सोमवार, ऑक्टोबर २५, २०१०
खेळ अनेक, कोच फक्त एक
सोमवार, ऑक्टोबर १८, २०१०
आपला तो बाब्या आणि दुसर्याचा तो कार्टा
Sadly, just when he needs it most as a defence, the Kannadiga sees his language and culture being eroded everywhere. I encounter this problem in Bangalore every day, where people routinely speak to me in Hindi. As a matter of principle, i insist on replying in Kannada, but the Kannadiga's self-esteem has dipped so low that many will talk only in Hindi to me. Our sense of who we are has unraveled. There is money, but there is no pride in Karnataka any longer.
But do pay attention, my fellow Kannadigas — Gowdas, Murthys, Sheikhs, and D'Souzas, all of you. Ten years from now, if the residents of Bihar tease you for coming from India's most lawless state, don't say that you had no warning.
सोमवार, सप्टेंबर २०, २०१०
राशीचक्राचे परचक्र
आमच्या ओळखीतील एक वृश्चिक रास आणि विशाखा नक्षत्रा मधे जन्मलेल्या मुलीचं लग्न ठरताना अनेक विघ्न येत आहेत. त्याचं मुख्य कारण उपाध्येंचा उपदेश. त्यामुळे बरीच लोकं तिची पत्रिका सुद्धा हातात घ्यायला तयार नाहीत!! खरं तर, ही मुलगी अत्यंत हुशार आहे, खासगी क्षेत्रातील एका चांगल्या बॅंकेत नोकरीला आहे, आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आहे. पण उपाध्येंच्या शब्दाला ब्रीद वाक्य मानणारे आपल्याकडे बरेच आहेत. पण हा कार्यक्रम गम्मतीचा भाग आहे, त्यातील प्रत्येक शब्द हा त्या विषयावरील शेवटचा शब्द ठरत नाही. हे अनेक लोकांनी अजून लक्षातच घेतलं नाही. थोडक्यात बारीक अक्षरातील "* conditions apply" हे कुणीच वाचलेलं नाही. आता ह्या मुलीच्या बाबतीत उद्भवलेल्या समस्येचं समाधान उपाध्ये देतील का? पत्रिका घेऊन, ती न जुळणे, हा वेगळा भाग आहे. पण लोकांनी ती घ्यायलाच नकार दिला, तर तिच्या लग्न जमायच्या कितीतरी संध्या फुकट गेल्या असतील. राशीचक्रामुळे तिच्या बाबतीत निर्माण झालेलं हे परचक्र कोण दूर करणार?
शुक्रवार, सप्टेंबर १७, २०१०
पी.एच.डी. आणि संस्कृत सुभाषितं
शुक्रवार, सप्टेंबर ०३, २०१०
दोन महान गायक, दोन भिन्न शैल्या, पण तेच मोहून टाकणं
आता, ०:५७ ला सुरू होणारी हीच ओळ महम्मद रफींनी गायलेली आहे. ही शैली एकदम स्मूथ वाटते. म्हणजे, कुठेही हेलकावे नाहीत, शब्दाच्या शेवटावर अधिक जोर नाही. इंग्रजीत "हॉट नाईफ थ्रू बटर", ह्या प्रमाणे त्यांची ही ओळ एकदम स्मूथली गायल्या सारखी वाटते. पाय थिरकत नाहीत, पण दाद देण्यासाठी मान डोलायला लागते. खासकरून "सारा हिन्दुस्तान"च्या वेळेस. ही ओळ एका श्वासात गायल्या सारखी वाटते.
विशेषत:, दोघांनी गायलेल्या "मैं तेरा, तू मेरी जाने सारा हिन्दुस्तान" मधला फरक प्रकर्षाने जाणवतो. पण दोन्ही शैल्या तितक्याच मोहक वाटतात, तितक्याच ऐकाव्याशा वाटतात. ह्या दोन्ही महान गायकांना त्रिवार वंदन!!
बुधवार, ऑगस्ट २५, २०१०
खासदारांनी मागितलेली पगारवाढ, कितपत योग्य आहे?
दुसरं, प्रणव मुखर्जी म्हणतात त्याप्रमाणे, एखद्या आय.ए.स. अधिकार्याला कॅबिनेट सेक्रेटरीच्या पदावर पोहोचण्यासाठी ३०-एक वर्षं लागतात. त्यात तो अनेक ठिकाणी कामं करून, अनुभव घेऊन त्या पदावर रुजू झालेला असतो. पण, इथे खासदार पहिल्यांदा आला काय, आणि पाचव्यांदा आला काय, त्याला जास्ती पगार हवा. बरं, वीस वर्षं अखंड सेवा झाल्याशिवाय कुठलाही सरकारी अधिकारी निवृत्ती वेतन आणि निवृत्त्युत्तर सुविधांसाठी पात्र ठरत नाही. पण तुम्ही एक दिवस जरी खासदार असलात, तरी तुम्ही खासदारांसाठी असलेल्या सर्व निवृत्त्युत्तर सुविधांसाठी पात्र ठरता. ही ह्या सेवेची विषमता नाही का?
तिसरं, कायद्यानुसार कॅबिनेट सेक्रेटरीला इतर कुठेही नोकरी करता येत नाही किंवा स्वत:चा व्यवसाय चालू करता येत नाही. भलेही तो पत्नीच्या अथवा मुलांच्या नावावर काहीही करत असो, कायद्यानुसार तो फक्त सरकारची नोकरी करू शकतो. पण, आपल्या खासदारांवर तसले काहीच बंधन नाही. ते खासदार असत्या वेळी, इतर (कायदेशीर) व्यवसाय करू शकतात आणि त्यातून पाहिजे तेवढे कमवू शकतात. त्याशिवाय, अनेक खासदार क्रीडा मंडळांचे अध्यक्ष, कोषागार, इ. आहेत. त्या क्रीडा मंडळा तर्फे सुद्धा ते मानधन घेण्यास पात्र असतात. कॅबीनेट सेक्रेटरी सरकारच्या आदेशाशिवाय कुठलेही इतर पदभार संभाळू शकत नाही आणि म्हणून त्याला इतर कुठूनही मानधन मिळत नाही.
चौथं, भारतीय संरक्षक दलाला एक-हुद्दा, एक-निवृत्ती वेतन (One Rank, One Pension) योजना लागू न करण्या मागे संरक्षण मंत्र्यांनी दिलेलं कारण असं होतं की ही योजना लागू केली तर ती सरकारला खूप खर्चीक पडेल. त्यामुळे सेवेचा काळ (service period) ह्याच्या आधारावरच निवृत्ती वेतन दिलं गेलं पाहिजे. जे अतिरेक्यांच्या गोळ्या छातीवर झेलण्याचा धोका स्वीकारतात, त्यांचा बद्दल ही कारणं सांगायची आणि खासदारांचे वाढीव पगार द्यायला सरकार कडे मुबलक पैसा आहे.
असो, हे सगळं असं असताना, ह्या गोष्टीचा सारासार विचार कुठल्याही खासदाराने केलेला दिसत नाही, किंवा करायची इच्छा नाही. म्हणून कसलाही विचार न करता त्यांना अवाढव्य पगारवाढ हवी. ह्या व्यतिरिक्त, अजूनही कारणं देता येतील. पण सध्या ही कारणं विचार करायला भाग पाडण्यास पुरेशी आहेत.
शुक्रवार, ऑगस्ट १३, २०१०
टके सेर भाजी और टके सेर ख़ाजा
ह्याची थोड्या फार प्रमाणात पुनरावृत्ति इथे माझ्या माय देशात, भारतात होत आहे. rediff.com ला २२ जुलैला दिलेल्या एका मुलाखतीत भारतीय खाद्य निगम (Food Corporation of India)च्या अध्यक्षांचे हे बोल वाचा. मुलाखत इंग्रजीत झाल्याने, तीचा उल्लेख इथे इंग्रजीतच करण्यात येत आहे. उगीच अनुवादा मधे, मूळ अर्थाचा र्हास नको-
प्रश्न: FCI has a huge stock of wheat, but inflexibility in pricing open market sale means the stocks are not lifted.
अध्यक्षांचं उत्तर: At present, open market prices are lower than FCI prices. But, the prices are determined by the government keeping in mind various things. For example, we offered to sell wheat at Rs 1,350 a quintal in Mumbai, though we could not sell much.
