" ६००० लि. पाणी वापरले. बापू, एवढ्या पाण्यात U.N.च्या संकेतांनुसार जवळ-जवळ ५० लोकांची दिवसाची पाण्याची गरज भागू शकते!! दुष्काळ जन्य  परिस्थिती लक्षात घेता त्यांची २ दिवसांची गरज भागू शकते. आहात कुठे? आणि तुम्ही हे पाणी मोकळ्या मैदानावर उडवून लावले! शिवाय ह्या पाण्याने माखालेल्यांनी ते घालविण्यासाठी पुन्हा आंघोळ केली आणि अतिरिक्त पाणी वापरले ते वेगळेच. म्हणे काय तर होळी खेळल्याने लोकांचे आजार दूर होतात. वा रे, डॉक्टर! हे तुमच्या कडून आधी कधी नाही ऐकले. तुमच्या बरोबर होळी खेळायला आलेल्या भक्तांना असे काय आजार होते जे तुम्ही त्यांचावर असे पाणी उडवून दूर केले? ह्याचे प्रमाण काय? तुम्ही ते सिद्ध करा, मग आम्ही तुमचा नक्कीच सत्कार करू. पण हे न करू शकल्यास तुम्ही आध्यात्मातून सन्यास घ्या आणि असले अमानुष प्रकार बंद करा. हे पाणी जर तुम्ही स्वखर्चाने दुष्काळी गावांमध्ये पिण्यासाठी पाठवले असते तर कित्येक तहानलेली माणसं तृप्त झाली असती. पण नाही, स्वतःची विवेक बुद्धी गहाण ठेवून आपण केलेल्या चुकांना अजून अधिक पोरकट आणि बिनडोक बडबड करून झाकायचा प्रयत्न करायचा! आणि पिडीत जनतेच्या गरजांचा अजिबात विचार न करणे ह्यात कसले आले आध्यात्म? हा तर थोतांडपणा आहे. 
आसाराम बापूंचे आध्यात्मिक थोतांड!!SocialTwist Tell-a-Friend

शनिवार, डिसेंबर २२, २०१२

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?

फार फार वर्षां पूर्वी असाच प्रश्न लोकमान्यांनी केसरी मधून विचारला होता. सरकार बदलले, पण प्रश्न तिकडेच आहे. दिल्लीत झालेल्या अमानुष सामूहिक बलात्कारा विरुद्ध राष्ट्रपती भवनाजवळ निदर्शनं करणाऱ्या अहिंसक तरुण जमावा वर पोलिसांनी ऐन थंडीत पाण्याच्या फवाऱ्याचा (water cannon) मारा केला आणि लाठ्या चालवल्या. ह्या जमावाला रोखून धरण्यासाठी सरकार कडे दुसरा उपाय नाही? अरे, त्यांचा कडे अशी काय हत्यारं होती कि त्यांच्यावर अश्रुधाराचे गोळे फेकावे लागले? थंड पाण्याचे जबरदस्त फवारे त्यांचा अंगावर मारले? बहुतांश लोकं  तिकडे आपल्या व आपल्या आई-बहिण-मैत्रिणींसाठी एक सुरक्षित दिल्ली (आणि देश) मागण्यासाठीच गेले होते ना? 

सरकारचं Public Relations खातं आहे की नाही? असा प्रश्न पडतो. ह्या जमावावर पोलिसी लाठ्या चालविण्या आधी जर पंत प्रधान किंवा राष्ट्रपती येउन बोलले असते, तर असा प्रकार घडला असता का? आपण काम करत आहोत असं लोकांना जाणीव करून देणे गरजेचे वाटत नाही का? अणु करार आणि किरकोळ व्यापारात थेट परकीय गुंतवणुकी साठी  देशाला संबोधणारे आणि (युधिष्ठिरा सारखे) आपलं सरकार पणावर लावणारे पंत प्रधान देशाच्या जनतेला का संबोधत नाहीत? सोनिया गांधी सुद्धा थेट मिडीयाशी  न बोलता त्यांचा विश्वासूं मार्फत बोलताना दिसल्या. राष्ट्रपतींनी तर अजूनही काही प्रतिक्रिया दिली नाही. जर ह्या जमावाशी संवाद साधला असता तर किती कष्ट वाचले असते? जनतेला सुद्धा दिलासा मिळाला असता की सरकार काहीतरी करतंय. पण नाही, आपली ताकद नको तिकडे दाखविण्याची हौस सरकारला उगीचच आहे.

तिकडे अमेरीकेत सुद्धा वारंवार अनेक ठिकाणी नि:शस्त्र लोकांवर गोळीबार होत असतो आणि त्यात भरपूर जीव हानी होते. पण न्यू-टाउन मध्ये हि घटना झाल्यावर उठलेल्या उद्रेकाला शांत करण्यासाठी त्यांचे राष्ट्रपती टी. व्ही. वर आले आणि त्यांनी देशाला त्या घटने बाबत आपण काय करू इच्छितो ह्या बद्दल संवाद साधला. त्यातील किती गोष्टी प्रत्यक्षात उतरतील ही नंतरची गोष्ट, पण आपला राष्ट्रपती आपल्या साठी काहीतरी करतोय असं  तरी लोकाना वाटलं. आणि इकडे उलटेच. देशाचे भावी पंत प्रधान होण्याची इच्छा असलेले (आपल्यला कितीही नको असले तरी) राहुल गांधी सुद्धा ह्यावर काही बोलत नाहीत. मग हे सरकार जनतेसाठी नेमके काय करणार आहे? आधीच अनेक भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये बरबटलेल्या ह्या सरकारला अजून काय विशेषणं  भूषवायची आहेत?  युवकांवर लाठीचार्ज करणे सोपे आहे, पण त्यांचाशी संवाद साधून मार्ग काढणे कठीण. सरकारला सगळ्याच बाबतीत सोपे मार्ग काढून प्रश्न झटकून द्यायचे आहेत का? ह्याचे उत्तर तरी कुणीतरी द्यावे.
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?SocialTwist Tell-a-Friend

शनिवार, ऑक्टोबर २७, २०१२

अपूर्व हेमंत

 पु. ल. देशपांडेंच अपूर्वाई वाचलं होतं. त्यात त्यांनी जपान मधील हेमंत ऋतूचं कौतुक केलं होतं. हेमंतातील झाडा-फुलांचे ते निरनिराळे रंग, आल्हाददायक वातावरण इ. खरंच बघत बसण्यासारखे आहे. आणि हा ऋतू संपू नये असं वाटत रहातं. आणि पु.लंनी त्यात लिहीलं सुद्धा आहे, की खरतर हेमंतापेक्षा वसंताचे अधिक कौतुक होत असले तरीही हेमंताची मजा काही औरच आहे. आणि खरच आहे, बघा वसंता मध्ये किती उत्सव होत असतात. वसंत व्याख्यान माला, अनेक संगीत उत्सव, वगैरे. पण हेमंता मध्ये असे उत्सव होताना पाहिले आहेत का?

खरेतर हेमंत चाहूल घेऊन येतो ते येणाऱ्या शिशिराची. म्हणजेच गोठून टाकणाऱ्या काळाची. पान गळती, बोचरे वारे, भर दुपारीसुद्धा उन्हाची ऊब नसते (अर्थात, भारतात बहुतांश ठिकाणी शिशिर ऋतुच सहन करण्यासारखा असतो). म्हणजेच काय, तर एका निर्जीव अवस्थेची नांदी होत असते. म्हणूनच कदाचित हेमंताचे तेवढे कौतुक होत नसावे. समोर निर्जीव अवस्था दिसत असताना, कौतुक कोण करेल?

वसंताचं तसं नसतं. वसंत म्हणजेच एका नव्या पर्वाची सुरवात असते. नवीन उमलेल्या कळ्या, झाडांना नवीन पानं यायला सुरु झालेली असतात. निर्जीवते कडून सजीवते कडे  जाणारा काळ  म्हणजेच वसंत. आणि म्हणूनच त्याचे कौतुक. ते ही योग्यच आहे म्हणा. फिनिक्स पक्ष्या सारखा स्वतःच्या राखेतून पुन्हा जन्मास येण्याची करामत वसंतातच दिसते.

पण म्हणून हेमंताचे सौंदर्य काही कमी होत नाही. उलटपक्षी हेमंतातच सृष्टीची उलथापालथ दिसून येते. झाडांवरील पानांचे विविध रंग, हवेतील आल्हाददायक बदल, इ. केवळ हेमंताची वैशिष्ट्ये. जणू सृष्टीचा एक संदेश. बाबांनो, जरीही पुढे एक गोठवून टाकणारा, निर्जीव वाटणारा काळ येणार असेल, तरीही माझे सौंदर्य बघण्यासारखे आहे. ग्रीष्म आणि वर्षा ऋतूत हिरवीगार दिसणारी झाडं एवढी लोभस वाटत नाहीत, जेवढी हेमंतात वाटतात. एके काळी केवळ हिरव्या रंगांच्या अनेक छटांनी भरलेली झाडांची पानं हेमंत येताच विविध रंग धारण करतात. एकाच झाडावर हिरवी, पिवळी, लाल, शेंदूरी, इ. अनेक रंगांची पानं एकाच वेळेस पहायला मिळतात.
 त्यामुळेच कदाचित हेमंतामध्ये एक चैतन्य निर्माण करायची शक्ती आहे. ते चैतन्य अल्प काळासाठी असले तरीही. शेवट समोर दिसत असला ना, की एक अंतिम झुंज द्यायची अद्भुत शक्ती सर्वांच्यात असते. इतिहासात अश्या अंतिम झुंजाच्या अनेक घटना गाजलेल्या आहेत. आणि अश्याच घटना चैतन्य निर्माण करण्यासाठी वापरल्या जातात. बघा ना, "चमक उठी सन सत्तावन में  वह  तलवार पुरानी  थी, खूब लडी  मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी" ही कविता ऐकल्यावर अंगात  अचानक चैतन्य संचारल्या सारखं होतं. अगदी देवा समोर लावलेला दिवा सुद्धा शांत व्हायच्या आधी सर्वात प्रखर प्रकाश देतो. म्हणूनच शोले मध्ये बसंती सुद्धा वीरूला वाचविण्यासाठी, ``जब तक है जान, जान-ए-जहां मै नाचूंगी`` असं गाऊन असलेल्या शक्ती पलीकडे नाचू शकते. येणाऱ्या शिशिरासाठी सृष्टी सुद्धा ``आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम-राम घ्यावा`` असं अगदी थाटात म्हणते.
अपूर्व हेमंत SocialTwist Tell-a-Friend

सोमवार, ऑगस्ट ०६, २०१२

संस्कृती आणि तिचे दर्शन

 खरं सांगायचे झाले तर देश सोडल्यावरच आपल्याला संस्कृती वगैरे शब्द आठवायला लागतात. पिकतं तिथे विकत नाही तेच खरं. पण शेवटी संस्कृती म्हणजे काय? ही व्याख्या अनेक वेळा उलगडत नाही. त्यात सुद्धा जागतिकीकरणाच्या लाटेत जिथे सगळच सारखं वाटायला लागतं, तिकडे वेगळे दिसण्याची समानता बर्‍याच लोकांत दिसून येते. त्यांचे हे वेगळे पण दिसून आले ते एडमंटन मधील Heritage Festival मधे. 

