नमस्कार,
आपला लोकसत्तेतला
अग्रलेख वाचला. शीर्षक पण भन्नाट आहे.
महाराष्ट्रची 'वाट'चाल : मुंबई मिळाली, महाराष्ट्र हरवला!
आपण महाराष्ट्राच्या चुकांचा एकदम पंचनामाच तयार केला आहे. मराठी रंगभूमीने, साहित्याने, कलाक्षेत्राने उरलेल्या भारतावर काहीच प्रभाव पाडला नाही, असा तुमचा तर्क आहे. ह्या उलट बंगाली आणि हिंदी साहित्याने आणि कलाक्षेत्राने आपली एक वेगळी छाप पाडली, असं तुमचं म्हणणं आहे. साहित्यासाठी उदाहरणं देताना तुम्ही रविन्द्रनाथांचं उदाहरण देता. पण रविन्द्रनाथ हे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात यायच्या आधी होते, हे विसरलात. हिंदी भाषेतील लेखकांमधे तुम्ही प्रेमचंदचं उदाहरण देता, इंग्रजीत मुल्कराज आनंद. पण ह्या सर्वांचा कार्यकाळ महाराष्ट्र राज्य निर्माण होण्या आधीचा आहे, हे तुम्ही विसरता. मुल्कराज आनंद जरी स्वातंत्र्यानंतर हयात होते, तरी त्यांचं साहित्य लेखन थांबलं होतं.
ह्या उलट पु.ल. हे राज्य स्तरावरील एकमेव साहित्यिक होते, की ज्यांच्या सभांमुळे तुमच्या लाडक्या कॉंग्रेस पक्षाचे खासदार पडले आणि जनता पक्षाचे खासदार निवडून आले. स्वातंत्र्यानंतर आणि संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापने नंतर एक महाश्वेता देवी वगळता असे किती साहित्यिक आहेत, ज्यांच्या भाषणांनी निवडणुकीची दिशा बदलू शकते?
राजकारणात तुम्ही जे म्हणता ते सत्य असेलही. पहिले, सी.डी. देशमुख आणि त्या नंतर यशवंतराव चव्हाण ह्यांच्या शिवाय केंद्रात एकही प्रभावी नेता महाराष्ट्रातून झाला नाही. पण सुनील प्रभू आणि मनोहर जोशींचे कार्य आपण एकदम कचर्यात टाकून दिले! त्या दोघांच्या कामाला सर्व स्तरावरून प्रशंसा मिळाली होती, हे विसरलात.
महाराष्ट्राचा इतिहास शिवाजी महाराज आणि पेशवे ह्यांच्या बरोबर संपतो, असं तुम्ही लिहिलं आहे. पण ह्याच महाराष्ट्रात लोकमान्य टिळक आणि आगरकरां सारखे स्वातंत्र्य सैनिक आणि समाज सुधारक तयार झाले. सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके सुद्धा महाराष्ट्रातले. चाफेकर बंधू, सावरकर बंधू, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, हे सगळे महाराष्ट्रातले. ह्यांच्या सारखे नेते इतर कुठल्या राज्याला लाभले का? तुम्ही "सिमबॉलिझम" वर भर देताय, म्हणून मी पण तेच करतोय. नाहीतर अजून खोल जाऊन तर्क-वितर्क करता येईल.
हिंदी चित्रपट क्षेत्रात सुद्धा तेच. तुम्ही ’उत्तरे’ कडील लोकांचे वर्चस्व आहे असं म्हणता. पण सोईस्कर पणे लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर ह्यांना विसरता. तनुजा आणि शोभना समर्थ ह्यांना पण तुमच्या मते काहीही किम्मत नाही. अमोल पालेकर, आणि एकेकाळी सगळ्या हृदयांची धक-धक उडवणारी माधुरी दिक्षित हे मराठीच आहेत. मराठी भाषेतील दोन चित्रपट ऑस्करच्या स्पर्धे साठी निवडले गेले आहेत. हिंदी वगळता इतर कुठल्याही भाषेतील भारतीय चित्रपट ऑस्करला गेले नाहीत, हे तुम्ही विसरलात.
ह्या सगळ्या बाबींकडे लक्ष देऊन माहिती मिळवताना तुमची इतकी दमछाक झाली की क्रीडा क्षेत्राकडे तुमचे दुर्लक्षच झाले. आणि ह्या क्षेत्रातले महाराष्ट्राचे योगदान (किंवा त्याचा अभाव) नमूद करायचं राहून गेलं. तर तुम्हाला आठवण करून देतो. ऑल्मपिक स्पर्धेत व्यक्तिगत खेळां मधे आज पर्यंत भारताला केवळ पाच पदकं मिळाली आहेत. पैकी पहिलं, महाराष्ट्राच्याच खाशाबा जाधंवांनी मिळवलं होतं. अंजली वेदपाठक, अभिजीत कुंटे, भाग्यश्री ठिपसे, प्रवीण ठिपसे, हे मराठीच आहेत. आणि क्रिकेट बद्दल काय बोलावं? माधव मंत्री, सुनील गावस्कर, सचीन तेंडुलकर, विजय हजारे, विजय मांजरेकर, हृषिकेश कानिटकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, अजीत आगरकर, जहीर खान, हे अस्सल मराठीच आहेत. ह्यांच्या योगदानाचा उल्लेख करावासा वाटला नाही तुम्हाला?
तुम्ही म्हणता तसं महाराष्ट्रात आपल्या मना सारख्या सर्वच गोष्टी घडल्या नसतील. पण सर्व काही नकारार्थी नेण्या सारखे सुद्धा घडलं नाही. पण एखाद्याला केवळ उणीवाच काढायच्या असतील, तर असे इंग्लंड-अमेरिकेत गेलेले अनेक भारतीय-मुळाचे लोक आहेत, जे भारत-निंदेला आपले जीवित कार्य मानतात. तुम्हालाही त्यांच्यात सामील व्ह्यायचे आहे का? बरं एवढा सगळा उणीवांचा पाढा वाचून दाखवल्यावर त्यातून बाहे पडायचा मार्ग काय, ह्या विषयी एकही अक्षर लिहिलं नाहीत? हे म्हणजे डॉक्टरने आजाराची सगळी कारणं सांगून औषधं न देता पेशंटला घालवून देण्या सारखे झाले. तर सांगायचा मुद्दा असा, की जरी आम्ही मराठी लोकं काही क्षेत्रात मागे पडलो असलो, तरी तुम्ही म्हणता तसं सगळं संपल्या सारखं नाही. आणि तुमचे असे नकारार्थक लेख वाचून कृपया आमच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचवू नका.