Once market prices change, we may be able to sell at this price. We cannot bring the price much lower as in that case (if the sale price falls too low), private trade will not buy wheat from farmers and government agencies will have to make all the procurement, which is not advisable.
म्हणजे काय, तर खुल्या बाजारातला गहू हा सरकारी भावापेक्षा कमी आहे, आणि अनेक (अस्पष्ट) धोरणांमुळे FCI चा गहू त्या किंमतीला विकता येत नाही.
गेल्या काही वर्षांपासून सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर एवढं नियंत्रण ठेवलं होतं की काही महीने तेल कंपन्यांना बाजार भावापेक्षा रु. ५-६ कमी किंमत मिळत होती. ती तूट भरून काढण्यासाठी सरकार ह्या तेल कंपन्यांना १०-१२ हजार कोटींचं २० वर्षांचे बॉंड देत होतं. आणि ONGC सारख्या कंपन्या त्यांना तेलाच्या किंमतीत सूट देत होत्या.
का, तर देशातल्या मोटारींना इंधनाच्या किंमतीची झळ बसू नये म्हणून. आणि डिझेलच्या किंमतीत दरवाढ केली तर महागाईचा भडका उडेल म्हणून. पण आपले हे हुशार सरकार, FCIला कुठल्याही प्रकारचे बॉंड देऊन गरीब जनतेला परवडेल अशा किंमतीत धान्याची विक्री करायला तयार नाही. पण मध्यम आणि उच्च वर्गीयांच्या गाड्यांच्या टाक्यां मधे भरले जाणारे पेट्रोल मात्र त्यांना वाजवी दरात मिळाले पाहिजे. म्हणजे, ह्या सरकारच्या मते, पेट्रोल-डिझेल आणि धान्याची उपलब्धीला समान महत्व आहे. अहो लोकं चार पावलं चालत जाऊ शकतात, चार पैकी १-२ वीक-एन्डला गाडीतून हिंडण्या ऐवजी घरी बसू शकतात, पण जर आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या लोकांना रास्त भावात धान्य मिळालं नाही, तर ते काय करणार? आज परिस्थिती अशी आहे, की वीक-एन्डची धाम-धूम आहे तशीच आहे, वाढली सुद्धा असेल, पण शहरात आणि गावात, गरीब लोकांना दोन वेळचं जेवण सुद्धा महागलं आहे. rediff.com वरच आलेल्या काही मुलाखतीं मधे, मुलांना पोटभर जेवायला मिळावं म्हणून आपण अर्धपोटी रहातो, असे सांगणार्या पालकांच्या मुलाखती आहेत. सन्माननीत शरदरावजी पवारांनी ह्या विषयावर जरा विचार करावा. महत्वाचं काय आहे? धान्यावर वाजवी सूट देणं की खनीज तेलाच्या पदार्थांवर?
नाहीतर टके सेर भाजी और टके सेर ख़ाजा असं चित्र ह्या देशात तयार होतं आहे.
सोमवार, ऑगस्ट ०९, २०१०
हरवलेला रविवार
न्याहरी आणि आंघोळ हे सगळं एकतर सकाळी नऊच्या आंत किंवा तडक साडे-दहा नंतर उरकायची. कारण सकाळी नऊ ते दहा, आधीच्या काळात रामायण लागायचं. त्यावेळी, असं म्हणतात की बाजारं ओस पडलेली असायची (बघायला कोण गेलंय?, आम्ही रामायण बघत बसायचो). खरी मजा तर गावाला असताना यायची. त्याकाळी सगळ्यांकडे टी.व्ही. नव्हता. केवळ मोजक्या घरांमधे असायचा. मग शेजार-पाजारचे, घरी कामाला असलेल्या बायका, वगैरे, सगळ्यांची मैफल जमायची. कैकेयीने रामाला वनवासात धाडण्यासाठी जेव्हा दशरथाकडे गार्हाणं घातलं, तेव्हा तिला बायकांनी बोटं मोडून शिव्या घातल्या होत्या (मेली कपाळ-करंटी , कड-कड (बोटं मोडल्याचा आवाज) आणि तत्सम). नंतरच्या काळात महाभारताचे वेड लागले होते. वेड म्हणावे का ध्यास? कारण आजी-आजोबांपासून ते ५-६ वर्षांच्या नातवंडांपर्यंत सगळेच अगदी तन्मयतेने बघायचे. राम वनवासात निघाला, तेव्हा कौशल्या आणि सुमित्रा बरोबर अनेक देशवासीयांनी (विशेषत: स्त्रियांनी) अश्रू ढाळले होते. अखेरच्या लढाईत, रावण पडल्यावर वानरसेने इतकाच जल्लोष बच्चे कंपनीने देखील केला होता. शाळेत जास्ती करून युद्ध-प्रसंगांची चर्चा रंगायची. करुण रसातील प्रसंग बहुधा शाळेतील आम्हा मुलांच्या डोक्यावरूनच जायचे.
ते संपलं, की दहा वाजता मुलांसाठी कार्यक्रम. कार्टून शो. 'गायब आया' हे भारतीय दूरदर्शन वरील सगळ्यात पहिलं कार्टून. त्यानंतर जंगल बुक, डक टेल्स, टेल्स्पिन, पोटली बाबा की, ह्या कार्यक्रमांनी लहान मुलांना अक्षरश: एका वेगळ्याच विश्वात फिरवून आणलं. रामायण-महाभारतवरच्या चर्चांच्या सोबत ह्या कार्यक्रमांची सुद्धा शाळेत मुलं पोस्टमॉर्टेम करीत.
आणि एकदा का ११:०० वाजले, की सगळे आपापल्या कामाला लागायचे. आई, दुपारच्या जेवणाच्या तयारीला; बाबा रविवारचा पेपर वाचायला आणि मुलं खेळणे, किंवा उरलेला गृहपाठाला लागायची. दुपारी सगळं उरकलं की दीड वाजता प्रादेशिक भाषेतील चित्रपट लागायचे. त्यातील काही खूप चांगले असायचे. आता काही आठवत नाही, पण काही चांगले बंगाली सिनेमे बघितले होते त्याचावर. आम्ही ग्वाल्हेरला असताना, मराठी चित्रपट दिसायची ही एकच संधी होती. सर्जा चित्रपट आम्ही असाच एकदा पाहिला होता. आणि तो आधी सुद्धा बघितला असल्या कारणाने तो किती आणि कुठे कापलाय ह्याचीपण चर्चा रंगायची.
दुपारचा चहा झाला, की संध्याकाळी प्रादेशिक सिनेमा लागयचा. म्हणजे, महाराष्ट्रात मराठी सिनेमा, गुजराते गुजराती आणि हिंदी-भाषिक राज्यांमधे हिंदी सिनेमे लागायचे. साप्ताहिकीत कळलेलं असायचं की रविवारी संध्याकाळी कुठला सिनेमा लागणार आहे. त्यामुळे चांगला सिनेमा असेल, तर बाहेर जायचा मोह टाळण्यात यायचा.
रात्रीच्या जेवणानंतर, इंग्रजी बातम्यांच्या नंतरची वेळ सरकारने खास इंग्रजी कार्यक्रमांसाठी राखून ठेवलेली होती. स्ट्रीट हॉक, नाईट रायडर, येस मिनिस्टर आणि पुढे यस प्राईम मिनिस्टर, हे चांगले दर्ज्याचे कार्यक्रम बघायला मिळाले. आणि सगळ्यात शेवती रात्री दहा वाजता "द वर्ल्ड धीस वीक". जागतिक घडा-मोडी सांगणारा प्रणय रॉय चा (तोच तो, एन. डी. टी. व्ही. नामक न्यूज चॅनल सारखं काहीतरी चालवणारा) हा कार्यक्रम जागातील अनेक बातम्या आपल्या घरात आणून द्यायचा. आणि ह्या कार्यक्रमाच्या शेवटी लागणारी ती डनलॉप टायरची जाहिरात. हे सगळं झालं, की रविवार संपायचा. आणि पुढच्या रविवार उगवण्याची वाट बघणं सुरू व्हायचं.