जवळ-जवळ ८५ हून अधिक देशांमधील विविध खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि तेथील अनेक हस्तकला व सांस्कृतिक वस्तूंचे स्टॉल लावले होते. पार अगदी प्रगत असलेल्या इंग्लंड-फ्रान्स पासून ते विकसनशील आणि अनेक आपदांनी त्रस्त असलेल्या आफ्रिकेतील इरिट्रिया, सुदान, सोमालियातील देशांचे स्टॉल होते. इंग्लंड आणि वेल्स मधील फरक प्रत्येकाच्या स्टॉलला भेट दिल्यावर कळतो. नेदरलंड्स आणि फ्रांस मधला फरक त्यांच्या नृत्यातील उद्देश्यामुळे लक्षात येतो. हाव-भाव आणि हाल-चाल मध्ये सूक्ष्म फरक असला तरी त्या नृत्याचं उद्देश्य काय (म्हणजे हे नृत्य का केलं जात आहे)? हेच त्या दोन देशातील संस्कृतीतला फरक. साधं लोकर कसं विणलं जातं ह्या वरून हे फरक लेक्षात येतात. सूक्ष्म अभ्यासकाला हेच लहान फरक ध्यानात येतात आणि लक्षात रहातात. संस्कृतीं मधील हे फरक जाणून बुजून केले आहेत असं ही नाही. आपलं वेगळेपण दिसून यावं याचा अट्टाहस नाही!! केवळ तिथल्या भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितींमुळे निर्माण झालेले हे फरक. शिवाय प्रत्येक मनुष्याच्या नजरेतील फरकामुळे सुद्धा हे फरक घडत असतातच.

फरक आहेत तसेच साम्यपण आहेत. इराण, इराक, तुर्की, ग्रीस, इस्रायल ह्या देशांमधील खाद्य पदार्थांमधे इतकं साम्य आहे की आज हे देश एक-मेकांच्या एवढ्या विरोधात का आहेत ते कळत नाही. तिच गत भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशची. ह्या तिन्ही देशांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल बघितले की काहीच वेगळे जाणवत नाही. पदार्थांची नावे सारखीच, चव सुद्धा जवळ-जवळ सारखीच. केवळ तेथील स्थानिक परिस्थितीनुसार काही वेगळ्या घटकांचा वापर. अर्थात भारत-पाकिस्तान मधील संबंध (किंवा त्यांचा अभाव) याला सांस्कृतिक कारण नसून राजकीय (आकांक्षा नव्हे, तर) हाव व धर्मांधपणा जास्ती कारणीभूत आहे, असे माझे मत आहे. अनेक दक्षिण अमेरिकी देशांच्या पदार्थांमधे साम्य दिसते. तसेच त्यांचे पदार्थ स्पॅनिश व पोर्तुगीज पदार्थांशी थोडं फार साम्य राखून आहेत. स्पेन आणि पुर्तगालचं त्या देशांवरील एकेकाळच्या वर्चस्वाची ही दिसून येणारी गाथा आहे.

ह्या Heritage Festival मधून अनेक गोष्टी समोर आल्या. संस्कृतींमधील साम्य व सूक्ष्म फरक तर दिसलेच, पण ह्यांच्या खाद्यपदार्थांमधून त्यांचे (पूर्वापार चालू) असेलेले संबंध सुद्धा दिसून आले. उदाहरणार्थ, इराणी/इराकी पदार्थांमधे वापरले जाणारे मसाले (मिर्च्या, मिरी, इ.) पाहून लक्षात येतं की ह्या देशांचे भारताबरोबर किती जुने व्यापारी संबंध आहेत. जिलबी ह्या पदार्थाचा उगम मध्य-पूर्व आशिया मध्ये आहे. सिरीया किंवा जॉर्डन मधे. तो पदार्थ आफ्रिकी व्यापारी आणि मोगल व तत्सम आक्रमणकर्त्यां मार्फत भारतात पोहोचला. त्याच प्रमाणे सामोसा, हा उत्तर-भारतीय लोकां मधील अत्यंत प्रिय नाष्ट्याचा प्रकार केनीयाच्या व फिजीच्या मेनू मध्ये पण दिसतो. ह्याचा उगम सुद्धा मध्य आणि मध्य-पूर्व आशियात आहे.

असो, ह्या सगळ्या तांत्रिक व ऐतिहासिक गोष्टी झाल्या. तात्पर्य काय, तर संस्कृती म्हणजे आजू-बाजूच्या रहाणीमानानुसार तयार झालेली एक जीवन पद्धती. त्याकाळी तयार झालेली, जेव्हा शहरातील एका टोका पासून दुसर्‍या टोकाला जायचे म्हणजे दिवसभराची ‘पिकनिक’ असायची. आणि ८४ लक्ष योनीं मधील केवळ मनुष्य योनी मधील जीवाने अस्तित्वापलीकडील जगणे आनंददायी, रममाण आणि अधिक सुसह्य होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची फळे म्हणजेच संस्कृती!!
संस्कृती आणि तिचे दर्शनSocialTwist Tell-a-Friend

रविवार, एप्रिल १५, २०१२

निवडक मालिका

असं म्हणतात की दूरदर्शनच्या जमान्यात जेव्हा रविवारी सकाळी रामायण किंवा महाभारत लागायचं तेव्हा रस्ते ओस पडलेले असायचे. मुळात लोकं आपली सगळी कामं ह्या दोन मालिकांची वेळ लक्षात घेऊनच ठरवायची. म्हणजे, रविवारी सकाळी चिकन अथवा मासे हे ८:३० च्या आत घरात असायचे. हीच गोष्ट संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या मालिकांची. १००, ब्योमकेश बक्षी, सुरभी, इ. संध्याकाळी ७:०० वाजता कामं अशी हवीत की ती टी.व्ही. समोर बसून करता येतील. तसेच रात्री ९:०० वाजता जेवायला बसले पाहिजे किंवा जेवण उरकले असले पाहिजे. कारण त्यावेळेस मालिका सुरू व्हायच्या.  

नंतर केबलचा  जमाना आला आणि पावसाळ्यात कुत्र्यांचा शेपटा जश्या उगवतात, त्याच प्रमाणे मालिका सुरू झाल्या. देशभर सासवा-सुनांची भांडणे गाजू लागली. प्रत्येक मालिकेत कोण तरी कुणा विरुद्ध कट रचत असायचे. घरातील बायका उंची कपडे आणि दागिने घालून कारस्थाने रचू लागली. त्यामुळेच अनेक सुज्ञ जणांना मालिकांचा कंटाळा आला आणि कामं करण्याची घडी बिघडूनच गेली. कारण आता मालिकाच बघायची नाही, तर कामे कधीही करता येतील!

पण हे दृश्य हल्ली थोडं बदलायला लागलं आहे. झी मराठी वर पहिल्यांदा सा रे ग म प मध्ये Little Champs मुळे थोडी शिस्त आली. त्यानंतर पुन्हा सगळं फिसकटले. पण हल्लीच सुरू झालेल्या 'उंच माझा झोका' आणि 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ह्यामुळे पुन्हा थोडी शिस्त आली. आता कामं उरकून ८:०० वाजता टी. व्ही. समोर बसायचे, ते एका लग्नाची... चा पहिला ब्रेक होई पर्यंत हलायचे नाही. त्या ब्रेक मध्ये जेवण वाढून घ्यायचे आणि जेवायला बसायचे. ह्या २ मालिकांमुळे सगळं कुटुंब एकत्र येतं आणि यमू (रमा)-महादेवराव व राधा-घना च्या सुख-दु:खात सामील होतो. ह्या मालिकांमुळे पुन्हा एकदा कामाची शिस्त आली आहे आणि थकून-भागून घरी आल्यावर चांगले काहीतरी पहावयास मिळेल ही आशा टिकून आहे.
निवडक मालिकाSocialTwist Tell-a-Friend

बुधवार, मार्च २८, २०१२

पर्यायी वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन केव्हा?

गोव्या मध्ये नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी आपल्या बजेट मध्ये वाहतुकीच्या इंधनावर कर कमी केल्याने तिकडे पेट्रोल जवळ-जवळ ११ रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे काम एका भाजपच्या सरकारने केल्यामुळे कदाचित माध्यमांना त्याला फार प्रसिद्धी द्यावीशी कदाचित गरज वाटली नाही.  पण ही बातमी बाहेर पडल्यावर अपेक्षे प्रमाणे इतर राज्यांतून तिथल्या-तिथल्या जनतेचे आवाज उठले की गोव्या प्रमाणे त्यांचा सरकारने देखील पेट्रोल वरील कर कमी करून सामान्यांना दिलासा द्यावा.