आता ती सगळी मजा गेली. शंभर वाहिन्या आलेल्या आहेत, पण कार्यक्रम तेव्हा सारखे वाटत नाहीत. रविवार सकाळ, म्हणजे गेल्या आठवड्यातील कार्यक्रमांची रिव्हिजन करणे असच झालंय. त्यात आता न्यूज चॅनल वाले तर गेल्या आठवड्यातील कॉमेडी आणि डान्स शोस दाखवून आपल्या मतांची पिंक टाकत असतात. चित्रपटांचे सुद्धा ७-८ चॅनल्स असल्याने बहुदा सगळेच चित्रपट बघून झालेले असतात. आवर्जून रविवारी वाट बघून पहावा, असा एकही चित्रपट उरला नाही. मग काय, बीग-बी फेस्टीवल, सुपरस्टार उत्सव वगैरे चालू केले आहेत. पण आता काही रविवारी सकाळी रस्ते ओस पडत नाहीत. उलट उधाण येतो. शाळेत रविवारच्या कार्यक्रमा ऐवजी काल कुठल्या मॉल मधे खरेदीला गेलो ह्याची चर्चा होते. आणि रविवारी सकाळी लवकर उठण्याची सवय सुद्धा मोडली आहे.
शुक्रवार, जुलै ३०, २०१०
युरोपने बुरख्या बाबत का नमावे?
बेल्जियम मधे बुरख्यावर बंदी घालण्या बद्दल कायदा मंजूर करताना तिथल्या सरकारने स्पष्ट केलं की त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या CCTV मधे लोकांचे चेहरे जर दिसले नाहीत तर ते सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचं ठरेल. फ्रान्सने तर त्या पुढे जाऊन सांगितलं की सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारची धर्म-चिन्ह बाळगणं हे त्या देशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या कक्षेत बसत नाही. बुरख्या विरोधात युरोप मधे तयार होत असलेल्या मता बद्दल अनेक मुसलमानांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांना युरोप मधे आपण सुरक्षित नाही असं वाटायला लागलं आहे. आणि त्या विरोधात त्यांची निदर्शनं आणि सरकार कडे निवेदनं वगैरे चालू आहेत. एवढच काय, तर आता अल-कायदा सुद्धा युरोपीय मुसलमानांच्या बाजूने उतरलं आहे.
पण, युरोपने बुरख्या वरच्या बंदीच्या विरोधा समोर का नमावे? आपण ज्या देशात वास्तव्य करतो, तेथील संस्कृती अनुसरायला नको? तुम्हाला कुणीही परंपरागत पेहराव घालण्यास मनाही केलेली नाही. त्यांचा 'हिजाब' ला विरोध नाही. फक्त बुरख्याला आहे. आणि युरोप तर सगळ्यांना आपल्या धर्माचं अनुसरण करायला परवानगी तरी देतं. आखाती (मध्य-पूर्व आशिया) देशां मधे तर मुसलमानेतर लोकांच्या धार्मिक विधिंवर पूर्ण बंदी आहे. तिकडे इतर कुठल्याही धर्माचे अनुसरण करणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. आणि "काफरांना" सजा-ए-मौत ची शिक्षा देण्यास हे लोकं कमी करत नाहीत. सऊदी अरब आणि यू. ए. ई. मधे तर तुमच्या कडे हिंदू देव-देवतांचे फोटो आढळले तर दंड ठोठावला जातो. त्या देशांना कुणीही जाब विचारत नाही. त्यांना कुणीही हिंदू-द्वेष्टे, ज्यू-द्वेष्टे किंवा ईसाई-द्वेष्टे म्हणत नाही. ज्या मुसलमानांना आपला धर्म पाळायची मुभा हवी, ते पण ह्या बाबतीत काहीही बोलत नाहीत. त्यांना युरोप मधील स्वातंत्र्य आणि सुबक आर्थिक परिस्थिती भोगायची आहे, पण स्वत:च्या सऊदी वातावरणात. त्यांचे स्वत:चे देश इतर धर्मांच्या हक्कांना दाबून देतात, आणि त्यांना मात्र इकडे सगळे स्वातंत्र्य हवे. मग युरोपने तरी स्वत:च्या इच्छेनुसार का वागू नये? त्यांनी आपले बुरख्या बाबतचे धोरण स्वत:च्या राष्ट्रीत कायदे, हक्क आणि तत्वानुसार राबवलेच पाहिजे. ज्यांना हे नको वाटते, ते युरोप सोडून आखाती देशात किंवा अफगाणिस्तानात जायला मोकळे आहेत. कुणीही त्यांना रोखून धरणार नाही.
रविवार, जुलै २५, २०१०
चला होऊ सायकल स्वार
नेदरलॅन्ड्स बद्दल चार गोष्टी जगभरात प्रसिद्ध आहेत. पहिल्या तिथल्या पवनचक्क्या, दुसरं आम्स्टर्डम मधील ऍन फ्रॅन्क हाऊस, तिसरी, तिथलीच रेड-लाईट डिस्ट्रिक्ट आणि चौथं म्हणजे सायकली. त्यातील पहिल्या तीन वगळता, मी फक्त सायकलीं बद्दल लिहित आहे. सायकल चालवणे हा डच लोकांचा राष्ट्र धर्मच आहे. पाच वर्षांच्या इवल्याशा पोरी पासून ते साठ-सत्तर वर्षांच्या आजी पर्यंत सगळेच पटाईत सायकल स्वार असतात. पण हे सगळं योगायोगाने न घडता डच सरकारच्या नियोजित धोरणांनुसार होत आहे.
अखंड युरोप खनीज तेला साठी आतातींवर अवलंबून आहे. आणि तेलाच्या वाढत्या उतरत्या किंमतींमुळे संपूर्ण जगाला सतत चिंतेमधे रहावं लागतं. केवळ तेवढेच नव्हे, तर ओपेकच्या सभासदांनी मनात आणलं तर ते तेल साठा पाहिजे तेव्हा रोखून धरू शकतात. म्हणूनच खनीज तेलाचा वापर कमी करण्यासाठी डच सरकारने सायकलींच्या यातायातावर भर द्यायला सुरू केलं. लोकांनी सायकल वापरावी म्हणून शहरांमधे अनेक ठिकाणी कार पार्किंग अतिशय महाग केलं. आज तुम्हाला तिकडे कार घेणं सोपं आहे, पण ती घेऊन बाजारहाट करण्यासाठी जाणे अत्यंत कठीण. काही ठिकाणी, विशेषत: मध्य वस्तीत, तर कारने जाताच येत नाही. केवळ चालत किंवा सायकलवर.
हे केल्यावर सगळ्या लहान-मोठ्या शहरां मधे, सायकलींसाठी वेगळे रस्ते केले. हे रस्ते मुख्य रस्यांना समांतर आहेत. त्यावरून केवळ सायकली आणि पादाचारी जाऊ शकतात. चौकांमधे क्रॉसिंगच्या वेळेस सायकलींना प्राधान्य आहे. सायकल-स्वारांसाठी वेगळी सिग्नल व्यवस्था आहे. ती त्यांना स्पष्ट दिसेल ह्याची पण सोय आहे. रेल्वे स्थानक, बस स्थानक, इतर सार्वजनिक ठिकाणी, सायकली उभ्या करण्यासाठी स्वतंत्र स्टॅण्ड आहे. आणि हे स्टॅण्ड्स मुबलक प्रमाणात उपलब्ध केले आहेत. सुपरस्टोर्सच्या शेजारीच सायकल पार्किंग असावं, ही डच सरकारची पॉलीसीच आहे. अशा सगळ्या सोई केल्यावर आणि काही प्रमाणात कार वापरणे कठीण केल्यामुळे डच लोकं सायकलींवर स्वार होऊ लागले. आणि हळू-हळू सायकलिंगची संस्कृती ह्या देशात रुळू लागली.
अनेक जणं कार्यालयात जाण्यासाठी सायकलींचा वापर करतात. तुम्हाला एका शहरातून दुसर्या शहरात जायचे असेल, तर तुम्ही ट्रेन मधे तुमची सायकल घेऊन चढू शकता. त्यासाठी ट्रेन मधे स्वतंत्र डबे आहेत. सायकल नेणं सोपं जावं ह्यासाठी एका कंपनीने फोल्डींग सायकल काढली. तुम्हाला ट्रेन अगर ट्रॅम मधे सायकल घेऊन जायचं असेल, तर सायकल फोल्ड करून हातातून घेऊन जाऊ शकता.
सायकली वरून बाजारहाट करता यावा म्हणून सायकल कंपन्यांनी सायकलच्या समोर बास्केट बसवायला सुरू केलं. ही बास्केट तुमचं आठवड्याभराचा भाजीपाला वाहून घेऊ शकते. शनिवार-रविवार उजाडला की अनेक कुटुंब आपापल्या सायकली घेऊन सफरीला जाताना दिसतात. ह्या असल्या व्यायामामुळेच आणि मैदानी खेळांमधे हिरहिरीने भाग घेत असल्यामुळ डच लोकांचं स्वास्थ्य टिकून आहे. स्थूल व्यक्ति नेदरलॅन्ड्सच्या छोट्या शहरांमधे सापडणे कठीण. ह्यातूनच पर्यावरणाचं संवर्धन होतं. कारण, सायकल बनवायला कार पेक्षा कमी उर्जा आणि कच्चा माल लागतो. आणि ती चालवायला सुद्धा पेट्रोल अथवा डिझेल लागत नाही.
पण हे सगळं आपोआप घडून आलं असं समजू नका. सरकारच्या अनेक पॉलीसी ह्या साठी कारणीभूत आहेत. पण पॉलीसी बनवताना सायकल स्वारांसाठी सुविधा तयार करायला सरकार मागे राहिलं नाही. त्यांना स्वत:हून प्राधान्य निर्माण करून दिलं, आणि सायकल चालवणे सुरक्षित करून दिलं.
शुक्रवार, जुलै ०२, २०१०
विश्वकरंडक आणि विश्वयुद्ध
खरं तर हा पोस्ट लिहायला उशीर झालाय, पण उशीरा का होईना, पोस्ट केलं पाहिजे. आज (शुक्रवार, दि. ३ जुलै) पासून उपांत्य-पूर्व सामने चालू होतील. पण जरा तुलना करुया विश्वयुद्ध आणि इंग्लंड-जर्मनी ह्यांच्यातला २७ जूनला झालेल्या बाद फेरीतल्या सामन्याचं.
समानता:
- "ब्लिट्झक्रेग"चा वापर: द्वितीय विश्वयुद्धात, जर्मन सैन्यानं सुरवातीच्या काळात ब्लिट्झक्रेग अर्थात विद्युत गति युद्ध तंत्र अवलंबून अनेक विजय संपन्न केले होते आणि शत्रु-पक्षास जेरीस आणले होते. ह्या सामन्यात देखील जर्मनीच्या मिड-फिलडर्स आणि स्ट्रायकर्सनी असंच विद्युत गतिचा खेळ करून इंग्लंडच्या बचाव फळीला पेचात पकडलं. क्लोसंने जर्मनी साठी केलेला दुसरा गोल पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल. आणि ६९ व्या मिनिटांत ओझीलने मिड-फिल्ड मधून जर्मनीच्या डी-बॉक्स पर्यंत केलेल्या दौडीने इंग्लंडच्या बचाव फळीला भांबावून सोडलं होतं. त्याचा फायदा घेऊन म्युलरने गोल केला.
- सुरवातीचं जर्मन वर्चस्व: विश्वयुद्धाप्रमाणेच सामन्यातही सुरवातीला जर्मन वर्चस्व होतं. इंग्लंड कडे जरी बॉलचं पोसेशन अधिक वेळ असलं तरी जर्मन स्ट्रायकर्सनी इंग्लंडच्या बचाव फळीला जरा सुद्धा उसंत घेऊ दिली नाही.
- एका व्यक्तिचं वलय: द्वितीय विश्वयुद्धात इंग्लंडची सर्व दारोमदार विंस्टन चर्चिल नावाच्या झुंजार नेत्यावर होती. ह्या विश्वचषकात इंग्लंडची दारोमदार वेन रूनी वर होती. दुर्दैवाची गोष्ट अशी, की दोघांचे ही इंग्रजी लिपीतील नाव "W" वरून चालू होत असले, तरीही रूनी चर्चिल सारखा प्रभावी ठरला नाही. त्याची खेळी निष्प्रभ ठरली.
- म्युनीक मधील जर्मन नेतृत्व: द्वितीय विश्वयुद्धात जर्मनीचं नेतृत्व करणार्या हिटलरची राजकीय कारकिर्दाची सुरवात म्युनीक शहरातच झाली होती. जर्मन संघाचा कर्णधार फिलिप लामची कारकिर्द सुद्धा बायर्न म्युनीक क्लब तर्फे खेळताना बहरली. राष्ट्रीय़ स्तरावर नाव गाजवण्या आधी दोघांनी ही म्युनीक मधे नाव कमावलं होतं.
- त्रयस्थ संगठनांचा कमकुवतपणा: लीग ऑफ नेशन्सच्या कमकुवत आणि नेमस्त स्वभावामुळे जर्मनीला मोकळं रान मिळालं होतं आणि ही गोष्ट त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी कारणीभूत ठरली. सामन्यात सुद्धा रेफरी आणि लाईन्समनचे हात बांधले असल्या कारणाने त्यांनी लॅम्पार्डचा गोल नामंजूर केला. त्यामुळे इंग्लंडला धक्का बसला आणि जर्मनीचं मनोबल वधारलं.
विषमता:
- जर्मन वर्चस्व कायम: विश्वयुद्धात जरी जर्मनीचं वर्चस्व निवळून मित्र राष्ट्रांचं स्थापित झालं असलं, तरी सामन्यात जर्मनीने शेवट पर्यंत वर्चस्व कायम राखलं.
- इंग्लिश खाडी: विश्वयुद्धात ही खाडी इंग्लंड साठी एक नैसर्गिक सुरक्षात्मक खंदका सारखी होती. पण सामन्यात जर्मन स्ट्रायकर्स आणि इंग्लिश बाचाव फळीतल्या खाडी एवढ्या अंतराचा जर्मन खेळाडूंनी पुरेपूर फायदा उचलला.
- अमेरिकेची भूमिका: विश्वयुद्धात अमेरिकेने इंग्लंडला मदत करून जर्मनीचा पराभव केला होता. पण ह्या विश्वकरंडक स्पर्धेत अमेरिके मुळेच इंग्लंडला जर्मनीला सामोरं जावं लागलं. पात्रता फेरीत जर अमेरिकेने इंग्लंडला १-१ च्या बरोबरीत रोखलं नसतं तर त्या दिवशी अमेरिका जर्मनी बरोबर खेळत असती आणि इंग्लंड घाना बरोबर.
शनिवार, जून २६, २०१०
मुंबई: सुधारित रिक्षा भाडं
आता प्रत्यक्ष भाडेवाढी कडे वळूया. ती किती असावी ह्यावर मी माझं मत मांडत नाही. पण ती असताना प्रवाश्यांचे हाल होऊ नयेत एवढीच अपेक्षा. रिक्षाचे किमान भाडे, रु. ९ वरून रु. ११ करण्यात आले आहे. आणि त्यापुढे प्रत्येक कि.मी. ला आकारले जाणारे भाडे रु. ५ वरून रु. ६.५० करण्यात आले आहे. ह्यात सगळ्यात डोकेदुखीची बाब ठरणार ती त्या वरच्या ५० पैश्यांची. रिक्षावाले नेहमीच सांगणार ५० पै. नाहीत. मग प्रवाश्याने हताशपणे त्या वरच्या ५० पैश्यांवर पाणी सोडायचे. कारण स्वत: रिक्षावाले काही सोडणार नाहीत.
सध्या ५० पै. फार कमी ठिकाणी चलनात आहेत. मुंबईत तर हल्ली दुकानांनी आठ-आण्याचं नाणं स्वीकारणं बंद केलं आहे. ह्या परिस्थितीत ५० पैश्यांची नाणी आणायची कुठून? कारण अनेक लोकांनी आपापली नाणी बॅंकेतून बदलून घेतली असतील अथवा कुठेतरी खपवली असतील. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे होती. भाडे वाढ कमी ठेवण्याच्या नादात प्रवाश्यांचे कष्ट आणि ताप वाढले आहेत.
बुधवार, जून १६, २०१०
दृष्टी पलीकडील रंग सृष्टी
पण, माझी आई, तिच्या मैत्रिणी, बहिणी, मावश्या, आत्या, आणि बहुतांश स्त्रियांना नजरे पलीकडचे अनेक रंग दिसतात. त्यांना ते रंग दाखवणारे साडीच्या (आणि हल्ली ड्रेसच्या) दुकानातील मदतनीस बहुदा डोळ्यांवर वेगळी कॉन्टॅक्ट लेंस लावून येत असावेत. आता राणी कलर म्हणजे काय? हे मला अजूनही कळलेलं नाही. उभ्या जन्मात कळेल, असं वाटत नाही. बरं तो रंग नेहमीच राणी "कलर" असतो. तो क्वीन्स रंग किंवा राणी-रंग नसतो. अगदी इंग्रजीचा गंध नसलेले सुद्धा (हल्ली असे कुणी सापडणं कठीण आहे म्हणा) त्या रंगाला राणी कलरच म्हणतात.