सरकारचे काम केवळ कर वसुलीचे नसून, गरजेप्रमाणे देशाच्या जीवनमानाला गती आणि वळण देण्याचे सुद्धा आहे. आपण आपल्या गरजेच्या ७०% खनिज तेल आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीं मधील चढ-उताराची झळ आपल्याला सहन करावी लागणारच आहे. आणि सरकार तरी किती वेळ बाजार भावापेक्षा कमी किमतीला पेट्रोल आणि डीझेल विकणार आहे? लक्षात घ्या, जे पैसे तेल कंपन्यांना तूट भरून काढण्यासाठी मिळतात, ते आपणच आधी कर म्हणून भरलेले असतात. शिवाय, पेट्रोल-डीझेल वर अप्रत्यक्ष कर असल्याने तो सर्व वापरकर्त्यांना भरावा लागतो. ह्या देशातील ३% पेक्षा कमी लोक आयकर भारतात. अशा परिस्थितीत अप्रत्यक्ष करातूनच सरकारला पैसे मिळू शकतात.

त्यामुळेच मला असे वाटते की सरकारने कर कमी न करता ह्या पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून मिळणारा पैसा पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी वापरावा. त्याचा वापर अशा प्रकारे नक्कीच करता येईल-
  1. पेट्रोल-डीझेल च्या विक्रीतून कर रूपाने आलेल्या पैश्याचा वापर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी वापरावा. विशेषतः शहरांमध्ये बी. आर. टी. सारखे प्रकल्प योजनाबद्ध रीतीने अमलात आणावे. सार्वजनिक वाहतूकीलाच (बस व एस. टी.) ह्या रस्त्यांच्या वापराची परवानगी असावी.
  2. बसच्या सोई साठी उड्डाणपूल बांधून त्यावरून केवळ सार्वजनिक वाहतूक जाईल ह्याची दक्षता घ्यावी. उड्डाणपुलावर बस-थांबे बांधून, त्यावर चढ-उतार करण्यासाठी elevator आणि जिना बसवावा. ह्यातूनच नागरिकांची सोय होईल.
  3. सर्व रस्त्यांचा कडेला cycle-track बांधावेत. शिवाय ह्या track वर हरित पट्टे बनवावेत, ज्या कारणाने सायकल स्वारांना उन्हाची झळ बसणार नाही.
  4. रस्त्याचं पुनर्नियोजन अशा प्रकारे करावं ज्याने सायकल स्वारांना आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य मिळेल. उ. सायकल वाल्यांना कमीत-कमी चढ-उतार असला पाहिजे. रस्ते क्रॉस करताना त्यांची सोय आधी बघितली पाहिजे. 
  5. शिवाय, बस मधून उतरल्यावर प्रवाश्यांना आपल्या इच्छित स्थळी चालत जावे लागते. त्यासाठी उत्तम पद-पथ तयार करावे.
  6. हे सगळे केल्यावर, ह्या सगळ्या विस्ताराची देखभाल चोखपणे सरकार (किंवा पालिका) ने करावी.
पेट्रोल-डीझेल वरील अवलंबत्व कमी करण्यासाठी ह्या सगळ्याची गरज आहे. आणि नागरिकांनी सुद्धा केवळ पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी टाहो न फोडता, अशा पर्यायी वाहतुकीचा पाठ पुरावा करून सरकारला ते अमलात आणण्यासाठी भाग पाडले पाहिजे. तरच आपले भवितव्य सुसह्य होईल.
पर्यायी वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन केव्हा?SocialTwist Tell-a-Friend

गुरुवार, मार्च ०८, २०१२

बक्षिसे जाहीर करून कर्तव्य संपलं का?

नुकताच पार पडलेल्या महिला कबड्डी विश्व चषकात भारताच्या महिलांनी सुवर्णपदक मिळविण्याची उत्तम कामगिरी केली. ही कामगिरी बजावल्यावर त्यांचावर अभिनंदनाचा आणि पुरस्कारांचा वर्षाव झाला. फेसबुक वर आणि twitter वर शुभेच्छांचा वर्षाव आणि क्रिकेट सोडून अशा खेळांना पाठींबा देण्याचे अनेकांनी गाऱ्हाणे घातले. केवळ योगायोगाने ह्याच काळात भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. म्हणूनच अनेक क्रिकेट प्रेक्षकांनी  देशातल्या क्रिकेट मध्ये माखलेल्या जनतेला हे आव्हान केले. पण, कबड्डी विश्व चषक कधी चालू झाला, त्या स्पर्धेत किती संघ होते, कोणत्या देशातील होते, ह्याची माहिती अनेक जणांना नाही. शिवाय, ज्या मिडीयावाल्यांनी आज ह्या खेळाडूंची बाजू उचलून धरली आहे आणि जे त्यांचावर आता अनेक कार्यक्रम करीत आहेत, त्यांनी ह्या स्पर्धे बद्दल ब्र देखील उच्चारला नाही. सेहवाग-धोनी मधील तथा-कथित वादाला फ्रंट-पेज वर जागा मिळाली, पण कबड्डी विश्व चषकाची नांदी ह्यांना दिसली नाही. त्यामुळे आता चाललेले कौतुक खोखलेपणाचे वाटते. ह्या संघात किती खेळाडू होते, हे सुद्धा सांगणे अनेकांना कठीण जाईल, त्यांची नावे सांगणे तर सोडाच!!

आणि विश्व चषक जिंकल्यावर अपेक्षे प्रमाणे  अनेक राज्य सरकारांनी खेळाडूंवर बक्षिसांची खैरात जाहीर केली. ही बक्षिसे ह्या खेळाडूंना कधी मिळतील माहित नाही, आणि त्या साठी त्यांना किती जोडे झिजवावे लागतील हे पण सांगता येत नाही. पण, केवळ बक्षिसे वाटून आणि जेत्यांना शासकीय नोकरी जाहीर करून देशात क्रीडा संस्कृती रुजणार नाही. शासनाने क्रीडा संबंधित सुविधांमध्ये सुद्धा लक्ष पुरविले पाहिजे. खेळाडूंना कुठल्या प्रकारच्या सुविधा पाहिजेत, त्याची व्यवस्था करावी. शिवाय, खेळाला (कुठल्याही कारणास्तव) राम-राम ठोकल्यावर त्यांना नोकरी मिळवून देण्याची मदत करावी. ही नोकरी शासकीय असण्याची काही गरज नाही. कारण एवढे समर्थ खेळाडू मनात असेल तर कुठेही चमकू शकतात. ह्यातूनच दर्जेदार खेळाडूंचे एक talent pool तयार होईल. लक्षात घ्या,  ज्या १२ जणी विश्व चषकात खेळल्या, त्यांची निवड शेकडो मुलीं मधून झाली आहे. त्यामुळे केवळ जे जिंकले त्यांचे कौतुक न करता ज्यांनी ह्या खेळात राज्य व राष्ट्रीय पातळीवर भाग घेतला आहे, त्यांचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. सहाजिकच विश्व चषक मधील खेळाडूंना अधिक मोबदला मिळेल, पण निदान दुसऱ्या फळीतील खेळाडूंना वाळीत टाकल्या सारखे तरी वाटणार नाही. आणि म्हणूनच केवळ बक्षिसे आणि नोकऱ्या जाहीर करून संपणार नाही, तर क्रीडा संस्कृती बहरून येण्यासाठी खेळाडूंच्या बाबतीत दीर्घ कालीन योजना राबविण्याची गरज आहे. तरच इतर खेळांमध्ये सुद्धा आपण वर्चस्व गाजवू शकतो.
बक्षिसे जाहीर करून कर्तव्य संपलं का?SocialTwist Tell-a-Friend

गुरुवार, फेब्रुवारी ०२, २०१२

PMPMLचे टप्प्याचे वाहतूक का?

बरेच दिवस ह्या विषयावर लिहीन असे डोक्यात होते, पण काही कारणांमुळे राहून गेले. तर आज हा विषय पुन्हा आठवला तो नुकत्याच घडलेल्या PMPMLच्या प्रवासामुळे. मला नळ-स्टॉप वरून आयडियल कॉलनीला यायचे होते. त्यासाठी तिकीट काढले, तर डेक्कन कॉर्नर ते जय भवानी नगर असे तिकीट मिळाले, ज्याचे भाडे रु. ७ आकारले गेले. आता डेक्कन कॉर्नर हे नळ-स्टॉपच्या ३ थांब्या अगोदर येतं, तर जय भवानी नगर हे आयडियल कॉलनीच्या २ थांब्यानंतर येतं. म्हणजेच मी दिलेल्या भाड्यापेक्षा एकूण ५ थांबे कमी प्रवास केला. तरीही माझ्या कडून सर्व प्रवासाचे पैसे आकारले गेले. ह्याचं कारण असं आहे, की डेक्कन कॉर्नर ते जय भवानी नगर, हा भाड्याचा एक टप्पा आहे. आणि कुठलेही तिकीट हे त्या टप्प्याचे दिले जाते. 

पण अश्या टप्प्याच्या प्रवासाचे तिकीट का द्यायचे? आता तर PMPMLच्या कंडक्टर कडे तिकीट देण्यासाठी संगणकीकृत यंत्र आहे. ते वापरून त्यांना प्रवासाचे कि.मी. च्या आधारावर तिकीट देणे शक्य आहे. रिक्षाचे प्रवास भाडे देखील प्रत्येक कि.मी. (किंवा त्याचा भाग, every k.m. or part thereof) च्या तत्वावर आहे. नळ-स्टॉप ते आयडियल कॉलनी हे अंतर जवळ-जवळ ३ कि.मी. आहे. तर डेक्कन ते जय भवानी नगर, हे अंतर जवळ-जवळ ५.५ कि.मी. आहे. कुठल्याही प्रवाश्याने ह्या अतिरिक्त अंतराचे पैसे का भरावे? पहिला टप्पा एखाद्या ठराविक अंतराचा ठेवायला हरकत नाही. कारण त्यातून बस सेवेशी संबंधित Fixed Costs आकारता येतील. पण पुढील प्रवास भाड्याचा आकार  टप्प्यानुसार न होता किती अंतर प्रवास केला, ह्याचा आधारावर केला जावा. ह्यातून प्रवाश्यांना फायदा होईल आणि भाडे आकारण्यातही पारदर्शकता येईल.
PMPMLचे टप्प्याचे वाहतूक का?SocialTwist Tell-a-Friend