तीच गत रामा-ग्रीनची. ह्या रंगाचं सोवळं सर्वात पहिल्यांदा रामाने नेसलं होतं का? की ह्या रंगाची साडी-चोळी सीतेला त्याने भेट म्हणून दिली होती का? ह्याचं उत्तर सापडणं कठीण आहे. कुठल्या तरी रंग बनवण्याच्या कारखाण्यात काम करण्यार्या रामा गड्याने रसायनांचं प्रमाण चुकवलं असेल आणि त्यातून निर्माण झालेला हा रामा-ग्रीन.
असो, नजरे पलीकडच्या विश्वात असे अजून अनेक रंग असतील. दिसतं तसं नसतं, म्हणतात ते हेच. रामा ग्रीन रंगावर थोडी निळ्या रंगाची झाक पण आहे. राणी कलर मधे कुठल्या रंगांचं मिश्रण असेल, माहित नाही. दृष्टी आडची ही सृष्टी कळण्यास बहुदा दुसरा जन्म उजाडेल.
रविवार, जून ०६, २०१०
गोमंतक लॉजिंग-बोर्डिंग हॉटेल
आज परळला गेलो होतो, तेव्हा येताना मत्स्याहार करायचं ठरवलं होतं. ३-४ महिन्यांपुर्वी मालवणला गेलेलो असताना, तिकडे हॉटेल चैतन्य मधे जेवायचा योग आला होता. तेथील जेवण अतिशय उत्कृष्ट होतं. त्या वेळेस वाटलं होतं की असं जेवण मुंबईत किंवा पुण्यात मिळेल का? तोच त्या चैतन्यवाल्याने आपलं कार्ड दिलं ज्यात त्यांच्या मुंबईच्या शाखेचा पत्ता होता. मुंबईत हॉटेल चैतन्य राम गणेश गडकरी चौकात आहे. ठाकूर कटपीसच्या समोर. पण दुर्दैव असं की ते फक्त घरी घेऊन जाण्यास डबे देतात. तिकडे बसून जेवायची सोय नाही!! आणि हे त्यांच्या कार्डावर दिलं नसल्याने, तिकडे जाईस तोवर ह्याची कल्पना नव्हती. आता झाली का पंचाईत? जेवण बांधून येथे पवईला येई पर्यंत ते पूर्णपणे थंडं झालं असतं आणि थंडं मासा काय खायची इच्छा नव्हती. मग वाटलं की आजचा बेत काही पूर्ण होत नाही. म्हणून आम्ही पुन्हा दादर स्टेशनच्या दिशेने वळलो. तोच कोहिनूर मिलला लागून असलेल्या पदपथावरून दादर स्टेशनच्या दिशेने जाताना हॉटेल गोमान्तक लॉजिंग-बोर्डिंग दिसलं. ते पाहिल्यावर म्हण्टलं की आज आपल्या नशीबात मत्स्याहार आहेच. असा विचार करून आत शिरलो. जागा पण लगेच मिळाली. पहिल्यांदाच आलेलो असल्याने, काय मागवायचे हे कळत नव्हते. म्हणजे इथला चांगला पदार्थ कुठला, अथवा ह्या हॉटेलची खासियत काय, हे काहीच माहित नव्हतं. अशा वेळेला, आई-बाबांचा हुकूमी एक्का वापरला. थाळी मागवली!! विचारलं, पापलेट थाळी आहे का? वेटर हो म्हणाला. मग काय, पापलेट थाळीची ऑर्डर दिली. आणि ऑर्डर देते वेळेस लक्षात होतं की कोकणात चपात्यांपेक्षा "वडे" केव्हाही चांगले. म्हणून त्याला सांगितलं की थाळी मधे चपाती नको, वडे दे. हॉटेल मधली सेवा तत्पर आहे. खाद्यपदार्थांचे दर सुद्धा वाजवी आहेत. एवढ्या मोक्याच्या ठिकाणी असून देखील दर सर्वसामान्यांना परवडण्याजोगे आहेत. फक्त आतील विद्युत रोशणाई जरा सुधारली तर बरं होईल. वेटर सुद्धा संध्याकाळी नऊ वाजता प्रसन्न चेहर्याने वावरत होते. माश्याची थाळी, वड्यां सकट, १५ मिनिटात आली!! ४ वडे, एक मध्यम आकारचं पापलेट, कालवण, कांदा-लिंबू, सोल-कढी आणि भात. मी पण जोरात ताव मारला. भूक तर लागलीच होती. पापलेट चवीला चांगलं होतं. मुळात मासा चांगला होता. सोल-कढी सुद्धा चांगली होती. आणि मुख्य म्हणजे हे सगळं वट्ट ११८ रुपयात. एवढं जेवल्यावर दादर स्टेशनला आलो. लाजरी शेजारच्या पानाच्या टपरीवर पान खाल्लं. आणि फलाटावर येऊन कुल्फी खाल्ली. तेवढ्यात ठाणे लोकल आली. ती रिकामी पाहून चटकन त्यात उडी मारून घरच्या प्रवासाला लागलो.
मंगळवार, मे १८, २०१०
ब्लॉग लेआऊट आणि ब्लॉग
सगळ्यात पहिली गोष्ट. अशी एखादी टेम्पलेट घ्यावी ज्यात आपला मजकूर ठळक पणे दिसून येईल. टेम्पलेट निवडताना ह्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात- एकतर ब्लॉगच्या मजकुराच्या फॉन्टचा रंग काय असेल? किंवा काय ठेवायचा. त्यासाठी मजकूरा मागची बॅकग्राऊंड कोणत्या रंगाची आहे हे ठरवा. उगीच "स्टाईल" मारण्यासाठी भडक रंग किंवा विचित्र रंग-संगती निवडू नये. ब्लॉगची बॅकग्राऊंड आणि मजकूर, ह्यांचे रंग काँट्रासटिंग हवे. म्हणजे मजकूर हा बॅकग्राऊंड वर उठून दिसला पाहिजे. त्याच्या उलट नव्हे.
दुसरा मुद्दा. ब्लॉग टेम्पलेट मधले "साईड-बार". अनेक टेम्पलेट २-कॉलम, किंवा ३-कॉलमचे असतात. त्यातला सगळ्यात मोठा कॉलम मजकूरासाठी असतो आणि दुसरा किंवा तिसरा अतिरिक्त माहिती साठी असतो. ह्या कॉलम्सचा वापर केवळ त्यासाठीच करावा. तुमच्या स्क्रीनची ५०% पेक्षा अधिक जागा मजकुराच्या कॉलमने व्यापली पाहिजे. उरलेल्या जागेत हे बाकीचे कॉलम आले पाहिजेत. आणि मुख्य कॉलम आणि अतिरिक्त कॉलम मधला फरक जाणवला पाहिजे. नाहीतर वाचणार्याचा गोंधळ उडून ब्लॉग मधलं स्वारस्य निघून जाण्याची शक्यता असते.
अनेकजण ह्या अतिरिक्त कॉलम्स मधे अनेक प्रकारचे विजेट्स टाकतात. विजेट्स आकर्षक असले तरी त्यांचा अतिरेक करू नये. वाचक विजेट्स कडे नव्हे, आपल्या लेखनाकडे बघत असतात. विजेट्स मुळे त्यांना लेख शोधायला वेळ लागू नये. किंवा विजेट्स आणि जाहिरातींच्या मधे लेख झाकला जाऊ नये. मुख्यत: अतिरिक्त कॉलम्स मधे आपल्या विषयी (सांगण्यासारखं असेल तर) थोडसं, ब्लॉग आर्कायिव्ह, आपण जर कुठल्या (कायद्याने मान्य असलेल्या) संघटनेचे किंवा नेटवरील फोरमचे सदस्य असलो तर त्यांचे बोध चिन्ह आणि फार तर एक-दोन अजून विजेट्स असावीत. तुम्ही ब्लॉग वर जर जाहिराती टाकणार असाल, तर ते शक्यतो मजकुराच्या खालच्या भागात टाकावेत. साईड बार मधे टाकू नयेत, नाहीतर त्यांच्या ऍनिमेशन्समुळे वाचकाचं लक्ष विचलित होतं. लक्षात ठेवा, आपला ब्लॉग वाचला जातो तो आपल्या लेखांमुळे, जाहिरातींमुळे नाही.
आणि सगळ्यात शेवटचं, पण तितकंच महत्वाचं म्हणजे भाषा. भाषा ही नेहमी शुद्ध असावी. अशुद्ध भाषेमुळे मन चल-बिचल होतं आणि पुढचा मजकुर वाचायची इच्छा निघून जाते. जर ब्लॉग विश्वात आपल्याला आपलं स्थान निर्माण करायचं असेल तर भाषेची काळजी घेतलीच पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा होत नाही, की प्रत्येक इंग्रजी शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द वापरलाच पाहिजे. तुम्ही साहित्य लिहित असाल, तर ठीक आहे, पण दैनंदिन वाचनासाठी लिहित असाल, तर बोली भाषेतले शब्द वापरावे. म्हणजे उगीच कॉम्प्युटरला संगणक म्हणत सुटू नये.
असो, तर शेवटी काय, आपला ब्लॉग एकदम सुटसुटीत असावा. उगीच मुंबईच्या लोकल सारखी त्यावर इतर शुल्लक माहितीची गर्दी नसावी आणि सरळ-सोप्या भाषेत लिहून तो अधिक-अधिक वाचकांना समजेल ह्याचा प्रयत्न करावा.
सोमवार, मे १०, २०१०
प्रकाशन हक्क (कॉपीराईट) संबंधी थोडंसं
आनंद घारे काका यांनी एक अत्यंत कळीचा प्रश्न समोर ठेवला. की ई-मेल मधून फॉरवर्ड म्हणून आलेले, किंवा इंटरनेटवर उपलब्ध असलेली छायाचित्र आपण आपल्या ब्लॉग वर वापरू शकतो का? वापरली तर त्या चित्रांच्या प्रकाशन हक्कांचं काय? हा प्रश्न मांडल्यावर असं लक्षात आलं की अनेक ब्लॉगर्सना कॉपीराईट्स संबंधी फार धूसर माहिती आहे. नेटभेट वर ह्या विषयावर लेख आलेले आहेत, पण म्हण्टलं की आपण आपल्या परीने हा विषय मांडावा.
आपल्याला जर प्रकाशन हक्क भंग करण्याच्या धोक्यापासून दूर रहायचं असेल, तर एक नियम लक्षात ठेवा. जर कुठल्याही छायाचित्रा सोबत प्रकाशन हक्कां बद्दल काहीच लिहिलं नसेल, तर आपण सर्व हक्क छायाचित्राच्या मालका कडे राखीव आहेत, असं समजावं. त्याचं कारण असं की जर प्रकाशन हक्कां बद्दल मनात द्विधा असेल, तर आपण आपल्या दृष्टीने सुरक्षित बाजू घ्यावी. न जाणो, ह्या माहिती जालाच्या कुठल्या कोपर्यातून तो छायाचित्रकार तुम्हाला शोधून काढेल आणि कायदेशीर कारवाईची धमकी देईल. दुसरं असं, की परवानगी शिवाय त्याचं छायाचित्र वापरणं हे सुद्धा तात्विक दृष्टिकोनातून चुकीचं आहे. अहो, साधं आपलं पेन कुणी न विचारता घेतलं तरी आपली चिडचिड होते!! अनेकजण म्हणतात की छायाचित्र टाकून त्याच्या सोबत आपण जर लिहिलं की हे अमक्या-अमक्या च्या वेबसाईट वरून घेतलं आहे, किंवा हे छायाचित्र अमक्याचं आहे, असं लिहिलं आणि त्याचा दुवा दिला, तर सर्वसाधारण पणे कुणीही आक्षेप घेत नाही. पण हे गृहीत धरणं चुकीचं आहे. ते छायाचित्र तयार करण्यामागे किती कष्ट लागले असतील हे आपल्याला थोडीच माहित आहे? म्हणून हे कधीही गृहीत धरू नका.
मग ह्याच्यातून मार्ग काय? जर आपल्याला छायाचित्र वापरणे अनिवार्य असेल, तर काय करता येईल? त्यावर महेंद्र काकांनी सुचवलेला एक उपाय म्हणजे, गुगलवर कॉपीराईट फ्री छायाचित्रांचा शोध घेता येतो आणि ती वापरता येतात. अशा छायाचित्रांना रॉयल्टी फ्री छायाचित्रं असे ही म्हणतात. दुसरं असं की flickr वर किंवा picasa वर Creative Commons License अंतर्गत प्रकाशीत केलेली छायाचित्र शोधावी. Creative Commons (CC) License, हे प्रकाशकाला आणि वापरकरत्यांना अतिशय सोप्या भाषेत समजेल असा परवाना आहे. ह्या परवान्याच्या अंतर्गत आपण आपले छायाचित्र अथवा लेख अथवा अन्य कुठलीही प्रकाशन योग्य गोष्ट आपल्याला पहिजे त्या रितीने प्रकाशीत करू शकतो. उदाहरणार्थ, जर मला माझ्या छायाचित्राचा मुक्त वापर करण्याची मुभा द्यायची असेल, तर मी CCचं Attribute परवाना वापरू शकतो. पण जर मला असं वाटलं की हे छायाचित्र इतरांनी स्वत: पैसे कमवण्यासाठी वापरू नये, किंवा ह्या छायाचित्रा मधे कोणताही बदल न करता ते आहे तसं वापरावं, तर मी त्यांचा Attribute-Non Commercial-No Derivatives परवाना वापरू शकतो. असे एकंदरीत ८-९ परवाने CCच्या अंतर्गत उपलब्ध आहेत. शिवाय कुठल्याही परवान्यावर सूट द्यायची मुभा प्रकाशका कडे आहे. त्यामुळे ती परवानगी मिळवीणे फार कठीण नाही. म्हणूनच हल्ली CC परवान्याच्या अंतर्गत आपले लेख, छायाचित्र, इ. प्रसिद्ध करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.
असो, एवढं सगळं असूनही लोक CC परवाना पाळतीलच असं नाही. त्यातही 'मी वापरलं तर कुणाला कळतय', ही भावना असणारच. पण आपण जर एका सुजाण, सुसंस्कृत समाजाचे नागरिक आहोत, तर प्रकाशकाच्या मालकी कडे काना-डोळा करून कसं चालेल? पण लक्षात ठेवा, माहिती जालावर कुठलीही गोष्ट गृहीत धरणे धोकादायक आहे. टायगर वुड्स कसा फसला, हे विसरू नका. अर्थात तो माहिती जालावर फसला नाही, पण माहिती तंत्रज्ञानाच्या धोक्यांना दुर्लक्षित केल्यामुळे फसला. आपल्याला त्रास, मनस्ताप, इ. होईल अशी कुठलीही गोष्ट करू नका.
गुरुवार, मे ०६, २०१०
सन्माननीय कुमार केतकर यांस
आपला लोकसत्तेतला अग्रलेख वाचला. शीर्षक पण भन्नाट आहे.
महाराष्ट्रची 'वाट'चाल : मुंबई मिळाली, महाराष्ट्र हरवला!आपण महाराष्ट्राच्या चुकांचा एकदम पंचनामाच तयार केला आहे. मराठी रंगभूमीने, साहित्याने, कलाक्षेत्राने उरलेल्या भारतावर काहीच प्रभाव पाडला नाही, असा तुमचा तर्क आहे. ह्या उलट बंगाली आणि हिंदी साहित्याने आणि कलाक्षेत्राने आपली एक वेगळी छाप पाडली, असं तुमचं म्हणणं आहे. साहित्यासाठी उदाहरणं देताना तुम्ही रविन्द्रनाथांचं उदाहरण देता. पण रविन्द्रनाथ हे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात यायच्या आधी होते, हे विसरलात. हिंदी भाषेतील लेखकांमधे तुम्ही प्रेमचंदचं उदाहरण देता, इंग्रजीत मुल्कराज आनंद. पण ह्या सर्वांचा कार्यकाळ महाराष्ट्र राज्य निर्माण होण्या आधीचा आहे, हे तुम्ही विसरता. मुल्कराज आनंद जरी स्वातंत्र्यानंतर हयात होते, तरी त्यांचं साहित्य लेखन थांबलं होतं.