गुरुवार, डिसेंबर २२, २०११

विकिपीडिया टिकवा, ज्ञानाचा प्रकाश वाढवा

ह्या ब्लॉगच्या वाचकांमधे, विकिपीडिया न वाचलेला(ली) वाचक, कदाचित अपवादानेच सापडेल. पण गुगल जसं आपलं default search engine आहे, तसंच विकि आपलं default ज्ञानकोश आहे. विकि वरील माहिती क्वचितच चुकीची अथवा एखाद्याच्या विचारसारणीला धरून असते. त्याचा वरील सर्व लेख हे तटस्थ भूमिकेतून लिहिलेले असतात. अगदी सचीन तेंडुलकर पासून ते मनमोहन सिंग पर्यंत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते काँग्रेस पार्टी पर्यंत. विकिवरील माहिती उपलब्ध करून देतात, ते जगातील तुमच्या-आमच्या सारखे सामान्य लोक, जे आपल्या दैनंदिन आयुष्यातून वेळ काढून विकी वरील विषयांसाठी माहिती गोळा करून लिहितात, त्याची सत्यता पडताळतात आणि ती वाढवत रहातात. लोकशाहीचा जगातील सर्वात सफल प्रयोग ह्यापेक्षा दुसरा कुठलाच नसेल. विकि वरील माहिती ही खरोखरच एब्राहम लिंकन ह्यांच्या व्याख्ये प्रमाणे "of the people, by the people and for the people" आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, ही सर्व माहिती विकि तर्फे मोफत पुरविली जाते. ह्या साठी ते एकही रुपया आकारत नाहीत. आणि हे असंच रहावं, हे विकिचे संस्थापक जिमी वेल्स ह्यांचं आणि विकिमीडिया संस्थेचं उद्देश्य आहे. 

पण, ज्ञान (किंवा माहिती) जरी मोफत वाटायचं म्हंटलं, तरी ते पोहचवण्याची माध्यमं आहेत, त्यांचावर पैसा खर्चं होतोच. त्यातून सुटका नाही. विकीचं कार्य चालू रहावं ह्या साठी त्यांचा समोर दोन पर्याय आहेत. एक म्हणजे, विकिच्या पानांवर जाहिराती लावायच्या. पण विचार करा, एखादा गहन विषय वाचत असताना, पानाच्या मधेच जाहिरात आली तर? किंवा जाहिरातदारांनी सांगितलं की दिवसा गणिक किमान अमुक एवढे पेज-हिट्स मिळत असतील, त्याच पानांवर जाहिराती टाकण्यास परवानगी आहे, तर? मग चांगले, पण कमी वाचक असलेले विषय विकिने काढायचे का? 

दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या-आमच्या सारख्या वाचकांनी विकिला आर्थिक मदत करणे. त्यातूनच हा प्रकल्प जाहिरात मुक्त आणि सदैव मोफत राहील. त्याहूनही महत्वाचं म्हणजे हा प्रकल्प लोकाभिमुख राहील. भारतातून आता पर्यंत दान करण्याची ज्यांची इच्छा होती, त्यांचा समोर एक अडचण होती. विकिपीडिया वाले रुपयां मधे आर्थिक सहायता स्वीकारत नव्हते. तेव्हा डॉलर मधे मदत करणे अनेकांना कठीण होते. पण आता विकि रुपयां मधे सुद्धा आर्थिक सहायता स्वीकारत आहे. त्यामुळे जे कुणी इच्छुक असेल त्यांना आता आपल्या डेबिट कार्डने सुद्धा सहायता करता येईल. आणि जितकी जास्त लोकं सहायता करतील तितकीच विकिची आर्थिक स्थिरता वाढेल, हा प्रकल्प तेवढाच वाढवता येईल. तेव्हा, हा ब्लॉग वाचणार्‍या विकिच्या सर्व चाहत्यांनी विकिला आर्थिक सहायता करावी आणि आपल्या मित्र-मैत्रीणींना करण्यास प्रोत्साहन द्यावं. आणि हो, किमान सहाय्य रु. ४९चं आहे, जे वाचकांपैकी बर्‍याच जणांना खूप जास्ती नाहीत.

आणि हो, केवळ आर्थिक सहायता करून थांबायचं नाही. मराठी भाषेतील ज्ञान जर अधिकाधिक लोकां पर्यंत पोहोचवायचं असेल, तर विकिच्या मराठी पृष्ठांवर माहिती जमा करण्यास आणि विकिवरील मराठी लेखांची संख्या वाढविण्यास मदत करा. आणि विकिची माहिती तटस्थ रहावी ह्यासाठी जागरुक पणे प्रयत्न करा. मराठी विकिची तुम्ही कशी मदत करू शकता, ह्या बद्दल अधिक माहितीसाठी मराठी विकिला अवश्य भेट द्या. लक्षात ठेवा मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा!!
विकिपीडिया टिकवा, ज्ञानाचा प्रकाश वाढवाSocialTwist Tell-a-Friend

शनिवार, नोव्हेंबर १९, २०११

दिवाळी एडमंटन मधली!

खरं तर दिवाळी संपून बरेच दिवस झाले. म्हणजे, जवळ-जवळ महिना झाला. आता तर तुमच्या घरातील दिवाळीचा फराळ सुद्धा संपला असेल. पण ही पोस्ट लिहायला उशीर झाला!! असो, भारता बाहेरील ही माझी पहिली दिवाळी. पण दिवाळीच्या दिवशी इथे काहीही विशेष नसल्यामुळे चुकल्या-चुकल्या सारखं वाटत होतं. घरी कसं दिवाळीची चाहूल जवळ-जवळ महिन्याभर आधी पासून लागते. आई फराळाचं सामान घेऊन येते, नव्या पणत्या येतात, घरी आलं की कुठल्या ना कुठल्या फराळाची चव घ्यायला सांगून त्या फराळाची शबरीची बोरं करण्यात येतात. पण इथे रोजचे जेवण करण्याचे वांदे, तर स्पेशल फराळ कुठला होतोय? 

असो, अमेरिकेत अथवा कॅनडात आल्यावर कुठलाही सण त्या दिवशी साजरा न होता, जवळचा शनिवार बघून साजरा केला जातो. इथे केवळ १ जुलै (कॅनडाचा स्थापना दिवस) आणि ख्रिसमस त्याच दिवशी साजरे केले जातात. बाकी सगळे सण एखादा शुक्रवार अथवा सोमवार बघून त्या दिवशी साजरे होतात. म्हणजेच, लोकांना शनिवारी सामूहिक रित्या तो साजरा करता येतो. त्याच नियमाला धरून एडमंटन मधील मराठी भाषिक मंडळाने १२ नोव्हेंबरला २०११ सालचा दिवाळी उत्सव साजरा केला. येथील मराठी समाज तसा छोटाच आहे. मराठी मंडळाचे सदस्य असलेले ३९ परिवार आणि तेवढेच नसलेले धरले, तर एकूण ७०-८० परिवारांचा मराठी समाज. ह्या समाजाने एकत्र येऊन मराठी सण साजरे करणे खरेच कौतुकास्पद आहे. 

असो, तर येथील हिन्दू समाज मंदिरात ह्या वेळचा दिवाळी कार्यक्रम पार पडला. लहान मुलांनी चांगल्या मराठी गाण्यांवर नाच केला, मोठ्यांनी सुद्धा गाणी गायली. कौतुक म्हणजे, बॉस्टनहून नुकत्याच इथे आलेल्या एका बाईंनी लावणी नाच सादर केला. त्यासाठी तिने खास नऊ-वारी साडी नेसऊन तयार होऊन येण्याचे कष्ट घेतले. स्वत:चे रोजचे काम करून असा नाच बसवणे हे सुद्धा कौतुक करण्याजोगे आहे. शिवाय शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रहात असताना सुद्धा तालमीसाठी ह्या मुलांना एकत्र आणण्याचे काम करणारे त्यांचे पालकही धन्य आहेत. पण असे कष्ट घेतल्यानेच बांधिलकी वाढते, आपले मराठी संस्कार पैलतिरी थोड्या-फार प्रमाणात जपता येतात.

कोणताही मराठी सांस्कृतिक कार्यक्रम, शिवाजी महाराज आणि पु.ल. देशपांडे, ह्यांच्या शिवाय पूर्ण होत नाही. इथे सुद्धा तेच झाले. कॅलगरीहून आलेल्या मराठी मंडळातील लोकांनी अफझलखान वध सादर केला, जो मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, ह्या चित्रपटातील ‘महाराजांची किर्ती बेफाम’ ह्या पोवाड्यावर बसवला होता. कार्यक्रमानंतर झालेल्या भोजनाच्या कार्यक्रमात थोड्याफार ओळखी झाल्या. चेहरे अनोळखी असल्याने, आधी आम्ही कॅलगरीहून आलोय, असं इथल्या लोकांना वाटलं. पण एडमंटन मधे नवीन आहोत, हे ऐकल्यावर मात्र सगळ्यांनी नीट चौकशी केली. कुठून आलात, कधी आलात, थंडीची तयारी झाली ना. इकडे रहाता कुठे, काम काय करता, इ. नेहमीचे प्रश्न झाल्यावर, काहीही अडचण आली तर आमच्याशी संपर्क साधायला संकोचू नका असेही सांगितले. एका काकांनी तर तुला काय वाद्य वाजवता येतं? असं विचारलं. म्हणजेच मंडळाच्या पुढच्या कार्यक्रमात माझा प्रोग्रॅम ठेवण्यात आला असता. असो, मला काही वाजवता येत असते तर माझं वाजवणं एडमंटन मधेच ऐकलं असतं लोकांनी. भारतात एवढे दिग्गज आहेत, की माझ्याकडे कुणीही ढूंकुन देखील पाहिलं नसतं. म्हंटलं नाही बाबा, मी काही वाजवत नाही. पण थोडं फार कथा-कथन करता येतं. पण त्यावर काहीही पुढे झालं नाही. 