ह्या उलट पु.ल. हे राज्य स्तरावरील एकमेव साहित्यिक होते, की ज्यांच्या सभांमुळे तुमच्या लाडक्या कॉंग्रेस पक्षाचे खासदार पडले आणि जनता पक्षाचे खासदार निवडून आले. स्वातंत्र्यानंतर आणि संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापने नंतर एक महाश्वेता देवी वगळता असे किती साहित्यिक आहेत, ज्यांच्या भाषणांनी निवडणुकीची दिशा बदलू शकते?
राजकारणात तुम्ही जे म्हणता ते सत्य असेलही. पहिले, सी.डी. देशमुख आणि त्या नंतर यशवंतराव चव्हाण ह्यांच्या शिवाय केंद्रात एकही प्रभावी नेता महाराष्ट्रातून झाला नाही. पण सुनील प्रभू आणि मनोहर जोशींचे कार्य आपण एकदम कचर्यात टाकून दिले! त्या दोघांच्या कामाला सर्व स्तरावरून प्रशंसा मिळाली होती, हे विसरलात.
महाराष्ट्राचा इतिहास शिवाजी महाराज आणि पेशवे ह्यांच्या बरोबर संपतो, असं तुम्ही लिहिलं आहे. पण ह्याच महाराष्ट्रात लोकमान्य टिळक आणि आगरकरां सारखे स्वातंत्र्य सैनिक आणि समाज सुधारक तयार झाले. सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके सुद्धा महाराष्ट्रातले. चाफेकर बंधू, सावरकर बंधू, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, हे सगळे महाराष्ट्रातले. ह्यांच्या सारखे नेते इतर कुठल्या राज्याला लाभले का? तुम्ही "सिमबॉलिझम" वर भर देताय, म्हणून मी पण तेच करतोय. नाहीतर अजून खोल जाऊन तर्क-वितर्क करता येईल.
हिंदी चित्रपट क्षेत्रात सुद्धा तेच. तुम्ही ’उत्तरे’ कडील लोकांचे वर्चस्व आहे असं म्हणता. पण सोईस्कर पणे लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर ह्यांना विसरता. तनुजा आणि शोभना समर्थ ह्यांना पण तुमच्या मते काहीही किम्मत नाही. अमोल पालेकर, आणि एकेकाळी सगळ्या हृदयांची धक-धक उडवणारी माधुरी दिक्षित हे मराठीच आहेत. मराठी भाषेतील दोन चित्रपट ऑस्करच्या स्पर्धे साठी निवडले गेले आहेत. हिंदी वगळता इतर कुठल्याही भाषेतील भारतीय चित्रपट ऑस्करला गेले नाहीत, हे तुम्ही विसरलात.
ह्या सगळ्या बाबींकडे लक्ष देऊन माहिती मिळवताना तुमची इतकी दमछाक झाली की क्रीडा क्षेत्राकडे तुमचे दुर्लक्षच झाले. आणि ह्या क्षेत्रातले महाराष्ट्राचे योगदान (किंवा त्याचा अभाव) नमूद करायचं राहून गेलं. तर तुम्हाला आठवण करून देतो. ऑल्मपिक स्पर्धेत व्यक्तिगत खेळां मधे आज पर्यंत भारताला केवळ पाच पदकं मिळाली आहेत. पैकी पहिलं, महाराष्ट्राच्याच खाशाबा जाधंवांनी मिळवलं होतं. अंजली वेदपाठक, अभिजीत कुंटे, भाग्यश्री ठिपसे, प्रवीण ठिपसे, हे मराठीच आहेत. आणि क्रिकेट बद्दल काय बोलावं? माधव मंत्री, सुनील गावस्कर, सचीन तेंडुलकर, विजय हजारे, विजय मांजरेकर, हृषिकेश कानिटकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, अजीत आगरकर, जहीर खान, हे अस्सल मराठीच आहेत. ह्यांच्या योगदानाचा उल्लेख करावासा वाटला नाही तुम्हाला?
तुम्ही म्हणता तसं महाराष्ट्रात आपल्या मना सारख्या सर्वच गोष्टी घडल्या नसतील. पण सर्व काही नकारार्थी नेण्या सारखे सुद्धा घडलं नाही. पण एखाद्याला केवळ उणीवाच काढायच्या असतील, तर असे इंग्लंड-अमेरिकेत गेलेले अनेक भारतीय-मुळाचे लोक आहेत, जे भारत-निंदेला आपले जीवित कार्य मानतात. तुम्हालाही त्यांच्यात सामील व्ह्यायचे आहे का? बरं एवढा सगळा उणीवांचा पाढा वाचून दाखवल्यावर त्यातून बाहे पडायचा मार्ग काय, ह्या विषयी एकही अक्षर लिहिलं नाहीत? हे म्हणजे डॉक्टरने आजाराची सगळी कारणं सांगून औषधं न देता पेशंटला घालवून देण्या सारखे झाले. तर सांगायचा मुद्दा असा, की जरी आम्ही मराठी लोकं काही क्षेत्रात मागे पडलो असलो, तरी तुम्ही म्हणता तसं सगळं संपल्या सारखं नाही. आणि तुमचे असे नकारार्थक लेख वाचून कृपया आमच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचवू नका.
सोमवार, एप्रिल २६, २०१०
आंबा इलो रे बा!!
"होय हो, देतोय. सगळ्यांच्या द्यायच्या आहेत." ट्रॅव्हल्स वाला पुन्हा सांगतो. बसच्या अवती-भवती सगळे राणे, सामंत, परब, साळसकर इ. अस्सल मालवण भागातील लोकं जमलेली. आधीच गाडीला उशीर झाल्याने ते पण जरा कंटाळलेले होते. पण तरीही कुठेही गोंधळ गडबड दिसत नव्हती. कोकणी माणूस त्या बाबतीत शिस्त पाळतो. तर, चालक आणि वाहक मंडळी पेट्या उतरवून देण्यात गर्क होते. तिकडे नेहमीचीच बरीच मंडळी आली असल्याने, ट्रॅवल्हस वाला मधूनच "राणे, तुमची पेटी आली, बाजूला घ्या." मधूनच सामंत-परब पैकी एक जण हमालाला "अरे जरा पेटी नीट लाव, माका नाव दिसत नाही," असं सांगून पेट्यांची जुळवा-जुळव करून घेत होते. जवळ-जवळ शंभर-सव्वाशे पेट्या उतरवून घेतल्यावर, पार्सलवाला ओरडतो "चला साहेब, तुमची पेटी मिळाली का?"
तिकडे बस चालक बस पुन्हा डेपो मधे नेण्यासाठी उत्सुक असतो. त्या उत्साहात, तो रिव्हर्स घेताना एका टॅक्सीला जवळ-जवळ ठोकतोच. वाहक बसवर एक जोरात थाप मारून ओरडतो "थांबरे, नाहीतर घालशीला त्याचा अंगावर." टॅक्सीवाल्याला तिकडून लवकर-लवकर घालवून बस रिव्हर्स जाते आणि थोड्या वेळात सिग्नलला उजवीकडे वळून दिसेनाशी होते. वेळेत पोहोचलेले राणे-परब-साळसकर मंडळी आपापल्या पेट्या उचलून निघतात. शेवटी तिकडे उरतो फक्त पार्सल-वाला आणि त्याचा मदतनीस. आपल्याला खायला न मिळणार्या आंब्यांची राखण करत. उरलेले मालवणकर, घरी कालवण करून कधी येतात, ह्याची वाट बघत.
गुरुवार, एप्रिल १५, २०१०
माओवाद रोखण्यास काय करता येईल?
ह्या सगळ्याचा मूळ प्रश्न असा की माणसं कायद्याने दिलेला मार्ग सोडून बेकायदेशीर मार्गाकडे का वळतात? हे फक्त गरीब किंवा मागासलेल्या भागांच्या बाबतीत घडतं असं नाही. जुन्या काळातले गाजलेले चित्रपट आठवा. दीवार, सामना, इ. त्यात स्मगलर असलेली लोकं बहुतांश वेळा सोन्याचं स्मगलींग करताना आढळतात. का? सोनं म्हणजे काही हानीकारक वस्तू नव्हे, चरस, ब्राऊन शुगर सारखी. की ज्याच्या खरेदी-विक्रीवर सरकार बंधन घालेल. पण त्या काळात कायदेशीर मार्गाने सोने घेण्यास अनेक अडचणी होत्या, निर्बंध होते आणि जाचक कर होते. १९४७ ते साधारण ७०-८० च्या दशकापर्यंत तर सोन्याच्या आयातीवर बंदीच होती!! मग, ज्यांना सोने पाहिजे असेल, त्यांनी कोणाकडे वळावे? कायदेशीर मार्गाने मिळत नाही, असं दिसल्यावर लोकं बेकायदेशीर मार्गांकडे वळली. म्हणूनच स्मगलरांचे फावले. १९९१ पर्यंत तर जवळ-जवळ सगळे सोने स्मगलिंग मार्फत यायचे. पण १९९१ मधे आयाती वरचे निर्बंध उठल्यावर आणि अनेक जाचक कर कमी केल्यावर सोन्याचे स्मगलिंग कमी झाले आणि सगळ्यांनी कायदेशीर मार्गाने सोने विकत घेणे पसंत केले. बोध काय, की सरकारने सोने कायदेशीर मार्गाने उपलब्ध करून दिल्याने स्मगलरांचा "बिसनेस मॉडेल"वरच आघात केला होता. उगाच बेकायदेशीर रित्या सोनं घेऊन कुणालाही अडचणीत सापडायची इच्छा नव्हती. सरकारने सोन्याची खरेदी-विक्री सुलभ केल्याने सोन्याचं स्मगलिंग अगदी नगण्य झालंय.