कार्यक्रमाचं स्थळ तसं शहरापासून ‘लांब’ असल्याने, अनेकांनी विचारलं की काही सोय नसेल तर आम्ही सोडू. म्हंटलं चालेल, जवळच्या बस स्टॉप पर्यंत सोडा, तर म्हणाले, नाही, घरा पर्यंत सोडू. लोकांचा हा मदतीचा स्वभाव पाहून बरं वाटलं. आम्ही थोडेसे ओशाळूनच Titus Rodriguez ह्यांचा बरोबर गाडीतून घरी आलो. एकूण, दिवाळीच्या दिवशी नाही, तरी एका दिवशी मराठी लोकं एकत्र भेटली, सण साजरा केला, आणि आमच्या सारख्या नवीन लोकांना आपलसं केलं, हे पाहून ती संध्याकाळ मजेत गेली.
दिवाळी एडमंटन मधली!SocialTwist Tell-a-Friend

बुधवार, ऑक्टोबर २६, २०११

भले भले आले आणि मातीत मिळून गेले!

भारताचा इतिहासच असा आहे, की इथे आलेल्या परकीयांना कधी ना कधी तरी हार मानावीच लागली आहे. ह्या मातीचा सर्वात पहिला बळी ठरला तो जगज्जेता सिकंदर. त्याने पर्शियाच्या बलाढ्य शहा दरयुश-३ ला पराभूत केलं होतं. त्यानंतर तो मध्य आशिया जिंकत भारताच्या वेशी वर पोहोचला होता. त्याने भले ही पुरू राजाला हरविले असेल, पण त्या युद्धात त्याचा सैन्याने इतकी कच खाल्ली की तिने पुढे जायचा नकार दिला. सिकंदराला गंगा नदीच्या किनाऱ्या वरूनच परतावे लागले. त्यानंतर त्याच्या सामराज्यात कसलीच ताकद उरली नाही आणि त्याचा मृत्यु नंतर ते काही दशकातच कोसळलं. त्यानंतर कालांतराने आक्रमणकरते येत होते, ह्या देशावर आपली सत्ता बसवीत होते, पण त्यांना कालांतराने ह्या देशाचा भाग तरी व्हावं लागलं किंवा देश सोडून परत जावं लागलं. सदाशिवराव भाऊंना पानिपतात हरविणारा अहमदशहा अब्दालीला सुद्धा पुन्हा भारता कडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत झाली नाही. एवढी हानी त्याचा सैन्याला मराठी फौजांनी केली.  इंग्रज, पोर्तुगीज, इ. युरोपीय आक्रमणकरते सुद्धा आले, आणि आपल्यावर राज्य सुद्धा केले. पण, अमेरिकी खंडात त्यांनी स्थानिकांचं अस्तित्वच जसं नामशेष केलं, तसं इथे त्यांना जमलं नाही. उलट त्यांची ह्यात बरीच हानि झाली. आणि अखेरीस त्यांना हा देश सोडून द्यावा लागला.

आणि आता भारताचा हाच लौकिक खेळात सुद्धा पहायला मिळत आहे. विशेष करून क्रिकेट मधे. त्यामुळेच गेल्या १५ वर्षांत भारतात येणार्‍या संघाने केवळ २ वेळाच भारतीय संघाला पराभूत केले आहे. आणि तसंच नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड-भारत एकदिवसीय स्पर्धेत सुद्धा घडलं. सिकंदर प्रमाणेच अगदी महिन्या-दीड महिन्यापूर्वी भारताला नेस्तनाबूद करणार्‍या इंग्लंडचा भारतीय संघाने इथे भारतात त्यांचा सिकंदर करून टाकला. ५-० विजय मिळवून सपेशल दाखवून दिलं की आम्ही विश्वचषक विजेते कसे झालो! ज्याप्रमाणे सिकंदरला भारतातून पराभव व नामुष्की पतकरून परत जावे लागले, त्याचप्रमाणे इंग्लंडचा संघ इथे मोठ्या वल्गना करत आला असता, त्यांना नामुष्की पदरात घेऊनच माय देशी परत जावे लागले.

भारतीय संघाच्या ह्या कामगिरी बद्दल त्यांचे सपेशल अभिनंदन. आणि सचिन, जहीर, युवराज, हरभजन व सेहवाग नसताना ही कामगिरी बजावल्या बद्दल खेळाडूंचे अधिकच कौतुक करावेसे वाटते.
भले भले आले आणि मातीत मिळून गेले!SocialTwist Tell-a-Friend

सोमवार, ऑक्टोबर १०, २०११

सांग सांग भोलानाथ....

सांग सांग भोलानाथ, किंडल वरती मराठी मधली पुस्तके मिळतील काय? हा प्रश्न विचारायचं कारण असं की आता Amazon ने Kindle Fire टॅबलेट लाँच केलं आहे. Fireच्या आधीच्या Kindle e-book Reader हे वाचकांमधे सुपरहिट ठरलं आहे. जसं Appleच्या iPod ने संगीत क्षेत्रात क्रांती आणली होती, तशीच क्रांती Kindleने पुस्तक वाचनात घडवली. मुख्य म्हणजे Kindleच्या स्क्रीनचं तंत्रज्ञान असं होतं की वाटतं आपण खरंच एखादं छापील पुस्तक वाचत आहोत. त्यात Amazon ने आपलं एक स्वतंत्र Kindle e-book Store चालू केलं. त्यामुळे सर्व Kindle ग्राहकांना e-book विकत घेणं अतिशय सोपं झालं. माफक किमतीत क्लासिक्स, शिवाय रास्त दरात Best Sellers वगैरे विक्रीला उपलब्ध करून अमेरिकेत पुस्तक प्रमींना ह्याने वेड लावलं. आणि मुख्य म्हणजे ही सर्व पुस्तकं तुम्हाला ७X५च्या आकाराच्या ठोकळ्यावर नेता येतात. म्हणजेच तुमची पुस्तकं घरात जागा अडवत नाहीत आणि जागा बदलताना त्या पुस्तकांचे काय करावे, ह्याचा अजिबात प्रश्न नाही. 

Kindle एवढं लोकप्रिय झालं की इतर टॅबलेट्स साठी Amazonने Kindle App काढलं. म्हणजेच तुमच्या iPad वरून किंवा Android टॅबलेट वरून Kindle App वापरून तुम्ही Kindle store मधून पुस्तकं download करून वाचू शकता. पण ही सगळी पुस्तकं इंग्रजी भाषेतील आहेत (आपल्याला मराठी, हिंदी आणि इंग्रजी सोडून इतर भाषा येत नाहीत, त्यामुळे इअत कुठल्या भाषेची पुस्तकं आहेत का, हे शोधायच्या भानगडीत कधीच पडलो नाही). पण मराठी अथवा हिंदी भाषेतील पुस्तकं Kindle store वर उपलब्ध नाहीत. ह्याचे कारण असे, की अजून मराठी प्रकाशकांनी आपल्या पुस्तकांची Kindle आवृत्ती काढलेलीच नाही! Amazonने १-२ वर्षांपूर्वी जाहीर केलं होतं की ते भारतीय प्रकाशकां बरोबर वाटाघाटी करून त्यांना पुस्तकांची Kindle आवृत्ती काढण्यास प्रेरीत करतील. पण तसं फारसं झालेलं दिसत नाही. झालच असेल, तर ते इंग्रजी पुस्तकं छापणार्‍या प्रकाशकां बरोबर झालं असेल. पण प्रादेशिक भाषेतील प्रकाशकांचे काय? ह्या प्रकाशकांकडे Amazon ने जाऊन त्यांना सुद्धा आपल्याकडील मराठी पुस्तकांची Kindle आवृत्ती काढण्यास उत्तेजीत केलं पाहिजे. नाहीतर ह्या प्रकाशकांनी तंत्रज्ञानातील प्रगती व बदलांचा आढावा घेऊन स्वत:च Kindle आवृत्ती काढण्यास सुरुवात केली पाहिजे. कारण आता परदेशात रहाणारा मराठी समाज खूपच मोठा झाला आहे. विशेष करून इंग्लंड, अमेरिका, कॅनडा व ऑस्ट्रेलिया मधे. इथल्या लोकांना मराठी पुस्तकं भारतातून मागवणे दर वेळेस शक्य नसतं. किंबहुना कुणी फारसं मागवतच नाही. बरं एखाद्या आवडणार्‍या पुस्तकाचं प्रकाशनच बंद झालेलं असतं. जुन्या अथवा उत्तम पण कमी विकल्या जाणार्‍या पुस्तकांची केवळ Kindle आवृत्ती काढल्यास अनेक वाचकांना त्याचा लाभ होईल. शिवाय, छपाईचा खर्च नसल्यामुळे प्रकाशकांवरचा खर्चाचा भार देखील कमी होईल. 

पण माझं हे गार्‍हाणं कुणी ऐकत आहे का? की ह्याचं उत्तर केवळ भोलानाथच देऊ शकेल??
सांग सांग भोलानाथ....SocialTwist Tell-a-Friend

बुधवार, सप्टेंबर २८, २०११

बेजवाबदार पत्रकारिता आणि वृत्तवार्ता

रविवारी रात्री IIT Bombay मधील हॉस्टेल १२, १३ आणि १४ च्या मेस मधे जे जेवण दिलं गेलं त्यामुळे अनेक ह्या तिन्ही हॉस्टेल मधील बहुतांश विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. ह्या जेवणात चायनीज पदार्थ होते. हक्का नुडल्स, वेज फ्राईड राईस, एग फ्राईड राईस आणि (अधिक पैसे भरून) चिकन. मेसच्या मेनू मधे ह्या जेवणाला ’ड्राय डिनर’ अशी नोंद असते. ड्राय डिनर मधील हे पदार्थ थोड्या-फार फरकाने गेली ८ वर्ष आहेत. मेस मधे विष-बाधा होण्याची ही पहिलीच घटना आहे. 