ह्याचं समांतर घेऊन आपण समजलं पाहिजे की माणसं माओवाद्यांकडे का वळतात? विकासाचा अभाव, शेतीमालाला पुरेसा भाव न मिळणे, दुर्गम भागातील सरकारी अधिकार्यांची उदासीनता, पोलीसांचा छळ, इ. गोष्टींना कंटाळून हे गावकरी सूडाग्नीने पेटून उठतात. त्यांच्या अल्पशिक्षणाचा फायदा हे माओवादी घेतात आणि त्यांना आपल्यात सामील करतात. त्यांना माओवादी होण्यापासून रोखायचं असेल, तर माओवाद्यांचं उच्चाटन करून नाही चालणार. जसं सोन्याचं स्मगलिंग, सरकारने, कायदेशीर मार्गाने सोनं उपलब्ध करून कमी केलं, तसंच ह्या "रेड कॉरीडोर" मधे सरकारी यंत्रणेनं जनहिताची कार्य करून माओवादाचं आकर्षण कमी केलं पाहिजे. विकास म्हणजे केवळ कारखाने उभारणे नव्हे, किंवा जमीनी ताब्यात घेऊन धरणे, वीज प्रकल्प बांधणे नव्हे, तर तिथल्या लोकांच्या संस्कृतीशी जुळवून घेणारा आणि त्यांच्या राहणीमानाला साजेलसा पण आर्थिक दृष्ट्या त्यांना सक्षम बनवणारा कार्यक्रम हवा. उदाहरणार्थ, शेतीमालाला चांगला भाव मिळून, तो व्यापार्याच्या पदरी न जाता शेतकर्याच्या पदरी जावा. किंवा त्या भागातील जी पारंपारिक उत्पादनं आहेत, त्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी. त्यांच्या भागात उत्तम प्राथमिक आरोग्य सेवा, दळण-वळणाची साधनं, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने कार्यक्रम राबले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदिवास्यांना त्यांच्या जमीनीवर आश्रितां सारखं न वागवता त्यांना त्यांचे हक्क दिले पाहिजेत.
ह्या सगळ्या गोष्टी एका रात्रीत होणं शक्य नाही. शिवाय असले कार्यक्रम राबवताना पोलीसां मार्फत मासोवाद्यांचं नि:शस्त्रीकरण चालू ठेवावं, पण केवळ शस्त्राने माओवाद्यांना नमवता येईल, ह्या भ्रमात कोणिही राहू नये. ब्रिटन सारख्या महासत्तेला सुद्धा गांधीजीं सारख्या नि:शस्त्र माणसाला आपल्या शस्त्रांनी नमवता आलं नाही. तेथे सशस्त्र माओवाद्यांचं काय घेऊन बसलात?
सोमवार, एप्रिल ०५, २०१०
द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा
ह्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अमीश ह्यांच्या "द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा" मधे. वास्तविक मेलुहा एक प्राचीन भारतातील उत्तर-पश्चीमेकडील (बहुतेक नैऋत्य, आपला मराठीतील दिशांचा खूप गोंधळ होतो, बुवा) एक प्रगत राज्य होतं. लोहथल, मोहन-जो-दारो, हडप्पा ही मेलुहातील शहरं. तर अमीश ह्यांनी इतिहास आणि पुराण कथा, ह्यांचा मेळ घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, हे पुस्तक इतिहास आणि दंत-कथा ह्यांच्या आधारावर लिहिले आहे.
कथेची सुरुवात होते कैलासातील मानसरोवराजवळ. दिनचर्या आटोपून शिव, त्यांचे गण आणि उरलेला कबीला संध्याकाळी थोडी विश्रांती घेत असताना पाकृती समाजातील लोकं त्यांच्यावर हल्ला करतात. ह्या पाकृती कबील्याला मानसरोवरावर स्वत:चं वर्चस्व स्थापित करायचं असतं. त्या दिवशी मेलुहातील काही सैनिक वाट हरवून शिवाच्या गणांच्या ताब्यात सापडलेले असतात. त्यांच्या सेनापतीचे नाव असते नंदी. तर हे सैनिक शिवाच्या गणांबरोबर पाकृती कबील्याच्या सैनिकांचा हल्ला परतवून लावतात. शिव ह्या रोजच्या युद्धाला पार कंटाळतो. त्यातच नंदी त्याच्या समोर एक प्रस्ताव मांडतो. तू तुझ्या कबील्या सोबत जर मेलुहाला आलास, तर ते इथल्यापेक्षा चांगलं आयुष्य जगतील. रोजच्या मारामारीला कंटाळलेला शिव कबील्याबरोबर मानसरोवर सोडून मेलुहाला येतो.
तिथे पहिल्या दिवशी त्याच्या कबील्याला औषध पाजलं जातं आणि त्यांना एका तात्पुरत्या निवासस्थानी ठेवण्यात येतं "क्वॉरंटाईन" मधे. पहिल्या रात्रीच शिवाचा अख्खा कबीला तापाने फणफणायला लागतो. केवळ शिवाला ताप येत नाही, फक्त तो घामाने डबडबून जातो. मेलुहातील वैद्य तातडीने रुग्णांची सुश्रुशा करायला लागतात. त्यांची मुख्य वैद्य शिवाला आंघोळ करायला सांगते. आंघोळ करून शिव येतो, तर त्याला आपला घसा एकदम थंड झाल्या सारखा जाणवतो. त्याला पाहून मुख्य वैद्य आश्चर्याने जवळ-जवळ बेशुद्ध होते. कारण विचारल्यास ती त्याला म्हणते, "हे प्रभू! आपण प्रकटलात!! आमचा उद्धार झाला!!"
तिचं असं बेशुद्ध पडण्याचं कारण काय? मेलुहा मधे ज्या तारणहारा बद्दल दंतकथा प्रसिद्ध आहेत, त्यात शिव बसतो का? आणि बसला तर तो नियती ने त्याच्या गळ्यात घातलेल्या कार्याला पूर्णत्वास नेण्यास तो तयार होईल का? अमीशने अतीशय सुरेख रित्या शिवाची ही कहाणी लिहिलेली आहे. शिव सर्वसाधारण माणूस असल्याने माणसाच्या सगळ्या प्रवृत्त्या त्याच्या आढळतात. उदाहरणार्थ, पुण्यवान कोण, पापी कोण, ह्याच्या व्याख्या तो स्वत: जाणून घेत नाही तर मेलुही प्रजेत रूढ झालेल्या व्याख्यांवर विश्वास ठेवतो. पण त्याला प्रत्येक टप्प्यावर जाणवतं की जे दिसतं तसं नसतं. त्यामुळे तो व्यथित होतो. त्याची ही व्यथा दूर करणारे आणि त्याला त्याच्या उद्देश्याच्या जवळ घेऊन जाणारे कोण आहेत? ह्या सगळ्या कार्या मधे सतीचा, नंदीचा आणि गणांचा काय सहभाग आहे? त्यांची भूमीका सुद्धा एकदम सुरेख पद्धतीने मांडली आहे!
द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा हे शिवावरील त्रिखंडीय पुस्तकांपैकी पहिलं खंड आहे. ह्यातला दुसरा खंड सुद्धा लवकरच बाजारात येत आहे. आणि हे पुस्तक वाचल्यावर दुसर्या खंडाच्या आगमनाची उत्कंठता नक्कीच वाढेल!