पण ही बातमी मिळताच वृत्तपत्रांनी मात्र त्याची एक खमंग बातमी बनविण्याचे ठरवले. लागलीच बातम्या झळकल्या. बातमीदारकांनी नीटशी शहानिशा करायचे प्रयत्नच केले नाहीत. १-२ मुलांशी बोलून त्यांचा प्रतिक्रिया अशा छापल्या जणू काय गेलं अनेक वर्ष IIT  ह्या मामल्याकडे दुर्लक्ष करत आलं आहे. सकाळने बातमी छापली आहे: 
आयआयटीसारख्या संस्थेत भोजनासारख्या संवेदनशील बाबींमध्ये इतका निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पौष्टिक पद्धतीचे भोजन पुरविण्याऐवजी चायनीज मंच्यूरियनसारखे जंक फूड देण्यात येत असल्याने आयआयटी प्रशासनाने भोजन व्यवस्थेकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असल्याचा आरोप केला जातोय. खासगी कंत्राटदाराऐवजी स्वतःच्याच प्रशासकीय यंत्रणेअंतर्गत आयआयटीमार्फत खानावळ का चालविण्यात येत नाही, विद्यार्थ्यांना भोजन देण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाते का, प्रशिक्षित व कुशल कर्मचाऱ्यांऐवजी सामान्य कर्मचारी खानावळीत का नेमले जातात, असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत. 
हे अत्यंत बेजावदार वृत्त आहे.  मेस मधे पौष्टिक जेवणाची काळजी घेतली जाते. ह्या मेसच्या मेनू मधे कोबी, फ्लॉवर, पालक, पनीर, इ. भाज्या आठवड्यातून एकदा तरी असतात. चायनीज जेवण महिन्यातून एकदाच असते. आणि ह्या साठी सकाळला फार मेहनत सुद्धा घ्यावी लागली नसती. हॉस्टेलच्या संकेत स्थळावरच मेनू उपलब्ध आहे. तेवढे जरी कष्ट घेतले असते, तर वरील बातमीचा भाग अर्धा झाला असता. हा मेनू सुद्धा दर ४-६ महिन्यांनी हॉस्टेल मधील विद्यार्थ्यांच्या संमतीनेच बनवला जातो. ह्या साठी तिन्ही हॉस्टेल मधे Referendum होतं आणि मुलांनी उचलून धरलेल्या पदार्थांनाच मेनू मधे जागा मिळते.  माहिती उपलब्ध असताना सकाळने दिशाभूल केली आहे.

कंत्राट देऊन मेस चालविणे हे गेले ८ वर्षं सुरू आहे. तेव्हा कुठल्याही वृत्तपत्राने वरील प्रश्न का नाही विचारले? IIT तर्फे चालविण्यात येणार्‍या मेस मधे मेसची वेळ संपायच्या अगोदरच जेवण संपलेलं असतं. बरं दर वर्षी कंत्राट बदलताना IIT विद्यार्थ्यांना विचारतं की तुम्हाला कंत्राटी मेस पाहिजे की IITची. दर वर्षी मुलांनी कंत्राटी मेसचा आग्रह धरला आहे. मेस मधील समस्या सोडविण्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी मेस कंत्राटदाराबरोबर मिटींग घेतली जाते. ह्या मिटींग मधे, विद्यार्थी प्रतिनिधी, तिन्ही हॉस्टेलचे वॉर्डन आणि हॉल मॅनेजर उपस्थित असतात. मेस मधील तक्रारींचा आणि अडचणींचा आढावा घेतला जातो आणि दोन्ही बाजूंच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले जातात. आणि कंत्राटदाराने काही हलगर्जीपणा केला असेल, तर त्याचावर दंड ठोकण्यात येतो. हे सगळं सकाळला माहित करून घ्यावसं का नाही वाटलं?

महाराष्ट्र टाईम्सने तर ह्याही पेक्षा सुरस वृत्त छापलं आहे.
या सर्व प्रकाराबाबत 'आयआयटी' प्रशासनाने गुप्तता पाळली असून विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
गुप्तता? हॉस्टेल मधे? हे शक्य तरी आहे का? हॉस्टेल मधे जे-जे काही घडतं ते उघडपणे समोर येतं. बरं, त्यात हॉस्टेल काउंसिल मधे असणारे कुणा-ना-कुणाचे तरी मित्र असतात. त्यामुळे सर्व माहिती हॉस्टेलभर पसरायला वेळ लागत नाही. तर ह्या घटने बाबतीत IITने गुप्तता पाळलीच असेल तर ती वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांपासून. विद्यार्थ्यांना लागलीच सगळी माहिती मिळाली असेल. आणि कसले तणावाचे वातावरण? काळजी नक्कीच असेल. एवढे विद्यार्थी आजारी आहेत म्हंटल्यावर प्रत्येकाला एकामेकाची काळजी असणारच. सगळ्यांचा एखादा तरी मित्र आजारी असेलच. पण तणाव कसला? म.टा. ने तर IITच्या Directorचं नाव सुद्धा नीट छापलं नाहीये. त्यांचं नाव खाखर नसून खखर आहे. हे वृत्त छापण्या साठी किती काळजी घेतली आहे, ते ह्यावरून लक्षात येतं.

मेस मधील खाण्याच्या दर्जा विषयी नेहमीच कुणाची तरी तक्रार असते. २००० हून अधिक मुलं असली की प्रत्येकाला समाधानी ठेवता येत नाही. पण ८ वर्षं आणि ४ कंत्रादार पाहिलेल्या ह्या मेस मधे अशी घटना पहिल्यांदाच घडत आहे. गेल्या ८ वर्षात लक्षावधी जेवणं वाढली आहेत ह्या मेस मधे. येथील अन्न खाऊन स्वत:ची वजनं ३-४ किलो वाढवून हजारो विद्यार्थी बाहेर पडले आहेत. ही घटना निश्चितपणे काळजीची असली तरी असले बेजवाबदार वार्तांकन वृत्तपत्रांनी करू नयेत. ह्यातून काहीही साध्य होणार नाही.

टीप: ह्या मेस बद्दल आणि एकंदरीत तेथील पद्धतीं बद्दल मला माहिती असल्याचे कारण म्हणजे मी २००४-२०११ ह्याच मेस मधे जेवत होतो. मी IIT Bombayचा विद्यार्थी आहे आणि हॉस्टेल १२चा भूतपूर्व रहिवासी.
बेजवाबदार पत्रकारिता आणि वृत्तवार्ताSocialTwist Tell-a-Friend

बुधवार, सप्टेंबर २१, २०११

तुमचा पत्ता काय?

भारतात असताना कुणालाही पत्ता विचारला की एक छोटं पान भर लिहील्या शिवाय पत्ता पूर्ण होत नसे. म्हणजे बघा ना, साधारण पणे एखादा पत्ता असा असतो:
फ्लॅट क्र. ४, न्यू गणेश सोसायटी, सर्व्हे क्र. अ/१२३/ब३०२,
रावसाहेब थोरात कन्या शाळा रस्ता,
पतीत पावन राम मंदीरा जवळ,
फातीमानगर, पुणे - ४११३९२
 आता कसं एकदम पत्ता वाटतो. तरीही, हा पत्ता तुम्हाला पहिल्या झटक्यात मिळेलच ह्याची खात्री नसते. मिळालाच, तर ते तुमचं भाग्य आहे. पत्ता सांगणारा देखील सांगतो, की शाळा नाही कळाली तर थोपटे चौक विचारा, तिथून ५ मिनिटावर शाळेचं वळण आहे. फातीमानगर गाठल्यावर, एका पानाच्या टपरीवर तुम्हाला विचारावच लागेल- "रावसाहेब थोरात कन्या शाळा कुठे आली हो?" बरं त्यातही ह्या शाळेचं स्थानिक नाव वेगळं असू शकतं. ती एकेकाळी पुणे नगरपालिका शाळा क्र. ३२३ सुद्धा असू शकते. त्यामुळे तिचं नाव पालिका शाळा म्हणूनच प्रसिद्ध असतं. नवीन पूर्ण नाव विचारल्यास पानवाल्याला माहित नसण्याची दाट शक्यता असते. मग तुम्ही थोपटे चौक विचारता. ह्या सगळ्या दिव्यातून बाहेर पडून एकदाचं ते वळण सापडतं, ते राम मंदीर दिसतं आणि त्या मागची न्यू गणेश सोसायटी सापडते. 

कट-टू साता समुद्रापलीकडे. इथे कॅनडा मधे आलो, तेव्हा पहिल्यांदा येताना मित्राला त्याचा पत्ता विचारला होता. सुरवातीला त्याचाकडेच रहायची सोय असल्याने त्याचा पत्ता लागणार होता. आणि तुम्ही कॅनडा मधे कुठे रहाणार आहात ह्याची माहिती इमिग्रेशनच्या वेळेस देणे गरजेचे असते. हे देखील गमतीशीरच आहे म्हणा. माणूस नवीन नोकरीच्या अथवा शिक्षणाच्या ठिकाणी येतो. त्यावेळेस तो कुठे रहाणार आहे, ह्याची त्याला कशी कल्पना असेल? तरीही तुम्ही रहाण्याच्या ठिकाणाचा पत्ता द्यायचा असतो. असो, तर विषयांतर घडू न देता, मित्राने कळवले की त्याचा पत्ता खालील प्रमाणे आहे (हा पत्ता काल्पनिक आहे, पण येथील पत्त्यांचे स्वरुप असेच असते)
9803 20th Avenue,
Edmonton, Alberta 
A1B 3C4
त्याला म्हटले, झाला पत्ता? म्हणाला हो, इथे पत्ता असाच असतो. वरील पत्त्याचाअ अर्थ असा, की 98th Street आणि 20th Avenue वरील 3 नंबर क्रमांकाचं घर त्याचं. टॅक्सी वाल्याला हा पत्ता सांगितल्या तो बरोबर आणून सोडेल. किंवा तुमच्या फोनच्या GPS मधे हा पत्ता टाकला तरी तो तुम्हाला तुम्ही आहात तिथून त्या पत्त्या पर्यंतचा मार्ग अचूक दाखवेल. म्हणाला इथे ही गल्ली, तो चौक वगैरे असं पत्त्यात नसतं. म्हटलं अरे हा काय पत्ता झाला? सगळं शहर नुसतं Street आणि Avenue मधे वाटून टाकलं. हे केकचे तुकडे केल्या सारखे आहे. उभे कापले की Street बदलते, आडवे कापले की Avenue. तरी येथील काही Street अगर Avenue ला नावं देखील आहेत. उदाहरणार्थ, Whyte Avenue, University Avenue, Stony Plain Road, इत्यादि. पण हे अपवाद आहेत. इतर वेळीस तुम्ही केवळ एका Street आणि Avenue क्रमांकाचे धनी. दूरभाष कंपन्यांसाठी कसे, तुम्ही केवळ एक क्रमांक म्हणून असता, तसे. त्याला म्हटलं, पत्ता म्हणजे म्हणजे कसा पाहिजे

पाटलाच्या बखरी म्होरं मारुतीच्या देवळाच्या आडाल्ल्या अंगाला, 
मुक्काम हरणगाव, पोष्ट किंकवडी, जिल्हा सातारा.

संदर्भ: माझे पौष्टीक जीवन, लेखक: पु.ल. देशपांडे

मग कसं, कुठे तरी गेल्या सारखं वाटतं.
तुमचा पत्ता काय?SocialTwist Tell-a-Friend

शनिवार, सप्टेंबर १७, २०११

वार लक्षात ठेवण्याची भानगड

हॉस्टेल ला होतो तेव्हा भिंती वर कॅलेंडर असलं तरी ते महिन्याला बदललं जायचं असं क्वचित व्हायचं. हॉस्टेल वर असल्या शुल्लक गोष्टीं कडे फार लक्ष ठेवलं जायचं नाही. पण मग आठवड्याचा वार कसा लक्षात ठेवायचा? कारण त्यावरूनच आज T.A. duty आहे की नाही हे कळायचं. हळू हळू वार लक्षात ठेवायची माझी एक अनोखी पद्धत विकसित झाली. हॉस्टेलच्या मेस मध्ये आज काय मेनू आहे, हे बघून वार ठरवायला जमायला लागले. खरं तर IIT मध्ये वार लक्षात ठेवून फार काही फरक पडणार नव्हता. पण सोमवार आणि गुरुवार च्या दिवशी मांसाहार करायचा नसतो, ह्या कारणाने तरी वार लक्षात ठेवणे गरजेचे होते. 

पण आता IIT सुटलं आणि नशिबी Edmonton (Canada) आलं. इथे सुद्धा दिनचर्या तिकडच्या सारखीच आहे. सुकाली उठून University ला जाणे, आणि संध्याकाळी काम उरकून घरी येणे. पण आता समस्या अशी आहे की वार कसे लक्षात ठेवायचे? कारण घरी कॅलेंडर नेहमी प्रमाणे नाहीच. आणि देश सुटला तरी वार पाळणे सोडले नाही. रोजच्या घर-University-घर ह्या चर्येत दिवसाचं भान कुठे रहातं? आणि आता जेवण स्वतःच बनवावं लागत असल्याने कुठला ही मेनू नाही. जे फ्रीज मध्ये असेल, ते घेऊन भाजी बनवायची आणि भात लावायचा. त्यामुळे ते ही साधन आता हातातून गेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनिवार आणि रविवार लक्षात ठेवणे. कारण ह्या दोन वारीच कपडे धुणे आठवड्याचा बाजार करणे ही कामं होऊ शकतात. पण प्रश्न असा आहे, की हे सगळं लक्षात कसं ठेवायचं? मोबाईल वर बघणे हा एक पर्याय झाला. पण दर वेळी तो हाताशी असेलच असं नाही. त्यामुळे कॅलेंडर घेऊन येणे, ह्या व्यतिरिक्त काही पर्याय नाही असं दिसायला लागलं आहे.
वार लक्षात ठेवण्याची भानगडSocialTwist Tell-a-Friend

गुरुवार, ऑगस्ट १८, २०११

जनलोकपाल विधेयकाने काय साधले जाईल?

अण्णा हजारे म्हणतात की जनलोकपाल विधेयक आल्याने भ्रष्टाचाराला चाप लागेल. आपल्यालाही वाटतं की क्या विधेयकामुळे भ्रष्टाचार करण्यापासून अधिकारी दूर रहातील किंवा करण्यास धजावतील. पण भारतातील आज पर्यंतचा अनुभव सांगतो, की आपल्या कडे चांगले जाचक कायदे असताना सुद्धा फार काही साध्य होत नाही. साधी उदाहरणं घ्या. मद्यपान करायला कायद्याने तुमच्याकडे परवाना असणे गरजेचे आहे. एक दिवसाचा परवाना ५ रुपयात मिळतो (सध्याचे शुल्क) आणि हा परवाना सर्व दारू विकणार्‍या दुकानांमधे आणि बीअर-बार मधे मिळवता येतो. वर्षाचा परवाना पाहिजे असेल, तर साधारण १००० रुपये शुल्क भरून तो शहरातील पोलीस कमीशनरच्या कार्यालयातून मिळवता येतो. हे सगळे माहित असताना, आपल्या पैकी किती जणं परवाना घेऊन दारू पितात? किंवा किती दुकानदार, अथवा बारवाले आपल्या ग्राहकांचे परवाने तपासतात? ह्याचाच अर्थ, कायद्याने गरज असताना सुद्धा तुमच्या-आमच्या सारखे कित्येक जणं, जे जनलोकपाल साठी अण्णांच्या मागे उभे आहेत, स्वत:च कायद्याचे पालन करत नाही!! हे जाणून-बुजून असेल, किंवा अनावधानाने असेल. पण असे आहे.

दुसरं उदाहरण. गर्भ-लिंग चाचणी ही सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. पण अशा चाचण्या देशभर सर्रासपणे होतात. त्यातूनच स्त्री-भ्रूण हत्येचा राक्षसाने आपल्याला त्रस्त केले आहे. आणि जर १००० पुरुषां मागे किती स्त्रीया, हा आकडा बघितला तर छोट्या खेड्या-शहरांपेक्षा मोठ्या शहरांमधे ही परिस्थिती भयावह आहे. सामाजिक सुधारणांमधे अग्रेसर असलेल्या पुणे शहरात सुद्धा स्थिती गंभीर आहे. पण ही गंभीर परिस्थिती आटोक्यात यावी म्हणून काय करतोय आपण? अनेक लोकं आजही गर्भ-लिंग चाचणी करत आहेत आणि स्त्री-भ्रूण हत्या होतच आहेत.

ह्याचा अर्थ काय? कायदे कितीही कडक असले, तरी ते पाळण्याची जवाबदारी ही देशातील जनतेची आहे. ते कायदे पाळताना आपल्याला त्रास होण्याची शक्यता नक्कीच आहे. पण ते त्रास झेलण्याची तयारी असली पाहिजे. त्याशिवाय असे त्रास कमी व्हावेत ह्यासाठी समाजाने स्वत:सुद्धा बदलायची तयारी ठेवली पाहिजे. उदाहरणार्थ, लोकांना मुलगी का नको असते? कारण तिच्या लग्नात हुंडा द्यावा लागेल, किंवा नवर्‍यामुला कडच्यांच्या अवाजवी मागण्या पुरवाव्या लागतील इ. शिवाय घराण्याला वारस हवा, हा अट्टाहस. हे बदललं पाहिजे.

आजही अनेक ठिकाणी कुजबुजलं जातं की पोलीस खात्यात भरती होण्यासाठी अनेक ठिकाणी लाच द्यावी लागते. ही लाच काही लाख रुपयांपासून सुरू होते. आता २३-२४ वर्ष वय असलेल्या तरुणाकडून अशी लाच घेतल्यावर, त्याला ते पैसे वसूल केल्यावाचून काय पर्याय आहे? त्यासाठी तो तुम्हा-आम्हाला त्रास देणारच. शिवाय पाहिजे त्या ठिकाणी बदली हवी असेल, तर पैसे मोजा. मग ते जनते कडून वसूल करा. हे प्रकार तो पर्यंत चालू रहातील जो पर्यंत समाज स्वत: बदलत नाही. लोकपालापुढे तक्रार केली तरीही कोर्टात केस सिद्ध करावी लागणार. आणि एकदा कोर्टात गेलं की काय होतं हे तुम्हा-आम्हा सर्वांना माहित आहे. लोकपालाकडे शिक्षा सुनविण्याचे हक्क नाहीत. त्याचा कडे फक्त गुन्हा नोंदवून त्याची संबंधित यंत्रणे कडून तपासणी करून घ्यायचे अधिकार आहेत. 

आजच सकाळ मधे बातमी होती. कवठे-यमाई येथील बाजार समितीच्या निवडणुकीत कित्येक हजार रुपये लाच म्हणून वाटण्यात आले. त्यातील एकाने अणांना साथ द्यायची असेल, आणि बदल हवा असेल, तर लाचेचे पैसे गाव विकास निधी मधे जमा करायचे आव्हान केले. सर्वांनी रक्कम परत केली तर त्यातून जवळ-जवळ १० कोटी रुपये मिळतील. तर ही सध्याची परिस्थिती आहे. एका बाजारपेठेतील निवडणुकी साठी एवढा पैसा खर्च होत असेल, तर इतर (आणि अधिक मोठ्या अगर महत्वाच्या) बाजारपेठेतील निवडणुकीत किती पैश्यांची उलाढाल होत असेल? आणि मग तर विधानसभा, लोकसभा साठीच्या निवडणुकीबद्दल तर बोलायलाच नको!!

असो, लोकपाल सरकारचा आला काय, किंवा अण्णांचा आला काय, त्याचा उद्देश्य सफल तेव्हाच होईल, जेव्हा देशातील जनता जागरुकपणे कायद्याचे पालन करायला शिकेल. आणि जेव्हा आपण एकमेकांना माणूस म्हणून किंमत द्यायला शिकू, तेव्हा भ्रष्टाचाराला आळा बसायला सुरवात होईल. नाहीतर लोकपाल काय आणि ब्रम्हदेव काय, कुणीही भ्रष्टाचार रोखायला किंवा नष्ट करायला कमीच पडेल.
जनलोकपाल विधेयकाने काय साधले जाईल?SocialTwist Tell-a-Friend

सोमवार, ऑगस्ट ०१, २०११

स्मारक काढा स्मारक

आजच पेपर मधे वाचले, की NTC ने राज्य सरकारला सांगितले की बाबा साहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जमीन हवी असेल, तर ती NTC कडून बाजार भावाने घ्यावी लागेल. बाबा साहेब आंबेडकरांचं नाव आलं की सगळे पक्ष आपसातले मत-भेद विसरून एक होतात. चला, निदान बाबा साहेबांनी तेवढं तरी साधलं. नाहीतर रोजच त्यांनी लिहिलेल्या घटनेची पायामल्ली करायला सत्ताधारी आणि विरोधीपक्ष पुढे मागे बघत नाहीत. तर ह्या विरोधकांनी जमीन मोफत द्यायच्या ऐजवी बाजा भाव मागितला म्हणून NTC विरुद्ध संताप व्यक्त केलाय.

असो, पण आता सरकार कडे जनतेला थोरांचे स्मारक देण्या व्यतिरिक्त काय राहिले आहे? जनतेने त्या स्मारकां कडे बघत केवळ भूतकाळात रमून जायचे. आणि ह्या थोरां सारखे नि:स्वार्थी आणि सेवाभावी नेतृत्व आज कुठेही दिसत नाही, ह्या बद्दल टाहो फोडायचा. भविष्याकडे उमेदीने बघता येईल अशा किती गोष्टी आहेत? आणि अशी उमेद असती तर आपण स्मारकांच्या गुंतागुंती पडलो असतो का? आज चीनला बघा. त्या देशासमोर एक उज्जवल भविष्य आहे, म्हणून त्यांचे सरकार माओच्या चुका निदर्शनास आणून देताना घाबरत नाही. आणि त्या चुका सुधारल्याने त्यांची कशी प्रगती झाली, ह्याची केवळ भाषणं न होता, प्रत्यक्ष परिणाम सुद्धा जनतेला दाखवले आहेत.

भारतातील जनतेने ह्या अपेक्षेने सरकारकडे कधी बघायचे? केवळ स्मारक काढून स्मृतींना उजाळा देऊन भविष्य घडत नसतं. ते घडतं सरकारच्या ठाम कर्तृत्वामुळे व्यापक धोरणांमुळे आणि ती धोरणं अमलात आणायच्या हिम्मतीमुळे. हे जर नसेल, तर तुम्ही-आम्ही केवळ स्मारकांचे दर्शन घेऊन धन्यता मानायची! आणि त्या स्मारकांवर अश्रू वहायचे. असे कर्तृत्वान महापुरुष पुन्हा कधी जन्माला येतील?
स्मारक काढा स्मारकSocialTwist Tell-a-Friend

शुक्रवार, जुलै २९, २०११

MTNL, BSNL सुद्धा Air India च्या वाटेवर का?

खरं म्हणजे, ह्या पोस्टमधील माहिती आणि विश्लेषण हे आता जुनं सुद्धा झालं असेल. तरी पण, मनात विचार आला, म्हणून ही पोस्ट लिहायचं ठरवलं. भारत सरकार मधील आजी-माजी मंत्र्यांनी आणि बाबूंनी मिळून Air Indiaची कशी बिकट अवस्था केली हे सर्वश्रुत आहे. AI सध्या सरकारी मेहरबानीवर जगत आहे. वेळेत नवीन विमानं खरेदी करायला न देणं, नफ्यात असलेले मार्ग त्यांचा कडून काढून ते खाजगी कंपन्यांना देणं, ह्यामुळे AIचं अस्तित्वच धोक्यात आल आहे.

बहुतेक तशीच परिस्थिती आता MTNL आणि BSNLची होण्याची शक्यता आहे. राजकारण्यांनी ह्या कंपन्यांकडून फोनची लाईन घेणे आणि त्याची बिलं न भरणे, हे तर खूपच सामान्य झालं आहे. त्याही पेक्षा, ह्या दोन कंपन्यांना economically unviable क्षेत्रांमधे लॅन्ड-लाईन व मोबाईल सेवा पुरविण्यासाठी सक्ती करणे ह्या कंपन्यांना भोवतय. सरकारी कंपन्या असल्यामुळे कदाचित त्यांनी ह्या गोष्टी करणे अपेक्षित आहे. तरीही इतर खाजगी कंपन्या असं काही करताना दिसत नाहीत, व करावं लागू नये, ह्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करत असतात.

नुकत्याच झालेल्या 3G लिलावाचं उदाहरण घ्या. इतर सर्व कंपन्यांना 3G स्पेक्ट्रम देण्या अगोदर साधारण १ वर्षा आधी MTNL ला मुंबई आणि दिल्ली साठी, तर BSNL ला अखंड भारतासाठी 3G स्पेक्ट्रम देण्यात आलं. ह्या एका वर्षा मधे त्यांना 3G सेवा चालू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर जवळ-जवळ १ वर्षाने झालेल्या लिलावात, कुठल्याच खाजगी कंपनीने अखंड भारतासाठी 3G स्पेक्ट्रम पटकवलं नाही. सगळ्यात अधिक 'सर्कल्स’ Airtel, Aircel आणि Reliance वाल्यांना मिळाले आहेत. ते सुद्धा देशाच्या विभिन्न भागात. प्रत्येक सर्कल्स मधे लागलेल्या सर्वाधिक बोली एवढे पैसे सरकारने MTNL आणि BSNLला भरायला सांगितले. म्हणजे, BSNLला जर राजस्थान मधे 3G सेवा देणं फायदेशीर वाटत नसेल, किंवा देशातील इतर भागां मधला प्रतिसाद बघून, मग सुरू करायचे असेल, तरीही त्या सर्कलच्या सर्वाधिक बोली एवढे पैसे सरकारकडे जमा करणे सक्तीचे केले. जर खाजगी कंपन्यांना त्यांचा कुवतीनुसार आणि व्यावसायिक दृष्टिकोणानुसार सर्कल्स ठरवायची मुभा होती, तर ती BSNL ला कां मिळू नये? ह्या दोन्ही सरकारी कंपन्यांवर देशभर 3G सेवा देण्याची सक्ती का केली? BSNLला 3G स्पेक्ट्रम पायी सरकारला १०,१८७ कोटी रुपये द्यावे लागले आहेत. MTNL ने २ सर्कल्स साठी ६,५६४ कोटी भरले. ह्या उलट, १३ सर्कल्स साठी Airtel ने फक्त १२,२९५ कोटी भरले. ह्यावरून MTNL ची येत्या काही वर्षात काय परिस्थिती होऊ शकते, हे लक्षात येईलच.

राजकारणी हेतूसाठी ह्या दोन कंपन्यांचा Air India प्रमाणेच वापर करून शेवटी व्यावसायिक दृष्ट्या त्यांचा बट्ट्याबोळ करण्याचे सरकारने ठरविले आहे का?
MTNL, BSNL सुद्धा Air India च्या वाटेवर का?SocialTwist Tell-a-Friend

बुधवार, जून ०१, २०११

लेडीज मार्केट: हाँग काँग

हाँग काँग जसं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, तसच ते इलेट्रोनिक वस्तूंसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आपण कुठेही पर्यटनासाठी गेलो, की तिकडून आठवण म्हणून काही तरी घेऊन येतोच. साधं महाबळेश्वरला गेलो, तर तिकडून वेताची छडी किंवा स्ट्रॉबेरी घेऊन आल्या शिवाय रहावत नाही.

हाँग काँगला गेलं असताना, लेडीज मार्केटला भेट देणं हे कर्तव्य आहे. ह्या मार्केटची ख्याती, तिथे मिळणार्‍या बायकांच्या उपयोगाच्या वस्तूंमुळे झाली, पण तरी आता तिकडे अनेक गोष्टी मिळतात. साध्या सेफ्टी पीन पासून ते घड्याळ इ. इलेट्रोनिक वस्तू तिथे मिळतात. थोडक्यात म्हणजे, हाँग काँग मधील लेडीज मार्केटची तुलना पुण्यातील तुळशीबागेशीच होऊ शकते. पण तिथे इलेट्रॉनिक वस्तू घेताना सावधानता बाळगावी. कारण बर्‍याचवेळा हा माल बनावट असतो आणि तो टिकण्याची काहीही गॅरंटी नसते. त्याशिवाय सुट्टे देताना नकली नोटा परत मिळण्याचे प्रमाण सुद्धा या इलेक्ट्रॉनिक बाजारात घडू शकतात. पण बाकी माल घेताना जीवाची फार तळमळ होऊ नये.

लेडीज मार्केट दुपारी १२:०० वाजल्या पासून रात्री ११:३० पर्यंत खुले असते. त्यासाठी दोन रस्ते बंद करून रस्त्यावरच दुकानं लावली जातात. इथे घेण्या सारख्या अनेक गोष्टी आहेत. हाँग काँग मधील पर्यटन स्थाळांच्या प्रतिकृति, प्राडा, गुची, इ. नामवंत लेबल्सची फेक उत्पादनं, ब्रेसलेट, माळा, बेल्ट, की-चेन, लहान मुलांची खेळणी आणि त्या सर्व गोष्टी ज्या तुळशीबागेत सुद्धा मिळतील. अनेक दुकानं असल्यामुळे आपल्या कडे पर्याय सुद्धा भरपूर असतात.

एक गोष्ट ध्यानी ठेवावी, की ह्या बाजारात कुठलीही वस्तू घेताना किमतीवर हुज्जत घालणे गरजेचे आहे. ज्याला उत्तम हुज्जत घालता आली तो तरला. पण, ज्याला नाही घालता आली, तो डुबलाच. जी काही किंमत दुकानदारीणीने (येथील बहुतेक ‘दुकानं’ बायका चालवतात) सांगितली असेल, त्याचा ३५-४०% किमती वरून आपण बोली चालू करावी. बाई खवळते, मोठ्याने आरडा-ओरडा केल्यासारखे बोलू लागते. पण आपण डगमगायचं नाही. बहुतांश लोकं चिनी असल्याने, त्यांची भाषा आपल्याला कळत नाही. म्हणून हे बारगेनिंग, कॅलक्युलेटर वर चालतं. दोन्ही पार्ट्या एक-एक करून आपल्या किमती त्यावर टाईप करतात. आणि दोन-तीन फेर्‍या (राउंड्स) झाल्यावर दोन्ही पक्ष एका किमतीवर राजी होतात, किंवा सौदा तोडून टाकतात. सौदा तुटला तरी हरकत नाही. बाई शिव्या सुद्धा घालेल, पण आपण निगरगट्टपणे पुढच्या दुकानाकडे मोर्चा वळवायचा. कुठल्या न कुठल्या दुकानात आपल्याला पाहिजे ती वस्तू पाहिजे त्या किमतीत मिळतेच.
लेडीज मार्केट: हाँग काँगSocialTwist Tell-a-Friend